किस्से जर्मन मालकांचे...

आम्ही जर्मनीत आलो,तेव्हा सुरुवातीला घराची सोय होईपर्यंत वोनहाईम मध्ये राहत होतो.(वोन=वसती,हाईम=घर : वसतिगृह!)एक किवा दोन खोल्या,दोन खोल्या असतील तर एक झोपायची खोली,आणि दुसरी बैठकीची; त्याच खोलीत एका कोपऱ्यात स्वयंपाकाची शेगडी,छोटेसे शीतकपाट,मायक्रोवेव आणि भांडी ठेवण्यासाठी मांडणी!  नोकरीच्या निमित्ताने एकेकटे लोक जेव्हा शहरात राहतात,आणि शनि-रवि( खरं तर शुक्रवारीच )घरी पळतात,सोमवारी थेट कामावर जातात,अशा लोकांसाठी ही वसतिगृहे खरचच चांगली आहेत.


आम्ही घराच्या शोधात आहोत,असे कळल्यावर जर्मन मालकांविषयीच्या आमच्या ज्ञानात भर पडायला सुरुवात झाली.इथे आधी एक गोष्ट स्पष्ट करते की जर्मन माणसाची तुलनाच जर करायची झाली ना,तर ती फक्त पुण्यातल्या लक्ष्मी रोड वरच्या खडूस दुकानदारांशी (गिऱ्हाईक म्हणजे सर्वात दुर्लक्ष करण्याची वस्तू....ते दुकानदार!)होऊ शकते.एकंदरीतच जर्मन लोक स्वतःला जास्त शहाणे समजणारे असतात.


आमचे एक स्नेही एका जर्मन मालकाचे भाडेकरू होते.मालक खालच्या मजल्यावर रहायचा आणि वरच्या मजल्यावर आमचा मित्र.दिवसभर याला घरात चोरपावलांनी वावरावे लागे. असे का? तर मालकाला खाली अजिबात आवाज झालेला चालत नसे.याचाच दुसरा नियम होता " रात्री ९ नंतर फ्लश करायचा नाही."चोरपावलाने चालणे एकवेळ परवडले हो ,पण हा दुसरा नियम?लवकरच त्याने जागा बदलली.आता हा खालच्या मजल्यावर आणि मालक वरच्या. हुश्श!! तरीही मालकाच्या सारख्या तक्रारी..जागा बदलली,मालक बदलला तरी तक्रारी कायम? आपल्या फोडण्या,मसाले यांचे वास त्याला सहन होत नसत,म्हणून त्याची कुरकुर..(तरी बरं,आपले सगळे चमचमीत,मसालेदार पदार्थ हा मालक मिटक्या मारत खात असे!)


दुसऱ्या एका मित्राची तिसरीच तऱ्हा! ह्याचा मालक दर रविवारी सक्काळी सक्काळी ८/८.३० च्या सुमाराला त्याच्या घरात अक्षरशः घुसत असे आणि न्हाणीघर तपासत असे.आणि दर वेळी "तुम्ही हे नीट साफ केले नाहीये.पुढच्या वेळी व्यवस्थित साफ करा",असा दम देत असे.दर शनिवारी आमचा मित्र 'हाती धरुन झाडू' तासभर हात मोडून सगळे चकाचक करत असे ,आणि दुसऱ्या दिवशी मालक आला की परत पहिले पाढे पंचावन्न! असे ३,४ वेळा झाले‌. शेवटी न राहवून त्याने मालकाला विचारले,"मी दर शनिवारी सगळी सफाई करतो, बेसीन,टब पासून सगळे न्हाणीघर स्वच्छ करतो,तरी काय तुम्ही साफ नाही म्हणता? आज मला दाखवाच काय अस्वच्छ आहे ते.यावर मालकाचे मासलेवाईक उत्तर होते ,"बाकी सगळे ठीक आहे पण बाथरुमच्या खिडकीवर धूळ जमा झाली आहे आणि ती तुम्ही साफ केलेली नाहीये!!!)आमच्या मित्राला खिडकीवर धूळ जमा झाली आहे हेच जाणवले नव्हते तर सफाई काय करणार?खरं तर आम्हालाही त्या खिडकीवरची धूळ त्या मालकाच्या एवढी डोळ्यात आली असेल असं ती धूळ पाहून(?) वाटले नव्हते.


अशा किश्शांच्या पार्श्वभूमीवर आम्ही घर शोधायला सुरुवात केली...