फेब्रुवारी २००८

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४

ह्यासोबत

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४

भारत सरकारच्या ह्या संकेतस्थळावर "काशीकी विभूतीयाँ" म्हणून पंधरा थोर व्यक्तित्वांची हिंदीत ओळख करून दिलेली आहे. पतंजलींची इथली ओळख विश्वसनीय वाटते. ती मुळातच अवश्य वाचावी. ती थोर व्यक्तीत्वे खालीलप्रमाणे आहेत.
 
१. महर्षि अगस्त्य
२. श्री धन्वंतरि
३. महात्मा गौतम बुद्ध
४. संत कबीर
५. अघोराचार्य बाबा कानीराम
६. वीरांगना लक्ष्मीबाई
७. श्री पाणिनी
८. श्री पार्श्वनाथ
९. श्री पतञ्जलि
१०. संत रैदास
११. स्वामी श्रीरामानन्दाचार्य
१२. श्री शंकराचार्य
१३. गोस्वामी तुलसीदास
१४. महर्षि वेदव्यास
१५. श्री वल्लभाचार्य

आता वळूया योगसूत्रांकडे.

०२५. तत्र निरतिशयं सार्वज्ञबीजम् ।

त्या ईश्वराचे ठायी पराकोटीच्या सर्वज्ञतेचे बीज सामावलेले असते.

०२६. स पूर्वेषाम् अपि गुरुः कालेनानवच्छेदात् ।

तो, सर्गारंभी जे उत्पन्न झाले (पूर्वेष) त्यांचाही गुरू आहे. त्याला काल मर्यादा नाहीत.
 
०२७. तस्य वाचकः प्रणवः ।

त्याचा द्योतक प्रणव -ॐ- आहे.
 
०२८. तज्जपस्तदर्थभावनम् ।

त्या अर्थाची भावना अभिव्यक्त करण्यासाठी ॐ चाच उच्चार करावा.
 
०२९. ततः प्रत्यक्चेतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च ।

(ईश्वरप्रणिधानामुळे) प्रत्यक् चेतनेस जे आकलन होते त्याद्वारे योगमार्गातील अडथळ्यांचे निवारण होते.

०३०. व्याधि स्त्यान संशय प्रमादालस्याविरति भ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि

चित्तविक्षेपास्तेऽन्तरायाः ।

ते अडथळे असतात व्याधी, निष्क्रियता (स्त्यान), संशय, चूक, आळस, अतृप्ती (अविरति), भ्रम (आपल्या क्षमतेविषयी चुकीचे निदान), आपल्या क्षमतेबाबत अवास्तव समज करून घेणे (अलब्धभूमिकत्व) आणि अस्थिरता (अनवस्थित्व).

०३१. दुःखदौर्मनस्याङ्गमेजयत्वश्वासप्रश्वासा विक्षेपसहभुवः ।

दुःखे, मनो-अस्वास्थ्य (दौर्मनस्य), कंप सुटणे (अंगमेजयत्व), श्वास आणि प्रश्वास हे पाच उपद्रवही ह्या अडथळ्यांसोबत असतात.
 
०३२. तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः ।

हे अडथळे आणि उपद्रव यांच्या निरसनार्थ कोणत्याही एका तत्त्वावार अभ्यास (संयम) करावा. चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा.
 
०३३. मैत्रीकरुणामुदितोपेक्षणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम् ।

सुख, दुःख, पुण्य आणि पाप ह्या विषयांबाबत मनात (चित्तात) अनुक्रमे मैत्री, करूणा, आनंद आणि उदसिनता ह्या भावनाचा प्रतिसाद द्यावा. असे केल्यास चित्त प्रसन्न राहते.

०३४. प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य ।

योगाभ्यासात अस्थिरत्व येऊ नये म्हणून प्रश्वास संपूर्णतः बाहेर सोडून (रेचक) मग त्यास बाहेरच रोखून धरल्यास (बाह्य कुंभक) चित्त प्रसन्न (स्थिर) होते. ह्या सूत्रातील विधारण म्हणजे विशेष प्रकाराने सावकाश धारण केला जाणारा श्वास असाही अर्थ संभवतो. तसा अर्थ घेतल्यास कुंभकरहित केले जाणारे दीर्घ श्वसन म्हणजे पुरक (श्वास आत घेणे) व रेचक असा अर्थ निघतो.
 
०३५. विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसः स्थितिनिबन्धिनी ।

३५ ते ३८ ह्या सूत्रांमध्ये चित्त स्थिर होण्यासाठी उपाय सांगितले आहेत. ह्या सूत्रातला उपाय म्हणजे शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श ह्या संवेदनांपैकी एखाद्या संवेदनेवर वृत्ती स्थिर झाल्यास तिला चित्ताची विषयवती प्रवृत्ती म्हणतात. ती चित्त स्थिर होण्यास कारणीभूत ठरते.
 
०३६. विशोका वा ज्योतिष्मती ।

ग्राह्याचे ज्ञान जिच्यायोगे होते ती चित्तातील ज्योती म्हणजे चित्ताचा सात्त्विक प्रकाश होय. ज्या प्रवृत्तीस ही ज्योती हाच विषय आहे, ती ज्योतिष्मती प्रवृत्ती होय. ह्या प्रवृत्तीत शोकाचा लेशही नसतो म्हणून ती विशोका. अशा प्रकारची विशोका ज्योतिष्मती प्रवृत्ती उत्पन्न केली असता ती मनःsथैर्यास कारण होते.
 
०३७. वीतरागविषयं वा चित्तम् ।

वीत म्हणजे पूर्णत्वाने नाहीसा झालेला. राग म्हणजे विषयाची अभिलाषा, लोभ. लोभ पूर्णत्वाने नाहीसा झालेला आहे अशा पुरूषाचे चित्त स्थिर होते.
 
०३८. स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा ।

स्वप्नात वा निद्रिस्त असतांना लाभलेले ज्ञान ज्याचे चित्तास आधार (आलंबन) आहे ते चित्त स्थिर होते.
 
०३९. यथाभिमतध्यानाद् वा ।

आपल्याला जो आवडत असेल किंवा इष्ट वाटत असेल त्या आधारावर ध्यान केले असता चित्त स्थिर होते.
 

Post to Feed
Typing help hide