सार्वजनिक गणेशोत्सव.... एक विद्यापीठ !

तसे बघायला गेल्यास सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रात थोडे थोडके नाहीत
परंतू आपण स्वतः ज्या गणेशोत्सवाचे आयोजन करीत असतो व जर आपल्या व आपल्या मित्रवर्गाच्या सर्व मेहनतीवर हा उत्सव साजरा केला जात असेल तर आपणांस त्याचे महत्त्व अधिकच वाटणार !

लहानपणा पासून भुसावळला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा अगदी जवळून बघितली आहे. आमच्या भुसावळातल्या कुळकर्णी प्लॉट्स च्या विवेकानंद गणेश मंडळाने चाळीशी नक्कीच गाठली असणार ! ह्यातली निम्मी वर्षे मी सक्रिय कार्यकर्ता असल्याने सार्वजनिक उत्सवांमधले आयोजन कश्या रितीने करावे ह्याचे अगदी बालपणापासूनच प्रशिक्षण आपोआपच मिळत गेले.
मंडप उभारण्यासाठी लागणाऱ्या काथ्यांच्या दोऱ्यांपासून ते थेट श्री गणेशाचे विसर्जन झाल्यावर केल्या जाणाऱ्या 'भंडाऱ्या'चे आयोजन आम्ही पोरे पोरेच करीत. दरवर्षी येणाऱ्या वर्गणीतून पैसे बाजूला काढीत त्यातून मंडळासाठी नेहमी लागणारे साहित्य म्हणजे टिनचे पत्रे, लोखंडी अँगल्स, स्टेजचे साहित्य, वगैरे विकत घेण्याने बचतीचा मूलमंत्र मिळाला.....
स्वत:चा जास्तीत जास्त सहभाग ठेवत पैसे वाचवण्याचे कौशल्य आपोआप शिकता आले....
हल्ली आयत्या मखरी मिळतात पण गणेशासाठी आरास स्वतःच्या हातांनी बनवण्यातली मजा ती अवर्णनीयच !
आदल्या रात्री पताका बनवतानाचा उत्साह व 'तयारी' च्या नावाखाली 'हरताळके'चे केलेले ते जागरण आठवले की, आजही गंमत वाटते.....
 
लायटींगची सेरीज (शोभेच्या माळांची) खास इंदोरला जाऊन साहित्य आणण्यापासून ते सॉल्डर करून आम्हीच पोरांनी बनवलेली होती....
रस्त्यावर बांधलेली त्यातली एखादी माळ बंद पडली, की हातगाडीवर उंच स्टूल ठेवून, टेस्टरने ती दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण कुठल्या शाळेत मिळणार ?
जेव्हा चार माणसांमध्ये वावरतो तेव्हा सर्वांच्या मतांनुसार कार्य सिद्धीस कसे न्यावे,
कुठल्या माणसात काय गुण आहेत ते हेरून त्याच्याकडून नेमकी तीच कामे कशी पार पाडून घ्यावीत;
वादविवादाचे प्रसंग हमरीतुमरीपर्यंत गेल्यास त्याक्षणी किंवा नंतरचे रुसवे फुगवे दूर कसे करावेत....
ह्या सर्वांचे तंत्रज्ञान कुठल्याच महाविद्यालयात आपणांस शिकायला मिळणार नाही !!!
अहो, जेथे एका घरात फक्त नवरा बायको व मूल अशी इन मीन तीन माणसे राहतात व तरी वाद विवाद घडू शकतात तेथे सार्वजनिक उत्सवांमधली ही रंगत किती वाढत असणार ह्याची आपणच कल्पना केलेली बरी !

गणेशोत्सवात हिरीरीने घेतलेल्या त्या स्पर्धा- त्यात स्लो सायकलिंग स्पर्धा - त्यासाठी रस्त्यावर चुन्याने दोरी धरून मारलेले पट्टे, एकांकिका बसवून स्वतःच केलेले त्यांचे दिग्दर्शन, १६ मी.मी. च्या पडद्यावर दाखवलेले ते वेगवेगळे चित्रपट, तर कधी 'शुक्रतारा मंदवारा' ह्या अरुण दातेंच्या कार्यक्रमाचे केलेले आयोजन आठवले की.... हे सर्व आम्ही त्या काळी (जेव्हा आमच्या भुसखेड्यात भ्रमणध्वनी सोडाच साधे दूरध्वनीही धड चालत नसत....) कसे पार पडत असू त्याचेच आज नवल वाटते.  

भुसावळ सोडून मुंबईला आल्यावर म्हणजे साधारण ८७ ते कांदिवलीला राहायला येईपर्यंत म्हणजे २००० अशी तब्बल १३ वर्षे मी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजन सुखाला मुकलो होतो. नाही म्हणायला कलकत्त्याच्या महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव जवळून बघायला मिळाला तो तेथे दोन वर्षे वास्तव्य असल्याने ! परंतू इतकी जुनी जाणती मंडळी कलकत्त्याच्या महाराष्ट्र मंडळात आयोजनासाठी राबत असत, की आम्ही पोरं फक्त मोजक्या कामांसाठीच उपयोगी पडायचो.

कांदिवलीत येथे बहुसंख्य गुजराती वस्ती पण सार्वजनिक उत्सवांमधला त्यांचा उत्साह दांडगा असतो....
आमच्या कॉलनीतल्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली ती गृहसंकुल तयार होऊन वर्ष उलटल्यावर म्हणजे २००२ चा प्रथम उत्सव.
त्या वर्षी सर्वच सदस्य नव्याने आलेले असल्याने उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. तो तसाच्या तसाच आजता गायत टिकून आहे हे महत्त्वाचे.
शेजारच्या कुटुंबाशी कधीही सलगी न वाढवणारे व शक्यतो "आपण भले की आपले काम बरे" असा दृष्टिकोन बाळगणारा मुंबईकर गणेशोत्सव म्हटला की कंबर कसून कामाला लागतो हे बघून श्रीं च्या ह्या कार्याची महती काय ते कळून येते.

आमच्या श्रीगणेशाची प्रथम वर्षाची मूर्ती लोकसत्तेच्या प्रथम पानावर आल्याचा शुभसंकेत हा उत्सव कधी खंडीत होणार नाही अशी आशा दुणावतो.
दरवर्षी गणेशाचे स्वागत सोसायटीच्या मुख्य दरवाज्यावर श्रीमान नंदकुमार व्यास ह्यांच्या संस्कृत श्लोक पठणांनी व कुमारिकांनी डोक्यावर कलश व श्रीफळ घेऊन गणेशाच्या केलेल्या पूजेने होते. मग फटाक्यांच्या व ढोलांच्या साथीने वाजत गाजत गणराय मंडपात विराजमान होतात.

गणरायासाठी १० बाय १२ चे वेगळा मंच खास बनवलेला असतो. आदली पूर्ण रात्र जागून तरुण वर्गाने केलेली शोभिवंत पण घरगुती आरास मंडपाला साजेशी असते. पहिल्या वर्षी मंडळाने मूर्ती खरेदी केली मात्र दुसऱ्या वर्षापासून "श्री गणेशाची मूर्ती ह्यावर्षी आमच्या कडून" अशी सदस्यांची आग्रहपूर्वक विनवणी आमचा आर्थिक भार हलका करते. ज्याने नवसाची मूर्ती दिलेली असते त्याचा आद्य मान श्रींच्या प्राणप्रतिष्ठापनेला.
प्राण प्रतिष्ठापनेची पुजा संपन्न झाल्यावर अथर्वशीर्षाची आवर्तने केली जातात.
गणपती दीड दिवसांचाच असल्या कारणाने पहिल्याच दिवशी कार्यक्रमांची भरपूर रेलचेल असते.
अथर्वशीर्षाचे पठण पूर्ण होताच दणक्यात श्रींची आरती होते. सव्वा ते दीड तास चालणाऱ्या ह्या आरतीला थोरामोठ्यांपासून सर्वांची आरती म्हणण्याची अहमहमिका बघण्यालायक असते. सोसायटीची स्वत:ची साउंडसिस्टम (ध्वनीविस्तारण यंत्रणा) आहे. मग महिला वर्ग एका बाजूला तर पुरूष दुसरीकडे अशी आरत्या म्हणण्याची जुगलबंदीच सुरू होते. श्री. गजाननाची आरती उतरवण्याचा मान मात्र सर्वांचाच... मग ह्या सव्वा दीड तास चाललेल्या आरतीचे तबक खाली न ठेवता एकेकाने समोर येऊन (लग्न झाले असल्यास सहपत्नी) हाती घेण्याचा रिवाज सुरुवातीपासून आहे.

आरती संपेपर्यंत गुरुजी परत आलेले असतात ते सत्यनारायणाची पुजा सांगण्यासाठी. श्री सत्यनारायणाच्या पुजेलही बसण्यासाठी सदस्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो..... मान मात्र चालू वर्षात नवीन लग्न झालेल्या जोडप्याचेच ! मग इतरही सदस्य त्यात सामील होतात. कधी ५ तर कधी ७ व मागील वर्षी तर ९ जोडप्यांनी सत्यनारायणाच्या पूजेला बसण्याचा मान मिळवला. सत्यनारायणाची पुजा सुरू झाल्यावर मात्र जरा श्वास घेण्यास व दोन घास पोटात ढकलण्यास उसंत मिळते. असाही माझा विनायकी चतुर्थीचा उपवासच असतो पण सवड मिळताच पोटात कावळे ओरडत असल्याचे जाणवते.

मधून मधून सायंकाळच्या कार्यक्रमाच्या तयारीवर शेवटचा हात फिरवला जात असतो....
"अरे तुम्हारा सिडी तयार है क्या ?" कोणीतरी विचारते. "नही रे, अभीतक एन्ट्रीज आ रही है ।"
"लास्ट मिनिट एंट्री मत लो यार" - अशोक
"छोड ना... बच्चे है, हर साल बताकर भी यही होनेवाला है ।" संदिपचा त्यावर शेरा...

दरवर्षी लहान मुलांचे म्हणजे ० ते १४ (नववी/दहावी) पर्यंतची मुले श्री. गणेशासमोर आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करतात.
त्यासाठी खास ३० बाय २० चा मोठा रंगमंच व पावसाळा असल्याकारणाने प्रेक्षकांना बसण्यास १०० बाय ४० चा मंडप खास उभारण्यात येतो....
सुरुवातीला कोणी गाण्याची कॅसेट (ध्वनिफीत) आणी तर कोणी चकती ! मग "अंकल मेरा गाना कॅसेट के ये बाजू है- वो दुसरी बाजू का मत बजाना" अशा प्रेमळ धमक्याही मिळत ! सुरुवातीपासूनच लहान मुलांच्या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन मी एकहाती करीत असल्याने बच्चे कंपनीला कधी प्रेमाने, कधी मागे लागून तर कधी धमकावून रागावून कार्यक्रम व्यवस्थित बसवून घ्यावा लागतो.
कार्यक्रमात वाजवली जाणारी सर्व गाणी एकाच चकती वर व एकाच फॉर्मेट (प्रकारात) मध्ये असावीत हा आग्रह व दंडक मी दुसऱ्या वर्षापासूनच पाळला. त्यामुळे कित्येक गोष्टी सुरळीत पणे पार पाडल्या जाऊ लागल्या.

       

सर्वप्रथम श्री. गजानन स्तुतीचे किंवा इशस्तुतीचे कार्यक्रम,
त्यामागोमाग अगदी छोट्या कलाकारांचे म्हणजे १/२ वर्षांच्या बालकांचे रंगमंचावर आगमन-
कोणी कृष्ण बनतो तर कोणी फेरीवाला...... त्यांचे आगमन मंचावर झाल्यावर जो टाळ्यांचा व हास्याचा धबधबा उसळतो त्यामुळे ती लहानगी कधी कधी गोंधळून मंचावरच रडण्यास सुरुवात करतात. मग त्यांच्या आईवडीलांचे त्यांना "हे करून दाखव-ते करून दाखव" असा जो आर्जव होत असतो तोच बघण्याचा एक मजेदार कार्यक्रम असतो.
ह्यातल्या एका टॉडलर ला कृष्ण बनवले होते व त्याला खरोखर लोणी आवडते म्हणून मटक्यात लोणी ठेवले होते.....
हा पठ्ठा रंगमंचावर चक्क मांडी घालून बसला व लोणी खायला सुरुवात केली....
मटक्यातले लोणी संपवल्यावरच हात व तोंड लोण्याने पूर्ण माखवून... खरोखरचा कृष्ण कसा असेल ह्याचे दर्शन देत लुप्त झाला.
मुलांच्या ह्या बाललीलांनंतर देशस्तुतीपर कार्यक्रमांना सुरुवात होते.
मध्येच स्किट्स (एकांकिका) तर मध्ये लावणी तर कुठे कच्छी गीत अशी बहार उडवली जाते.
२००५ च्या साली अवधूत गुप्तेचे "जय जय महाराष्ट्र माझा " हे रिमिक्स मी पाच मुलांकडून बसवून घेतले होते.
ह्या गाण्यावर कोरिओग्राफी (नृत्यदिग्दर्शन) करण्यात खूप मजा आली.
आमचा कटाक्ष असतो तो गैर फिल्मी गीतांवर जास्त !
फिल्मी गीते असतात पण त्यांना जाणून बुजून शेवटी ठेवल्यामुळे हळू हळू साधायचा तो परिणाम साध्य झाला.
दरवर्षी नवनवीन एकांकिका व  त्यावरील शैक्षणिक विषय व मनोरंजनातून होणारे मुलांवर संस्कार हा ह्यामागचा उद्देश्य साध्य होत असल्याचे खरोखर आत्मिक समाधान लाभते.
संपूर्ण कार्यक्रम एकाच चकतीवर रेकॉर्ड (ध्वनिमुद्रित) केल्याने गोंधळ विरहित कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो. 
तरी ह्या वर्षी (२००६) मध्ये व्हायचा तो गोंधळ झालाच. दोन चार गीते एका ठरावीक फॉर्मैट (प्रकारात) नसल्याने ध्वनिमुद्रण होऊच शकले नाही. हे लक्षांत येईस्तोवर साडेपाच वाजले होते व  वेळे अभावी हे रेकॉर्डिंग दुसरीकडून करवून घेणे शक्यच नव्हते. मग अखेरीस माझा संगणक ज्यात मास्टर/मुख्य कार्यक्रम ध्वनिमुद्रित केलेला होता तोच खाली मंडपात घेऊन जावा लागला.... अनायासे अत्याधुनिक गणेशोत्सव असे बिरुद मिळवण्याचा मार्गही त्याने मोकळा झाला..... (खरी गोम मात्र फारच थोड्या मंडळींना माहित होती.)  

"सार्वजनिक" हा उद्देश्य असला तरी घरच्या गणेशासाठी करावयाची तशी तयारी सर्वच मंडळी करीत असल्याने हा घरगुती समारंभ साजरा करण्यास जी मजा येते ती अवर्णनीयच असते. दुसऱ्या दिवशी वाजत गाजत विसर्जन व विसर्जनावरून परत आल्यावर भोजन समारंभ (गुजरात्यांचे वैशिष्ट्य !) पार पडल्यानंतर चर्चा रंगते ती पुढच्या वर्षी काय करायचे त्याची !

ह्या सार्वजनिक उत्सवांना यशस्वी करण्यामागे अनेक हातभार लागतात. "गांव करील ते राव काय करील ?" अशी एक म्हण आपल्यात आहे. खरोखर जे अनेक हात लागून केलेले कार्य असते ते एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडून एकट्याने होणारे नाही हे गणेशोत्सवाचे आयोजन बघितल्यास कळते.
लो. टिळकांनी गणेशोत्सवांना सार्वजनिक स्वरूप देऊन आपल्या मराठी मुलांवर एक उपकार नक्कीच करून ठेवला आहे व तो म्हणजे अगदी बाळबोध वळणाने "इव्हेंट मॅनेजमेंट" चे धडे गिरवण्याचे. आज ह्याच "इव्हेंट मॅनेजमेंट्स" च्या कोर्सेसना हजारो रुपये शुल्क मोजून आपल्या मुलांना प्रवेश मिळत नसल्याचे बघून सार्वजनिक गणेशोत्सवांचे आयोजन किती महत्त्वाचे असते हेच अधोरेखीत होते.