घराचा शोध

जर्मन मालकांच्या किश्शांची थोडी दहशतच मनात घेऊन आम्ही घर शोधायला सुरुवात केली.पीटर आणि इर्मी टाल्केनबर्गर यांच्या अल्ग्रुंड कंपनीत घरे पाहण्यासाठी आम्ही नाव नोंदवले‌. संध्याकाळी ६नंतर ते आम्हाला घरे दाखवायला घेऊन जात.काही घरांचे मालक आम्हाला पटले नाहीत.(हो,'रोज आंघोळ करता येणार नाही'अशी अटवाला मालक कसा पटेल?)काही घरे आवडली नाहीत,काही ठिकाणी आम्हाला हव्या त्या सोयी तिथे नव्हत्या म्हणून ती बाद.(पोळ्या तर करता आल्या पाहिजेत की नाही रोज..)काही घरमालकांशी सौदा पटला नाही,एक ना अनेक कारणे‌. आपण फारच चाळणी लावतोय असं वाटायला लागलं.


असंच एका संध्याकाळी घर बघायला गेलो.मुख्य स्टेशनापासून रेल्वेने १० मिनिटे,आणि ट्रामने २५मिनिटे! तिथल्या मुख्य रस्त्यापासून थोडे आत चालत गेले की तिळ्या बंगल्यांची कॉलनी आहे.बैठे तिळे बंगले,प्रत्येक बंगल्यात ३ ते ४ बिऱ्हाडे, दोन तिळ्यांमध्ये फरसबंद रस्ता,अंगणच जणू.कारण फक्त सायकली जातील एवढीच वाट.बाकीच्या वाहनांना मुख्य रस्त्यावरच्या आपापल्या गराजांमध्ये ठेवायचे नाहीतर रस्त्यावरच्या वाहनांसाठीच्या जागेवर लावायचे.


सगळीकडे हिरवाई!रंगीत तृणफूले,सफरचंदे,चेरी,प्लम यांनी लगडलेली झाडे आणि अंगणातले चेरी,प्लम, सफरचंदांचे सडे..(आतापर्यंत फक्त नाजुक प्राजक्त फुलांचा सडाच माहिती होता,पण चेरीची अशी अंगणातली पखरण पण काय रसिली दिसते!) आटोपशीर,बुटकी लाकडी कुंपणे,मध्येच एखाद्या बागेत काम करताना दिसणारे आजी-आजोबा.. एकदम त्या परिसराच्या प्रेमातच पडलो आम्ही.आता मुख्य भाग,घर पहायचे.(जे न पाहताच त्या परिसरामुळे आधीच आवडले होते)आणि मालकाशी 'बोलणी' करायची! सगळे 'मालक किस्से' मनात फेर धरायला लागले, तसेच जिना चढलो.


जर्मनीत फ्रांकफुर्ट,हानाव आणि पासाव येथे घरे, हंगेरीत बुडाबेस्टला घर असलेला उंच,घारा,गोरा,सोनेरी केसाचा हा माणूस निवृत्तीचे झकास जीवन जगतो आहे हे त्याच्या दणकट हस्तांदोलनावरून वाटले नाही.(६० सालके बुढे या ६० सालके जवान! या जाहिरातीची आठवण झाली!)सलामीलाच त्याने बाउन्सर टाकला,"आपण आत्ता ६ महिन्यांचा करार करु पण तुम्ही जर्मनी सोडेपर्यंत ह्या घरात राहू शकता."अजून आम्ही घर घ्यायचे की नाही हे ठरवले नव्हते,एवढचं काय अजून घर सुद्धा नीट पाहिले नव्हते...


घर छानच होते,छोटेसेच किचन(स्वैपाकघर म्हणणे जिवावर येईल त्याला इतके छोटे),झोपायची खोली आणि बैठकीची खोली.तिला लागूनच प्रशस्त, देखणी गच्ची आणि गच्चीला पाहिजे तेव्हा आच्छादता येईल असे कापडी छत,मोठ्ठ्या बिनगजांच्या काचेच्या खिडक्या आणि कुठल्याही खिडकीतून पाहिले तरी दिसणारे मेपल्स आणि मयूरपंखीचे वृक्ष!(ख्रिसमस ट्री=थुजा,मयूरपंखी??)या तिळ्या बंगल्यांची रचना अशी की आपल्या खिडकीसमोर समोरची खिडकी न येता भिंत येईल.खिडकीतून डोकावून दुसऱ्याच्या घरात पाहण्याचा भोचकपणा करायला 'चानस' नाही..


आता या देखण्या गच्चीमुळे किचनला 'ग्रेस मार्क' देऊन आम्ही पास केलं. आमचा मालक पासाव येथे फ्रा फु पासून अंदाजे ६०० किमी राहत असल्यामुळे घराचे मार्क वाढले.(मालकाचा रोजचा जाच नाही!)


आमच्या शेजाऱ्यांशी त्याने ओळख करून दिली (हेच आमचे पुढे सख्खे शेजारी झाले..त्यांच्याबद्दल पुढच्या लेखात..)