फेब्रुवारी १० २००८

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ५

ह्यासोबत

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ५

वेदव्यासांनी गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी "इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितियो अध्याय:" अशाप्रकारचा शेवट केला आहे. गीतेतील अध्यायांची नावेही अनुक्रमे अर्जुनविषादयोग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यासयोग, संन्यासयोग, ध्यानयोग, ज्ञानविज्ञानयोग, अक्षरब्रह्मयोग, राजविद्याराजगुह्ययोग, विभूतियोग, विश्वरूपदर्शनयोग, सगुणभक्तीयोग, क्षेत्रक्षेत्रज्ञयोग, गुणत्रयविभागयोग, पुरूषोत्तमयोग, दैवासुरसंपाद्विभागयोग, श्रद्धात्रयविभागयोग आणि मोक्षसंन्यासयोग अशी आहेत. गीतेचा शेवटला श्लोकही

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: |
तत्र श्रीर्विजयो भूतिर्धृत्वा नीतिर्मतिर्मम ||

हा आहे. ह्यात संजय श्रीकृष्णास "योगेश्वर" म्हणत आहे.

ह्या सगळ्यांवरून काही गोष्टी निस्संदिग्धपणे स्पष्ट होतात.

१. योग किमान गीतेइतकातरी प्राचीन आहे. म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वीपासून योगशास्त्र आहे.
२. योगशास्त्र ब्रम्हविद्येचा भाग आहे.
३. कृष्ण उत्तम प्रकारे योग जाणत असावा. त्याला योगेश्वरच म्हटले आहे.

आता योगसूत्रांकडे वळूया.

०४०. परमाणु परममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः ।

कुठल्याहि विषयावर चित्त विनासायास आणि अविरोध स्थिर (एकाग्र) होऊन चित्ताचे त्या विषयावर वर्चस्व राहण्यास "वशीकार" म्हणतात. पूर्वी सांगितलेले वशीकार नामक वैराग्य हे ह्या अवस्थेचे पूर्वरूप आहे.

०४१. क्षीणवृत्तेरभिजातस्येव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तत्स्थतदञ्जनतासमापत्तिः ।

ज्या चित्तातील वृत्ती क्षीण झालेल्या असतील ते चित्त स्फटिक मणी ज्याप्रमाणे ज्या रंगाच्या वस्तूवर ठेवाल त्या रंगात तन्मय होतो त्याप्रमाणे त्या विषयात (ग्राह्य), त्या ज्ञानेंद्रियांत (ग्रहण) आणि त्या पुरूषात (ग्रहिता) तन्मय होते.
 
०४२. तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तिः ।

गाय हा शब्द (गाय वाचक शब्द संकेत), प्रत्यक्ष गाय (वस्तू) आणि गायीचे आपल्याला मनात (चित्तात) निर्माण होणारे चित्र (ज्ञान) ह्या तिन्ही गोष्टी भिन्न असतात. मात्र "गाय" शब्दाच्या उच्चाराने आपल्या चित्तात, ह्या तिन्ही गोष्टी एकच असल्याचा भ्रम निर्माण होतो. हा भ्रमच "शब्द", "अर्थ" आणि "ज्ञान" ह्यांचे संकुचित अर्थ स्पष्ट करतो. गाय ह्या शब्दाचा गाय ह्या अर्थाशी संबंध नसूनही तो असल्यासारखा भासतो, असे वाटणे म्हणजे विकल्प. उदाहरणार्थ गाय ह्या शब्दाने इंग्रजी भाषकास व्यक्ती असा अर्थ ध्वनित होऊ शकतो. अशाच प्रकारे "शब्द", "अर्थ" आणि "ज्ञान" ह्यांचे परस्परांसाठी विकल्प म्हणून वापरले जाणे शक्य असते. अशावेळी ह्यांपैकी कशावरही चित्त एकाग्र झाल्यास, त्या ईप्सित संकल्पनेवरच ते स्थिर झालेले असेल असे नव्हे. अशा एकाग्रतेस सवितर्क एकाग्रता (समापत्ति, समाधी) म्हणतात. अशी एकाग्रता तिन्ही विकल्पांमुळे संकुचित असते.

०४३. स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्येवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का ।

संकेतशब्दामुळे तद्वाच्य जो अर्थ त्याचे ज्ञान चित्तात स्फुरते ते स्मृतीमुळे. सवितर्क समाधीत ही स्मृती वारंवार होत गेल्याने, ते ज्ञान अनायासे आणि ठळकपणे स्फुरू लागते आणि मग तो संकेत, त्याचा अर्थ आणि ज्ञान यांची सांगड दरवेळी नव्याने घालण्याची गरज राहत नाही. ह्यास स्मृतीपरिशुद्धी झाली असे म्हणतात. ह्या अवस्थेत चित्तवृत्ती केवळ अर्थाकार भासते. स्वरूपशून्य आणि केवळ अर्थाकार. ही निर्वितर्क समाधी होय.

०४४. एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता ।

एकाग्रतेकरता स्थूल विषयांऐवजी सूक्ष्म विषय आधार म्हणून निवडल्यास ती एकाग्रता सूक्ष्मविषया असते. एकाग्रता, समापत्ती आणि मग समाधी अशा अवस्था उत्तरोत्तर गाठल्या जातात. ह्या एकाग्रतेचेही सविचार आणि निर्विचार असे दोन प्रकार असतात.

०४५. सूक्ष्मविषयत्वं चालिङ्गपर्यवसानम् ।

चित्ताला एकाग्रता साधण्यासाठी उत्तरोत्तर अधिकाधिक सूक्ष्म विषय दिले जातात. ह्या सूक्ष्म विषयत्वाचे परिणती अलिंग म्हणजे प्रधान तत्त्वात होते. आनंद-अस्मिता-महत्तत्त्व आणि प्रकृती म्हणजे अलिंग असे उत्तरोत्तर सूक्ष्म विषय असतात.

०४६. ता एव सबीजः समाधिः ।

ज्या समाधीत संसाराचे वासनारूपी बीज नष्ट झालेले नसते आणि म्हणून पुन्हा संसार प्राप्त होऊ शकतो त्याला सबीज समाधी म्हणायचे. मागील सूत्रात प्रकृतीपर्यंत जे सूक्ष्म विषय सांगितले त्या आधारे होणार्या सर्व समापत्ती सबीज होत.

०४७. निर्विचारवैशारद्येऽध्यात्मप्रसादः ।

वैशारद्य म्हणजे पक्वावस्था. निर्विचार समाधीत वैशारद्य प्राप्त झाले असता अनात्म वासनांना कारण असलेले रज, तमादी मल ह्यांचा नाश झाल्याने चित्त आत्मसाक्षात्कारास सिद्ध होते.

०४८. ऋतंभरा तत्र प्रज्ञा ।

निर्विचार समाधीतील विशारद अवस्थेत योग्याची प्रज्ञा ऋतंभरा होते. म्हणजे कसल्याही विपर्यययाचा संपर्क न लागता वस्तूमात्राचे ज्ञान पूर्णत्त्वाने आणि यथार्थपणे ग्रहण करणारी अशी होते.

०४९. श्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् ।

श्रुत म्हणजे आगम, वेद. वेदांच्या शब्दापासून जे ज्ञान होते ती श्रुतप्रज्ञा. अनुमानप्रमाणाने जे ज्ञान होते ती अनुमानप्रज्ञा. दोन्ही प्रज्ञांमुळे होणार्या सामान्य ज्ञानापेक्षा ऋतंभरा प्रज्ञेचा विषय खास असतो. तिच्यामुळे वस्तूमात्रासंबंधीच्या विशेषार्थाचे ग्रहण होते.

०५०. तज्जः संस्कारो न्यसंस्कारप्रतिबन्धी ।

ह्या ऋतंभरा प्रज्ञेचा संस्कार इतर संस्कारांना प्रतिबंध करणारा असतो.

०५१. तस्यापि निरोधे सर्वनिरोधान् निर्बीजः समाधिः ।

ऋतंभरा प्रज्ञेचा संस्कारांचासुद्धा निरोध झाला म्हणजे सर्व वृत्तींचा निरोध झाल्याने निर्बीज समाधी सिद्ध होतो.

॥ इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः ॥

अशाप्रकारे पतंजलींनी रचलेल्या योगसूत्रांचा पहिला समाधीपाद नामक चतकोर संपूर्ण होत आहे.

Post to Feed
Typing help hide