डायरी ४

मनोज, निलेश आणि भैरवी नंतर आता मी तुम्हाला भेटणार आहे. माझं नाव प्राजक्ता. आम्ही चौघे एकाच वर्गात शिकतो. माझ्या मनाचं गुज मी आज पासून तुम्हाला सांगणार आहे.

गुरूवार १२ फेब्रुवारी

आज मन्या कॉलेजला आला होता. बघून छान वाटलं. लेक्चर्स नंतर कुठे गायब झाला कुणास ठाउक!! एकदम संध्याकाळी दिसला.

लायब्ररीत भैरवी भेटली. नवीन आहे. पण आमची गट्टी पटकन जमली. तिला माझ्या नोटस दिल्या तर प्रचंड खुष झाली. आम्ही कँटीन मधून बाहेर पडल्यावर मन्या आणि निलेश दिसले. मन्या तर भैरवीकडे बघण्यात इतका गुंग झाला होता की माझ्याकडे त्याचं लक्षच गेलं नाही. भैरवी सांगत होती की तो दिवसभर तिच्याकडेच बघत होता. खुप वाईट वाटलं.

मला मन्या खुप आवडतो. आमची मैत्री पण चांगली आहे. पण बहुतेक त्याच्या मनात मैत्रीच्या पुढे काही नाही. माझं मात्र त्याच्यावर प्रेम जडलं आहे. त्याला सांगावसं वाटतं पण हिंमत होत नाही. मला वाटतं त्याने ते समजवून घ्यावं. त्याच्यासाठी लिहीलेल्या कविता मी त्याला दिल्या. कदाचित त्याच्यतून तरी त्याला माझं मन समजेल.

=========================================================

शुक्रवार १३ फेब्रुवारी

आज मन्या भेटला. बऱ्याच दिवसांनी बोलणं झालं. कविता वाचल्या का विचारलं तर म्हणाला की वाचतोय. मला म्हणाला की तुला कशावर कविता करता येतात. मी म्हंटलं झाडे, फुले, पक्षी. मला म्हाणाला की एखादी माझ्यावर पण कर ना! ह्याला कसं सांगू की सगळ्या कविता ह्याच्यासाठीच लिहीलेल्या आहेत?

त्याला विचारलं की काल बोलला का नाहीस तर म्हणे माझं लक्ष नव्हतं. त्याला म्हंटलं की मला माहीत आहे तुझं लक्ष कुठे आहे ते. मी भैरवीचं नाव घेतल्यावर त्याला धक्काच बसला. मला सांगत होता की त्याला ती खुप आवडते. मनावर वीज कोसळल्यासारखं वाटलं.  सांगत होता की तो उद्या तिला विचारणार आहे. मन भरून आलं. त्याला सांगावसं वाटलं की माझं त्याच्यावर खुप प्रेम आहे. पण काय फायदा? आपण फक्त प्रेम करू शकतो, दुसऱ्याला करायला भाग पाडू शकत नाही. काहीतरी कारण सांगून मी निघाले.

भैरवी सांगत होती की तिला माझी अर्धी कविता आवडली. पुर्ण कधी करणार ते विचारत होती. ती कविता पुर्ण होणार नाही ते सांगतांना गळा दाटून आला. तिला काय माहीत की ती कविता तिच्यामुळेच अर्धी राहणार आहे ते? तसा तिचाही काय दोष म्हणा!

=========================================================

(क्रमशः)