माझा नोकरीविषयक प्रवास!-१

२००१ सालची गोष्ट. 'वर्ल्ड ट्रेड सेंटर' नुकतेच पडले होते. भारतीय आय.टी. आणि इतर कंपन्या तात्पुरत्या मंदीत जाणार अशा अफवा उठत होत्या. अशा या सुमुहूर्तावर आमची स्वारी नुकतीच इंजिनियर होऊन नाना माध्यमांनी नोकऱ्या शोधत होती.


३-४ वर्षांपूर्वीपर्यंत ताज्या इंजिनियरांना नोकऱ्या शोधायची माहिती असलेली पहिली पायरी म्हणजे सरकारी/निम सरकारी नोकऱ्या. म्हणून 'एम्प्लॉयमेंट न्यूज' चा हर आठवड्याचा अंक भक्तिभावाने मिळवणे आलेच. माझ्यासारखाच विचार माझ्या आसपासचे बरेच ताजे इंजिनियर करत असल्याने बुधवारी 'एम्प्लॉयमेंट न्यूज' चा अंक आल्याआल्या एक तासात संपायचा. असे दोन बुधवार झाल्यावर मग पेपरवाल्याकडेच दर बुधवारचा रतीब सुरू केला.अमक्या पानावर तमक्या बाजूला असलेली (एअर इंडिया/टीआयएफआर/डिआरडिओ वा तत्सम भव्य ब्रँडनेमची) जाहिरात पाहिली की मग मैत्रिणींना फोनाफोनी सुरू. 'अगं,महत्वाची जाहिरात आहे. तू माझ्या घरीच ये. आपण दोघी मिळून अर्ज पाठवू.' 'एम्प्लॉयमेंट न्यूज' च्या जाहिरातींना अर्ज पाठवणे हे एक चिकाटीपूर्ण काम असायचे. २४.५ बाय १७ सेमीचे पाकीट, २५०/१२५/१००/३००/५०० रु. चा डी. डी., जाहिरातीत दिलेल्या नमुन्याबरहुकूम अर्ज संगणकावर तयार करून प्रिंट करून घेणे आदी अनेक उपकामे त्यात दडलेली असायची. (हे अर्ज अप्पा बळवंत चौकात आयते अमुक बाय अमुकच्या लिफाफ्यासह व जाहिरात, प्रिंट केलेला अर्ज यासह मिळतात, पण पैसे वाचवायचा आणि सर्व स्वतः करायचा आमचा उत्साह उतू जात असायचा.)


रिमा घरी आली की मग शोधाशोध सुरू व्हायची: 'आई, मोठी कात्री कुठे आहे?फूटपट्टी कुठे आहे? डिंक कुठे आहे?तपकिरी कागद कुठे आहे?माझे परवा काढलेले फोटो कुठे ठेवलेस?''शोध गं तूच.तिथेच असतील. मला डब्याची घाई आहे.' इति आई. आजूबाजूचा परिसर उचकून या वस्तू जमवून 'सरकारी अर्ज मोहीम' सुरू व्हायची. अगदी पट्टीने रेघा आखून,एकाही मिलीमीटरची चूक न करता लिफाफा बनवला जायचा. (माझ्या मैत्रिणीचा एक अर्ज नापसंत होऊन परत आला होता. कारण: लिफाफ्याची मापे जाहिरातीबरहुकूम नव्हती. अर्थात त्यांनी २५० रु. चा डीड़ी. पण इमानदारीने परत पाठवल्याने आम्ही जाहिरातकर्त्यांना दूषणे न देता दुवेच दिले.) 'हाती घ्या ते तडीस न्या' या दुर्दम्य जिद्दीने लिफाफा बनवणे, अर्जाचा मसुदा प्रिंट करणे, त्यावर फोटो चिकटवणे, डीड़ी. काढणे आणि लगेच शेजारी पोष्टात जाऊन सर्व भांडार सासरी रवाना करणे हे सर्व तडाख्यात केले जायचे. (चुकून बोलता बोलता दोन्ही मैत्रिणींनी दोन अर्जावर एकच पत्ता लिहिणे,फोटो दाबून दाबून चिकटवल्यावर वाऱ्याने अर्ज उडून फोटो दुसऱ्याच जागी जाऊन चिकटणे,लिफाफ्याचा कागद कापताना त्याखालची स्वत:च्या बायोडेट्याची महागडी लेसर प्रिंट कातरणे, मित्राबरोबर बसून अर्ज भरत असल्यास सर्व हुबेहूब नक्कल करून अर्जात स्वतःचे लिंग पण 'मेल' लिहिणे असे काही माफक अपघात होत असत, पण 'सरकारी नोकरी' पुढे हे सर्व क्षुल्लक!)


मग काही दिवसांनी त्यांच्या प्रवेशपरीक्षेचे आमंत्रण यायचे. आमंत्रण आल्याआल्या  सामान्यज्ञानाची पुस्तके चाळणे, अभ्यासाची पुस्तके बघणे इ.इ. सुरू व्हायचे. पण हा ऐच्छिक अभ्यासाचा उत्साह फार कमी वेळ टिकायचा. जीमॅट वा तत्सम सामान्यज्ञान वाढवणाऱ्या लठ्ठ पुस्तकाचा अभ्यास करता करता घोरायला लागणे, तासनतास पुस्तकाचे एक पान उघडून परवा आलेल्या सिनेमावर गप्पा छाटत बसणे या अभ्यासामुळे मनात स्वतःच्या यशाबद्दल शंका असली तरी 'सामान्यज्ञान आहे ना? आपण हुशार आहोतच. अभ्यास नाही केला तरी ऐनवेळी बाजी मारूच.'


परीक्षेची केंद्रे पण सगळ्यांची नेमकी वेगळी यायची, कोणी कुलाब्याला तर कोणी विक्रोळीला तर कोणी सांताक्रूझला. त्यातल्या त्यात कोणी दोघी चुकून एका केंद्राला आल्याच तर आधीच संकेत ठरवले जायचे. 'पेपर कठीण आला तर मी अर्ध्या तासात देऊन समोरच्या हॉटेलात बसेन, तू लवकर ये.' परीक्षेच्या आधी केंद्रावर जमलेली गर्दी पाहून 'आपण यशस्वी होणार नाही व इथे फक्त पेन्सिलीने गोल नीट कसा रंगवायचा याचा सराव करायला आलो आहोत' ही उपरती व्हायची. कारण ६५ जागांना ७००० उमेदवार, २०० जागांना १०००० उमेदवार अशी भरघोस संख्या असायची. पेपर हमखास कठीण यायचाच कारण अभ्यास केलेलाच नसायचा. अशा या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये बहुधा प्रत्येक उत्तराला चार पर्यायांचे चार रिकामे गोल आणि जो पर्याय बरोबर असेल त्याचा गोल पेन्सिलीने रंगवायचा असायचा. येणारे ५-६ गोल नीट रंगवले की बाकी गोल पेन्सिलीने भगवान भरोसे वाट्टेल त्या क्रमाने रंगवून अर्ध्या तासात पेपर टाकून आम्ही सटकायचो. जर अर्ध्या तासात पेपर न टाकता पूर्ण वेळ बसलो तर परतताना स्टेशनाच्या बाकावर बसून आमची स्वप्नरंजने सुरू व्हायची. 'कसलं भारी असेल ना राव? मस्त ९ टू ५ नोकरी. १५००० पगार अधिक राहण्याची व्यवस्था अधिक इतर सुविधा! एकदा तरी जबऱ्या अभ्यास करून ही असली नोकरी मिळवली पाहिजे यार! लाईफ बन जायेगी.' त्या काळी आईबाबा पण हमखास त्यांच्या कोण्या मित्राच्या मेहुण्याचा भाचा एखाद्या 'सरकारी' नोकरीत चिकटल्याची खबर मिळवून आणायचे.  


बऱ्याच वेळा एका दिवसात सकाळी कुलाब्याला एक, दुपारी दादरला दुसरी, संध्याकाळी ठाण्याला तिसरी अशा तीन परीक्षा एकाच दिवशी यायच्या. तिन्ही परीक्षांना २००-२०० रु. चे डी. डी. भरलेले असल्याने तिन्ही परीक्षा इमानेइतबारे दिल्या जायच्या. अर्थात आम्ही असे असलो तरी आमच्यातली बरीच मुलं खरोखर व्यवस्थित इंजिनियरिंगाच्या परीक्षेसारखा जागून या परीक्षांचा नीट अभ्यास करायची आणि परीक्षेत बहुतेक सर्व उत्तरे बरोबर लिहून यायची. पण ६५:७००० या गुणोत्तरामुळे असेल किंवा वेळ कमी पडल्याने असेल, आमच्यापैकी कोणीच कधी 'एम्प्लॉयमेंट न्यूज' मधल्या नोकऱ्या मिळवल्या नाहीत! तरीही आम्ही एकाही बुधवारचा 'एम्प्लॉयमेंट न्यूज' चुकवला नाही. दोन तीन महिन्यांनी सर्व परीक्षा संपल्यावर हळूहळू लक्ष 'टाईम्स असेंट' कडे वळले आणि बुधवाराऐवजी सोमवारचा 'असेंट' रतीब सुरू झाला!