माझा नोकरीविषयक प्रवास!-२

'टाईम्स असेंट' मधील नोकऱ्या जरा भारीच आणि २-३ वर्षे अनुभव मागणाऱ्या असत. काही आठवड्यांनंतर लक्षात आलं की आपण टाईम्समधल्या मोठ्या रंगीबेरंगी जाहिराती बघतो आहोत. आपल्या सध्याच्या अनुभवाला (आणि गुणांना) पान ३ किंवा ४ वरील छोट्या काळ्या जाहिराती जास्त झेपतील. मग प्रत्येक काळ्या जाहिरातीला अर्ज करण्याचा वसा सुरू केला. 'खडे टाकत रहा, निराश होऊ नका,सम जॉब समव्हेअर इज मेड फॉर यू' असं घरातली मंडळी सांगत असायची. (आर्थिक परीस्थिती खराब नसली तरी आपला भावनाप्रधान मुलगा/मुलगी बेकारीला कंटाळून 'अंकुश' चित्रपटातल्यासारखा होईल अशी सुप्त भिती त्यांना वाटत असायची.) त्यामुळे इतके खडे टाकलेले असायचे की एखादा खडा बरोबर जागी लागला तर तो कधी फेकला तेच आठवायचं नाही.


असाच एकदा एक खडा लागला. 'न्यू इरा' की कायसंसं कंपनीचं नाव होतं. जाहिरात केव्हाच हरवलेली होती. आणि कंपनीच्या पत्रात फक्त मुलाखतीचं निमंत्रण होतं. सांताक्रूझला.  इस्त्रीचे कपडे घालून आणि पुस्तकातून थोडेफार फंडे वाचून मी तिथे गेले. स्वागतिकेने बसायला सांगितलं. आजूबाजूला बघत होते. समोरच्या भिंतीवर मधुमेहाची जाहिरात लागली होती. मधुमेहाची जाहिरात??? मी उडाले. थोड्या दूर एक टाय आणि चकचकीत बुटांचा घोळका बसून कुठल्यातरी इंजेक्शनाबद्दल चर्चा करत होता. 'खडा चुकीच्या जागी लागला आहे' याची जाणीव होऊनही मी बसून होते. तितक्यात माझं नाव पुकारलं गेलं आणि मी आत गेले. आत एक चकचकीत बूट-कडकडीत इस्त्री सदरा-रेशमी टाय फोनला कान व खांद्यात पकडून बसला होता. मला पाहून फोन जागेवर गेला. नमस्कार चमत्कार झाले. त्याच्या 'हॉलिवूड' आणि माझ्या तर्खडकरी आंग्ल भाषेत संभाषण सुरू झाले.
'तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहात.'
'होय साहेब.'
'तुम्ही जिथे मुलाखतीसाठी आला आहात ते नक्की काय आहे ते तुम्हाला माहिती आहे?'
'नक्की नाही साहेब. खरं तर अर्ज करून बरेच दिवस झाले आणि मी पूर्ण विसरले आहे.'
'हे मधुमेहांच्या औषधांच्या आणि इंजेक्शनांच्या कंपनीचे विक्री ऑफिस आहे. आणि आम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या शोधात आहोत. आता हे खरं की सध्या आमच्याकडे एक मॅकेनिकल इंजिनियर एम.आर. चे ट्रेनिंग घेतो आहे. पण तुम्ही खरंच अशा प्रकारच्या विसंगत नोकरीसाठी इच्छुक आहात काय?'
'नाही साहेब. आता आलेच आहे तर मुलाखत देऊन जाऊ म्हणून मी थांबले होते.'
'ठीक आहे. तुम्ही आता जाऊ शकता. यापुढे जाहिरात नीट वाचून अर्ज करत चला! तुमचा वेळ वाचेल आणि आमचाही.'
'होय साहेब. धन्यवाद साहेब.'
स्टेशनाकडे जाता जाता मी विचार करत होते. काय भांग बिंग प्यायली होती की काय अर्ज करताना? अरे हां!! 'न्यू इंडिया इलेक्ट्रॉनिक्स' वर मारायचा असलेला खडा शेजारच्या 'न्यू इरा' च्या जाहिरातीवर लागला होता!


असेच एक दिवस दुपारी बाबांच्या परममित्राच्या मुलीचा फोन आला.
'अगं मी इथली नोकरी सोडते आहे आणि आमच्या साहेबांना तातडीने या संगणक क्लासात नव्या शिक्षिकेची गरज आहे. तुला काहीकाळ ही नोकरी चालेल का?'
'हो चालेल. पण तसं मला सी आणि विन्डोज सोडून काही येत नाही गं.'
'सरावाने तू शिकशीलच.इथले विद्यार्थी पण पाचवी ते बारावीची शाळकरी मुलं आहेत.' तिथे गेले. पंडित साहेब त्यांच्या नव्यानेच औषध मारलेल्या खोलीत बसले होते.
प्र: काय काय येते?
उ. घरी संगणक आहे म्हणून एम.एस.ऑफिस येते, पदवीमध्ये ६ महिने शिकले म्हणून C येते. C++ चे पुस्तक वाचते आहे, वाचून शिकेन. असेंब्ली लँग्वेज येते. (मनातः प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स अभियंता 'असेंब्ली लँग्वेज येते' असे बेधडक ठोकून देत असतो. काही अपवाद वगळल्यास बऱ्याच जणांचे असेंब्ली लँग्वेजचे ज्ञान 'परीक्षेत पाच मार्कांच्या प्रश्नात चार ओळी कशाबशा लिहून २ मार्क मिळवणे' इतकेच असते. )HTML सध्या येत नाही, पण लवकरच शिकेन. (मनात: खरे तर काहीच नीट येत नाही, ते नीट शिकण्यासाठीच संगणक क्लासात नोकरी करायची आहे.)
प्र: केव्हा रुजू होणार?
उ. एक महिन्यानंतर.
प्र: पगाराच्या अपेक्षा काय आहेत?
उ.: २५०० रु.(मनात: हि हि हि...मला माहिती आहे,ज्या मुलीच्या जागेवर मी येते आहे तिला तुम्ही २५०० देत होतात ते..ती माझ्याच घराशेजारी राहते..)
प्र: २५०० जास्त वाटतात. अनुभव नसलेल्या उमेदवाराला इतके आम्ही देऊ शकत नाही. सध्या १८०० वर भरती व्हा. तुमचे काम आणि प्रगती पाहून वाढ केली जाईल. 
अशा प्रकारे माझी पहिली नोकरी सुरू झाली. प्रत्येक नवीन नोकरीत रुजू झालेला माणूस ज्या प्रचंड ध्येयाने, निष्ठेने,आणि साहेबावरील श्रद्धेने आणि आपल्या कामाने सर्वांवर छाप पाडायच्या इच्छेने(आणि अशाच काही तत्सम अव्यवहारी अतिशयोक्त भावनांनी) झपाटून काम चालू करतो तसेच मीही चालू केले.