माझा नोकरीविषयक प्रवास!-५

'हरहर! शिवशिव!थू तुझ्या जिनगानीवर!! इत्यादी ब्ला ब्ला ब्ला स्वनिर्भत्सनायुक्त वाक्ये!
तुला मिळून मिळून मार्केटिंग कसलं मिळावं, तर फिनेलचं? चुल्लूभर पानीमे डूब मर,करमजली!'
माझं मन असे संवाद टाकत असतानाच मी 'आभार. पण मला या नोकरीत रस नाही' म्हणून बाहेर पडले.


घरी जाऊन हा किस्सा सांगितला. नेहमीप्रमाणे 'आधी नीट बघून चौकशी करून जायला काय होतं?' वा तत्सम शेरे मिळाले. मध्यंतरीच्या काळात रिमाची पण नोकरी सुटली होती आणि आम्ही दोघी खडे टाकत होतो. असेच एका ठिकाणी गेलो. पण त्यांनी 'जवळच्या ठिकाणचे नाही' म्हणून आम्हा दोघींना डिच्चू दिला. सहज फिरता फिरता रावतसाहेबांची कंपनी दिसली. जाऊन भेटून यावं म्हणून आत गेलो आणि त्यांना विचारलं की त्यांनी ती जागा भरली का?
'मला आमच्या इथे जास्तकाळ टिकणारे उमेदवार हवे आहेत. पण एक काम करता येईल. तुम्ही मला माझ्या कंपनीची वेबसाइट डिझाइन करून द्या आणि थोडेफार टेस्टिंगचे काम करा.' 


रावत साहेबांकडे जम चांगला बसला. मी वरच्या मजल्यावर संगणकावर आणि बाकी सारे इलेक्ट्रॉनिक्सवाले खाली असल्याने काम करता करता रेडीयो मिर्ची ऐकायची सोयही झाली होती. आयकर मर्यादेच्या बराच आत असलेला पगार अधिक २०० रु. चहापाणी भत्ता मिळत होता. 'क्रिमीनल' चित्रपटातल्या गाण्यातल्यासारखे भावपूर्ण आवाजात रेकावेसे वाटत होते, 'औ ऽऽऽ र जीने ऽऽ को क्या ऽऽ चाहिये!!!'


वेबसाइटचे काम मजेशीर आणि चांगले वाटले तरी अधुनमधुन मोठी मागणी असल्यास इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य यादीबरहुकूम काढून देणे, उत्पादनावर दर्शनी भागावर लागणारे स्टिकर्स कापणे इ. कामे करावी लागायची. पण आता त्याबद्दलही विशेष तक्रार नव्हती.


मध्ये मध्ये मुले पाहणे मोहीमही चालू होती. एका शुक्रवारी तर सकाळी निगडीचा, दुपारी टिळक रोडचा आणि संध्याकाळी सदाशिव पेठेचा असा घाऊक प्रमाणात मुले पाहणी कार्यक्रम झाला. 'जीवनसाथी.कॉम' वरून पाहिलेल्या एका पुणेकर मुलाशी जमले आणि रावत साहेबांना निरोप दिला. 


सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपल्यावर परत पुण्यात खडे टाकणं सुरू केलं. नोकऱ्या आता मिळत होत्या, पण कमी पगाराच्या.आता लग्न झाल्याने जरा बऱ्यापैकी पगाराचीच नोकरी स्वीकारायची माझी इच्छा होती. बऱ्याच जणांनी सल्ले दिले: 'जर बऱ्यापैकी नोकरी मिळवायची असेल तर इंजिनियरींगबरोबर अजून एखाद्या पदवीचं शेपूट हवं.' 


आम्ही चांगल्या शेपटांच्या शोधाला लागलो! सहा महिन्यांच्या एंबेडेड सिस्टम्स च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. अभ्यासक्रमामध्ये शेवटचे तीन महिने कंपनीत प्रोजेक्ट मिळवण्यासाठी आता सर्वांच्या वाऱ्या सुरू झाल्या. अभ्यासक्रमातील संगणकांमुळे इंटरनेट आणि ईपत्रांचा मार्ग सोपा झाला होता. मध्येच कोण्या एका याहू ग्रुपवर पानभर नोकरीविषयक इ-पत्ते  सापडले. ते घेऊन घाऊक प्रमाणात इ-पत्रे पाठवणं चालू झालं. त्यातले बरेच देशाबाहेरचे आणि बरेच दहा वर्षांपूर्वीच्या नोकरीच्या जागेसाठी होते, पण 'पेराल तर उगवेल' या न्यायाने धपाधप बिया पेरणे चालू होते.


सदाशिव पेठेतील एका पत्त्यावर प्रोजेक्टसाठी निमंत्रण आलं. एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर दाटीवाटीत खोल्या होत्या, त्यातल्या एका खोलीत दोन तरुण बसले होते. खोलीत ते टेबल आणि खुर्च्या सोडून जेमतेम चार इंच जागा होती.
'या.बसा.आम्हीच तुम्हाला बोलावलं.'
'हे तुमच्या ऑफिसचं स्वागतकक्ष आहे का?'
'नाही, आमचं ऑफिस इथे हे इतकंच आहे. पाषाणला अमुक इमारतीत आमची मोठी शाखा आहे.'
मग तांत्रिक प्रश्न इ. झाले आणि मी बाहेर निघाले. माझी एक मैत्रीण त्याने सांगितलेल्या इमारतीतच राहायची. तिला फोन करून पत्ता दिला आणि सांगितले की अशा अशा ठिकाणी या या नावाची कंपनी आणि या या नावाचा माणूस आहे का याची चौकशी कर.


मैत्रिणीचा फोन आला.
'अगं, तू सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन आले. तिथे दारावर त्या मुलाचं नाव आहे. पण मी दार वाजवलं आणि या या नावाची कंपनी इथेच आहे ना म्हणून विचारलं तर तो म्हणाला की इथे मी फक्त राहतो. आमची मोठी शाखा सदाशिव पेठेत आहे.'
हा हा हा! मुळात त्या दोन मुलांची 'एंबेडेड कंपनी हँडलिंग मल्टिनॅशनल प्रोजेक्टस' म्हणजे सदाशिव पेठेतली ८ बाय ८ ची ती खोली इतकीच होती. पण ते सफाईदारपणे 'आमची मुख्य आणि मोठी शाखा दुसरीकडे आहे' असं सांगत होते.  या टोपीबाजांना मनोमन सलाम करून आमची स्वारी इतर कंपन्यांकडे वळली.