माझा नोकरीविषयक प्रवास!-४

आमचा मुख्य साहेबही एक सरदारजी होता. तो फिरतीच्या नोकरीवर असायचा आणि फक्त महिन्यातून दोन दिवस कंपनीत असायचा. आता मला 'शेक्रेटरी' बनून दोन आठवडे झाले होते. इन्व्हॉइस,चलने,बिले बनवणे,हिशेब पाहणे,फोन घेणे, या विसंवादी कामांवर बऱ्यापैकी सराव झाला होता. आठवडी सुट्टीत नोकऱ्यांच्या मुलाखती देणेही जोरात चालू होते.


नवीन सेक्रेटरी कोण आहे म्हणून बघायला साहेबाने माझा बायोडेटा मागवला आणि तो उडालाच.
'तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा आणि डिग्री असून माझ्याकडे सेक्रेटरी म्हणून काम करता? का?'
'मला माझी मुलाखत घेणाऱ्या माणसाने सांगितलं होतं की काही महिन्यात इलेक्ट्रॉनिक्सच्या जागा तयार होणार आहेत म्हणून.'
'मी तुम्हाला आताच इलेक्ट्रॉनिक्सचा आणि आपल्या उत्पादनांचा थोडा अभ्यास करायचे काम देतो. पण प्रत्यक्ष काम मिळायला मात्र अजून काही दिवस लागतील.तोपर्यंत तुम्हाला हे सेक्रेटरीचं काम करावं लागेल.'
'पण मला सर्व ठिकाणी कागदपत्रांवर मी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम करत असल्याचाच उल्लेख हवा आहे.'
'तो मिळेल.'


अशा प्रकारे 'कागदोपत्री' इलेक्ट्रॉनिक्सच्या कामात असलेली मी बाहेर या कागदांनिशी नोकरी शोधू लागले. पेपरात एक इलेक्ट्रॉनिक्सची जाहिरात होती. त्यात फक्त कंपनीचे नाव आणि पोष्ट बॅग क्र. दिला होता. मी डिरेक्टरी बघून फोन क्र. शोधून फोनवर पत्ता विचारला. पलीकडे काम सांगितल्यावर फोनवर आलेला 'रावत' नामक माणूस म्हणाला, 'तुम्हाला हा फोन नंबर कसा मिळाला?' 
'मी डिरेक्टरीतून शोधला.'   
'ठीक आहे, तुम्ही रविवारी इथे मुलाखतीसाठी या.आमच्याकडे शुक्रवारी आठवड्याची सुट्टी असते.'
रावत साहेबांकडे मुलाखतीला गेले. मी 'केलेल्या' इलेक्ट्रॉनिक्स कामांवरही बोलले. रावत साहेब म्हणाले की तुम्ही आम्हाला तीन वर्षांचा करार लिहून द्या.
'तीन वर्षे जमणार नाही.कारण माझ्या वडिलांची बदली होणार आहे पुढच्या वर्षी.पण हे एक वर्षं मी चांगलं काम देऊ शकते.'
'नाही, माफ करा. आम्हाला तीन वर्षाचा करार करणारेच लोक हवे आहेत.'
इथेही काम फिसकटलं! शेवटी हातात दुसरी नोकरी नसतानाही मी सरदारजीच्या कंपनीला टाटा बाय बाय केले.


एके दिवशी दुचाकी दुरुस्त करायला नेहमीच्या मद्राशाकडे गेले. बोलता बोलता त्याला  सांगितले की नोकरीच्या शोधात आहे.
'आपका कितना सॅलरीका एक्स्पेक्टेशन होता?'
'मिनीमम थ्री थाउजंड.'
'क्या बात करता मॅडम..आजकल इंजिनियर फ्रेशर १५०० रुपया मे भी काम करता.इतना पगार कौन देगा?'
इतका वेळ बाजूला एक चष्मेवाला तिऱ्हाईत आमचे संभाषण ऐकत होता. तो पुढे आला.
'मै आपको फोर थावजंड तक पगार दूंगा.'
'लेकीन जॉब क्या है?'
'ये मेरा व्हिजिटिंग कार्ड. मीट मी धिस संडे फोर पी एम ऍट धिस ऍड्रेस.'
'ओके.'


काय बरं नोकरी असेल? चार हजार पगार? कॉल सेंटर असेल का? की टेलिमार्केटिंग?
रविवार आला. आई जरा धास्तावलेलीच होती. 'सांभाळून जा हो. काहीच माहिती नाही आणि इथे तिथे जात असतेस. हल्ली दिवस चांगले नाहीत.'
'काळजी करू नकोस गं आई.मी नीट बघूनच जाईन तिकडे.' दिलेल्या पत्त्यावर गेले. काचेचं लखलखीत दार आणि बाहेर पाटी होती: मॅक्सक्लीन. मॅक्सक्लीन?? नक्की काय बनवतात बरं हे? चष्मेबहाद्दूर आत वाट पाहत बसला होताच.
'या.बसा.'
मी आजूबाजूला बघून हे नक्की काय बनवतात याची माहिती मिळते का बघत होते.नेहमीचे जुजबी 'टेल मी अबाउट युवरसेल्फ' इ.इ. वाले प्रश्न झाले. तरीही थांगपत्ता लागेना. शेवटी मी विचारलं.
'तुमचं प्रॉडक्ट काय आहे?' 
'हां, मी या प्रश्नाकडे येणारच होतो.' त्याने खण उघडून एक बाटली काढली.
'हे आमचं नवीन फॉर्म्युल्याचं मोगरा सुगंधाचं फिनेल. आम्ही फिनेल, फ्लोअर क्लीनर आणि इतर सफाई प्रॉडक्ट्स बनवतो. तुम्ही आमच्या प्रॉडक्टसचं प्रत्यक्ष कंपन्यांच्या सफाई साठी जबाबदार लोकांना भेटून मार्केटिंग कराल का?आम्ही कमिशनही देतो आणि ठराविक रक्कम पगारही.'
'फिनेलचं मार्केटिंग????' माझ्या घशातून चित्रविचित्र आवाजात शब्द निघाले!!