युगंधर -रसास्वाद-भाग ४

युगंधर रसास्वाद भाग १


युगंधर रसास्वाद भाग २


युगंधर रसास्वाद भाग ३


युगंधर रसास्वाद भाग ४


          अर्जुनाची व्यक्तिरेखा आपल्या समोर रेखाटताना शिवाजी सावंतांनी कृष्णाच्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्या समोर उलघडले आहेत. श्रीकृष्णाचे जीवन समजणे किती अवघड आहे व त्याचा आवाका किती मोठा आहे ते स्पष्ट करताना अर्जुन म्हणतो,
"श्रीकृष्णावर विचार करू लागलो की घटनांचे मृगतांडे मनात धपाधप उड्या घेत अनावर गतीने धावू लागतात. अनेकविध आकारांच्या रंगवैभवी मयूरपक्षांचे थवेच थवे मनाच्या किनाऱ्यावर केकारव करीत अलगद उतरू लागतात. त्यातील कुठल्याही एकावर म्हणून दृष्टी जखडून ठेवता येत नाही. मला आठवेल तशी ही कृष्णार्जुनगाथा मी सांगतो आहे. मला याची पूर्ण जाणीव आहे की त्याच जीवन म्हणजे मला गांडीव धनुष्याबरोबर मिळालेल्या अक्षय्य भात्यासारखे आहे."


       अर्जुनाला त्याच्या नावाचा अर्थ समजावून सांगतला तो कृष्णाने. अर्जन म्हणजे मिळवणे , प्राप्त करणे. जगातील कीर्तीला नेणार निवडक ज्ञान म्हणून जे जे काही आहे त्याच अर्जन करणे हेच तुझ जीवनसाफल्य आहे असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो.


          अर्जुनाशिवाय मोजक्यांनाच श्रीकृष्ण सखा म्हणायचा. त्यात त्याचा सारथी दारूक होता. परममित्र सुदामा होता. हस्तिनापूरचे महात्मा विदूर आणि मंत्री संजय होते. आणि उद्धवदादा होते. आपण श्रीकृष्णसखा आहोत ही कल्पनाच अर्जुनाला आनंददायी होती आणि म्हणून आपल्याला कृष्णाने सखा म्हणावे असे अर्जुनाला वाटे. पण प्रसंगानुरुप श्रीकृष्ण त्याचा उल्लेख वेगवेगळ्या नावाने करीत असे हे सुद्धा अर्जुनाला समजले होते.


         युगंधरमध्ये या भागात आपल्या भावंडांचे, मातेचे आणि द्रौपदीचे वर्णन अर्जुनाने केलं आहे.   जगाच्या दृष्टीने पाच वेगळे बंधू वाटले तरी पाचजणांच एका बळकट मुठीसारखं अभेद्य अस्तित्त्व होतं. त्यात एकीत मोठा वाटा होता कुंतीमातेचा आणि द्रौपदीचा. पण कोणत्याही तराजूत घालून न जोखता येण्याजोगा वाटा होता तो परमसखा श्रीकृष्णाचा.  त्याच्याच मार्गदर्शनाने पांडव लाक्षागृहापासून तर अज्ञातावासापर्यंत सगळ्या अवघड प्रसंगातून बाहेर पडले होते.


      श्रीकृष्णाने पुनर्वसित केलेल्या हजारो कामरूप स्त्रियांचा विचार अर्जुनाच्या मनात येतो तेव्हा तो म्हणतो,' की स्त्रीत्वाचा जो अर्थ कृष्णाला कळला होता तो एकाही वीराला कळला नव्हता.' 


      द्रौपदीचे विभाजन, पाच पतींबरोबर तिच्या एकांताची संहिता कुंतीने श्रीकृष्णाच्या मदतीने आखली होती.  आपल्या पुत्रांचे नामकरण व पालनपोषण या सर्वाकरता, आपल्याला सखा श्रीकृष्ण सदैव आपल्याला मागर्दर्शन करीत होता याची जाणीव अर्जुनाला सतत होती.


          जीवनाचे तत्त्वज्ञान सांगण्यासाठी आपले जेष्ठ बंधू युधिष्ठिर व भीमाची निवड न करता आपलीच निवड श्रीकृष्णाने का केली असावी याची कारणेही अर्जुनाने दिली आहेत.


          अर्जुनाच्या आयुष्यातील अथवा अर्जुन साक्षीदार असणाऱ्या कित्येक घटना आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याचे सामर्थ्य युगंधरमध्ये आहे. नागकन्या उलुपीशी विवाह, पाशुपतास्त्राची प्राप्ती व त्यानंतर अर्जुनाची बदललेली मनोवृत्ती याची वर्णने उदाहरण म्हणून देता येतील. त्याशिवाय चित्रागंदेकडून नृत्याचे शिक्षण, सुभद्राहरण,  अश्वत्थ्याम्याने केलेली दिव्य सुदर्शनचक्राची मागणी, द्रोणाचार्यांनी एकलव्याला मागितलेली गुरुदक्षिणा अशीही अनेक उदाहरणे देता येतील.


          अर्जुनाने आपल्या भावंडांबरोबर धृतराष्ट्र, भीष्म, दूर्योधन,द्रोणाचार्य, शकुनी यांचे स्वभाव विश्लेषणही केले आहे.    यादवांच्या इतर स्त्रिया आणि कौरव पांडवांच्या स्त्रिया यांची तुलनाही त्याने द्रौपदी, राधा आणि रुक्मिणीशी केली आहे. ही सर्व वर्णने मनोवेधक आहेत. श्रीकृष्णसखी व आपली पत्नी दौपदी, हिच्याबद्दल अर्जुनाला वाटणारा आदर व अर्जुनाचे आपल्या मातेवरील निस्सीम प्रेमही आपल्याला कित्येक ठिकाणी दिसते.


               कुरुक्षेत्रावरील सैन्याची मांडणी व त्याचे वर्णन वाचनीय आहे. 'आपल्याच नातेवाईकांना, जेष्ठांना, गुरुजनांना युद्धात मारायचे' या विचाराने हतबल झालेला अर्जुन आपल्या डोळ्यासमोर वर्णनाद्वारे उभा राहतो. त्यावेळी त्याला श्रीकृष्णाने गीतेसारख्या अमर जीवनतत्त्वाची जाणीव करुन दिली. त्याचे वर्णन वाचताना शिवाजी सावंतांच्या लेखणीचे सामर्थ्य कळते. यासर्वाचा आढावा घेणे माझ्या आवाक्याबाहेर आहे.


              अभिमन्यूच्या वधाने संतप्त अर्जुनाने, 'दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापर्यंत जयद्रथाचा वध करेन अन्यथा अग्निप्रवेश करेन' अशी प्रतिज्ञा केली. जयद्रथाला ठार करता न आल्याने अर्जुनाने  अग्निप्रवेशाची तयारी केली.  'त्यावेळी चितेवर चढताना गांडीव धनुष्य बरोबर ठेव' असा सल्ला श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला. 'माझ्या तर्जनीकडे लक्ष ठेव' असाही धनुष्यधारी अर्जुनाला महत्त्वाचा संदेश श्रीकृष्णाने दिला. त्यावेळी सूर्यग्रहणाचे वेध सुटताच रणभुमीवर सूर्यदेव अवतरले याचे वर्णन शिवाजी सावंतांनी अलंकारीक भाषेत केले आहे.


        जयद्रथाच्या वधानंतर युद्धाचा चौदावा दिवस संपतो.   "आपण एक सामान्य नर आहोत आणि श्रीकृष्ण म्हणजे नारायण आहे" या अर्जुनाच्या वाक्याने युगंधरच्या 'अर्जुन' ह्या भागाचा शेवट होतो.


          पुढील भागात आपण सेनापती सात्यकी याची व्यक्तिरेखा पाहू.