आपण एखादी गोष्ट करायची असे मनात ठरवतो पण प्रत्यक्षात ती करू शकत नाही असे बरेचदा होते. त्या वेळेस ते नशीबातच नव्हते असे दैववादी म्हणतील तर तुमचे प्रयत्न पुरेसे नव्हते असे प्रयत्नवादी सांगतील. अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर ती गोष्ट साध्य झाली तर त्यातून जास्तच आनंद मिळतो. अशीच एक पर्वणी नुकतीच गाठायला मिळाली. पहायला गेल्यास हा महोत्सव गेली त्रेपन्न वर्षे नियमितपणे साजरा होत आला आहे. गेली तीस पस्तीस वर्षे मुंबईहून येऊन त्यात सहभागी होणारे काही महाभागसुद्धा आम्हाला तिथे भेटले. दरवर्षी संक्रांतीला तिळगुळ वाटावा किंवा दिवाळीला फटाके उडवावेत इतके ते त्यांच्या अंगवळणी पडले आहे.
मला मात्र रजा मागण्यासाठी साहेबाला काय सांगावे हा पहिला प्रश्न पडायचा. फक्त गाणे ऐकायला मी पुण्याला जाणार आहे असे सांगितलं तर तो औरंगजेब मला मूर्खात काढेल आणि मला माझ्या कामात रसच नाही असा त्याचा ग्रह होईल अशी भीती वाटायची. त्यातून काही मार्ग काढलाच तर आयत्या वेळी काही ना काही महत्त्वाचे काम किंवा कोणाचे तरी आजारपण निघायचे आणि सगळेच ओंफस व्हायचे. ते सगळे बाजूला ठेऊन मला जाता आले असते, अगदी नाही असे नाही, पण तेवढा निर्धार होत नव्हता.
मुळात शास्त्रीय संगीताचा परिचयच खूप उशीरा झाला. त्यापूर्वी मला सात स्वरांची पूर्ण नांवेसुद्धा माहीत नव्हती. आत्याबाईला मिशा असल्या तर काका म्हणतात तसेच गरीब गोगलगाईच्या पुल्लिंगी अवताराला कोमल ऋषभ म्हणत असतील आणि शुद्ध निषाद रात्रीच्या वेळी अरबट चरबट न खाता दूधभात, भेंडीची भाजी खाऊन झोपत असेल असे मी बिनदिक्कत सांगितले असते. शास्त्रीय संगीतावर आधारलेली लोकप्रिय हिंदी मराठी गाणी मलाही आवडायची पण त्याच्यामागे सुर, ताल, लय यांचे एवढे मोठे व्याकरण असेल याची पुसटशी कल्पना नव्हती.
पुलंची पुस्तके वाचतांना त्यांत शास्त्रीय संगीताचे अनेक उल्लेख यायचे. प्रत्यक्ष नबाबाचे बोलावणे घेऊन आलेल्या निरोप्याला "त्यांना सांग, म्हणावं इथे फुलला आहे पूरिया" असे सांगणाऱ्या गायिकेबद्दल आदराने बोलणारे इंदौरचे काकाजी असोत किंवा "त्यांच्यासारखी एक तान घेऊन दाखव की रे, खाली मुळव्याध झाली नाही तर नांव सांग की" असे म्हणणारे बेळगांवचे रावसाहेब, अशा साऱ्या पात्रांच्या माध्यमातून पुलंनी जे व्यक्त केले त्यातून शास्त्रीय संगीताबद्दल एक आदरमिश्रित उत्सुकता निर्माण झाली व वाढत गेली. मग गणेशोत्सवाच्या मांडवातील विनामूल्य गाण्यापासून सुरुवात करून हळू हळू वेगवेगळ्या ठिकाणी भरलेल्या खाजगी आणि सार्वजनिक मैफिलींना हजेरी लावली आणि ते स्वर्गीय संगीत ऐकायची गोडी निर्माण झाली. अशाच एका भव्य वातानुकूलित सभागृहामधील हाय फाय कार्यक्रमातील अप्रतिम गायनानंतर "कांही म्हणा पण मागच्या सवाई गंधर्वमध्ये झालेल्या यांच्या गायनाची सर कांही आज आली नाही." असा कुणीतरी शेरा मारलेला ऐकला आणि मनात शास्त्रीय संगीताचे एक नवीन परिमाण तयार झाले. गायन ऐकायला येणाऱ्या इतर चोखंदळ श्रोत्यांच्या गप्पांमध्ये सवाई गंधर्व महोत्सवाचा उल्लेख हमखास निघे आणि मला त्यांत भाग घेता येत नसल्याबद्दल खंत वाटे. त्यामुळे आपण हा अनुभव घ्यायचाच असे ठरवले होते ते आतां या वेळी जमले.
सहा डिसेंबरच्या रात्री झोपायला भरपूर उशीर होऊनसुद्धा सात तारखेला पहाटे लवकर उठून, तयार होऊन पुण्याची बस पकडली आणि पुणे गाठले. जेवणखाण झाल्यावर थोडेसे हाश्श हुश्श करून कार्यक्रमाला जायला निघालो. न्यू इंग्लिश स्कूल सांगितल्यावर वाहन चालकाने टिळक मार्गावरील एका भव्य इमारतीसमोर नेऊन गाडी उभी केली. तेथील पटांगणात सगळा शुकशुकाट दिसत होता. प्रवेशद्वारावर बसलेल्या रखवालदारांकडे चौकशी केल्यावर त्याने हा कार्यक्रम त्याच शाळेच्या रमणबागेत असलेल्या वेगळ्या शाखेत होत असल्याचे सांगितले. वाट चुकलेल्या पांथस्थांना योग्य मार्ग दाखवणे एवढेच त्या दिवशी त्याचे मुख्य काम असावे. त्याने फटाफट चार पांच गल्लीबोळांची नांवे सांगून डाव्या उजव्या दिशेने वळणे घेत तिथपर्यंत कसे पोचावयाचे हे सुद्धा सांगितले. पण हे गल्ली बोळ ज्याला माहीत असतील त्याला ही रमणबाग माहीत नसेल कां असा विचार मनात डोकावत होता तेवढ्यात आपल्याला सगळे कांही समजले आहे अशा आविर्भावात मान डोलवून आमच्या वाहनचालकाने गाडी पुढे हाणली आणि नू.म.वि. या पुण्याच्या आणखी एका सुप्रसिद्ध शिक्षणसंस्थेचे दर्शन घडवले. तिथल्या एका चुणचुणीत मुलाने हातांच्या इशाऱ्याने शेवटचे सव्यापसव्य दाखवले ते मात्र सर्वांना नीट समजले आणि आम्ही रमणबागेतील शाळेच्या मुख्य द्वारापर्यंत पोचलो. तिथे आंत बरीच गर्दी दिसत होती पण प्रवेशद्वाराजवळ कोणी नव्हते. "कलाकारासाठी प्रवेश" असे लिहिलेला फलक लावलेला होता व त्याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी एका द्वारपालाची नियुक्ति केली होती. एकादी तान वा लकेर मारून आम्ही सुद्धा कलाकार आहोत असे सांगून इथे भागण्यासारखे नव्हते. ते सिद्ध करणारी तांबड्या का पिवळ्या रंगाची खास प्रवेश पत्रिका दाखवणे जरूरीचे होते. आमच्या हातातील सामान्य तिकीट पाहून आमच्यासाठी मागील दाराने आंत जाण्याची सोय केलेली असल्याचे त्याने सांगितले. मग शाळेची इमारत आणि आजूबाजूच्या अनेक घरांना व दुकानांना वळसा घालून मागची बाजू गाठली. तिथे मात्र माणसांचा पूर लोटला होता. त्या प्रवाहातून पोहत पोहत विद्यालयाच्या प्रांगणांत प्रवेश घेतला.
मी पूर्वी कधीही पाहिला नव्हता इतका विस्तीर्ण मांडव त्या ठिकाणी घातलेला होता. 'खुर्च्या', 'कोच', 'भारतीय बैठक', 'निमंत्रित', 'पत्रकार' वगैरे वेगवेगळी दालने दर्शवणारे स्पष्ट फलक जागोजागी होते त्यावरून भारतीय बैठकीची जागा शोधायला कांही अडचण आली नाही. एका विशाल दालनात सतरंज्या आणि चादरी पसरून त्यावर तुरळकपणे लोक बसलेले होते. भरपूर मोकळी जागा बघून खूप आनंद झाला आणि शक्य तितके पुढेच बसायचे ठरवले. चपला काढून हातात धरून प्रवेश केला पण प्रत्येक रिकाम्या दिसणाऱ्या जागेवर कोणीतरी "आधीपासून बसलेले आहे", "लवकरच येणार आहे", "चहा प्यायला गेले आहे" असे सांगून आजूबाजूचे लोक आम्हाला तिथे बसू देत नव्हते. सगळ्या चादरी सारख्या आकाराच्या नसल्यामुळे कांही ठिकाणी खाली अंथरलेले मळकट जाजम दिसत होते. अशीच एक जागा पाहून आम्ही खाली बसलो. बाजूच्या लोकांचा सौम्य विरोध होताच पण आता आम्हीही गांधीगिरी करायचे ठरवून बसकण मारली. तिथे येऊ घातलेले लोक चांगले चार पांच तासांनी रात्रीची जेवणे आटपून येते झाले पण तोपर्यंत लकडी पुलाखालून भरपूर पाणी वाहून नव्या पुलाखालून संगमाच्या डोहापर्यंत जाऊन पोचले होते आणि आम्ही आजूबाजूच्या चादरींवर हात पाय पसरण्याइतके स्थिरस्थावर झालो होतो. दुसऱ्या दिवशीपासून आम्हीसुद्धा आपली चादर घेऊन लवकर येऊन जागा धरायच्या खेळात सामील झालो. मोठ्या खुबीने मोक्याच्या जागा धरून त्या शेवटपर्यंत इंचइंच लढवण्यात जी गंमत असते ती एखाद्या तानेमुरकीइतकीच आनंददायी कशी असते याचा शोध लागला.
एकापाठोपाठ अनेक शोध लागत गेले. सुश्राव्य गायन ऐकणे ही श्रवणभक्ती करण्यात कान गुंतलेले असतांना शरीराच्या इतर इंद्रियांचा सदुपयोग करण्याचे अनंत मार्ग दिसले. प्रत्येक रसिकाने आपल्याबरोबर एक तरी पोटळी आणलेलीच होती. कुणी त्यातून टेपरेकॉर्डर काढून ध्वनिमुद्रणाच्या फितीवर फिती काढत होते तर कोणी इलेक्ट्रॉनिक कॅमेरा काढून ढिगानढीग छायाचित्रे घेत होते. एक चित्रकार मुलगी आपल्या स्केचबुकावर मंचावरील कलाकार, त्यांचे साथीदार व रसिक श्रोत्यातील कांही चेहेऱ्यांची रेखाचित्रे काढत होती तर दुसरी कलावती हातातील वहीमध्ये मेंदीच्या नक्षीकामाचे नमूने रेखाटत होती. अधून मधून त्यांच्या वह्या आवतीभोवती बसलेल्या रसिक प्रेक्षकांमध्ये फिरून वाहवा मिळवत होत्या. एक आजीबाई लोकरीचा गुंडा आणि सुया घेऊन आल्या होत्या आणि नाधिंधिंनाच्या तालावर उलटे सुलटे धागे गुंफीत होत्या. माझ्या एका बाजूचा गृहस्थ योगी अरविंदांच्या व्याख्यानांचे पुस्तक वाचण्यात मग्न होता तर दुसऱ्या बाजूला एक युवक संगणक परिचालन प्रणाली (सॉफ्टवेअरला असेच कांही तरी म्हणतात ना?) वरील जाडजूड ग्रंथ घेऊन बसला होता. त्याच्या डोळ्याबरोबर हातांनाही चांगला व्यायाम घडत होता. कांही लोक तर सकाळचे वर्तमानपत्रच घेऊन आले होते. त्यातील कांही लोक त्यामधील शब्दकोडी किंवा सुडोकू सोडवण्यात आपापल्या सुपीक डोक्याचा कस लावत होते तर कांही लोकांच्या सगळ्या बातम्या वाचून झालेल्या असल्यामुळे ते आता छोट्या जाहिराती पहात होते.
प्रत्येकाच्या झोळ्यामध्ये गोल, चौकोनी, चपटे, उभे कसले तरी डबे होतेच. शुभारंभाच्या सनईचे सूर सुरू झाल्यापासून तासाभरात संपले असतील नसतील तेवढ्यात या डब्यांची उघडझाप सुरू झाली. त्यातील शेव, चिवडा, वड्या, चणे, फुटाणे, शेंगदाणे वगैरेचे चव घेत चघळणे करतांना ते थोडे थोडे आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांत वाटलेही जात होते. थोड्या वेळातच आमचे सख्खे शेजारी बनलेल्या कांही लोकांच्याकडून आम्हालाही त्या खिरापतीचा लाभ झाला. सात आठ तास बसून गायन ऐकतांना कान तृप्त होऊन त्यानेच पोट भरले तरी त्याने पोटातील कावळ्यांचे समाधान होईल याची खात्री नव्हती, यामुळे आपणही क्षुधाशांतीसाठी बरोबर कांही न्यावे असा विचार मनात आला होता. पण यापूर्वी कांही सभागृहामध्ये खाद्यवस्तू नेण्यास सक्त मनाई असल्याचे पाहिले होते. या ठिकाणी कसली पुणेरी पाटी लावली असेल याचा नेम नव्हता म्हणून मध्यंतरामध्ये बाहेर जाऊन पुणेरी मिसळ किंवा थालीपीठ असे कांही तरी चाखावे असा विचार करून आम्ही नुसतेच हात हलवीत आलो होतो. पण जसेजसे डबे उघडायला सुरुवात झाली तसेच बसलेले कांही लोक उठून बाहेर जाऊ लागले. त्यातील कांही जण येतांना हातांत कसल्यातरी पुरचुंड्या घेऊन आंत येत होते. त्यातील बटाटेवडे आणि भज्यांचा सुवास चोहीकडे दरवळत होता. आता मात्र आमच्याही जिव्हा उद्दीप्त झाल्याने बाजूच्या लोकांना आमची जागा राखण्याची विनंती करून बाहेर आलो.
तेथील दृष्य बघून तर अक्षरशः दिग्मूढ व्हायला झाले. आम्ही फार फार तर एखाद्या कामचलाऊ कँटीनची अपेक्षा केली होती. इथे तर जत्रा भरलेली दिसली. एका बाजूला ओळीने दहा बारा स्टॉलवर पुस्तके, दिनदर्शिका, ध्वनिफिती वगैरे मांडून ठेवल्या होत्या. दुसऱ्या बाजूला दहा बारा स्टॉलवर विविध प्रकारच्या खाद्यवस्तू मिळत होत्या. पुणेरी मिसळ व थालीपीठ तर होतेच पण उप्पिट आणि आंबोळी हे मुंबईचे लोक विसरून गेलेले मूळ पदार्थही होते. अर्थातच भेळ, पराठा वगैरे त्यांचे उत्तर भारतीय भाऊबंद आणि कानामागून येऊन तिखट झालेले उत्तप्पा व डोसा हे दाक्षिणात्य अवतार जास्तच लोकप्रिय होते असे दिसले. पण या परभाषिक पदार्थांच्या पाककृती आत्मसात करून रसिकांना सादर करणारी सगळी मराठी मंडळीच होती. अगदी तव्याशेजारी उभे राहून आपल्याला पाहिजे तेवढा कांदा, कोथिंबीर, तिखटमीठ घालून पाहिजे तेवढे परतवून मनासारखा गरमगरम उत्तप्पा तव्यावरून काढून थेट हातातल्या डिशमध्ये घेऊन खायला कुठे मिळतो? नुसत्ती उत्तप्प्याची चवच नव्हे तर तो भाजला जात असतांना दरवळणारा सुगंध घेण्याची संधी कधी मिळते? शिवाय ही पोटपूजा सुरू असतांना सभागृहात सुरू असलेल्या संगीत मैफिलीचा प्रत्येक सूर व्यवस्थितपणे कानावर पडत राहील याची खबरदारी घेतलेली होतीच.
या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे म्हणावे लागेल. हजारो लोक बसू शकतील इतका प्रशस्त मांडव, अधिक रसिक श्रोत्यांना सामावून घेण्यासाठी मांडवाबाहेर ताडपत्र्या अंथरलेल्या, वीस पंचवीस तरी क्लोज सर्किट टी.व्ही. मॉनिटर्स, मंचाच्या दोन्ही बाजूस दोन मोठे स्क्रीन, मांडवाबाहेर त्याहून मोठे पडदे, त्यावर वेगवेगळ्या अँगल्सने घेतलेले व्हीडिओशूटिंग, क्लोज अप्स वगैरे पहाण्याची सोय, अगणित स्पीकर्स असलेली बोस साउंड सिस्टीम, सगळेच कांही अचाट होते.
या कार्यक्रमाबद्दल मी इतके लिहिले पण तेथील गायनवादनाबद्दल कांहीच नाही. याचे कारण असे आहे की मोगऱ्याचा सुगंध किंवा रेशमाचा स्पर्श जसा शब्दात सांगता येत नाही, त्याचा उल्लेख करून त्या अनुभवाची फक्त आठवण करून देता येते, तसेच कांहीसे सुश्राव्य संगीताचे आहे असे मला वाटते. जाणकार लोक तांत्रिक शब्दांचा उपयोग करून ती आठवण जास्त रंगवून सांगू शकतील, पण तो माझा प्रांत नाही. त्याबद्दल एक अभूतपूर्व अनुभव एवढेच मी म्हणू शकेन. पण फक्त गाणेच नव्हे तर तेथील एकंदर वातावरणात चार दिवस घालवणे हा सुद्धा एक अभूतपूर्व अनुभव होता आणि तो दीर्घ काळ स्मरणात राहील यात शंका नाही.