युगंधर -रसास्वाद-भाग १

कै.शिवाजी सावंत यांची "युगंधर"ही कलाकृती माझ्या वाचण्यात आली. त्यांचे छावा आणि मृत्युंजय मला आवडले होते. त्यामुळे या पुस्तकाविषयी अपेक्षा वाढल्या होत्या. पुस्तकाने त्या पुर्ण केल्या यात शंका नाही. तेव्हापासून त्याविषयी काही लिहावे असे मनात होते. माझ्या मनाला भावलेले व मनोगतींना दाखवावेसे वाटलेले मी येथे लिहीणार आहे. या महान ग्रंथावर भाष्य करण्याची वा त्याची समीक्षा करण्याची माझी पात्रता नाही याची मला पूर्ण जाणीव आहे.


युंगधरमध्ये भगवान श्रीकृष्णाचे जीवन सामान्यापुढे उलगडून त्याला साहित्य, विज्ञान आणि इतिहासाच्या  पाटीवर तावून सलाखून घेण्याच काम शिवाजी सावंतांनी केले आहे. त्याकरता त्यांनी भारतभर केलीली भ्रमंती आणि उपयुक्त दाखले आणि छायाचित्रे दिली आहेत. हे सर्व शिवाजी सावंताच्या शोधक वृत्तीचे प्रतीक आहे .आजच्या विज्ञानयुगात भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा वेध घेताना त्यात कुठेही भावूकपणाची छ्टा आढळत नाही. १००० पानी ग्रंथातील प्रत्येक ओळ सावंतांच्या मराठी भाषाप्रभुत्वाची बोलके उदाहरण आहे. युगंधर वर चार भागात लिहायचा विचार आहे. त्यावेळी  मी जमेल तेवढा साहित्यिक दृष्टीने आढावा घेणार आहे त्याकरता मला आवडलेली वाक्ये पुस्तकातून जशीच्या तशी लिहीणार आहे. अर्थात मला आवडलेले सगळे आपल्याला भावेल असे मुळीच नाही. आता थोडेसे पुस्तकाच्या मांडणी विषयी. मनोगतावर रसिक आणि साहित्याची आवड असणारी मंडळी आहेत त्यांच्याकरता सांगायचे तर मृत्यंजयाच्या साच्यात युगंधराची आखणी केली आहे. ग्रंथाची सुरुवात प्राचीन अश्वत्थ वृक्षाच्या तळी पहुडलेल्या श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेने होते. त्यानंतर रुक्मिणी, दारुक, द्रौपदी, अर्जुन, सात्यकी व उद्धव अशाक्रमाने व्यक्तीरेखा त्यांचे व श्रीकृष्णाचे नाते उलगडून दाखवतात. हे वाचल्यानंतर राधेचे नाव स्वतंत्र कसे नाही हा प्रश्न मनात येणे अगदी स्वाभाविक आहे. साहित्यात वेगवेगळ्या भाषेत शृगाररसप्रधान खंडकाव्यातून राधा जनमानसात आली. परंतु शिवाजी सावंतानी राधेला प्रातिनिधिक गोपस्री म्हणून घेतली आहे. आपल्या गोकुळाच्या आठवणी सांगताना श्रीकृष्णाच्या तोंडी राधेचा-प्रिय गोप सखीचा उल्लेख आहे. राधा या जोडशब्दाचा अर्थ मोक्षासाठी तळमळणारा जीव असा आहे.राधेबरोबर रास खेळणारा श्रीकृष्ण म्हणतो" मी आणि राधा राधा आणि मी गोप आणि गोपी पूर्ण उन्मनी झालो होतो.राधाकृष्ण ही दोन शरीरे उरली नव्हती." पुढे श्रीच म्हणतात"स्री ही विधात्याची निकोप प्रेमाची कसली वासनारहीत संस्कारशील कलाकृती आहे याची गुरुदक्षिणा राधेने मला दिली, बारीक सारीक सर्व मात्रांसह.खरच राधा माझी पहिली स्त्री गुरु होती."


आता भगवान श्रीकृष्णाचे सावंतांनी वर्णन केले आहे ते असे"माझ्या कंठात पांढर्‍याशुभ्र फ़ुलांची, मध्येच हिरव्याकंच पानांचे कलाश्रीमंत गुच्छ गुंफ़लेली टवटवीत "वैजयंतीमाला" विसावलेली आहे.तिला घेरून कौस्तुभमणीधारी कंठेच कंठे आणि कितीतरी सुवर्णी अलंकार छातीवर रुळताहेत....माझ्या झळझळीत पीतांबरावर अश्वत्थाची पान चुकवून उतरलेले सूर्यकिरणांचे काही चुकार कवडसे ऐस पैस पसरलेत.त्यामुळे हे पीतांबर कस अंगभर झळझळून उठल आहे....माझ्या अथक आणि उदंड भतकंती केलेल्या या चक्रवर्ती तळव्यातच "जरा"नावाच्या व्याधान नुकताच सोडलेला, खोलवर रुतलेला एक सुची बाणही मला स्पष्ट दिसतो आहे!......उजव्या पायाच्या टाचेशी दाटलेलं माझ्याच दुर्लभ, उष्ण रक्ताच थारोळहि पसरलेल मला दिसत आहे. रक्त ! खरच रक्त म्हणजे असत तरी काय?तो असतो चैतन्याने अखंड काळाला साक्षी ठेवून दिलेला संस्कारशील हुंकार! पिढ्यानपिढ्याच्या दिर्ध साधनेच्या संस्कारशील वाटचालीन लाभलेला.


युगंधर मध्ये मथुरेचे सुंदर वर्णन केले आहे. त्याचप्रमाणे द्वारकेची निर्मिती, हस्तिनापूर तसेच मयासुराने बांधलेली पांडवांची राजनगरी यांचे वर्णन करतांना आपल्याला सावंतांचे शब्दसामर्थ्य कळते. ही नगरे वाचकांच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहतात असे म्हटले तर वावगे ठरू नये.  श्रीकृष्णाला मिळालेले प्रत्येक रत्न आणि त्यासाठी केलेले प्रयत्न, युध्दे याची वर्णनेही वाचनीय आहेत. आचार्य सांदिपनींच्या आश्रमातील विद्याथीदशेतल्या श्रीकृष्णाचे १४ विद्या आणि ६४ कलांचे अध्ययन व त्याअनुशंगाने येणारे प्रश्न आणि उत्तरे म्हणजे वाचकांना पर्वणीच यात काही शंका नाही. गोमंत पर्वतावरील वास्तव्य,भगवान परशुरामांची व श्रीकृष्णाची भेट, सुदर्शनचक्राची प्राप्ती, जरासंधाबरोबर केलेले युद्ध ही सर्व वर्णने पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतात.


आपल्या पत्नीचे रुख्मिणीचे वर्णन करतांना श्रीकृष्णाच्या मुखी सावंतांनी पुढील वाक्ये आपल्या शैलीत लिहीली आहेत."पूर्ण उमललेया चंद्रविकसी कुमुदकमळासारखी दिसत होती तिची चर्या! उत्सफ़ुल्ल, यौवनरसरशीत. माझ्या रथाच्या दंडावरचा सुवर्णी गरुडध्वज बघताच तिची चर्या कशी आनंदोर्मीन फ़ुलून आली. लाख लाख सुवर्णी गरुडपक्षीच जसे काही मैनाकपर्वत शिखरासारख्या उन्नत दिसणार्‍या तिच्या प्रसन्न चर्येवर उतरले. ......ती आली !उन्हात उजळलेली अंबिका मंदिराची एक एक श्वेत पायदंडी धिमेपणाने उतरत, चालत संगमरवरी शिल्पासारखी! शरदातल्या प्राजक्तगंधित टवटवीत पहाटेसारखी! आषाढाच्या प्रारंभी सावळ्या मेघमालेत तळपून उमटणार्‍या वीजरेघेसारखी. ......दुसर्‍याच क्षणी तिचे काळेभोर, टपोरे तरीही अरागस डोळे माझ्या मस्तकीच्या मोरपंखाला भिडले!त्याच्या हव्या हव्याशा नितळ आवाहक रंगच्छटात जसे खिळूनच पडले!...


रुख्मिणीच्या सौंदर्याचे वर्णन जसे सावंतांनी केले आहे तसेच श्रीकृष्णाच्या तोंडी वारंवार तिच्या बुद्धिमत्तेचे कौतुकही त्यानी वर्णन केले आहे. रुख्मिणीच्या बुद्धिमत्तेचा पहिला दाखला म्हणजे तिने श्रीकृष्णास लिहीलेल्या पत्र होय. आपल्या जीवनसखीचे केवळ सौंदय न पहात तिच्या बुद्धिमत्तेकडे आदराने पहाण्याची श्रीकृष्णाची दृष्टी आजही समाजाला मोठी शिकवण देते आहे.  श्रीकृष्णाच्या शब्दात सांगायचे तर"ती जशी अनुपम सौंदयवती होती तशीच अजोड बुद्धिमानही होती. ...रुख्मिणीच्या आगमनाने माझ्या जीवनातील रंगीविरंगी 'संसारपर्व'सुरु झाल होत....रुख्मिणीच्या आगमनानं माझी भावद्वारका नाना भावगंधांनी रंगछटांनी कशी अंगभर खुलून गेली- 'ऋतुस्नात' झाल्याप्रमानं!तिच्यावर एक आगळीच 'नव्हाळी' चढली!!  येथे सावंतांनी श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा रुक्मिणीच्या व्यक्तिरेखेशी जोडून पुढचे पर्व सुरु केले आहे.