साबणगाथा

विविध उपग्रह वाहिन्यांवर चाललेल्या साबणगाथा (सोप-ऑपेरा) पाहिल्या की उपग्रह हा आपल्या पत्रिकेत शनी-मंगळ वा राहू-केतू आदी बलाढ्य ग्रहांपेक्षाही अधिक पीडक आहे हे पटायला प्रत्यवाय नसावा. पत्रिकेत सगळे ग्रह एकमेकांना “पाहतात” असे ऐकून आहे. उपग्रहाची वक्रदृष्टी हाही त्यातलाच प्रकार असावा. असोत बापडा. इंग्रजीत एक वचन आहे - “जर तुम्ही त्यांचा पराभव करू शकत नसाल तर त्यांना सामील व्हा!” याच अनुषंगाने साबणगाथा कशी बनवता येईल यावर खल करू लागलो. त्या लिहिणा-या नामवंत लेखक-लेखिकांच्या मुलाखती घेतल्या. येथे नामवंत या शब्दातील नाम हे राष्ट्रभाषेतून घेतले आहे. त्यांत एक म्हण आहे, “बदनाम हुएँ तो क्या हुआ, बदनाम हुएँ, पर नाम तो हुआ ।” यच्चयावत सगळ्या शायरांना आडवे पाडील अशा त्या वचनातील नाम ध्यानात ठेवले म्हणजे साबणगाथांचा उगम निराळा शोधायला नको.


आता तुम्ही म्हणाल की नमनाला घडाभर तेलाचे काय कारण? अहो, हीच तरी खरी मेख आहे. मूळ मुद्दा एक वार असला तरी त्याचे सादरीकरण किमान दोनशे वार असायला हवे. तरच यशस्वी साबणगाथा लिहिता येईल. यश आणि अपयश ह्या सापेक्ष कल्पना आहेत. यश म्हणजे, बहुतांश प्रेक्षकांच्या अनादरास पात्र होईल असे लेखन! ते करणे काही सोपे काम नाही. येथे दुग्धव्यवसायातून बोध घेणे आवश्यक आहे. हा बोध घेतानाच दुधात पाणी टाकणे या नियमाची भिंगरी फिरवून पाण्यात दूध टाकणे हा साक्षात्कार व्हायला हवा. एवढे झाले की यशाची पहिली पायरी तुम्ही चढलात म्हणूनच समजावे. लेखन करताना आपल्या प्रतिभेचा थयथयाट करणे आवश्यक आहे. डार्विनसाहेब म्हणूनच गेले आहेत की मानव हा माकडापासून उत्क्रांत झाला आहे. याला अनुरूप अशी सुरुवात करावी.


उच्च प्रतीचे मद्य आणावे आणि ते अनशेपोटी सपाटून प्यावे. त्यानंतर संगणकाच्या कळपटावर टंकन सुरू करावे. ह्याने संगणन शास्त्रातील एका महत्त्वाच्या नियमाचे अधोरेखन होईल. तो म्हणजे, “काही माकडे अनंत काळ कळपट बडवीत बसली तर शेक्सपियरचे हॅम्लेट पूर्ण करतील.” ते अजर नाटक होईपर्यंत अनंत साबणगाथा ह्याही होतीलच. अशा रितीने तयार झालेले संवादाचे बाड दिग्दर्शकाच्या टाळक्यावर आदळावे. त्या सुपीक डोक्यावर त्या बाडाची बीजे होऊन पडली की दूरचित्रवाणीच्या आधुनिक तंत्रज्ञानातील युक्त्या-प्रयुक्त्या वापरून साबणगाथेच्या भागांचे शेत उभे राहते. मग प्रायोजक मिळविण्याचा प्रवास सुरू होतो. ह्याबद्दल बेफिकीर असावे. प्रायोजित कार्यक्रमासाठी वित्तपुरवठा करणा-या संस्थांजवळ कार्यक्रमाची गुणवत्ता पाहण्यासाठी फारसा वेळ नसतो. कराराच्या अटींमध्ये नीट पळवाटा ठेवल्या की झाले. हवा तेवढा कल्पनाविलास करायला तुम्ही मोकळे होता.


एकदाचे शेकडो भाग झाले की मग कलाकारांच्या मुलाखती वगैरेंनी काम भागते. यथावकाश मालिकेस वर्ष पूर्ण झाले की प्रेक्षकांच्या सहनशक्तीची दाद द्यावी आणि ती अजून वाढवण्यासाठी नवीन मालिकेच्या कथेची तयारी सुरू करावी!