मार्च १० २००८

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १५

ह्यासोबत

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १५

सत्यवादिनमक्रोधं निवृतं मद्यमैथुनात् ।
अहिंसकं, प्रशांतं,जपशौचपरं, धीरं तपस्विनं ।
देव-गोब्राह्मणाचार्य-गुरूवृद्धार्चनरतं, आनृशंस्यपरं ।
अनहंकृतं, शास्त्राचारं, अध्यात्मप्रवणेंद्रियं ।
धर्मशास्त्रवरं, विद्यान्नरं नित्यरसायनम् ॥

नेहमी खरे बोलणारा, न रागावणारा, मद्यनिवृत्त, ब्रह्मचारी, अहिंसक, शांतवृत्त, जपशौचादीकांत तत्पर, धैर्यवान्, तपस्वी, देव-गायी-ब्राह्मण-आचार्य, गुरूजन आणि वृद्ध ह्यांना मान देणारा, कोणाचा घात-पात न करणारा, निरभिमानी, सदाचरणी, अध्यात्माकडे इंद्रियांची ओढ असलेला, धर्मपरायण असा जो मनुष्य तो मूर्तिमंत नित्यरसायन होय. – चरकसंहिता

जे रसायन नियमितरीत्या घेतले असता चिरतारूण्य प्राप्त होते अशास्वरूपाच्या रसायनास नित्यरसायन म्हणत असावेत. वरीलप्रमाणे व्रतस्थ वर्तणूकच नित्यरसायन असते असे सांगण्याचा हा प्रयास वाटतो.

आता योगसूत्रांकडे वळू या.

०४५. ततोऽणिमादिप्रादुर्भावः कायसंपत् तद्धर्मानभिघातश्च ।

अष्टमहासिद्धींचा लाभ - ह्या भूतजयापासून योग्याच्या ठिकाणी अणिमा आदी अष्टमहासिद्धी प्रकट होऊ लागतात. पुढील सूत्रांत सांगितल्याप्रमाणे त्या गुणांनी युक्त असलेली शरीरसंपत्ती त्यास प्राप्त होते आणि शरीराच्या ठिकाणी असलेल्या धर्मांचा अग्नी, वायू, जल इत्यादींकडून नाश न होण्याचे सामर्थ्य त्या शरीरात उत्पन्न होते.
 
०४६. रूपलावण्यबलवज्रसंहननत्वानि कायसंपत् ।

सुंदर रूप, उत्तम लावण्य, श्रेष्ठ सामर्थ्य आणि वज्रासारखे सहननत्व म्हणजे अवयवसमूह ही कायसंपत् होय.
 
०४७. ग्रहणस्वरूपास्मितान्वयार्थवत्त्वसंयमाद् इन्द्रियजयः ।

इंद्रिये आपापल्या विषयाशी संयुक्त होणे ही त्यांची ग्रहणावस्था, विषयाशी संयोग नसतांना ती आपापल्या गोलकांत निर्व्यापार स्थितीत केवळ प्रकाशरूप असतात. ही त्यांची स्वरूपावस्था, चित्तात 'मी आहे' असे जे अखंड स्फुरण होत असते ती अस्मितावस्था, अस्मितेत त्रिगुणांचे अस्तित्त्व असते ही अन्वयावस्था आणि त्रिगुणांतील भोगापवर्गार्थतारूप शक्ती ही अर्थवत्त्वावस्था. ह्या पाच अवस्थांवर संयम केल्याने इंद्रियजय ही सिद्धी प्राप्त होते.
 
०४८. ततो मनोजवित्वं विकरणभावः प्रधानजयश्च ।

मनाच्या वेगासारखा गतीलाभ शरीरास होणे हे मनोजवित्व आणि कोणत्याही देशांतील आणि काळांतील विषयांचे सेवन इंद्रिय-निरपेक्ष घडू शकणे हा विकरणभाव. मागील सूत्रांत सांगितलेला इंद्रियजय प्राप्त झाला असता मनोजवित्व आणि विकरणभाव ही व्यष्टिनिष्ठ संयमाची फले आणि प्रधानजय हे समष्टिनिष्ट संयमाचे फल अशी तीन प्रकारची फले योग्यास प्राप्त होतात.
 
०४९. सत्त्वपुरुषान्यताख्यातिमात्रस्य सर्वभावाधिष्ठातृत्वं सर्वज्ञातृत्वं च ।

सत्त्व म्हणजे अंत:करण त्याचा द्रष्टा जो पुरूष ह्या उभयतांत असलेली जी अन्यता म्हणजे वेगळेपणा त्याची ख्याती म्हणजे प्रतीती ही सत्त्वपुरूषान्यताख्याति होय (हीच विवेकख्याति होय). ही ज्याच्या ठिकाणी स्थिरभावाला पोचली असेल त्या योग्याच्या ठिकाणी 'सर्व भावांचा अधिष्ठाता मीच आहे व म्हणून मी सर्वज्ञही आहे' अशी प्रतीती येऊ लागते.
 
०५०. तद्वैराग्यादपि दोषबीजक्षये कैवल्यम् ।

वरील दोन्ही फलांविषयीही वैराग्य उत्पन्न झाले असता अविद्या-काम-कर्म ह्या दोषत्रयांचे बीज असलेला जो द्रष्ट्ट-दृश्य संयोग त्याचा नाश होऊन पुरूषास कैवल्याचा लाभ होतो.
 
०५१. स्थान्युपनिमन्त्रणे सङ्गस्मयाकरणं पुनः अनिष्टप्रसङ्गात् ।

स्थानिन् म्हणजे देव. योग्याच्या तपामुळे प्रसन्न झालेले देव त्या योग्याला अनेक दिव्य भोग भोगण्यासाठी उपनिमंत्रण करतात, म्हणजे त्याने त्या भोगांचा स्वीकार करावा अशी त्यास प्रार्थना करतात. तेव्हा योग्याने मनात त्या भोगांविषयी आसक्ती निर्माण होऊ देऊ नये किंवा "देवही मला भोग भोगण्यासाठी निमंत्रण देत आहेत तेव्हा माझ्या ठिकाणी केवढे तप:सामर्थ्य प्रकट झाले आहे" अशा रीतीची स्वत:विषयी एक प्रकारची धन्यता वाटणे हा स्मयही त्याने करू नये. कारण तसे केल्यास पुन्हा संसाररूपी अनिष्टाचा प्रसंग प्राप्त होतो.
 
०५२. क्षणतत्क्रमयोः संयमादविवेकजं ज्ञानम् ।

कालाचा अतिसूक्ष्म भाग म्हणजे क्षण, आणि पूर्वक्षण, उत्तरक्षण असा अखंडपणे चाललेला क्षणांचा प्रवाह हा त्यांचा क्रम होय.वस्तूंतील सूक्ष्म भेदांचे ज्ञान होण्याला कारण असलेली जी शक्ती ती विवेक होय. क्षण आणि त्याचा क्रम ह्यावर संयम केला असता ह्या विवेकापासून उत्पन्न होणारी वस्तूची भिन्नता जाणणारे ज्ञान होते.
 
०५३. जातिलक्षणदेशैरन्यताऽनवच्छेदात् तुल्ययोस्ततः प्रतिपत्तिः ।

अन्यता म्हणजे दोन वस्तूंतील वेगळेपणा. गाय, म्हैस अशा जाती; काळी गाय, पांढरी गाय इत्यादी लक्षणे; आणि ह्या ठिकाणची गाय, त्या ठिकाणची गाय, हा देश; ह्या तिन्हींच्यामुळे दोन वस्तूंतील अन्यतेचा अवच्छेद म्हणजे वेगळेपणाचा निश्चय होऊ शकतो. परंतु तिन्ही मार्गांनी दोन वस्तूंतील अन्यतेचा अवच्छेद न झाल्यामुळे जेव्हा दोन पदार्थ अगदी तुल्य दिसतात तेव्हाही योग्याला त्या तुल्य पदार्थांची प्रतिपत्ती म्हणजे ते परस्परांहून भिन्न असल्याची प्रतीती मागील सूत्रांत सांगितलेल्या विवेकज ज्ञानामुळे होऊ शकते.
 
०५४. तारकं सर्वविषयं सर्वथाविषयम् अक्रमं चेति विवेकजं ज्ञानम् ।

हे विवेकज ज्ञान योग्याला तारणारे असते म्हणून ते 'तारक' होय. त्या ज्ञानाला अविषय अशी कोणतीच वस्तू नसते म्हणून ते 'सर्वविषय' होय. त्या ज्ञानामुळे कोणत्याही विषयाचे नुसते सामान्य ज्ञान तेवढे होते असे नसून, त्या विषयांतील सर्व गुणधर्म आणि अवस्थाविशेष ह्यांचेही ज्ञान होत असल्यामुळे ते 'सर्वथा-विषय' होय आणि वस्तुगत गुणधर्मादिकांचे ज्ञान विशिष्ट क्रमाने न होता योग्यास इच्छा होताच वाटेल त्या वेळी वाटेल त्या गुणधर्मादिकांचे ज्ञान होऊ शकते म्हणून ते 'अक्रम' होय. अशा लक्षणांनी युक्त असे ते विवेकज ज्ञान असते.
 
०५५. सत्त्वपुरुषयोः शुद्धिसाम्ये कैवल्यम् इति ।

चित्ताचे उपादानभूत जे सत्त्व त्यातून रजस्तमोमल नाहीसे होत होत ते पूर्ण शुद्ध झाले आणि त्यामुळे त्याच्यात व पुरूषांत शुद्धिसाम्य झाले म्हणजे चित्ताच्या ठिकाणी कैवल्य सिद्ध होते.

॥ इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रे तृतीयो विभूतिपादः ॥

याप्रमाणे पातंजल योगदर्शनाचा तिसरा विभूतीपाद संपूर्ण झाला.

Post to Feed
Typing help hide