ऍना फ्रँक

'डायरी ऑफ ऍना फ्रँक 'ची पारायणं केल्यापासून म्हणजे शालेय वयापासूनच तिच्याविषयी एक सुप्त उत्सुकता होती.त्यामुळे ऍमस्टरडॅमला गेलं की 'ऍना फ्रँक हाऊस'ला भेट द्यायची हे मी युरोपमध्ये राहण्याची सुतराम शक्यता नव्हती तेव्हाच ठरवून टाकलं होतं‍. माझ्या अनेक सोनेरी स्वप्नात तेव्हा अजून एक भर पडली होती.पुढे अनेक वर्षांनी जर्मनीला आल्यावर ऍना फ्रँकची डायरी परत खुणावायला लागली. जेव्हा आम्ही ऍमस्टरडॅमला जायचा बेत आखला तेव्हा गुप्ता,शर्मा, वर्मा ,चावला आदी मित्रमंडळीनी "अभी उधर जाके क्या है देखनेको?हम ट्यूलिप्स के सिजनमे जाएंगे.."असा फतवा काढला."ऍना फ्रँक? ये कौन है?" असे प्रश्न ऐकल्यावर आम्ही त्यांच्याशिवायच जाण्याचा सूज्ञ निर्णय घेतला.
'त्या' घरात शिरल्यापासूनच 'डायरी' आठवायला लागली.ऍना फ्रँक प्रतिष्ठानने ते फार सुंदर स्मारक केले आहे,तळमजल्यावरील हॉलमध्ये मूळ घर आणि फ्रँक कुटुंब तेथे आसऱ्यासाठी आल्यावर केलेले बदल अशी दोन्ही प्रारुपे (models?)ठेवली आहेत. जसजसे आपण घर पाहत जातो,तसतसे संदर्भ लागत जातात, तिथल्या भिंतींवर,जिन्यामधील जागेत ऍनाच्या डायरीतली वाक्ये उद्धृत करून ठेवली आहेत.त्याचाही परिणाम मनावर आपोआप होत राहतो.
'बुकरॅक'चे दार उघडून आत शिरलो की आपण दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच पोहोचतो. ऍना आणि मार्गोट(तिची बहिण)ने  पोस्टर्स लावून सजवलेल्या भिंती, त्यांच्या उंचीच्या पेन्सिलीने केलेल्या खूणा,त्यांचे खेळ,त्यांच्या अभ्यासाच्या वह्या सगळे जसेच्या तसे जपून ठेवले आहे.मसाल्याच्या कारखान्याच्या मागे लपण्यासाठी केलेला हा आसरा, तिथल्या बंद खिडक्याआड दडलेली वेदना डायरीच्या रुपाने जगासमोर आली. ही काही फक्त फ्रँक कुटुंबाची वेदना राहत नाही,तर त्या काळात असले दुःख भोगावे लागलेल्या साऱ्यासाऱ्यांची ती वेदना होते.तिथल्या पडद्यावर दाखवण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या चित्रफितीतून तो काळच समोर उभा राहतो,आणि सुन्न व्हायला होतं.तिची डायरी तिच्या बाबांना कशी मिळाली,त्यातून त्यांना आपलीच मुलगी कशी समजत गेली,याची ह्रद्य मुलाखत आहे.या कुटुंबाला मदत करणाऱ्या सुह्रदांच्या मुलाखती आहेत,ऍना छळछावणीत गेल्यावर आपला जीव धोक्यात घालून तिला बाहेरुन मदत करणाऱ्या मैत्रिणीची मुलाखत आहे.
एका भव्य दालनामध्ये ऍनाच्या या डायरीच्या जगभरातील भाषांमध्ये भाषांतरीत झालेल्या पुस्तकांच्या प्रती मोठ्या कलापूर्ण रीतीने मांडल्या आहेत.भारतीय भाषांमध्ये मंगला निगुडकरांची मराठी डायरी,आणि एक बंगाली डायरी आहे. छोट्या,छोट्या नावही न ऐकलेल्या देशांच्या भाषांमध्ये ऍनाची डायरी आहे.आणि एवढ्या मोठ्या खंडःप्राय देशातल्या फक्त दोनच भाषांमध्ये तिचे भाषांतर? असा एक विचार आला क्षणभर मनात आणि मी पुढच्या दालनात गेले.
ज्या डायरीची आपण पारायणं केली ती अशी मूळ स्वरुपात,खुद्द ऍनाच्या अक्षरातली ती 'किटी' पाहताना मनातले भावनांचे कल्लोळ डोळ्यातल्या पाण्यातून वाहू लागले,त्यांना शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न!


 


अवांतर: किटी- आपल्या डायरीला ऍनाने दिलेले नाव.
बुकरॅकचे दार- फ्रँक कुटुंब जीव वाचवण्यासाठी जिथे लपले ती मसाले,जाम इ.च्या कारखान्याची मागची बाजू होती,तिथे जाण्यासाठी एका पुस्तकाच्या मांडणीचे दार केले होते‌, समोरून ती पुस्तक-मांडणी वाटते पण ते दार आहे.