नशीब हे शिकलो - भाग ३९

घरात पाय ठेवताच बायकोने मुलाला मराठीतून लवकर ऊठ बघ बाबा आला असे म्हणताच मी एकदम गारच झालो, फारसी बोलणारी बायको मराठी केव्हा शिकली ? मला तर गोड धक्का बसला होता. दोन तासातच बायकोचे डोळे भरून आले. मी ओमानला गेलो तेव्हा तिला सदाशिव पेठेतल्या त्या जागेत सोडून गेलो होतो. तिथे त्या मालकिणीने कसा त्रास दिला, भाषेचा कसा त्रास झाला. शेजारी नव्याने झालेल्या मैत्रिणीने कशी मदत केली होती ह्याचे वर्णन ति करीत होती. मी स्वतःवर चिडण्या शिवाय काहीच करू शकत नव्हतो. त्या मालकिणी बरोबर दोन हात करायची वेळ आली होती. शेवटी नळ स्टॉपला माझ्या दूरच्या मावसं बहिणीने तिची एक खोली माझ्या बायकोला भाड्याने दिली होती.

भाजीवाल्या बाईबरोबर बोलता यावे म्हणून ती " आमची माती आमची माणसे" कार्यक्रम रोज ऐकत होती, दिवस भर मराठी रेडिओ ऐकून तिने मराठी शब्द बोलायला सुरू केले होते. एक महिना कसा संपला कळलेच नाही. मी मस्कतला परतलो. बायको येणार म्हणून घर बघणे वगैरे तयारी सुरू झाली. १९८४ ला ति मुलाला घेऊन मस्कतला आली. माझा पगार ४१० रियाल होता. १०० रियाल गाडीचा खर्च होता. नीटनेटके साधे जुने घर टेकडीच्या पायथ्याशी २५० रियाल महिना भाडे असे सापडले. एक मोठी खोली, दोन थोड्या लहान खोल्या, एक स्वैपाकाची खोली, एक संडास / अंघोळीची जागा, वर मोकळी गच्ची, घरापुढे उंचसखल माती, एकच गाडी मावेल एवढीच जागा, गाडी आत बाहेर करणे एक कसरतीचे काम होते. घर घेण्या आधीच निम्मे भाडे, टॅन्करचे पाणी वीज आकार देणारा सहभागी मराठी मित्र मिळाला होता. त्यामुळे १२५ रियाल भाडे, ५ रियाल पाणी, २० रियाल वीज असा खर्च मी देत असे. १६० रियाल महिना हातात उरत होते.

तीन महिन्यात सहभागी मित्राला त्याच्या कंपनीने चांगली जागा दिली, तो ते घर सोडून जाताना त्याने दुसरा मराठी सहभागी शोधून दिला होता. हे मित्र मराठी मित्र मंडळामुळे मला मिळाले होते. ह्या काळात नव्याने ओळख झालेल्या मित्रांनी अनमोल मदत केली. एके दिवशी १४ इंची टीव्ही चे पूर्ण पैसे त्यांनी देऊन माझ्या घरी आणून ठेवला, मी ६० रियाल / महिना देऊन ते फेडले. त्याच काळात कंपनीने नवीन गाडी वापरणार्‍यांना गाडी खर्च व घर भाडे वाढवून दिले. त्यामुळे महिन्याच्या खर्चात काही बचत करणे शक्य झाले. मला कामातील वेळ, घर खर्च ह्याचे नियंत्रण करणे बर्‍याच प्रमाणात सुलभ झाले. पुढील सहा महिन्यात घरात दोन  सहभागी बदलले. त्या घरातील शेवटचा सहभागी एक वेगळाच अनुभव देऊन गेला.

त्या सहभागी कुटुंबात नवरा बायको दोघे नोकरी करीत होते, दोन शाळेत जाणारी लहान मुले होती. सकाळी ७.३०ला ते सगळे बाहेर जात असत. दुपारी ३ ला सगळे घरी परत येत होते. ति बाई शाळेत शिक्षिका होती. पहिल्याच महिन्याचा विजेचा व पाण्याचा खर्च एकदम वाढला. मी त्या सहभाग्याशी वाढलेल्या खर्चा विषयी बोलत असताना त्याची बायको एकदम चिडून बाहेर आली. तिची तक्रार होती ७ तास त्यांची खोली बंद असते व माझी बायको घरात असते म्हणून वीज / पाण्याचा एक तृतिअंश खर्च ते देणार दोन तृतिअंश खर्च आम्ही द्यायचा. वाद वाढला, माझ्या बायकोने मुद्दा काढला, आम्ही तीन होतो त्यांच्या कडे चार आहेत, म्हणून निम्मा खर्च प्रत्येकाने दिला पाहिजे. गॅस वापरण्या वरून वाद झाले. तो विषय संपला असे वाटले, पण दुसर्‍या दिवसांपासून एक वेगळाच प्रकार सुरू झाला. ति बाई मुलांना सोबत घेऊन अंघोळीला जात असे त्यात नळ दोन तास पूर्ण उघडा ठेचीत असे. पाण्याच्या खर्चात अजून वाढ झाली. बायकोचा हा खेळ नवर्‍याच्या लक्षात आला. मग लक्षात आले ती बाहेर जाताना दाराला कुलूप लावताना वातानुकूल यंत्र चालू ठेवून निघून जात असे. एकदा ति नसताना नवर्‍याला आम्ही कामावरून घरी बोलावले त्याने ते ओळीने तीन दिवस पाहिले. पुन्हा त्या दोघांचे भांडण झाले.

एक दिवस बायकोला मासे तळण्याचा वास आला, त्या वेळेला शेजारीण कामाला गेलेली होती, तिला शंका आली म्हणून दार उघडून बाहेर बघायला गेली. तिसर्‍या खोलीचे दार उघडे होते, एक तरुणी त्या खोलीत स्वैपाक करण्यात मग्न होती, माझी बायको तिच्याशी बोलायला गेली, तेव्हा कळले, शेजारणीने तिला बाहेर स्वैपाक करायला मनाई केली होती. त्या खोलीत तिच्या लग्नातला दोघांचा फोटो होता. त्या नवीन शेजारणीने सगळी माहिती दिली. रात्री सगळे मला समजले, दुसर्‍या दिवशी मी घराला आतून कुलूप लावले, गच्चीला कुलूप घातले व त्यांची वाट बघत घरात थांबलो. शेजारी मित्र घेऊन आला होता. मी सरळ दोन महिन्याचे भाडे रोख मागितले, नाहीतर पोलिस ला बोलवतो असे सांगताच, सगळे प्रश्न सुटले. मी ते घर सोडले. व एक स्वतंत्र १२० रियाल भाड्याचे घर मिळवले. त्या नवीन जागेत २५० प्रयोगाची विनोदी मालिकाच घडली. - भाग ४०