माझा नोकरीविषयक प्रवास!-६

एंबेडेड अभ्यासक्रमाच्या परीक्षा तोंडावर आल्या होत्या आणि पिंपरीच्या एका जर्मन कंपनीचं मुलाखतीसाठी निमंत्रण आलं. भर दुपारी तीन वाजता तिथे गेले. बरीच रांग असेल असा माझा अंदाज होता. पण त्यांनी वेळा ठरवून एक एकच उमेदवार एकावेळी मुलाखतीला बोलावल्याने मी एकटीच होते.


समोर टेबलामागे कपाळावर आठ्यांसहित एक भारतीय साहेब व टॉमेटोसारखा लाल झालेला आणि झोपाळलेला एक गोरा साहेब बसला होता. भारतीय साहेब 'रोशोगुल्ला' (म्हणजे बंगाली) आहे असे कळले. कंपनी यांत्रिक उत्पादनाशी संबंधित असल्याने हे आता काय प्रश्न विचारणार हा मला प्रश्न पडला. बंगाली साहेबाची आंग्लभाषा फारच झकास आणि आलंकारिक होती.(म्हणजे आहे. आजही त्या भाषेत ओरडणी ऐकण्याचा किंवा झापून घेण्याचा सुंदर योग कधीकधी येतो!)


'टेल मी अबाउट युवरसेल्फ' आदी ध्रुवपद झाल्यावर बंगाली साहेब अंतऱ्यात घुसला. 'मला सांगा कुलकर्णी, सगळ्या 'हेवनली बॉडीज' आकाराने गोल का असतात?'  
मी भुईसपाट! कंपनी पंपाची, मी इलेक्ट्रॉनिक्सची, हा प्राणी मला स्वर्गाबद्दल का बरं विचारतो आहे? आईशप्पथ, ग्रहताऱ्यांना 'हेवनली बॉडीज' म्हणतात हे मला तेव्हा माहिती नव्हते! म्हणजे, मी विचार करत होते, हेवनली बॉडीज म्हणजे यक्ष , गंधर्व, अप्सरा इ. प्रकार असेल. मी आणि जर्मन गोरा दोघेही क्षणभर मख्खपणे त्याच्या तोंडाकडे पाहत राहिलो. शेवटी मी विचारलं,
'सर, व्हॉट डू यू एक्झॅक्टली मीन बाय 'हेवनली बॉडीज?''
'शिरसी मा लिख, मा लिख, मा लिख' किंवा 'भो मूर्ख:' असे भाव चेहऱ्यावर उमटवून बंगाली साहेब म्हणाला, 'आय मीन प्लॅनेटस! प्लॅनेटस! व्हाय द प्लॅनेटस आर राउंड इन शेप?'
अच्छा! मग ग्रह म्हण की लेका!
मी आठवीच्या भूगोलाच्या पुस्तकातून आठवून आधी ग्रह आगीचे गोळे होते, मग ते फिरत फिरत थंड झाले म्हणून गोल आहेत असे काहीतरी ठोकून दिले.
जर्मन साहेब गप्प राहून माझ्या बायोडेट्याला रंगीत पेनांनी हिरव्या आणि लाल जखमा करत होता. माझं हृदय १५ रु. खर्चून काढलेल्या प्रिंटसबद्दल कळवळत होतं.


साहेबाने पुढचा गूगली टाकला:
'मला सांगा, आकाशातून पडणाऱ्या थेंबाचा आकार वर टोकदार आणि खाली गोल असा का असतो?'
(बापरे! हा आकारांच्या मागे का लागला आहे?आधी भूमितीचा शिक्षक होता की काय?)

साहेबाने पुढे विचारले,
'तुम्ही पेपर वाचता का? मला सध्या चालू असलेल्या राजकारणातील ताज्या बातमीबद्दल सांगा. '
(राजकारण?बातमी? और मै?? को ऽऽ भ्भी नही !!)
'हल्ली मी फक्त 'असेंट' च वाचते.'
जर्मन साहेबाने वर पाहिले. बंगाली साहेबाने त्याला समजावले, 'इट इज लोकल जॉब ऍडव्हर्टाजमेंट पेपर.'
पुढे जर्मन साहेबाने तीन चार तांत्रिक प्रश्न विचारले.
मग एक 'सी' चा पेपर लिहिला.
'तुम्हाला एक वर्षं जर्मनीला जावे लागेल आणि परत आल्यावर पुढे तीन वर्षं आमच्या बरोबर पुण्यात काम करावे लागेल.'


या नोकरीचा खडा बरोबर लागला, एक वर्षं जर्मनीत गेले. सुरुवातीचे दिवस फार भयंकर गेले. भाषा, संस्कृती सर्वच वेगळं. असेच एकदा एकांतात डोळ्यात अश्रू आले. खूप उदास वाटत होतं. पिशवीतून परवाच विकत घेतलेले ओले सुगंधी रुमाल काढून तोंड पुसलं. रुमालाचा स्पर्श खडबडीत का लागतो आहे म्हणून नीट पाहिलं, तर ते चुकून सुगंधी कागदी चेहऱ्यांच्या रुमालाऐवजी जर्मन भाषेत लिहिलेले न कळून मार्केटातून उचललेले लहान मुलांचे सुगंधी 'टॉयलेट पेपर' होते. रडता रडता भसकन हसू आलं आणि मनात विचार आले,
'बस! मी आता नाही रडणार!जितकी रडले तितकं हास्य आता माझ्या हिमतीच्या जोरावर मिळवणार! आयुष्यापुढे कधी हरणार नाही. कायम तलवार घेऊन लढणार. '


आजवर आयुष्याशी तलवार घेऊन लढते आहेच. कधी हिमतीने, कधी युक्तीने, कधी त्रागा करून तर कधी तात्पुरता तह करून!
---------------------------------------------------------------------------------------
(नोकऱ्यांची ही साठा उत्तरांची कहाणी सध्या तरी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!)