डायरी

मी मन्या!!! मला सगळे ह्याच नावाने ओळखतात. मी अ. ब. क. कॉलेज मध्ये शिकतो. तुम्ही म्हणाल कॉलेज मध्ये काय शिकतो!! काय फरक पडतो? मी तसाही अभ्यास करत नाही. पण तरी सांगतो. मी इंजीनिअरींग ला आहे. अभ्यासात मी साधारण आहे. तसं माझ्यात असाधारण असं काही नाही. पण तरी मी आज पासून तुम्हाला डायरी च्या रुपात भेटणार आहे.

बघा माझी भेट आवडते का!

============================================================

गुरूवार - १२ फेब्रुवारी

आज उठायला उशीर झाला. घाईत आवरलं. गल्लीच्या बाहेर पडलो तर काळा बोका आडवा गेला. ह्या बोक्याच्या XXX. नाट लावली सकाळी सकाळी. ३ पाउले डोळे मिटून मागे आलो, तर आजु-बाजूला खेळणारी लहान पोरं हसायला लागली. बघितलं तर उजवा पाय शेणात. परत घरी जाउन कपडे बदलून कॉलेज गाठलं. DS चं लेक्चर चुकलं. सरांनी बाहेर पडतांना "आपल्या दर्शनाने धन्य झालो" अशा अर्थाचा कटाक्ष टाकला. उद्या प्रॅक्टीकलला म्हणजे वाट लावणार. अजून एक सुद्धा प्रॅकटीकल तपासून नाही झालेलं. तपासतांना एकेकाची जाम तासतात असं एकलं आहे. बघू पुढच्या आठवड्यात तासून घेऊ म्हणजे तपासून घेउ.

निल्याने खबर दिली होती. आज 'ती' येणार असल्याची. खरंच आली होती निळ्या ड्रेस मध्ये अप्सराच वाटते. तसं आपण पण काही कमी नाही, पण सालं डेअरींग होत नाही.

परवा वॅलेंटाईन. काहितरी करायला हवं............................

============================================================

शुक्रवार - १३ फेब्रुवारी

निल्या साला एकदम हरामखोर आहे. त्याला म्हंटलं की 'तिच्यासाठी' चार ओळी लिहून दे, तर भाव खायला लागला. स्वतःला संदिप खरे समजायला लागला. एरव्ही ह्याच्या कवितांवर कुत्रसुद्धा तंगडी वर करणार नाही. वर्षभर कोणी त्याच्या कविता एकत नाही तर त्याचा वचपा हा असा काढतो. शेवटी ह्या रविवारी पुर्णदिवस गाडी आणि रोज लिफ़्ट देण्याच्या बोलीवर डील केलं.

दिवसभर माझ्या वहीत खरवडत होता. जमलं नाही की कागद फाडायचा. २०० पानांची वही १०० वर आणली. साल्याने एक ओळ वाचू दिली नाही. मदत करूका म्हंटलं तर चहा घेऊन ये म्हणाला. साल्याला वाटतं की कवितेतलं मला काही समजत नाही.

ह्याच्या कडून काही झालं नाही तर काय करायचं? अरे हो!!! प्राजक्ताने दिलेली तिच्या कवितांची वही कधी कामाला येईल?? त्यच्यातलीच एखादी छापू.

पण कविता आवडली नाही तर? तिच्याशी एकदा पण बोलणं झालं नाही. कसं बोलायचं हे पण ठरवावं लागेल. आजची रात्र झोप येणारच नाही.

============================================================

(क्रमशः)