फेब्रुवारी २००८

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३

ह्यासोबत

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३

पतंजलि महामुनी

पतंजलि महामुनी हे व्याकरणभाष्याचे कर्ते, योगदर्शनाचे प्रणेते व आयुर्वेदातल्या चरक परंपरेचे जनक होत. भारतात होऊन गेलेल्या अग्रगण्य विद्वानांत पतंजलींची गणना होते. म्हणूनच त्यांना नमन करतांना भर्तृहरीने आपल्या वाक्यपदीय ग्रंथाच्या प्रारंभी पुढील श्लोक लिहिला आहे.

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्यच वैद्यकेन ।
योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलीं प्रांजलिरानतोस्मि ॥

योगाने चित्ताचा, पदाने (व्याकरणाने) वाणीचा व वैद्यकाने शरीराचा मल ज्याने दूर केला, त्या मुनिश्रेष्ठ पतंजलीला मी अंजलिबंध करून नमस्कार करतो.

पतंजलि हे गोनर्द गावाचे रहिवासी होते. यांच्या मातेचे नाव गोणिका असे होते. पित्याचे नाव मात्र उपलब्ध नाही. पतंजलींना शेषाचा अवतार समजण्यात येते.

पतंजलि बाल्यावस्थेतच अध्ययन करू लागले. मग ते तपाला बसले. त्यांनी शिवाला प्रसन्न करून घेतले. शिवाने त्यांना चिदंबरक्षेत्री आपले तांडव नृत्य दाखवले. मग शिवाने त्यांना आदेश दिला, की 'तू पदशास्त्रावर भाष्य लिही.' त्यानुसार चिदंबरम येथेच राहून पतंजलींनी पाणिनीची सूत्रे व कात्यायनाची वार्तिके यांच्यावर विस्तृत भाष्य लिहिले. ते महाभाष्य या नावाने प्रसिद्ध झाले.

पातंजलमहाभाष्यचरकप्रतिसंस्कृतै: ।
मनोवाक्कायदोषाणां हन्त्रेऽहिपतये नम: ॥

योगसूत्रे, महाभाष्य आणि चरकसंहितेचे प्रतिसंस्करण या तीन कृतींनी अनुक्रमे मन, वाणी आणि देह यांच्या दोषांचा निरास करणार्‍या पतंजलीला माझा नमस्कार असो.

पतंजलींनी व्याकरणमहाभाष्य लिहून तर संस्कृत भाषेला गौरवाच्या शिखरावर नेऊन बसवले. त्यामुळे पाली-अर्धमागधीसारख्या बौद्ध-जैनांच्या धर्मभाषाही मागे पडल्या. संस्कृत आणि अपभ्रंश शब्दांनी सारखाच अर्थ व्यक्त होत असला, तरी धार्मिक दृष्ट्या संस्कृत शब्दांचाच उपयोग करावा; कारण तसे केल्याने अभ्युदय होतो, असे पतंजलींनी म्हटले आहे. याचा इत्यर्थ हा, की अपभ्रंश शब्द अनंत असल्याने ते वापरल्यामुळे देशातील भिन्न गटागटांतून विभक्तपणाची भावना बळावत जाते. उलटपक्षी संस्कृताला चिकटून राहिल्याने परंपरेला स्थैर्य लाभून एकराष्ट्रियत्वाची भावना दृढमूल होते. त्या काळी पतंजलि व पुष्यमित्र यांनी केलेल्या संस्कृत भाषेच्या पुनरुद्धारामुळेच रामायण-महाभारतादी महान ग्रंथांचा अखिल भारतात सामान्यत: एकाच स्वरूपात प्रचार होऊन भारताचे एकराष्ट्रियत्व आतापर्यंत टिकून राहिले.

पतंजलींना मोक्षाइतकेच ऐहिक अभ्युदयाचे महत्त्व वाटत होते. बौद्ध धर्माने अभ्युदय या धर्मांगाकडे नुसते दुर्लक्षच केले होते असे नव्हे; तर प्रत्यक्षपणे अभ्युदयविरोधी धोरण स्वीकारले होते. अभ्युदयाचा संबंध इहलोकाशी म्हणजेच पर्यायाने वर्तमानकाळाशी येतो. बौद्धांनी शब्दच्छल करून वर्तमानकालाचे अस्तित्वच अमान्य केले होते आणि जनसमुदायाचा बुद्धिभेद चालवला होता. पतंजलींनी बौद्धांच्या अशा अनेक वर्तमानकालविरोधी वचनांचे खंडन करून वर्तमानकालाचे अस्तित्व सिद्ध केले आहे.

महाभाष्य ही पतंजलींची अजरामर रचना आहे. भारतात अनेक भाष्ये निर्माण झाली. शबर, शंकराचार्य, रामानुज, सायण इत्यादी महान आचार्यांनी ती निर्माण केली. पण या सर्व भाष्यांत पतंजलींचे हे एकच भाष्य महाभाष्य ठरले.
पतंजलींनी योगसूत्रे लिहून योगदर्शन हे अद्वैत दर्शनाचे प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध होणारे प्रायोगिक अंग आहे हे प्रतिपादले आहे. त्यामुळे चित्ताचा, मनाचा इतका शुद्ध, सूक्ष्म व शास्त्रीय विचार मांडून संस्कृतमधून महाभाष्ये लिहून भारतीय तत्त्वज्ञानाचा जणू पुनरुद्धारच केला. हे पतंजलींचे कार्य केवळ अद्वितीय आहे.

पातंजल योगसूत्रे

०१३. तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः ।

एकाग्रता साधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना "अभ्यास" म्हणतात. क्षणभर घडलेल्या निरोधाचाही चित्तावर संस्कार घडत राहतो. संस्कारित चित्ताला निरोधातील आनंद आवडू लागतो. आणि निरोधाचा अभ्यास सुकर होतो.

०१४. स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः ।

दीर्घकाल, निरंतर व आदरपूर्वक केल्यास अभ्यास दृढमूल होतो.

०१५. दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् ।

शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श ह्या संवेदनांनी समजणारे विषय 'दृष्ट'. आणि शास्त्र, परंपरा वा विश्वासार्ह व्यक्तींकडून समजणारे विषय 'श्रुत'. दृष्ट आणि श्रुत अशा दोन्ही प्रकारच्या विषयोपभोगांतून मिळणारा आनंद, योगसाधनेतून मिळणार्‍या आनंदाच्या तुलनेत निकृष्ट वाटू लागून जेव्हा ह्या विषयांप्रती साधक अनासक्त होतो, तेव्हाची त्याची अनासक्ती योगशास्त्रात ‘वशीकार वैराग्य’ म्हणून ओळखले जाते. प्राप्त केलेल्या वैराग्याचा आणखी वैराग्यप्राप्तीसाठी उपयोग होतो. वैराग्याच्या चार अवस्था वर्णिलेल्या आहेत. यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकार. वैराग्यप्राप्तीच्या प्रयत्नांत पायरी-पायरीने ह्या चारही अवस्थातून जाऊन मनुष्य वशीकार वैराग्य मिळवू शकतो.

वैराग्य प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतांनाचे 'यतमान' (प्रयत्नमान) वैराग्य. चित्तातून वासना नाहीशा होतात, म्हणजेच त्यांचा व्यतिरेक होतो व साधकास कोणत्या वासनांचा व्यतिरेक झाला आहे आणि कोणत्या वासना चित्तात अजूनही शिल्लक आहेत हे कळू लागते त्या अवस्थेतील 'व्यतिरेक' वैराग्य. इंद्रिये आणि मन स्वाधीन झाल्यावरही बुद्धी ह्या अधिष्ठानात विषयवासना बीज रूपाने उरलेली असल्याने तिची जागृती न होण्यासाठी साधना चालू ठेवण्याची आवश्यकता संपत नाही. ह्या अवस्थेस योगशास्त्रातील वैराग्याची तिसरी पायरी म्हणजेच 'एकेंद्रिय' (हे एक इंद्रिय बुद्धी म्हणता येईल का?) वैराग्य असे म्हणतात. ह्यानंतर बुद्धितील आसक्तीही निरांकुर झाली, तिला कोंब फुटण्याची शक्यता मावळली, की जी अनासक्ती प्राप्त होते तिलाच योगशास्त्रात 'वशीकार' वैराग्य म्हणतात. निर्विचार समाधीत वैशारद्य प्राप्त झाल्यावर, विषयोपभोगांत व्यस्त राहूनही, साधकाची अनासक्ती अबाधित राहते. विषयोपभोगांनाही वश करून घेणारी अनासक्ती या अर्थानी ती अनासक्ती 'वशीकार' वैराग्य म्हणवल्या जात असावी.

०१६. तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यम् ।

तृष्णा म्हणजे तहान. वैतृष्णा म्हणजे अनासक्ती. गुण म्हणजेच विषय. चित्ताहून पुरूष वेगळा आहे असा विवेक उत्पन्न होणे ही पुरूषख्याति होय. अशा पुरूषख्यातीमुळे सत्त्व, रज आणि तम ह्या तीन्ही गुणांप्रती जी अनासक्ती निर्माण होते ते परमवैराग्य.

०१७. वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् संप्रज्ञातः ।

समाधीच्या अभ्यासबलाने ईप्सित पूर्णत्वाने आणि प्रकर्षाने समजते म्हणून अशा प्रकारच्या समाधीला संप्रज्ञात समाधी म्हणतात. हा संप्रज्ञात समाधी (समाधी हा शब्द पुल्लिंगी असल्याची मी खात्री केली आहे.) वितर्कादीकांच्या रूपाशी चित्ताचा अनुगम म्हणजे चित्ताची तदाकारता झाल्यामुळे सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित (स+अस्मित) आदी चार प्रकारचा होतो.

०१८. विरामप्रत्ययाभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः ।

एक चित्तवृत्ती नाहिशी होऊन दुसरी निर्माण होण्याच्या दरम्यानचा विराम वारंवार अनुभवल्यावर जो समाधी साधतो, तो असंप्रज्ञात समाधी होय. ह्यात चित्त केवळ नाममात्र राहते म्हणून संप्रज्ञाताहून निराळा असा तो असंप्रज्ञात समाधी.

०१९. भवप्रत्ययो विदेहप्रकृतिलयानाम् ।

देहविषयक अहंकार नाहीसा झाल्यामुळे देवत्व पावलेले योगी आणि ज्यांचे चित्त प्रकृतीत लय पावलेले आहे असे योगी, ह्या उभय योग्यांचा समाधी असंप्रज्ञात समाधी असतो, म्हणजे त्यात (भवप्रत्यय) संसाराचा अनुभव पुन्हा यावयाचा असतो. (चित्ताला आत्म्यावरील असंप्रज्ञात समाधीतच आत्मसाक्षात्कार होत असतो. विदेह व प्रकृतीलय योग्यांच्या असंप्रज्ञात समाधीत अनुक्रमे त्यांच्या चित्ताला महत्तत्त्व हा आधार असतो किंवा त्यांच्या चित्ताचा लय प्रकृतीत झालेला असतो. त्यांचे चित्त आत्मसाक्षात्कारयुक्त झालेले नसते. म्हणून ते व्युत्थित -disturb- होईल तेव्हा त्याला भवप्रत्यय म्हणजे संसाराचा अनुभव घडणारच.)

०२०. श्रद्धावीर्यस्मृतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषाम् ।

विदेह आणि प्रकृतीलय हे जे दोन प्रकारचे वरील सूत्रांत उल्लेखलेले योगी त्यांच्याहून इतर योग्यांचा असंप्रज्ञात समाधिद्वारा आपल्याला कैवल्यसाक्षात्कार होणार असा विश्वास (श्रद्धा), समाधिद्वारा आपण कैवल्यसाक्षात्कार अवश्य संपादन करणार असा उत्साह वाटणे हे वीर्य, पूर्वी अनुष्ठिलेल्या योगाभ्यासाचे स्मरण आणि त्यावरून पुन्हा आचरलेला समाधि (स्मृती) आणि समाध्यनुष्ठानामुळे प्राप्त झालेली प्रज्ञा म्हणजे वस्तूंचे यथार्थत्वाने ग्रहण करणारी बुद्धी, एतत्पूर्वक असतो. म्हणजे हे उपाय आधी अवलंबले जातात आणि मग त्यांचे फल म्हणून पुढील असंप्रज्ञात समाधि साध्य होत असतो.

०२१. तीव्रसंवेगानाम् आसन्नः ।

संवेग म्हणजे कैवल्य प्राप्तीच्या इच्छेची उत्कटता. ही तीव्र असेल तर तो तीव्रसंवेग होय. असा तीव्रसंवेग ज्यांच्या ठिकाणी आहे ते तीव्रसंवेगयोगी. अशा तीव्रसंवेगयोग्यांना समाधी आसन्न म्हणजे अगदी जवळ असतो. म्हणजे तो त्यांस फार शीघ्रतेने प्राप्त होतो.

०२२. मृदुमध्याधिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ।

ह्या [float=font:kishor;place:top;]तीव्रसंवेगाच्या मृदुत्वामुळे, मध्यमत्वामुळे आणि अधिमात्रत्वामुळे समाधिलाभ त्याहूनही विशेष आसन्न असा होतो.[/float] म्हणजे मृदु तीव्रसंवेग असल्यास समाधिलाभ लवकर होतो, मध्य तीव्र संवेग असल्यास अधिक लवकर होतो आणि अधिमात्र तीव्र संवेग असल्यास तो फारच लवकर होतो.

०२३. ईश्वरप्रणिधानाद् वा ।

अथवा ईश्वर प्रणिधानानेसुद्धा वरील असंप्रज्ञात समाधी साध्य होतो. आपल्याजवळील सर्वोत्कृष्ट श्रेय व संचितास ईश्वराजवळ ठेव म्हणून ठेवणे म्हणजे "ईश्वरप्रणिधान".

०२४. क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः ।

ज्याचे प्रणिधान करावयाचे त्या ईश्वराचे स्वरूप ह्या सूत्रात सांगितले आहे. थोडक्यात म्हणजे ईश्वराची व्याख्याच इथे दिलेली आहे. अविद्या, अस्मितादी पाच क्लेश; चांगले, वाईट आणि मिश्र अशी तीन्ही कर्मे; जाती, आयुष्य आणि भोग हे त्या कर्माचे फल (विपाक) आणि त्या फलास कारण असणार्‍या चित्तातील सूप्त वासना हा आशय अशा चारही गोष्टींनी जो कालत्रयी लिप्त होत नाही तो ईश्वर.

पातंजल योगसूत्रे व भाष्येः २

Post to Feed
Typing help hide