छून च्ये!

छून च्ये म्हणजे वसंतोत्सव. चीनी नववर्षाचा उत्सव.

चीनी लोक आपल्याच सारखे उत्सवप्रिय. शरदात चंद्रोत्सव असाच महत्त्वाचा. अर्थात वसंतोत्सवाचा थाट काही वेगळाच. आपल्याकडे दिवाळीला वा युरोप अमेरिकेत नाताळला जे महत्व ते चीनमध्ये नववर्षोत्सवाला. बंगालमध्ये दुर्गापूजेच्या आठवडा-पंधरादिवस आधीपासूनच जसे लोक मनाने पूजेत पोचतात तसे चीनी लोक या सणाच्या चाहुलीने हरखून गेलेले असतात.

चीनमध्ये आपल्याच सारखी समाज रचना असावी. हे लोक एकत्र कुटुंब पद्धतिवर प्रेम करणारे, पण बदलत्या काळाच्या गरजेनुसार मुले-मुली शिक्षण वा नोकरीच्या निमित्ताने घर सोडून बाहेर पडतात, मोठ्या शहरात स्थायिक होतात. जागेची टंचाई, महागाई, भिन्न संस्कृति तसेच धकाधकीचे आयुष्य यामुळे वडीलधारी मंडळी आपल्या मूळ घरीच राहतात. मात्र सणासुदीला सर्वानी एकत्र यावे, गप्पा टप्पा व्हाव्यात, मुलाबाळांचे कोडकौतुक करावे, सगळ्यांनी एकत्र बसून मनसोक्त आस्वाद घेत पारंपारिक भोजन करावे हे प्रत्येक चीनी कुटुंबाचे मनोगत. मग गावकडच्या वडीलधारी मंडळींना मुलांचे वेध लागतात. मुले घरी येतील की आपणच मुलाबाळांकडे जायचे याचे बेत सुरू होतात.

हा सण साधारण फ़ेब्रुवारी महिन्याचा पहिल्या आठव्ड्यात असतो. मात्र यंदा नववर्षदिन थोडा उशीराने म्हणजे १८ तारखेला होता (कदाचित चीन्यांमधे सुद्धा अधिक महिना वगरे असेल:)). गेले वर्ष हे कुत्र्याचे होते तर येणारे वर्ष वराहाचे! डुक्कर म्हणजे भाग्याचे व धनाचे प्रतिक मानले जाते. चीनमध्ये अनेक ठिकाणी सोनेरी रंगाची, सजवलेली खेळण्यातली छोटी डुकरे ठेवलेली वा सजावटीसाठी वापरलेली दिसतात. भेट्वस्तूंच्या दुकानात व अगदी सोन्याच्या दुकानातही अशी छोटी हसऱ्या मुद्रेची डुकरे दिसून येतात.

नव्या वर्षाचे स्वागत म्हणजे नवे कपडे, घरात नव्या वस्तू यांची खरेदी ही आलीच. प्रत्येक जण आपापल्या कुटुंबियांसाठी, आप्तांसाठी, प्रिय व्यक्तिंसाठी भेटवस्तू शोधत असतो. ज्याला भेट द्यायची त्याच्या आवडी-निवडीचा विचार व आपला खिसा बघून वस्तू खरेदी केल्या जातात. मात्र प्रत्येक भेटवस्तू विकत घेताना ती घेणाऱ्याला ती भेट ज्याला द्यायची त्याच्या चेहेऱ्यावरची खुशी जणु खरेदी करतानाच दिसत असते. अनेक चीनी लोकांशी विशेषत: मुलींशी बोलताना हे जाणवून येते. कितीही महत्त्वाच काम असल, माणूस घरापासून कितीही दूर असला तरी तो या सणाला घरी येणारच. भेट वस्तूंबद्दलही असा संकेत आहे की सुंदर लाल वेष्टणात बांधलेल्या वस्तू आपल्या प्रियजनांना तर द्यायच्याच पण नातेवाईक वा परिचितांमध्ये कुणी परिस्थितीने गरीब असेल तर त्याला कपडे, वस्तू वगरे आवर्जुन भेट द्याव्यात ज्यायोगे त्यांचाही सण आनंदाचा होइल. नववर्ष दिनाची मेजवानी अर्थातच द्णदणीत हवी! एरवी देखील खाणे आणि खाउ घालणे हा चीनी लोकांचा आवडीचा विषय. या खास मेजवानीत कोंबडी, बदक, मासे, जलचर, भाज्या, भात वगरेचे चांगले ३०-३५ पदार्थ हजेरी लावतात. मध्य आणि उत्तर प्रांतांमध्ये थोडे झणझणीत खातात तर दक्षिणेकडे खाणे जरा सौम्य वा सपक असते.

प्रत्यक्ष सुट्टी साधारण आठवड्याची असली तरी शाळा- महाविद्यालये २-३ आठवडे बंद असतात, कामगार मंडळी जी घरी जातात ती सण साजरा करून घरची कामे वगरे उरकून साधार १५-२० दिवसांनीच परततात. आपल्याकडचे कोकणातले कामगार एकदा गणपतीला गेले की अनंत चतुर्दशीनंतरच परततात तसे. या काळात सगळे कामकाज निदान आठ दिवस तरी संपूर्ण बंद! अगदी जहाजाने माल रवाना झाला तरी कागदपत्रे देखिल ताब्यात मिळणार नाहीत. शहरात सर्वत्र आनंदाला व उत्साहाला उधाण आलेले असते. सुट्टी आधीचे काही दिवस एकमेकाना शुभेच्छापत्रे पाठवणे, खरेदी व एकीकडे कचेरी बंद होण्या आधी आवश्यक कामे संपवणे असे गडबडीचे असतात.

जानेवारी महिना उजाडला की आपण काढलेली काही बरी प्रकाशचित्रे निवडुन त्यांची  नववर्ष शुभेच्छापत्रे करणे हा माझा आवडता उद्योग. चित्र निवडुन त्याच्यावर ’शिन निएन ख्वाऽऽइ ल’ वा ’छुन च्ये यु ख्वाऽऽइ’ असे लिहिले की झाले आमचे शुभेच्छापत्र तयार. कधी चीन मध्ये टिपलेले तर कधी आपल्याकडचे काही वैशिष्ठ्य दाखवणारे चित्र तर कधी ज्याल पाठवायचे त्याच्याबरोबरचे आपले चित्र अशी निवड असते. फोशानच्या मयूर उद्यानात नकळत टिपलेले छिंगवन चे चित्र जेव्हा मी तिला शुभेच्छापत्र रुपात पाठवले तेव्हा ती हरखून गेली होती. शक्यतो प्रत्येक पत्र हे खास व वेगळे असावे असा माझा कटाक्ष असतो. ठोकून एकच पत्र नाव बदलून सर्वांना पाठव्णे मला रुचत नाही. 

भेटपत्रे तयार झाली की मग कुणाकुणाला पाठवायचे त्याची जंत्री तयार करायची; कुणी रहायला नको! मला परिचित असलेल्या तमाम चीनी मंडळींना आपल्याला कुणीतरी आठवणीने शुभेच्च्छापत्र पाठवत आहे याचा आनंद व अभिमानही असतो. अनेकदा अनेक ओळखी होतात, पुढे व्यावसायिक संबंध फारसा राहात नाही. मात्र मैत्री जुळते ती कायमची. कधी निरोपकावर गप्पा होतात, कधी ई-टपालाने ख्यालिखुशाली विचारली जाते, मग कामाच्या व्यापात अनेक महिने संपर्कच नसतो. मीन अशातलीच एक मैत्रीण. वास्तविक तिची आणि  माझी प्रत्यक्ष भेट झालेलीच नाही, तरीही आमची दाट मैत्री आहे. त्याची एक वेगळीच कहाणी आहे; असो. अर्थात व्यावसायिक संबंध नसल्याने गप्पा होतात त्या मैत्रीतल्याच. हल्ली बरेच दिवसात आमची काही पत्र-संदेश वगरेची देवाण घेवाण नव्हती, हळु हळू संपर्क खूपच कमी झाला होता. मात्र शुभेच्छापत्रांची यादी करताना तीची प्रकर्षाने आठवण झाली. आठवणीने मी तिला ई-शुभेच्छापत्र पाठवले. लगोलग तिचे उत्तर आले, अनेक महिने संपर्क नसताना अचानक माझे नववर्षाचे शुभेच्छापत्र पाहुन तीला खूप आनंद झाला असे तिने लिहिले होते. ती आता ऑस्ट्रेलियात स्थायीक झाली होती! मला आग्रहाने बोलावले होते; इथे काही काम नसत का तुमच्या आस्थापनेच? आणि समजा नसल तर काढ अस म्हणत होती. तशी ती खट्याळ स्वभावाची.  देश सोडून दूर आल्यावर या सणाच्या वेळी तीला आपल्या सर्व मित्र-मैत्रीणींची खूप आठवण येत आहे असे म्हणत होती.  आता यंदा ती चीन मध्ये नसली तरी नववर्ष दिन साजरा करायला ऍडलेड्च्या ’चायना टाउन’ ला जाणार होती.

एकुण काय, तर माणूस हा सहजीवनावर प्रेम करणारा प्राणी आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी समाज, सण-समारंभ, नातं ही त्याची एक भावनिक गरज आहे. चला, आपणही नव-वर्षाच्या आनंदात सहभागी होउ.