नशीब माझे - भाग - ११

काय नैतिक - अनैतिक हे ठरवण्याचा प्रश्न काही वर्षांनी पुन्हा एकदा माझ्या समोर उभा ठाकला. ह्या प्रसंगात मी फार सावध होतो. सावज बनलो नाही.

कंपनीत माझ्या बरोबर काम करणार्‍या एका कलाकाराशी (पुढे कळेल) ओळख वाढली. त्याने मला त्याच्या घरी नेले, बायको मुलीची ओळख करून दिली. मला लहान मुलांना खेळवण्याची  फार लहानपणापासून सवय असल्याने फार कमी वेळात त्या लहान चिमुकलीशी ओळख झाली. जेवताना ती माझ्या मांडीवर येऊन बसली, चार घास आवडीने खाल्ले आणि थोड्या वेळात माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली. त्या दोघांनी माझे कौतुक केले. मी एकटा जीव सदाशिव होतो, दोघांनी रात्री त्यांच्याच घरात राहण्याचा आग्रह केला. मी नाकारला व राहत्या जागी झोपायला निघून गेलो.

काही दिवसातच तीन दिवसांची सलग सुट्टी होती. दोघांनी आग्रहाने त्यांच्या घरी राहायला बोलावले. तीन दिवस घरच जेवण मिळेल व तीन रात्री स्वच्छ जागेत झोपायला मिळेल ह्या विचाराने लगेच आमंत्रण मान्य केले. ह्याचे कारण कामाच्या जागेपासून दोन मिनिटाच्या वाटेवर, एका खोलीत ८ पलंग असलेली, त्यातल्या एका पलंगाची ती जागा फार कमी पैशात मिळाली होती. त्या पगारात तेवढेच शक्य होते. त्या जागेत मी एकटाच मराठी होतो बाकी सगळे गैर मराठी होते. निद्रानाशाच्या आजाराला इथूनच सुरुवात झाली होती.

असो, संध्याकाळी कलाकार मित्राच्या घरी गेलो. त्याच्या बायकोने व मुलीने गोड लाडिक हास्य देत माझे स्वागत केले. गप्पा, गाणी, विनोद रंगले त्यात साधे सोज्वळ घरगुती जेवण मला मेजवानी सारखेच होते. ती धाकटी चिमुरडी पोर माझा खिसा मुठीत घट्ट धरून माझ्या खांद्यावर झोपली होती. कसेबसे सावरत तिची झोपमोड न करता मी शांतपणे गादीवर आडवा झालो. दिवा विझला, बर्‍याच वेळाने नवरा बायको दोघे बाहेर आली, मुलीला उचलण्याचा प्रयत्न झाला माझी झोप मोड होवू नये म्हणून मुलीला माझ्या जवळ सोडून पार्टिशनच्या मागे झोपायला आत गेले. मला नवीन वातावरणात नीट झोप लागत नव्हती. मला त्या ८ पलंगी खोलीच्या वातावरणाची थोडी फार सवय झालेली होती. ते भे/बे सुर घोरणे, खोकणे, गावठी दारु/विडीचे वास, त्या नवीन जागेत नव्हते.

काही वेळाने ए ग्रेड सिनेमाची ध्वनी फीत हळू आवाजात सुरू झाली. नंतर जिंकू किंवा मरू अशी स्थिती होती आणि मग सगळं कस शांत शांत झाले. माझे डोके मन सुन्न झाले होते. किती वेळ निघून गेला कळले नाही. त्याची बायको बाहेर आली पाणी पिऊन माझ्या अंगावरची चादर नीटनेटकी करून आंत निघून गेली. थोड्याच वेळात ध्वनिफीत पुन्हा सुरू झाली.  माझी स्थिती " कळेना अजुनी माझे मला असामी काय गुन्हा केला? " झाली होती. मला ताप भरल्यासारखे वाटू लागले. बर्‍याच वेळानंतर, खरंच माझ्या कानांनी ऐकले " थांबा जरा पाणी पिऊन येते " मी नक्की काय ते समजलो. ति बाहेर येण्या आधीच आवाज न करता बाल्कनीत जाऊन उभा राहिलो. गादी रिकामी पाहून ति बाल्कनीत आली, मी डोके धरून उभा होतो. ह्या दोघांनी माझा हजेरीपट केला होता. तिने माझ्या हातावर एक गोळी ठेवली, घ्या व शांत झोपा म्हणत आत निघून गेली. तुम्ही मला सांगा दोष माझा होता की - - नशीब माझे - भेटू भाग १२

http://dtrskills.blogspot.com/  भजने ऐकून मन शांत करा.