युगंधर रसास्वाद- भाग ३


युगंधर रसास्वाद भाग तीन


 या भागात आपण दौपदीच्या व्यक्तिरेखेचा  आढावा घेणार आहोत.
द्रौपदी
आपल्या जन्माशी निगडीत असलेल्या घटनांचे वर्णन करुन द्रौपदी स्वयंवराची कथा सांगायला सुरुवात करते. त्या निमित्त्याने तिची आणि कृष्णाची पहिली भेट झालेली आहे. स्वयंवराचा अवघड पण जर पूर्ण करता आला नाही तर काय होणार असा विचार तिच्या मनात येत असतांना आसानावरुन उठलेलेल्या द्वारकाधिषांना उद्देशुन सभेने काढलेले उद्गार ऐकताच, द्रौपदी मान वर करुन पहाते. तिच्या मनात विचार विचार चमकतो की यांनी जर पण पूर्ण केला तर यांची पत्नी म्हणून आपले जीवन कसे असेल? रुक्ख्मिणीदेवी आपला स्वीकार करतील ना? पण तेवढ्यात अर्जुनाने पण जिंकल्यावर त्याच्या गळ्यात वरमाला चढवल्यावर द्रौपदी कृष्णाकडे बघून म्हणते की द्वारकाधीषांच्या डोळ्यात क्षणापूर्वी पाहिलेल्या अभिलाषेचा लवलेशही नव्हता, होती ती स्फ़टीकासारख्या बंधुभावापेक्षाही पारखायला कठीण अशी छटा! कुंतीने 'भिक्षा वाटून घ्या' असे सांगितल्यावर सखा श्रीकृष्णाने तिची घातलेली समजुत द्रौपदीने वर्णन केली आहे.



आपले पाच पती एका पत्नीच्या आणि इंद्रप्रस्थाच्या महाराणीच्या दृष्टीकोनांतून कसे भासले, याचे विवेचन विविध घटना, उदाहरणे देऊन द्रौपदीने केले आहे.  इंद्रप्रस्थाची महाराणी या नात्याने अर्थात ती महाराज युधिष्ठीरांची श्रेष्ठ पती म्हणून निवड करते तर एक स्री म्हणून भीमसेनाची!
'माते कोणतीही कुलस्त्री कधी भिक्षा होऊ शकत नाही' असे युधिष्ठीर केवळ आपल्या अभिलाषेने म्हणाला नाही आणि त्याने स्वत: द्यूत हरलयावर, आपल्या पत्नीला पणाला लावले. यामुळे दुखावलेली द्रौपदी म्हणते की" तो केवळ माझे विच्छेदनच करुन थांबला नाही तर त्याने कुठल्याही क्षत्रीयाने प्राणपणाने जपावे अशा स्वस्रीच्या लाखमोलाच्या लज्जेचे धिंडवडे काढले. दोन्ही वेळी सख्या श्रीकृष्णाने माझे रक्षण केले."  आपल्या पाचही पतींचा सगळ्यात आवडलेला गुणविशेष म्हणजे त्यांची पारदर्शक मातृभक्ती असे द्रौपदी सांगते. ती म्हणते की हे पाचही बंधू म्हणजे हाताच्या पाचही बोटांनी वळलेली सशक्त मूठ होती. त्या मुठीची कळ होती ती म्हणजे त्यांची माता-राजमाता कुंतीदेवी-माझ्या सासूबाई.



द्रौपदीच्या आयुष्यात ठ्ळक अशी तीन महत्त्वाची वळणे होती. पहिले तिचे स्वयंवर की ज्यामुळे तिला पाच पती लाभले.तशीच अनुभवी राजमाताही लाभली. दुसरं वळणं होतं ते युधिशिष्ठिराचा आणि दौपदीच्या राज्याभिषेकाच. तिसर आणि महत्त्वाच वळण होत ते राज्याभिषेक आणि राजसूय यज्ञ यामधील कालखंडाच. त्या कालखंडात दौपदी पुत्रवती झाली आणि पांडवांचे इतर विवाह झाले.
राजसूय यज्ञाच्या वेळी दौपदीकडून अनवधानाने एक अक्षम्य चूक झाली. ती म्हणते 'एक मनोमन झालेल्या, पुढ मलाच न पटलेल्या सुप्त विचाराची आणि दुसरी मी काढलेलया उदगारांची. अर्थातच तिचा निर्देश कर्ण सहावा पती म्हणून लाभला असता तर आणि मयसुराने तयार केलेल्या राजवाडयात पाण्यात पडलेल्या दूर्योधनाला उद्देशून काढलेल्या उदगारांकडे आहे. पुढे द्रौपदी म्हणते कि मला कर्णाबद्दल जे अनाकलनीत आकर्षण वाटल होत त्यात कोणताही शारीरिक वासनांचा भाव नव्हता. तो जन्मजात सूर्यभक्त आणि मी जन्मजात अग्निकन्या यांचा तो तेजाकर्षाणाचा भाग होता असे मला आज पूर्ण विचारांती वाटत.



द्रौपदी सांगते की आपल्या मनाच्या चक्षूंनी रोज श्रीकृष्णाचे दर्शन घेणे आणि त्याचे चिंतन करणे याशिवाय एकही दिवस गेला नाही. आकाशातल्या तारका जशा कुणाला मोजता आल्या नाहीत तसे श्रीकृष्णाची रोज दिसलेली रूपे भिन्न होती. आपल्याजवळ असलेल्या सुदर्शन यंत्राचा उपयोग नेहमी का करत नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना  श्रीकृष्ण म्हणतो " अट्टाहासाने जर का या तेजयंत्राचा उपयोग करायचा ठरवला तर जवळ येणारे हवेहवेसे वाटणारे, मानससरोवरातील शुभ्रधवल हंसपक्षासारखे, तेजयंत्राचे बोल हा हा म्हणता आठवेनासे होतात!मृगातील विजेच्या कडकडाटाने ते राजहंस कुठंच्या कुठं पांगले जावे तसे दूर उडून जातात. मग येणारा शारीरिक अनुभव पराकोटीचा थकव्याचा असतो. त्यामुळे मी क्षणैक थरथरतो. सुदर्शनाच्या प्रयोगाचा विचार गोकुळाच्या गोपींनी यमुनेत कोजागिरीचे द्रोणदिवे सोडून मोकळ व्हाव तसा दूर सोडून मोकळा होतो. खर सांगायच तर कृष्णे ,मला कुठल्याही कर्मात मनोमन कधीच अडकून पडावंसं वाटल नाही हे निदान तुला तरी समजायला हरकत नाही. "



लाभलेल्या अपार सौंदर्यामुळे आपल्या ठायी एक अहंभाव आला आहे याची जाणीव द्रौपदीला होती. ती जाणीव कृष्णानं अत्यंत कौशल्यानं माझ मन राखून तिला वेळोवेळी करून दिली होती. ते करताना तो हसत म्हणाला होता," सौंदर्यायाला विनय शोभून दिसतो कृष्णे. अप्रतिम स्त्रीच्या ठायी तो असला तर सुवर्णाला प्राजक्त फुलांचा सुगंध येतो."
वनवासात भेटायला आलेल्या कृष्णाला पाहून आपल्यावर झालेल्या अन्यायाचे वर्णन सांगण्याआधी ह्याने दुष्टांचा पाडाव का केला नाही या विचाराने द्रौपदीचे मन क्रोधाने भरून येते.  तेव्हा तिला शांत रहायला सांगणार्‍या कृष्णाच्या प्रेमाने क्षणात तिला आनंद होतो. "कृष्णे तू कोणत्या मनोभावात आहेस हे मी जाणतो, स्थिरचित्त हो मग मी निवांत बोलणार आहे तुझ्याशी. सावर स्वत:ला. " त्याचे हे उद्गार ऐकून द्रौपदी म्हणते की तो भाव जपणारा होता पण भाऊक नव्हता. तो सर्वांशी समरस होणारा पण कुणाच्याच मनोभावात वाहून जाणारा नव्हता. त्याचे विचार ऐकून मी स्वत:ला सावरलं.



       आपल्यावर द्यूतानंतर झालेल्या अन्यायानंतरही आपले पती कसे शांत राहीले, दिग्गजांनी भरलेल्या सभेत कोणीच कशी तिची रक्षा केली नाही हे सांगताना द्रौपदीचा रोखून धरलेला संताप बाहेर येतो, भरसभेत आपली झालेली विटंबना तिने श्रीकृष्णाला सांगितल्यावर तो म्हणतो," सखे तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा तुझे पती कौरवांना पराभूत करून घेतील. यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करेन व विजय मिळवून देईन हे तुला वचन देतो. "
यानंतर द्रौपदीने जयद्रथाकडून झालेले तिचे हरण व भीमार्जुनानंनी केलेली सुटका, अज्ञातवासाचे गुप्तपणे श्रीकृष्णाबरोबर केलेले आयोजन याचे सखोल वर्णन केले आहे. शिवाजी सावंतांनी अज्ञातवासाचे दिवस, विराटसेनापती कीचकाचा भीमाने केलेला वध या घटना अत्यंत प्रभावीपणे आपल्या डोळ्यासमोर द्रौपदीच्या व्यक्तिरेखेद्वारे उभ्या केल्या आहेत.


     कृष्णशिष्टाई अयशस्वी झाल्यानंतर पांडवांच्या वतीने श्रीकृष्णानेच निर्णायक युध्दाचा निर्णय घेतला होता. हे युद्ध मात्र आता केवळ कौरव पांडवांच राहिले नाही. ते झाले संपूर्ण आर्यावर्ताचे. अन्यायाविरुद्धच्या न्यायाच! दमनाविरुध्दच्या दया-क्षमेचे! असत्याविरुद्ध सत्याच!पांडव युध्दाच्या तयारीला लागल्यानंतर द्रौपदी म्हणते की माझे कितीतरी दिवस नुसते विचार करण्यात व थकल्यानंतर श्रीकृष्णाचे स्मरण करण्यात निघून गेले. युध्दासाठी कोणाचा पक्ष घेणार असे विचारण्यास द्वारकेला निघालेल्या अर्जुनास द्रौपदी सांगते की काही झाले तरी श्रीकृष्णाचा पाठिंबा चुकवू नकोस,त्याला पांडवांपासून दूर जाऊ देऊ नकोस. इतर सर्व जग आणि त्याचा पाठिंबा चुकवलास तरी चालेल. यानंतर द्रौपदीने युद्धाची तयारी, सैन्याची मांडणी, डावपेच इत्यादींचे ओघवते वर्णन केले आहे. युद्ध सुरु होताना व झाल्यावर एक महाराणी म्हणून व पांडवांची पत्नी म्हणून होणारी तिच्या मनाची घालमेल, उत्सुकता, अधिरता वाचकाला खिळवून ठेवते. परंतु एक क्षत्राणी म्हणून ती म्हणते की आमच्या रक्तातच भिनल असत की जीवन हाच एक संग्राम आहे. अभिमन्यूच्या वधानंतर शोकाकूल द्रौपदीला कृष्ण म्हणतो"याज्ञसेने युध्द म्हणजे महायज्ञ!त्यात कुणाकुणाला आणि कसली कसली कसली समिधा अर्पण करावी लागेल सांगता येत नाही."
यापुढील भागात आपण अर्जुनाच्या व्यक्तिरेखेचा आढावा घेऊ.
-सोनाली जोशी