डायरी २

मी निलेश. मी मन्याच्याच वर्गात शिकतो. जरा तुमच्याशी काही गोष्टी शेअर कराव्या म्हणून तुमच्या भेटीला मी येणार आहे.

गुरूवार १२ फेब्रुवारी

आज मन्या कॉलेजला आला. म्हणजे तो अधुन-मधून येत असतो पण आज लेक्चरला पण बसला. त्याचं कारण म्हणजे आज २ दिवसांच्या सुटीनंतर भैरवी येणार होती. मन्याचा अवतार पाहण्यासारखा होता. बावळटासारखा जिन्सवर कोल्हापुरी चप्पल घालून आला होता. पुर्ण दिवसभर भैरवीवर नजर ठेवून होता. माझ्याकडे बघून ती हसली तर ह्याचा जीव जळाला. मला म्हणाला की ओळख करून दे. माझी जुनी मैत्रीण थोडीच आहे ओळख करून द्यायला. १० दिवसांपुर्वी तिने ऍडमिशन घेतली. तेंव्हा H.O.D. ची केबीन तेव्हढी मी दाखवली होती. कसं-बसं मी त्याला टाळून दिलं.

संध्याकाळी मन्याकडे गेलो. कसचा तरी घाणेरडा वास येत होता. शेवटी खिडकीपाशी बसलो तेव्हा बरं वाटलं. रूमवर मला म्हणाला की ह्या वॅलेंटाईन ला तिला प्रपोझ करतो. नुसता बोली-बच्चन आहे. दम काहीच नाही.

============================================================

शुक्रवार १३ फेब्रुवारी

आज मन्याने जाम त्रास दिला. सकाळपासून वॅलेंटाईन-वॅलेंटाईन  करत होता. मला म्हणाला की एखादी कविता लिहून दे. जाम पकवत होता. मला म्हणे की तु कॉलेजचा संदीप खरे आहेस. काय माहीत खर म्हणत होता की खोटं. पुर्वी कवितेचा क म्हंटला तरी हा पळायचा.

शेवटी लिहायला बसलो. एक ओळ सुचता सुचेना. काही वहीवर लिहीलं की हा मुंडी घालून बघायचा. कविता काय बूंदीसारखी थोडीच पाडता येते. कॉन्संट्रेशन लागतं. ह्याला ते काय कळणार. मला म्हणाला की काही सुचवू कां? मी म्हंटलो नको. शेवटी चहा आणायला पिटाळला. तेंव्हा कुठे थोडी मोकळीक मिळाली. येतांना पेशल चहा आणि वडापाव सुद्धा आणला. एरव्ही चहा पाज म्हंटलं तर पाजत नाही. कामा पुरता मामा करतो.

मी विचार केला!! माझ्या कवितेवर हा तिला पटवणार. पेड मैं लगाऊ आम वो खाये !! ह्याट!! वॅलेंटाईनला मीच तिला विचारणार!!!

============================================================

(क्रमशः)