माझी अस्मिता- माझी मराठी !

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी,
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफूलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नभानभात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तहलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी,
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहूणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

-कवी सुरेश भट.

आज २७ फेब्रु. - आज कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकरांचा जन्मदिन.हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
ह्या दिनाचे महत्त्व काय आहे, होते किंवा असावे ह्या चर्चा करण्यापूर्वी मराठीचे आपल्या सर्वांसाठीचे नेमके स्थान कुठले हे स्वत: नक्की करणे आज आवश्यक झाले आहे. आपणच आपल्यावर ही वेळ ओढवून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. व म्हणून की काय इतकी सुंदर कविता रचणाऱ्या कवीवर्य सुरेश भटांनाही शेवटच्या कडव्यात सद्यपरिस्थितीची विदारकता त्या काळी जाणवली असणार. ह्या भुमीतल्या संतांनी, साहित्यीकांनी व कवींनी जो मराठीला मोठे करण्याचा विडा उचलला होता ते कार्य करणे आज माझ्यासारख्या यकच्चीत माणसाला शक्य नसले तरी जे त्यांनी दिले आहे ते राखणे तर हाती असल्याची जाण मात्र नक्कीच आहे.

माझ्या एका बालमैत्रीणीशी नव्याने ओळख झाली तीनेही ह्या लेखाला हातभार लावण्याचे कार्य करण्याची उर्मी व इच्छा दर्शवली.....!
हे द्योतक आहे ते मराठी टिकवण्यासाठी सर्वसामान्य उचलीत असलेल्या खारीच्या वाट्याचे. 
ह्या लेखातला काही भाग व एक चारोळी तीने सुचवलेली आहे. मनोगती असो वा नसो.... मराठी भाषेच्या अस्मीते साठी म्हणा की अस्तित्त्वा साठी म्हणा, काळजी घेणाऱ्या प्रत्येक मराठी बांधवाला एकत्र आणण्याचे कार्य "मनोगत" सारखी संकेतस्थळे करीत असताना हे अस्तित्त्व किंवा ही अस्मिता टिकेल की नाही ह्याची काळजी जरा कमी होते हे नक्कीच स्पृहणीय आहे.

सुचित्रांनी मला पाठवलेल्या त्यांच्या विचारांचा सारांश: 

"माझी मराठी मराठी
तीची पुण्याई अनोखी
चला घेऊ खांद्यावरी
तीची अनोखी पालखी"

"मराठी भाषेचे मुळ इंडो-युरोपीयन आहे. मराठी भाषा ही भारतात बोलली जाणाऱ्या भाषांपैकी चौथी भाषा आहे व हिंदी, तेलगू, बंगाली ह्या इतर तीन भाषा आहेत.
भाषेची व्याख्या करावयाची झाल्यास; भाषा हा ध्वनी व वस्तु ह्यांच्यात संबंध दर्शवणारा दुवा आहे (किंवा संकेत आहे). किंवा- 'एखादा विशीष्ठ ध्वनी म्हणजे एखादी विशीष्ठ वस्तू हा संकेत म्हणजेच भाषा' असेही म्हणता येईल. उदाहरण द्यायचेच झाल्यास आपण जेव्हा 'नववधू' चा संदर्भ देतो तेव्हा मंगळसुत्रातल्या उलट्या वाट्या पटकन आपल्या नजरे समोर येतात !
आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की अमरकोषावरून स्फुर्ती घेऊन रोजेट ने शब्दकोष बनवला. भाषा पंडितांनी अमरकोष मुखोद्गत केल्याने त्याचा नेमका अर्थ किंवा त्यांचे समानार्थी शब्द सांगणे त्यांना शक्य होई. आज अमरकोष मुखोद्गत करणे शक्य नसले तरी मराठी भाषेचा वापर आपण योग्य रितीने घरात केल्यास आपल्या मुलांच्या कानांवरून वेगवेगळे शब्द, वाकप्रचार, म्हणी इत्यादी अलंकार गेल्याने त्यांची भाषा समृद्ध होईल.
भाषेच्या प्रसारा बरोबरच अपभ्रंशांचा प्रसारही झाला जो टाळला जायला हवा. मराठी ही आपली मातृभाषा आहे, म्हणजे आपली मायबोली; म्हणजेच जी भाषा आपली "आई" बोलते तीच आपण बोलतो. मग आपल्या मातेची (आजीची) मायबोली ही तीच व तीच्या आईची मातृभाषा ही 'मराठी'....... पण जी मराठी आपण बोलतो तीच मराठी आपली आजी वा पणजी बोलायची का ह्याचा विचार करणेही क्रमप्राप्त आहेच.
भाषेत येणारे अपभ्रंष टाळले गेले तर तीचे अस्तित्त्व बराच काळ टिकून राहील व ती अधीकाधीक समृद्ध होईल.
मात्र ह्या आजी किंवा पणजीचे काही शब्द आजही आपल्या पर्यंत जसेच्या तसे पोहचलेत हीच ह्या भाषेची महती आहे.
अडगुल मडगुल
सोन्याच कडगूल,
रुप्याचा वाळा
तान्ह्या बाळा.. तीट लावा....
ह्यातल्या अडगुल मडगूल ह्या शब्दांचा अर्थ बऱ्याच जणांना माहित नसूनही तो अपभ्रंष न होताही येथवर पोहचला आहे ह्यातच ह्या भाषेचे महत्त्व दिसून येते."
- सुचित्रा देशपांडे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीला व मराठी राज्याच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होतील. तरीही मराठी भाषेला राजदरबारी योग्य ते स्थान न मिळाल्याची खंत थोरामोठ्यांनी व्यक्त केली आहे व आज आपल्यापर्यंत येऊन पोहचली आहे.
दुकानांवरील पाट्या मराठीत नाहीत.....
महाराष्ट्रात फिरणाऱ्या एका दुचाकीवर मराठीत क्रमांक लावणे गुन्हा आहे.....
मुंबईतल्या हायकोर्टात मराठीतून कामकाज करावे की नाही ह्यावर आद्यापही घोळ चालला आहे.....
हे जे भाषेवर आलेले अतिक्रमणाचे संकट आहे ते आपल्या अमरकोषावर किंवा साहित्यावर आलेले नसून ते रोजच्या व्यवहारातील भाषेवर आलेले आहे. व आजची सर्वात मोठी काळजी तीच आहे. रोजच्या व्यवहारातच आपण आपल्या भाषेचा पुरस्कार केला नाही तर एका विशीष्ठ काळापर्यंतचे साहित्य भाषेने समृद्ध राहिल बाकी त्यापूढे येणारे / येत असलेल्या साहित्यात मग संमीश्र भाषेचा प्रयोग आपणांस बघावा लागेल व हीच लक्षणे भाषा नामशेष होण्याची आहेत.

ह्या बाबत एक अत्यंत मार्मीक उदाहरण द्यायचे झाल्यास, आमच्या इमारतीत एक शेट्टी कुटूंबीय राहतात. त्यांच्याशी भाषे संदर्भात बोलताना जाणवले की त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांची भाषा बोलताच येत नाही. हे ऐकल्यावर मला जरा विचीत्र वाटले परंतू नंतर कळले की त्यांच्या भाषेला स्वत:ची लिपीच नाही व म्हणून जर ती भाषा बोलली गेली नाही तर तीचे अस्तित्त्व टिकणे कठीणच होणार आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे फुटलेले पेव व आपण पालकवर्ग (माझ्यासह) त्यांची करीत असलेली पाठराखण हा ही एक काळजीचा मुद्दा आहे. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात व प्रत्येक बाजूचा विचार करावयाचा झाला तरी सर्वप्रथम मराठीला प्राधान्य दिले जावे असे वाटते. पण सर्वच मराठी शाळांची अवस्था सरकारी धोरणांमुळे इतकी बिकट झालेली आहे की मराठी मायबोली वरील प्रेम कितीही व्यक्त करण्याचा प्रयत्त्न केला तरी व्यवहार ही नाण्याची दुसरी बाजू लक्षात घेतल्यास तीच बाजू नेहमी (छापा/काटा) जिंकतेय.......
महाराष्ट्रात शाळेला परवानगी देताना - मराठी हा विषय बंधनकारक आहे- ह्या अटीवर का दिली जात नाही हे मला आजवर न सुटलेले कोडं आहे. जेथे आपले सरकारच योग्य त्या दिशेने पाउल उचलत नाही तेथे आपण तरी किती बुड आपटणार ???
मायबोली पासून मुले दुरावणे म्हणजे त्यांचा सामाजीक ऱ्हास करवून घेणे असल्याचे कुसूमाग्रजांनी मागेच म्हटले होते.
आजच म.टा. मध्ये "मराठीवरील संकट हे अस्मितेवरील संकट" हा कुसूमाग्रजांचा लेख वाचनांत आला. लोकसतेतही ह्यावरील बरेच काही वाचनीय आहे. परंतू सर्व लेखनांचा सारांश काढावयाचा झाल्यास हा प्रश्न फक्त सरकारी कृतीने पार पाडण्यासारखा नसून प्रत्येक मराठी माणसाचा कर्तव्यतत्पर हातभार स्वत:च्या मायबोलीला लागला तरच जे काही आहे ते आपण टिकवून ठेवू शकू असे वाटते.

मी स्वत: काही संकल्प सोडलेत....
मराठी भाषीकांनी इंग्रजाळलेले मराठी वापरण्याऐवजी स्वत:ची बोली स्वत:च्या लेखनांत आणावी ह्याबद्दल आग्रह करीत असतो....
जेथवर शक्य आहे तेथवर हा गाडा ओढण्याचे ठरवलेय....
बघूया ह्या कार्याला यश कितपत मिळते ते ! शेवटी फक्त प्रयत्न करणेच माझ्या हाती आहेत.

धन्यवाद....