नाव सुचत नाही

मित्र नाही, मद्य नाही, प्रेमही झुलवून गेले
मुक्त केले सावलीने, दु:खही सोडून गेले


राहिली हातात माझ्या ठेव बाकी आसवांची
आपले जे मानले, पार्‍यापरी निसटून गेले


रंगलेल्या मैफलीचा जाहला रसभंग ऐसा
ऐकुनी माझी कहाणी लोक कातावून गेले


हात ना ज्यांचा कधी आधार घेण्या मज मिळाला
चार खांद्यांवर मला मेल्यावरी घेऊन गेले


वेळ नाही आज कोणा, काळ घाईगडबडीचा
देह नुकता ठेवला, हे सांत्वना भेटून गेले


वाहता वारें खुले, सुस्थापितांना घाम आला
सवय कुबड्यांची जया, स्पर्धेस धास्तावून गेले