घर जर्मनीतलं..

दुधाच्या व्हॅन्स,रिक्षांचे आवाज,पेपरवाल्यांची लगबग अशा पहाटेची आजवर सवय!क्वचित चिमण्यांची चिवचिव किवा कबुतरांचे गुटर्गू आणि कावळेदादाची पाहुण्यांची वर्दी देणारी खडी साद एवढाच पक्षीरव ऐकायची सवय असलेले शहरी कान पहाटे पहाटे मंजुळ किलबिलाटाने जागे झाले.प्रसन्न सकाळ!सूर्याची सोनेरी कोवळी किरणे त्या भल्यामोठ्या खिडकीतून आत डोकावताना मधुर किलबिल पण आत आणत होती. गच्चीचे दार उघडले तर गुलाबांवरचे दवबिंदू आणि ओल्या गवताचा लुसलुशीत स्पर्श शिरशिरी आणत होता...मी कुठे स्वप्नातल्या घरात नव्हते तर एका प्रगत देशाच्या आर्थिक राजधानीच्या शहरातल्या आमच्या घरात होते. नजर जाईल तिथपर्यंत हिरवे वृक्षच दिसत होते.(पुढे ऋतुचक्राबरोबरच त्या हिरव्या वृक्षांचे 'खराटे' होतात, हे सत्य अंगवळणी पडले.)खाली पाहिलं तर मखमालीच्या गवती गालिच्यातून रंगीत गवतफुले डोकावत होती.एका प्रसन्न भारलेपणातच आमचे रोजचे रुटीन सुरू झाले.
आमच्या त्या छोट्याशा घरात खालच्या मजल्यावर श्री व सौ फ्लेमिंग राहतात. वय ७५ च्या आसपास.आम्ही त्यांना आजी आजोबा करून टाकले,म्हणजे मनातल्या मनात! आपसात बोलताना "आज जिन्यात आजी भेटली होती,तिने हॅलो केलं".. इ.इ...आम्हालाही त्यांच्याशी बोलायची,ओळख करून घ्यायची उत्सुकता होतीच.पण पाश्चात्य देशातील शिष्टाचारांबद्दल ऐकले,वाचले आणि पाहिलेही होते त्यामुळे एकदा बिचकतच मी एका चिठ्ठीत आमचा दूरध्व्नी क्र. लिहून त्यांच्या क्रमांकाची विचारणा केली,आणि त्यांच्याशी बोलायची इच्छाही त्यात व्यक्त केली,आणि त्यांच्या पत्रपेटीत ती चिठ्ठी टाकली‌.साधारण पाऊण एक तासाने दारावर टकटक झाली.कोणी आले तर जिन्याच्या फाटकातील घंटा वाजणार,मग आपण दाराजवळच्या फोनवर कोण आलं आहेची विचारणा करायची आणि बेल दाबली की खालचे जिन्यातील फाटक उघडणार,आणि ती व्यक्त्ती आत येणार, असे साधारण इथे सर्व ठिकाणी असते.त्यामुळे 'दारावर टकटक' झाल्यावर मला जरा नवलच वाटले,आणि साशंकतेनेच दार उघडले तर दारात फ्लेमिंग आजी,हातात कागद!
चिठ्ठी लिहीण्याचा माझा आगाऊपणा कदाचित न आवडल्यामुळे आली असेल असा समज करून घेत मी आपली दिलगिरी व्यक्त केली,माझं वाक्यही पूर्ण होऊ न देता आजी जवळ जवळ चित्कारलीच,"अग,आमच्याकडे यायला चिठ्ठ्या,फोन काऽऽही नको,फक्त दारावर थाप मारायची ते सुद्धा दार बंद असेल तर,नाहीतर सरळ आत यायचं...(क्षणभर मला मी आमच्या ठाण्याच्या जुन्या घरातच असल्याचा भास झाला.)तिच्या प्रेमळ निळ्या डोळ्यात आपुलकी मला स्वच्छ दिसली.
फ्राऊ त्सेंटा फ्लेमिंग!साधारण सव्वापाच फूट उंची,मध्यम बांधा (जर्मन बायकांच्या मानाने तर अगदीच लहानखुरी),गोरा रंग,फिक्या निळ्या रंगाचे प्रेमळ डोळे,सोनेरी-भुरे केस,त्या केसातून मध्येच हात फिरवत'श्योऽन,श्योऽऽन' म्हणजे 'छाऽन,छाऽऽन' असं म्हणायची सवय!आणि हेर्न आकिम फ्लेमिंग, पावणेसहा फुटाच्या आसपास उंची,मजबूत हाडपेर,७६व्या वर्षीही कुठेही सैल न पडलेली त्वचा,सरळ धारदार नाक,भव्य कपाळ,तेच कपाळ पुढे मोठं होत गेलेलं टक्कल,लाल गोरा रंग,आजीपेक्षा थोडा जास्तच गोरा! सफरचंदासारखे लाल गाल आणि गडद निळे, चमकदार,प्रेमळ डोळे! दोघांच्याही डोळ्यांच्या निळेपणात फरक होता,पण प्रेमळपणा मात्र तोच! "आईज आर ब्लु,लवली टू.." आठवायला लावणारे डोळे...आजी स्पारडा बँकेत होती तर आजोबा डॉईश बान म्हणजे जर्मन रेल्वेत इंजिनिअर होते.
ते दोघं जण सुद्धा आम्हाला भेटायला उत्सुक होते,पण भाषेची अडचण त्यांना वाटत होती.कॉलेजमध्ये असताना छंद म्हणून शिकलेली भाषा मला अशी ठाईठाई उपयोगी पडेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं.आजीआजोबा भाषेचा मोठा अडसर दूर झाल्याने खूषच झाले.त्यांना भारताबद्दल अतिशय कुतुहल होते‌ आणि कोणा भारतीयांच्या संपर्कात असे ते पहिल्यांदाच येत होते."यशाचा मार्ग पोटातून जातो,"असं म्हणतात.आमच्या मैत्रीच्या नात्याच्या सुंदर गुंफणीची पायवाटही पोटातूनच गेली..