डायरी ५

निल्याची डायरी - सोमवार १६ फेब्रुवारी

तुन्ही म्हणाल की आम्हाला १४ फेब्रुवारीची उत्सुकता आहे १६ ची नाही. काय करू? लिहूच शकलो नाही १४ ला. पण रागवू नका. मी तुम्हाला १४ ला काय झालं तेच सांगणार आहे.

त्या दिवशी मी ठरवलं, काही झालं तरी भैरवीला आपणच प्रपोझ करायचं. त्या दिवशी रात्रभर जागून मी छान कविता तयार केली. एक छोटंसं प्रेमपत्र पण लिहीलं. घराजवळच्या फुलवाल्याकडून गुलाबाची एक कळी घेतली. कॉलेजमध्ये गेल्यावर नजर तिलाच शोधत होती. शेवटी एकदाची दिसली. हातामध्ये वह्या घेउन कुठे तरी निघाली होती. प्रत्यक्ष भेटून फुल द्यायची हिंमतच होईना. मग एक आयडीया सुचली. तिला धक्का द्यायचा, वही खाली पाडायची, वही खाली पाडतांना त्यात पत्र ठेवायचं.

मी भरं भर चालत निघालो. तिला धक्का देणार इतक्यात ती बाजुला झाली. चुकून माझा धक्का दुसऱ्याला लागला. खिशातलं पत्र आणि गुलाबाचं फुलं खाली पडलं. "अरे हा वॅलेंटाईन साजरा करतोय!! घ्या याला रींगणात!!! " कोणितरी म्हणालं. नंतर १० मिनिट नुसती धुलाई चालू होती. दोन दिवस माराने अंग ठणकत होतं.

आज मन्याबद्दल एकलं. साल्याने येव्हढी हिंमत कशी केली केली काय माहीत. सिक्सरच मारला. मला तर एकून धक्काच बसला. उद्द्या तिघे पण घरी येणार आहेत मला बघायला. तेव्हा विचारू डिटेलमध्ये.

भैरवीची डायरी - शनिवार १४ फेब्रुवारी

आज कॉलेजचा मुड बघण्यासारखा होता. नुसती जत्रा भरली होती. लेक्चर्स अटेंड करायचा कोणाचाच मुड नव्हता. मी प्राजक्ताला तिच्या वह्या देण्यासाठी शोधत होते. तेव्हढ्यात मला निल्या दिसला. खिशातून गुलाबाचं फुलं दिसत होतं. बापरे ह्याचा मुड वेगळाच दिसतोय. बैलासारखा पळत पळत येतं होता. माझ्या उरात धडकीच बसली. मी पटकन बाजूला झाले. त्याचा धक्का दुसऱ्या कोणाला बसला. पाठीमागे गोंधळ सुरू झाला. मी पटकन निघून आले. नंतर कळालं की काही छुप्या शिवसैनिकांनी निल्याची धुलाई केली. समजलं की निल्या मलाच प्रपोझ करणार होता. बिच्चारा!!!

पण मुख्य गंमत तुम्हाला सांगयचीच राहीली. आजचा वॅलेंटाईन मी कधीच विसरणार नाही. मी आणि प्रजक्ता कट्ट्यावर बसून गप्पा मारत होतो. इतक्यात तिथे मन्या आला. हातात गुलाबाची फुलं होती. म्हंटलं हा पण आता प्रपोझ करणार. मी क्षणात नाही म्हणायचं ठरवलं. माझ्या समोर गुडघ्यावर बसला. मला म्हणाला. "भैरवी, तु दिसायला खुप सुंदर आहेस. मला तू खुप आवडते! तु कॉलेजला आल्यापसून मी तुझ्या प्रेमात पडलो. पण खरं प्रेम काय असतं हे मला माहीतचं नव्हतं. . . . "

त्यानंतर तो खुप काही बोलला आणि असं काही बोलला की शेवटी मला त्याच्या हातातून गुलाबाचं फुल घ्यावचं लागलं. वाटलं नव्हतं मन्या इतका चांगला असेल. आज मी खुप आनंदात आहे.

प्रजक्ताची डायरी - शनीवार १४ फेब्रुवारी

आज मी आणि भैरवी बसलो होतो. तेव्हढ्यात मन्या आला. मला कळून चुकलं की हा तिला प्रपोझ करणार. निदान त्याने माझ्यासमोर तरी असं नको करायला. हृदयाचे हजारो तुकडे होत होते. मनात म्हंटलं तू आधिच खुप छळलं आहेस. अजून किती छळशील? तिच्या समोर बसला/ म्हणाला. की तु खुप छान आहेस, मी तुझ्या प्रेमात पडलो.. . असं बरचं काही म्हणाला. नंतर असं काही म्हणाला की मला धक्काच बसला. मन्या इतका छान बोलू शकतो? पण चेहऱ्यावरून आणि बोलण्याबरून आवाजातली सच्चाई समजत होती.

शेवटी त्याने एक फुल घेतलं. भैरवीला दिलं. तिने ते स्विकारलं. मला खुप आनंद झाला. दुसरं फुल त्याने मला दिलं. देतांना माझ्याकडे नुसता बघत होता. काही बोलतंच नव्हता. बोलायला कही उरलंच नव्हतं डोळ्यांची भाषा डोळे समजत होते.

आज ह्या कॉलेजला भैरवी आली नसती तर? खरच!! अजचा दिवस तिघांसाठी अविस्मरणिय!!!

मन्याची डायरी - शनीवार १४ फेब्रुवारी

मला माहित होतं निल्याकडून काही होणार नाही. म्हणून मी 'प्लान बी' तयार ठेवला होता. प्राजक्ताची वही शोधायला लागलो कुठे ठेवली होती कुणास ठाउक. शेवटी पलंगाखाली मिळाली. वाचायला लागलो. काय सही लिहीते ही पोरगी!!! एकेक कविता वाचून होत होत्या. ही पोरगी कुणाच्या प्रेमात पडली आहे? माझ्याशिवाय जवळचा मित्र कोणिच नाही!!! हळुहळू कवितांतलं वर्णन माझ्याशी जुळायला लागलं. मला धक्काच बसत होता. तिच्याशी मी फक्त मैत्रीच समजत होतो. ती चक्क माझ्या प्रेमात पडली होती.

मन अगदी अस्वस्थ झालं. काय करावं तेच सुचेना. शेवटी तडक कॉलेजला निघालो. गेलो तर प्रजक्ता आणि भैरवी गप्पा मारत होत्या. मी भैरवीकडे गेलो. तिला म्हंटलं की मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. पण प्रेमाचं अर्थ मला आज समजला. आज मला समजलं प्रेम काय असतं ते. तिला म्हंटलं की प्रजक्ताचं माझ्यावर खुप प्रेम आहे. तिच्या सच्च्या प्रेमाचा मी अव्हेर करू शकत नाही. पण तु माझी मैत्रिण व्हावी असं वाटतं. तिला मी एक पिवळ्या गुलाबाचं फुलं दिलं. तिने ते स्विकारलं.

प्रजक्ताकडे गेलो. काही नं बोलता हातातलं लाल रंगाचं फुल तिला दिलं. तिच्या चेहऱ्यावरून तिच्या मनातलं समजत होतं.

निल्याची डायरी - मंगळवार १७ फेब्रुवारी

आज मन्या, प्राजक्ता आणि भैरवी घरी आले. मला बघायला. मन्या हराम्खोर प्लास्टर वर काही काही लिहित होता. त्याला म्हंटल साल्या हे सगळंच तुझ्यामुळे झालं. सगळे हसत होते. मी पण प्राजक्ता आणि त्याची चांगलीच खेचली. भैरवी बराच वेळ शांत होती. मग म्हणाली "खुप लागलं का रे..!!" तिच बोलणं थेट काळजाला जाउन भिडलं. आई बरोबर चहा आणायला आत गेली. इकडे प्राजक्ता आणि मन्या एकमेकांना डोळा मारत होते.

==========================================================

(समाप्त)