युगंधर रसास्वाद- भाग २


रुख्मिणी
          आपले अन श्रीकृष्णाचे जीवन उलगडून दाखवताना रुख्मिणी म्हणते की श्रीकृष्णाचे जीवन द्वारकेला घेर करुन असलेल्या सागरासारखे आहे आणि त्याच्या अविरत लाटांसारख्या आहेत माझ्या मनात अनंत स्मृती. स्मृतींच्याही आहेत अगणित लाटा...या लाटा सांगतांना माझी तारांबळ उडते आहे. जस जमेल तस आठवेल असे मी हे क्रमाने मन:पूर्वक सांगणार आहे.
     शिवाजी सावंतांनी रुख्मिणी या व्यक्तीरेखेद्वारे स्त्रीच्या मनातील विविध भावनांना योग्य शब्दात वाट करुन दिली आहे. त्याकाळात रूढ असणारी बहुपत्नीत्वाची पद्धत आणि त्यामुळे थोरली महाराणी या नात्याने करावि लागणारी तडजोड, धाकट्या राण्यांना मार्गदर्शन, पतीची विभागणी हे सारे करतांना सात्विक स्वभावाच्या रुख्मिणीची होणारी घालमेल त्यांनी विविध प्रकारे उत्तमोत्तम दाखले देवून आणि रुक्मिणीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करून टिपली आहे. तेवढ्याच ताकतीने त्यांनी आपल्या शक्तीची जाणीव झालेल्या रुख्मिणीने ज्या खंबीरपणे श्रीकृष्णाला साथ दिली, त्याच्या अनुपस्थितीत सून म्हणून व थोरली महाराणी आणि माता म्हणून आपल्या कर्तव्यात कुठेही कसर ठेवली नाही हे ही दाखवले आहे. आपल्या पतीची दिनचर्या रुख्मिणीने नेमक्या शब्दात सांगितली आहे.रुख्मिणीची व्यक्तीरेखा वाचकांसमोर स्मयंतकमण्याचे नाट्य,नरकासुराचा वध, कामरुप देशातील सहस्र स्रीयांची मुक्त्तता आणि द्रौपदी स्वयंवर यांचा विस्तृत वेध घेते. 
     रुख्मिणीच्या व्यक्तिरेखेत पांडवांचा आणि त्या ओघाने आलेल्या घटनांचा उल्लेख आहे. द्रौपदीस्वयंवरचे आमंत्रण बघून रुख्मिणीने पाचवी सवत म्हणून तिला स्विकारण्याची तयारी ही गोष्ट जरा वेगळी वाटते परंतु आपण तेथे का जातो आहोत हे त्यांना श्रीकृष्णाने न सांगितल्याने त्यांनी केलेल्या विचारात काही काही गैर वाटत नाही. अर्जुनाने स्वयंवराचा पण जिंकल्यावर भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात "ही माझी तिसरी भगिनी!" आणि ते "प्रातिवत्याच्या शिखराला जाशील असा आशीर्वादही द्रौपदीला देतात". रुख्मिणीशी निगडीत घटना म्हणजे श्रीकृष्णाच्या तिच्याशिवाय सात पत्नी आणि त्या सर्वांना झालेली अपत्यप्राप्ती, त्यांची नावे , स्वभाववैशिष्टे यांचे वर्णन याच पर्वात सावंतांनी केले आहे. त्याचबरोबर सुदामाभेट,सुभद्राहरण यांचेही या पर्वात वर्णन सावंतांनी आपल्या ओघवत्या, रसाळ शैलीत केले आहे.
दारुक            
         युगंधरातील तिसरी व्यक्तिरेखा आहे दारुकाची,भगवान श्रीकृष्णांच्या सारथ्याची. दारुक म्हणतो"एखादया कसदार चित्रकारानं सुरेख रंगसंगतीच आकर्षक चित्र रेखाटाव. भवतीच्या अवघ्या विश्वानं ते डोळे विस्फ़ारत थक्क होऊन बघाव तसच माझ्या स्वामींच जीवनकार्य ठरलं. अस चित्र रेखाटतांना चित्रकाराच्या कुंचल्यातून त्याला नकळतच चारदोन रंगतुषार बाजूला इकडतिकड उडावेत तेच ओंजळीत झेलून घेऊन मी हे सांगतो आहे."
"कुंभातून ओतल्यासारखा धो धो, सरळ कोसळणारा मुसळधार,वायुलहरींवर हिंदकळत उतरता रिमझिमता, मध्येच थांबणारा, पुन्हा कोसळणारा, उन्ह पावसाचा खेळ खेळणारा श्रावणी, अशा पर्जन्याच्या अ‌संख्य लयी असतात. एकीसारखी मात्र दुसरी कधी असते का?नाही. तसचं आमच्या द्वारकाधीश महाराजांचं जीवन होत. त्यानंतर दारुकाने जरासंधाबरोबर झालेले भीमाचे द्वंद्व युध्दाचे वर्णन केले आहे. इंद्रप्रस्थातील राजसूय यज्ञ, शिशुपाल वध,द्रौपदीवस्रहरण याचा वेध घेतला आहे. घोर अंगिरस गुरुंच्या आश्रमातील दिवस याचे वर्णनही दारुकाने केले आहे. द्वारकाधीश अंगिरसांच्या आश्रमात का आले हयाचे कारण सांगतांना
आचार्य म्हणतात,"तू इथे आला आहेस ते भवतीच्या सर्वांना आणि युगायुगाच्या पिढ्यांआ मनाचा विषाद काय असतो ते पटवून देण्यासाठी. रात्रीचा अनुभव घेतला तरच दिवसाचं मोल लक्षात येतं. अंधाराचा अनुभव घेतला तरचं प्रकाशाचं मूल्य कळतं."
या पर्वाच्या शेवटी दारुक म्हणतो"छे !स्वामी म्हणजे नेमके कोण आहेत? काही काही केल्या कळतच नाही."!
आता पुढील भागात द्रौपदी आणि अर्जून ह्या व्यक्तिरेखा आणि त्याच्या मनातील भगवान श्रीकृष्ण याचा आढावा घेऊ या.