हिन्दी आरमाराचा उठाव - (1)

     [ माझे वडील कै. रघुनाथ भिडे १९४२ ते .. Air Force मध्ये होते. त्यांनी आत्मकथनपर 'गरुडांच्या सहवासात' नावाचे एक पुस्तक लिहिले होते. त्यातीला कांही भाग येथे उद्धृत केला आहे ] 


      सुट्टीवरून आल्यावर लक्षात आले, कँपमध्ये एक प्रकारची शिथिलता आली आहे. ओव्हरसीज प्रयाणाच्या तयारीतील उत्साह बराच कमी झाला आहे. वरुन वरून तरी विशेष काही कारण दिसत नव्हते. दैनंदिन जीवनात फरक जाणवत नव्हता.
      गोरे मायदेशी जाण्याच्या गडबडीत असल्यामुळे, त्यांचा स्थानिक कारभारात उत्साह कमी होणे साहजिकच होते. स्वभावतःच ते लोक आपल्यापेक्षा प्रत्येक बाबतीत जास्त उत्साही दिसायचे. त्यांचा नेहमीच काही ना काही उपद्व्याप चालू असे. फूटबॉल, क्रिकेट मॅच, इंटर युनिट वा इंटर स्क्वॉड्रन मॅचेस, बॉल डान्स, व्हरायटी शो, तंबोला इत्यादि अक्टिव्हिटीज ते सजीव करीत.
      रोज सकाळचे फ्लॅग हॉइस्टिंग... फ्लॅग लोअरींग हे नित्य नेमाचे कार्यक्रम म्हणजे रुटीनच, पण ते त्यांना सेरेमोनियल रूप देत असत. दोन्ही वेळेला बॅंड असेच ! त्यावेळचे संचलन महत्त्वाचे मानीत असत. युनियन जॅकला सॅल्युटिंग साठी 'किंग्ज कमिशन्ड' ऑफिसरच लागे ! .. आता या कार्यमक्रमांनाही त्यांची अनुपस्थिती जाणवू लागली. इतर हालचाली मंदावल्या त्यातलीच ही गोष्ट. पण उदाहरण म्हणून येथे नमूद !
      त्यांची युनियन जॅकबद्दलची भावना आम्हाला कोठून कळणार ! (राष्ट्रध्वजाबद्दल नाहीतरी कीती अनास्था दिसतेय हल्ली) .. पण सिनेमागृहातही ' गॉड सेव द किंग ' सुरू झालं की सारे गोरे तत्परतेने ताठ उभे राहात असत - हीच भावना युनियन जॅकबद्दल - म्हणून तर जास्तच जाणवत असे. आमची तर कशात तरी निष्ठा होती - आहे ?
      आला दिन - गेला दिन, असेच दिवस जात होते ...
      आणि मग एक दिवस.. आमच्या सर्वांच्या - म्हणजे सशस्त्र दलांतील सैनिकांच्या.. सत्त्वपरीक्षेचा दिवस अचानक उगवला.
      तिन्ही सशस्त्र दलांत स्थलसेना सर्वात सिनियर, नंतर वायुसेना आणि सर्वांत ज्युनियर म्हणजे आमचे सगळ्यात लहान भावंड - जलसेना.. नव्हे समुद्र सेना (नेव्ही) ! या जलसेनेनें समुद्रासारखेच अफाट रौद्र रूप धारण केले ! रुद्रावतारच धारण केला.
      जलसेनेतील रॅटिंग्जना (शिपाई) मिळणारी गुलामासारखी वागणूक, तुच्छतादर्शक, अपमानास्पद वागणूक, पगारातील भयंकर तफावत वगैरे अन्यायामुळे नेव्ही आरमारातील लोक भडकून उठले ! 
     महायुद्धात आमच्या दलांपैकी वायुसेना व नॅव्हल फोर्स तसे दुय्यम दर्जाचे म्हणजे सपोर्टींग रोलचीच कामगिरी. पण स्थलसेनेला खरोखरच रणांगण गाजविण्याची म्हणजे प्रमुख कामगिरी मिळाली. त्यांनी आफ्रिका युरोपच्या रणांगणावर शत्रूला धूळ चारून शौर्य आणि रणकौशल्य यांचे अभूतपूर्व प्रदर्शन केले होते !
     आमच्या सशत्र दलाच्या बळावर गोर्‍यांनी त्यांचे साम्राज्य आणि आमचे पारतंत्र्य सांभाळले होते. फोडा आणि झोडा हे तत्त्व आचरणात आणून आमच्या सशस्त्र दलातही त्यांनी उच्च-नीच भाव वाढत ठेवून, परस्परांत संशय आणि द्वेषपेरणी यशस्वी रीत्या जपल्या होत्या. ऑफिसर्स आणि अदर रॅंक्स यामधील दरी खोल आणि जास्तीत जास्त रूंद करून अंतर ठेवण्याचे यत्न, पराकाष्ठेने प्रयत्नपूर्वक साकार केले होते. भावनिक प्रसंगी, किंवा प्रसंग पडलाच तरीही अधिकारी आणि सैनिकांत ऐक्य होऊच नये म्हणून, डिसिप्लिनच्या नावाखाली, घोडेस्वार आणि घोडा, असे परस्पर संबंध ठरवून दिले होते. म्हणून आमच्याच लोकांकडून आपलेच लोक.. आपलीच माणसे दबले जात होते.
      रॅटिंग्ज म्हणजे नौदलांतील सर्वांत तळाचे सैनिक. या.. या तळागाळातील सैनिकांमध्येंत स्वत्वाचा स्फुलिंग सर्व प्रथम फुलला.
      आपल्यावरील अन्यायाला त्यांनीच वाचा फोडण्याचे धैर्य दाखविले. हे तळागाळातील सैनिक तत्कालीन कारणे दाखवीत असू देत पण ते देशभक्‍तच होते. लढा पुकारण्यामागे, स्वातंत्र्यलालसा हाच मुख्य उद्देश होता. गोरे लोक ब्रिटिशांच्या शस्त्रदलामध्ये नौदलाला अग्रस्थान व अभिमान मानित. त्यांच्या युवराजालाही नौदलात काही दिवस तरी, रॅटिंग्जपासून सर्व दर्जावर प्रत्यक्ष शिक्षण घ्यावेच लागे.. अनुभवासाठी आवश्यक म्हणून. इतकी त्यांची नौदलावर निष्ठा आहे ! त्यांच्या त्या नौदलाबरोबरीचा दर्जा, स्थान मिळालेच पाहिजे, असा या आपल्या चिमुकल्या हिंदी आरमार बाळाने हट्ट धरला होता. इतकेच नव्हे तर, रॉयल नेव्हीने न्याय दबविण्याचा प्रयत्न केला , म्हणजे नाकेबंदी केली तर त्यावरही तोफा डागण्याची धमकी दिली होती. म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या सार्वभौम अहंकारालाच जबरदस्त आव्हानच ! 
     आव्हानात्मक प्रसंगीसुद्धा नौदलातील इतर रॅंकरनी भयंकर संयम.. कौतुकास्पद मानसिक संतुलन राखले होते. राजसत्ता त्यांना बंडखोर म्हणणारच. म्हणजे राजद्रोहच. ऑफिसर्स, किंग्ज कमिशन्ड ऑफिसर्स हे तर प्रत्यक्ष राजदूत गणले जातात. त्यांचेवरी बंधने भारीच कडक, म्हणून त्यांना लढ्यात भाग घेणे न घेणे ही गोष्ट ऐच्छिक ठरवून, भाग घेण्याची इच्छा नसल्यास, त्यांनी आपल्या जागा खाली करून दूर जावे, अशी मुभा देण्यात आली होती. युद्धनौकांवरील अधिकार्‍यांना सुखरूप सुरक्षितपणे, नौका सोडून किनार्‍यावर जाऊ देण्यात आले.
     अधिकार्‍यांवर जबरदस्ती न करता, स्वेच्छेने वागण्याचे स्वातंत्र्य देऊन .. सन्मानही राखण्याचे औचित्य रॅंकर्सनी साधले.
     समुद्रात असणार्‍या सर्व नौकांवर, सर्व स्तर, जागांवर पद्धतशीरपणे माणसे नेमून, आणि इतस्ततः हिंदुस्थानच्या अफाट किनार्‍यावर दूरदूरच्या नौकांमध्ये समन्वय साधून त्यांनी एकसज्जता राखली. सुरत, मुंबई, कोचिन, मद्रास, कलकत्त्यापर्यंत दूर, एकमेकांपासून अतिदूर असणार्‍या सार्‍या युद्धनौकांत संकेत साधून, एकछत्री ताबा ठेवणे, वर्तमान धोरणात सुसूत्रता राखणे, ही सोपी गोष्ट नव्हती. तेही प्रतिकूल वातावरणात फार कठीणच. पण हे महान कार्य एका बंगाली युवक 'रॅंटींग'ने , सर्वांवर यथायोग्य ताबा ठेवून, प्रस्थापित करून दाखविले.
     युद्धनौकांवर असणार्‍या नौसैनिकांशिवायही, हजारो नौसैनिक जमिनीवर किनार्‍यावर होते, तेही लढ्यात सामील झालेच होते. नौसैनेची मुख्य ठाणी जमिनीवर असतात ना ! इतर स्थानांपेक्षा महत्त्वाची ठाणी, कॅसलरॉक-कुलाबा, फोर्ट वगैरे मुंबईजवळच होती. त्या ठाण्यातील सैनिक लढ्यात उतरले, सर्व बंधने झुगारून टाकली, स्थानिक कमांड स्थापन केल्या. नौसैनिक कॅंपसभोवती ब्रिटिश सरकारने वेढे घातले. स्थलसेनेचे सैनिक वेढ्यासाठी तैनात केले होते. नौसैनिकांना कॅम्पमध्ये कोंडून ठेवण्याची युक्‍ति होती. ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारच.. तसे केल्यास गोळ्या घालून ठार करण्याचा स्थलसेना सैनिकांना आदेश देण्यात आला होता. त्यांना (अडाणी, अज्ञानी समजत असणार्‍यांना ) कोणी कसे केव्हां समजावले.. समजूत घातली कोण जाणे ! पण त्या स्थलसैनिकांनी आपल्याच नौसैनिकांवर हत्यार उचलण्याचे नाकारले. " आम्ही शत्रूंवर हत्यारे चालवू, हिंदी भाईंवर नाही ", असे त्यांनी सांगितल्याचे कळले.
     नौसनिकांच्या मागण्या उठाव बेकायदा ठरवून सैनिकी कारवायी, कोर्ट मार्शल धमकी सरकारनें जाहीर केली. बंड ठरविले. बंड म्हणजे रिव्होल्ट.. कारवायी म्हणजे कोर्ट मार्शल. का ? सनदशीरमार्गे मागितलेल्या न्याय्य मागण्या ऐकूनही न घेण्याचे धोरण .. म्हणजे दडपशाहीच.
     त्यामुळे किनार्‍यावरील नौसैनिक पिसाळले. कॅसलरॉक कुलाबा फोर्टमधील नौदल कॅंपमधून बाहेर पडून मुंबई शहरभर पसरले. गोर्‍या लोकांची वर्चस्व स्थळे, ब्रिटीश धार्जिण्या संस्था, सत्ताकेंद्रे जेथे जेथे होती, त्या त्या ठिकाणांची मोडतोड दुर्दशा करू लागले. वस्त्या, संस्था, परधार्जिणी मनोवृत्तिदर्शक केंद्रांवरच त्यांचा रोष होता ! ब्रिटिश फौजा किंवा आरमाराने दडपशाही केली, हल्ला केला तर, समुद्र युद्धनौका किनार्‍यावरील सत्तास्थाने केंद्रावर ताबडतोब तोफा डागतील, भडिमार चालू करतील अशी धमकी उठाववाल्या नौदलांतील सैनिकांनी दिली.
(उर्वरीत पुढील भागात.. )