कविता, अर्थ आणि जी. ए.

काल जी.ए.कुलकर्णी ह्यांच्या सुरुवातीच्या लेखनाचा संग्रह 'सोनपावले' हाती पडला. त्यात "मौज" साप्ताहिकाच्या २० फेब्रुवारी १९५५ च्या अंकात त्यांनी 'आणखी एक वासुकी' ह्या टोपण नावाने लिहिलेल्या एका पत्राचा समावेश आहे. त्या पत्राची पार्श्वभूमी अशी : 'मौजे'च्या ३१ ऑक्टोबर १९५४च्या अंकात वा. सु. की. या टोपण नावाने , 'अनाकलनीयाचे आकर्षण' या मथळ्याचे , मर्ढेकरांच्या काव्यविषयक भूमिकेवर टिका करणारे टिपणपर पत्र आले होते. या पत्राचा समाचार घेणारे जी. एं. चे हे पत्र. ह्यात जी. एं. नी आपले काव्यविषयक विचार मांडले आहेत. ते मनोगतींना कितपत पटतात हे जाणून घेण्याची इच्छा आहे. तसेच या विषयावर साधक-बाधक आस्वादात्मक, टिकात्मक चर्चा व्हावी अशीही इच्छा आहे. त्यासाठी जी.एं. चे ते पत्र खाली उद्धृत करत आहे.

एखाध्या कलाकृतीचा सुसंगत तार्किकार्थ नीट आकलन झाला नाही, तरी त्या कलाकृतीत सौंदर्य असू शकते का, किंवा ते जाणवणे शक्या आहे का, अशी शंका त्यात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यावर सुचलेले हे विचार : जे स्प्ष्ट आहे ते त्यामुळे मर्यादित आणि म्हणूनच पुष्कळदा अगदी निर्जीव वाटते, हे मान्य करण्याजोगे माझे मन शिष्ट बनले आहे. जीवनामध्ये अनेक भावना व अनुभव अनाकलनीय, अवर्ण्य वाटतात. त्यांना कोणत्याही शब्दाचे मखर बसवता येत नाही, हे कबूल करण्यात कोणालाही कमीपणा वाटू नये. सायंकाळी निश्चल पाण्यावर संधिप्रकाशाची अंगुली फिरू लागली, की मनाला जी हुरहूर लागते, आर्ततेचा ओलावा भासू लागतो, त्याचे कारण, त्याचा अर्थ सारे अनाकलनीय ( आणि आकर्षक)असते. बालकवींच्या 'औदुंबर' कवितेत 'पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर' ही ओळ वाचताच मन का थरारते, तृप्त होते, हे काही केल्या समजत नाही. 'Nymphs and Fairies shall dance no more' ही ओळ वाचताना या शब्दाच्या अर्थापलीकडून काही सूर येतात व मन कुसकरू लागतात, अशी ए. ई. हाऊसमन याने जी आठवण नमूद केली आहे ती काही बावळटपणाची नाही. "When waters flow, and petals fall" या शब्दांत असे काय आहे की ज्यामुळे नाजुक रेशमी हुरहुरीचे वस्त्र वाऱ्यावर थरथरू लागावे? कवितेचा अर्थ समजण्यापूर्वी तिच्या संगीताची मोहिनी आपल्यावर पडते, आणि काव्यानंदासाठी अर्थाची जरुरी आहेच असे नाही, हे कोलरिजचे शब्दही परिचित आहेत. (बालकवींच्या 'ओवाळणि घाली भाई' या कवितेचा अर्थ काय?) कथा, वर्णने, उपदेश यांमधून पार पडून सारे काव्य पलीकडे शुद्ध संगीताकडे जाण्याचा प्रयत्न करते; त्या वेळी अर्थाचे ओझेही कमी होत जाते. अर्थ पूर्णपणे जाणार नाहीत, कारण स्वरांप्रमाणे निव्वळ नाद असून अर्थ नसणारे शब्द भाषेत असत नाहीत. चित्रात रंगसंगती व काव्याला एखाद्या पर्शियन गालिच्याला जेवढा अर्थ असेल तेव्हढाच अर्थ असू शकेल. काही अनुभव सुचवता येतील, वर्णन करता येणार नाहीत.काव्यानुभव ही मुख्यत्वेकरून जाणीव आहे. माझी दहा मिनिटे देतो, दोन ओळींचा अर्थ व चार शब्दभर तात्पर्य टाक, असा भाजी मार्केटमधला तो काही सौदा नाही.
    पुष्कळदा रेडिओचा काटा फिरवता फिरवता कुठून तरी एका गाण्याचे स्वर येतात, आणि रंगीबेरंगी रिबनांप्रमाणे आठवणीभोवती गुंडाळून जातात. गाण्याचा अर्थ तर राहोच, पण त्या भाषेचे नावही पुष्कळदा माहीत नसते; ते स्वर अनेकदा स्वत:शी सुद्धा उच्चारता येत नाहीत. काय असतो त्यांचा अर्थ? परंतु काव्यातील अशा कोमल, अबोध अनुभवांनीच आयुष्यातील स्वप्ने विणली जातात. त्यांच्यापुढे दैनंदिन जीवनात वापरून वापरून निबर, निगरगट्ट किंवा मळकट, निर्लज्ज झालेल्या शब्दांच्या बंदिखान्यात आनंदाने बसणाऱ्या क्षुद्र अर्थाची पर्वा काय? अर्थ सांगण्यासाठीच जर काव्य लिहावयाचे, तर मनुष्याने काव्य कधीच लिहिले नसते. हा अर्थ गद्यात सरळ सांगता येतो. अन्यत्र श्रम वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या मानवाने लय, संगीत, यमक, उपमारूपके इत्यादी वलये उठविली तरी असती कशाला? आणि अन्वयार्थ सांगायचा आहे, तर त्यासाठी एखादा कवीच कशाला खर्ची घालायला पाहिजे? अर्थासाठी तळमळणाऱ्या लोकांकरिता मामलेदाराच्या स्वागतासाठी शाळामास्तरांनी लिहिलेल्या स्वागतगीतांची एक सस्ती आणि घरेलू आवृत्ती कोणी अर्थवाला प्रकाशक प्रसिद्ध करेल काय?
    आणि ते 'ग्रेट युनिव्हर्सल थीम्स' म्हणजे तरी काय? किती लोकांना मिळाला म्हणजे एक अनुभव 'ग्रेट युनिव्हर्सल थीम' सनातन माणुसकीचा गाभा ठरतो बरे? त्या शब्दांचा शब्दश: अर्थ घेतला तर जन्म आणि मृत्यू हे दोनच विषय 'युनिव्हर्सल' ठरतात. त्या निकषाने मग बेळगावच्या म्युनिसिपालिटीतील जननमरणाचे दप्तर जगातील महाप्रचंड महाकाव्य ठरायचे! या ठिकाणी परसात वाती वळत बसलेल्या आजीबाईपासून उजदारी गटारात खेळणाऱ्या बाब्या आणि बेबीपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन जे वाचायचे ते वाड्मय, अशी कोणी तरी केलेली सोज्वळ, बोटचेपी व भोंगळ व्याख्या मला आठवते. काव्य किंवा कला म्हणजे साऱ्यांच्या जीवनात हजर असलेल्या भावनांचा लघुतम साधारण विभाज्य नव्हे.
`    अशा तऱ्हेच्या अबोल,अबोध फुंकर टाकणाऱ्या कविता साऱ्या देशांत लिहिल्या गेल्या आहेत. चारसहा ओळींच्या चिनी भाषेतील कवितांमधील सूचक, अस्पष्ट, ओढणीतले सौंदर्य चिनी रेखाचित्रकारांच्या रेखेतील सौंदर्याप्रमाणे कुलवंत, जिवंत, व गर्भरेशमी आहे. आर्थर वेलेने भाषांतर केलेल्या कवितेतून अशी अनेक उदाहरणे दाखवता येतील.

       मला स्वत:ला जी.एं. ची ही मतं पूर्णपणे पटतात.