चिन्मयीचे नवे बाबा श्रीकांत गुप्तेंच्या रोजनिशीतले हे एक पान...
-----------------------------------------------------------------
आज अचानक चिन्मयी ची खोली आवरताना तिच्या ड्रॉवरमध्ये नंदुचे पत्र दिसले. दुसऱ्याला लिहिलेली पत्रे वाचू नयेत इतके मॅनर्स मला आहेत पण ह्या वेळेस राहवले नाही. पत्र अधाश्यासारखे वाचून काढले आणि त्याच विमनस्क स्थितीत इथे डायरी लिहायला बसलो आहे. बालपणीपासूनच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. नंदिनीच्या बाबांच्या दुकानात खेळायला जायचो ते आठवले. हिशोबातली उत्तरे बरोबर देऊन बाबांकडून गोड रेवडी वसूल करताना ही नंदिनी किती गोड दिसायची ते आठवले. एकदा तर तिने आणि मी दोघांनी एकसुरात उत्तर दिले होते पण नेमकी बरणीत एकच रेवडी होती. नंदिनीच्या गांधीवादी बाबांनी आम्हाला अतिशय हळुवार शब्दात ती अर्धी अर्धी वाटून घ्यायला सांगितली. नंदुने तिचा अर्धा भाग तिथेच खाऊन टाकला पण मी माझा वाटा मात्र अजूनही जपून ठेवला आहे.
हिशोबात चोख असणारी ही नंदु स्वतःच इतकी हिशेबी कधी झाली ते कळलेच नाही. विक्रीकर खात्यात ती आली माझ्यामुळेच. दर आठवड्याला तिला सिनेमाला हॉटेलात मी माझ्या खर्चाने घेऊन जायचो आणि त्या बदल्यात थोडीशी मागणी केली तर ही मला तिच्या बाबांकडून शिकलेले नीतिमत्तेचे डोस द्यायची. ऑफिसातल्या रोजच्या टोमण्यांना तर मी विटलोच होतो शेवटी सरळ नंदुला लग्नाची मागणी घातली तर ह्यावेळेस म्हाताऱ्या आईचे कारण बनवून मला झिडकारले. तरीही मी तिला निष्पापच समजत होतो.
माझे खरे डोळे उघडले ते तिने भायखळ्याच्या शाखेत बदली करून घेतली तेंव्हा. नंदुच्या गळाला आता नवीनं मासा लागला होता.नंदुचा हिशेब नेहमीसारखाच चोख होता. पण माझे काय? लग्नाचे वय तर कधीच निघून गेले होते. त्याच वेळेस माझ्या मित्राच्या अकाली मृत्यूमुळे एकाकी झालेल्या त्याच्या बायकोला आधार हवा होता. मी पण मनाची समजूत काढली मलातरी ह्या वयात कोण जोडीदार भेटणार आहे? आणि शेवटी आम्ही दोघांनिही लग्न करून टाकले. खरंच आता खूप बरं वाटत आहे. तरीही लग्नाला भायखळ्याच्या ऑफिसामधून आलेली खवचट कॉमेंट मी कधीही विसरणार नाही. "गुप्त्या लेका सेकंड हँड फियाट घेतलीस तो पर्यंत ठीक होते... असो लग्नास शुभेच्छा!"
जाऊदे हे सगळं लिहून मी माझ्याच जखमेवरची खपली काढत आहे. आता ती बुरसटलेली अर्धी रेवडी सुद्धा फेकून देणार आणि जीवनं पुन्हा नव्याने सुरू करणार.....