एक रम्य 'दिवाळी पहाट'

दिवाळीत पाडव्याला सकाळी सात वाजता गडकरी रंगायतनला 'मी पणशीकर बोलतोय' असल्याचे वाचले आणि प्रथम स्थान आरक्षित केले! अशा कार्यक्रमांना मोक्याची जागा हवी, तीनही डोळ्यांना दिसेल अशी. हा एक अनोखा कार्यक्रम ठाण्याच्या 'स्वा. सावरकर सेवा संस्था' यांनी आयोजित केला होता आणि ठाण्याचे मराठी उद्योजक श्री. प्रभुदेसाई त्याचे प्रायोजक होते तर श्री. जोशी व श्री. घैसास सहप्रायोजक होते. कार्यक्रमाची संकल्पना मोठी झकास! पंतांचे आत्मकथन पण ते साचेबंद मुलाखतीत न बांधता गप्पा व प्रत्यक्ष त्यांच्या गाजलेल्या भूमिका यांतून रंगमंचावर साकारणार. मा. प्रभाकर पणशीकर स्वतः तो मी नव्हेच, अश्रूंची झाली फुले व इथे ओशाळला मृत्यू या नाटकांतले प्रवेश सादर करणार होते तर त्यांचे चिरंजीव श्री. रघुनंदन व श्रीमती फैयाझ त्यांच्या नाट्यसंपदा निर्मित 'कट्यार काळजात घुसली' मधील नाट्यगीते सादर करणार होते.


या नटसम्राटाची नाना रुपे, नाना रंग टिपणे यासारखा आनंद कोणता? तत्काळ अध्यक्ष श्री. विद्याधर ठाणेकरांकडून मनसोक्त फटमारीची परवानगी पदरी पाडून घेतली. आता उत्सुकता होती ती प्रत्यक्ष कार्यक्रमाची.


आज सकाळी पावणे सातलाच जाऊन थडकलो तर रंगायतन रसिकांनी गजबजू लागले होते. प्रवेशद्वारातून आत शिरताच संस्थेचे कार्यकर्ते पेढे देऊन रसिकांचे तोंड गोड करत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच नटवर्य श्री. प्रभाकर पणशीकर यांचा सत्कार करण्यात आला  pn1

सत्कार सोहळा - खा.श्री. प्रकाश परांजपे, महापौर श्री. श्री. राजन विचारे, पंत, प्रभुदेसाई, श्री. जोशी (झाकलेले) व श्री. नांदगावकर.


लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली व श्री. अशोक समेळ व श्रीमती फैयाझ यांनी पंतांना बोलते केले.


 pn3


आपण कडक वडिलांना बरोबर तोलून लहानपणी शाळेत असताना प्रथम नाटकात काम कसे केले इथून सुरू झालेले पंत वयावर मात करणाऱ्या उत्साहाने बोलत होते. या महर्षीचे अनुभव ऐकताना रसिकजन हरपून गेले. नाटकाचा ध्यास, निर्माता कसा झालो, निर्माता म्हणून काढलेल्या पहिल्या नाटकाचे अतिउत्साहाने लावलेले लागोपाठचे दोन प्रयोग व ऐन वेळेला नाट्यगृहाचे पैसे प्रयोगा आधी भरावयाचे असल्याने भावाकडून घेऊन गहाण टाकलेला वहिनीचा चपलाहार, तो सोडवता न आल्याने बिंग फुटणार म्हणून घरातून केलेले पलायन, पदपथावर काढलेले दिवस, रामजी पुरुषोत्तम चाळीत गणपतिउत्सवच नाटकात मिळालेली 'प्राँप्टर'ची भूमिका, पुढे रांगणेकर कंपनीत मिळालेली व योगायोगाने लाभलेली नटाची भूमिका, पुढे तिथे व्यवस्थापकाची नोकरी, अचानक 'साहेबांच्या' तो मी नव्हेच साठी रांगणेकरांनी सुचविलेले त्यांचे नाव, 'साहेबांचा' साशंक चेहरा, मग प्रत्यक्ष प्रयोगाला साहेबांकडून मिळालेली भरभरून शाबासकी इथे मात्र पणशीकरांना थांबवावे लागले. अहो प्रत्यक्ष ते हजर असताना केवळ त्यांच्या भूमिकेविषयी ऐकायचे म्हणजे काय? तत्काळ पंतांना प्रवेशाच्या तयारीसाठी आत जायचा इशारा झाला. पंत आत जाताच रंगमंचावरील विघ्नेश जोशी व सुहास चितळे आपापले हार्मोनियम व तबला सरसावून बसले आणि रघुनंदन पणशीकर अवतरले. अशोकजींच्या अल्प निवेदना पाठोपाठ 'तेजोनिधी' सुरू झाले आणि प्रेक्षकांनी दिलखुलास दाद दिली.

pn4 गाणे संपते न संपते तोच अचानक विंगेतून गलबला ऐकू आला आणि रंगमंचावर राधाकृष्ण, गोपाळकृष्ण' चा घोष सुरू झाला. त्या गजरातच अवतरले "अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्रीकृष्णावतार श्री राधेश्याम महाराज" दरबार काय, पार्थाचे दर्शन काय, गुरुदेवांच्या आश्रमातली बैठक काय, पूर्वजन्मातली कपाळावरची खूण काय, प्रवेश रंगत होता आणि लोक उस्फुर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करत भरभरून दाद देत होते.

tmn

कार्यक्रमाचे नियोजन व संकल्पना श्री. विघ्नेश जोशी यांनी उत्तम पार पाडले. जेव्हा पंत दुसऱ्या प्रवेशाच्या तयारीसाठी आत जातील तेंव्हा फैयाझ, रघुनंदन यांचे ';कट्यार' अशोक समेळांचे नाट्यसंपदा व पंतांवरील समालोचन व पुन्हा पंतांचा प्रवेश असे सुरस व नेटके नियोजन होते.

pn18

दुसरे पर्व होते अर्थातच पंतांच्या दुसऱ्या अजरामर नाटकाचे - 'अश्रूंची झाली फुले'. हितशत्रूंच्या कपट कारस्थानामुळे तुरुंगात जावे लागल्यामुळे माणुसकीवरचा विश्वास उडालेल्या प्रा. विद्यानंदांना भेटायला त्यांची पत्नी व दोस्त शंभू महादेव तुरुंगात जातात तो प्रवेश सुरू होताच प्रेक्षक सत्तरच्या दशकात जाऊन पोहोचले आणि देहभान हरपून पुनर्प्रत्ययाच्या आनंदात बुडले. या वयात देखील पंतांचे संवाद प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेत होते. 'एट टू ब्रूटस.... तर विद्यानंदाला फासावर जावेच लागेल' किंवा 'माझा शाम मला कोण परत देईल' हे संवाद म्हणावेत तर पंतांनीच.

AF

तिसरा प्रवेश म्हणजे आणखी एक अजरामर व्यक्तिरेखा - औरंगजेब! आतापर्यंत ही भूमिका अनेकदा पाहिली होती पण प्रत्यक्ष रंगमंचावर बघता बघता रंगभूषाकाराच्या स्पर्शाने पणशीकरांचा औरंगजेब होताना पाहायचा हा एकमेवाद्वितीय प्रसंग. रंगभूषा सुरू असताना एकीकडे पंत त्या भूमिकेतले बारकावे सांगत होते. पहिल्या अंकातला साठी ओलांडलेला औरंगजेब आणि दुसऱ्या अंकातला पंचाहत्तरीचा औरंगजेब हे स्थित्यंतर कसे साकार केले, त्यासाठी एका तालमीत डॉ. वसंतराव देशपांडे यांनी केलेली 'नाटककार माधवराव जोशी' यांची नक्कल कशी उपयोगी पडली, "असे नमाज तर मुसलमीन सुद्धा पढू शकत नाही" ही एका मौलवीने केलेली तारीफ, "या इलाही इल्लिल्ला महंमद उल रसूलील्लाह' असे मुसलमान धर्माची दीक्षा देताना तीन वेळा म्हणतात, आपण तर अकरा वेळा म्हणालात, म्हणजेच आपण मुसलमान झालात" असे सांगायला दौऱ्यावर असताना लॉजवर खास सांगायला आलेले कोल्हापूरचे मोमिन असे अनेक किस्से पंतांनी त्यांच्या शैलीत ऐकवले. अखेर त्या औरंगजेबाचे ते खणखणीत संवाद ऐकले आणि कानांचे पारणे फिटले. त्यांना मिळालेले बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रशस्तिपत्र: 'खरा औरंगजेब जरी अवतरला तरी तो असाच बोलेल आणि असाच वागेल'

paz2

घड्याळाचे दुष्ट काटे कुठल्याकुठे पोचले होते. अखेर रघुनंदन यांनी भैरवी सुरू केली आणि संगीताचे साहित्य फोडून टाकायचा हुकूम देणारा औरंगजेब जातीने मैफलीत बघण्याचे भाग्य आम्हाला लागले, ते दृश्य अर्थातच मी अधाश्यासारखे टिपले.

pn12

पंतांना मानवंदना देत आम्ही तमाम रसिक नाइलाजाने नाट्यगृहाबाहेर पडलो.