माझा नोकरीविषयक प्रवास!-३

पंडित साहेब हे एक निराळेच व्यक्तिमत्त्व होते. एका कचेरीत हिशेब विभागातील चांगली चालणारी नोकरी सोडून या महत्त्वाकांक्षी तरुणाने दोन वर्षांपूर्वी हा आपला स्वतःचा संगणक क्लास उघडला होता. सध्या ना नफा ना तोटा अशा स्वरूपात क्लास चालू होता. जवळच्या दोन उपनगरांतही शाखा उघडण्याची स्वप्नं ते बघत होते. 'आपल्या क्लासात विद्यार्थ्यांना ज्ञान,रोजगाराचं साधन आणि इतर क्लासांपेक्षा वेगळं शिकल्याचं समाधान हे तिन्ही मिळालं पाहिजे.' हे त्यांचं नेहमीचं वाक्य होतं.


पंडित साहेबांचं ध्येय महान असलं तरी त्यांना लाभलेले विद्यार्थी एकाहून एक नग होते. क्लासातल्या स्कॅनरवर फोटो स्कॅन करणं,संगणकावर गाणी ऐकणं,संगणकावर 'फ्रीसेल' आणि इतर खेळ खेळणं या नेहमीच्या विद्यार्थी गुणांनी ही मुलं परीपूर्ण होती. सुरुवातीला माझ्या 'सर्व काही शिकवण्याच्या' आग्रहात या मुलांना मी एक्सेल मधील किचकट गणिती फंक्शन्स शिकवत असे. पण फंक्शन्स शिकवणं सुरू केल्यावर डुलक्या घेणाऱ्या मुलांची संख्या वाढायला लागली, तसे मीही सूज्ञपणे क्लासातील इतर शिक्षकांप्रमाणे वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंटमधील जुजबी आवश्यक गोष्टी शिकवून एम. एस.ऑफिस 'गुंडाळणं' सुरू केलं. सुरुवातीला 'आपल्या क्लासाची छाप पडावी' या उदात्त हेतूने पंडित साहेब प्रत्येक विद्यार्थ्याला क्लासात नाव घातल्या घातल्या शंभर शंभर रु. किमतीची वर्ड आणि एक्सेलची पुस्तकं देत होते. पण पुस्तक हातात पडल्या पडल्या पुढची फी न भरता किंवा सगळी फी चुकवून काही मुलं गायब झाली. तेव्हापासून 'फक्त एक वर्षाच्या अभ्यासक्रमात नाव घातलेल्यांनाच पुस्तकं द्यायची' हा फतवा निघाला.


क्लासात शिकवण्याबरोबरच मुलांच्या फिया गोळा करणे, क्लासची पुस्तके बनवणे, महिन्याच्या सुरुवातीला फीचा तगादा लावणे,नवीन 'बकरे' आल्यास त्यांना स्वागतकक्षात बसवून प्रभावी भाषण करून एक वर्षाच्या अभ्यासक्रमात नाव घालायला प्रवृत्त करणे इ.इ. कामं होतीच. बकरे पटवण्याचं काम तिकडची जरा जुनी शिक्षिका जास्त चांगलं करत असे. सुरुवातीला मी उत्साहाने आलेल्या दोन तीन जणांना एक वर्षाच्या अभ्यासक्रमाची महती पटवून दिली. पण माझं भाषण संपल्यावर त्यांनी बिचकत बिचकत सांगितलं की ते फोन दुरुस्त करायला आले आहेत! आलेल्यांपैकी विद्यार्थी नक्की कोण आहेत हे  ओळखण्यात मी न चुकता चुकायचे. पण 'तुम्ही कशासाठी आलात' हे मात्र भिडेखातर विचारायचं नाही! एकदा नवीन नोकरीला लागलेल्या आणि पहिल्या दिवशी आलेल्या शिक्षकाला पण स्वागतकक्षात बसून एक वर्षाच्या अभ्यासक्रमाची महती ऐकावी लागली.


दोन महिने झाले. चुकत शिकत आता एम. एस. ऑफिसवर बऱ्यापैकी हात बसला होता. पण दुसरी चांगली नोकरी बघायला हवीच होती. पंडित साहेबांना सांगितले आणि राजीनामा दिला. पण माझ्या जागी दुसऱ्या शिक्षिकेची सोय करायला हवी होती. त्यामुळे साहेबांनी मला गुंतवण्याच्या वेगळ्या युक्त्या सुरू केल्या. आपण 'असेंब्ली लँग्वेज' चा नवीन अभ्यासक्रम सुरू करू आणि तो पूर्ण तुम्ही सांभाळा, पगार दीडपट करतो म्हणून त्यांनी राजीनामा फाडून टाकला. 'असेंब्ली लँग्वेज येते' हे मुलाखतीत छाप टाकायला फेकलेलं बूमरँग माझ्यावरच उलटलं होतं! अभ्यासातल्या वह्या घेऊन असेंब्ली लँग्वेजचा सराव सुरू केला. पण लवकरच समजलं की हे आपल्याला कळलं तरी अकरावी-बारावीच्या नगांना समजावणं कठीण आहे. मधल्या काळात पंडित साहेब आणि माझे नोकरी सोडण्यावरून एकदोन प्रेमळ संवाद झाले. पंडित साहेबांचे म्हणणे असे की 'हा क्लास तुमच्या घराच्या अगदी जवळ आहे,वेळा पण चांगल्या आहेत. तुम्ही शिक्षिका म्हणूनच करियर का करत नाही?पगार मी वाढवतो.' ते अनुभवपत्र द्यायला तयार नसल्याने जरा पंचाईत होती.


शेवटी एका रविवारी(आम्हाला सुट्टी शुक्रवारी असायची!) मी 'एका अर्धवेळ अभ्यासक्रमात प्रवेशासाठी अनुभवपत्र हवे आहे' असे सांगून अनुभवपत्र घेतलं आणि मग राजीनामा पुढे केला. थोडेफार आणखी प्रेमळ संवाद होऊन मी क्लासातून यशस्विरीत्या अनुभवपत्रासहित बाहेर पडले.


आता परत बॅक टू 'खडे टाकणं'! मध्यंतरी एका शुक्रवारी जवळच्या एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत मुलाखत दिली होती. पण त्यांनी 'सध्या आमच्याकडे जागा नाहीत' म्हणून परत पाठवले होते. गंमत अशी की क्लास सोडल्याच्या दुसऱ्या दिवशी त्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतल्या सरदारजी व्यवस्थापकाचा फोन आला आणि त्याने परत मुलाखतीला बोलावले. मी तिथे गेले. सरदारजी वाट पाहत बसलाच होता. सरदारजीच्या नाकातील उच्चारांत आणि माझ्या तर्खडकरी उच्चारांतील आंग्ल संवाद परत सुरू झाला.
'आमच्याकडे सध्या तरी इलेक्ट्रॉनिक्स चे कोणी सोडून जात नाहीये. पण दोन महिन्यांनी जागा होईल. आम्हाला सध्या एका डाटाएंट्री ऑपरेटरची खूप गरज आहे. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स चे काम मिळेपर्यंत ते काम कराल का?'
(बापरे, मी डाटाएंट्री ऑपरेटर??पण ठीक आहे. दुसरं काही काम मिळत नाही तोपर्यंत चालू राहूदेत.)
'चालेल. पण नंतर इलेक्ट्रॉनिक्स चं काम नक्की मिळेल का?'
'हो. मी नोकरी सोडून चाललो आहे. पण तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स चं काम नक्की मिळवून देईन. पण त्याच्याबद्दल तुम्ही मला किती पर्सेंट देणार?'
(काय करावं?निघून जावं?याच्या कानाखाली मारून काही फिल्मी सीन करावा?)
मी शांतपणे विचारलं, 'किती पर्सेंट पाहिजेत?'
'ते मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स  चं काम मिळाल्यावर सांगेन.'
'चालेल.' (आईबाबांना हे रामायण सांगण्यात अर्थ नाही.चांगली नोकरी मिळवून दाखवेनच.पण सध्या घरी बसण्यापेक्षा ठीक.)
आणि माझी 'डाटाएंट्री ऑपरेटर+स्वागतिका+हिशेबनीस' ही नोकरी आणि इतर ठिकाणी खडे टाकणंही जोरात चालू झालं!!