नशीब त्यांचे - भाग २१

शब्दाचे भाषांतर केल्यास विनोद निर्माण होणार परंतु कवी भावना समजल्यास कवितेचा आनंद घेता येईल,
जगात सगळीकडे कवी भावना सारख्याच असतात बदलतात ते फक्त शब्द. भाषांतर काराने त्या भावना
समजूनच त्या त्या भाषेत भाषांतर करणे आवश्यक असते. सत्तार ह्या गायकाचे हे गाणे खूप प्रसिद्ध होते, मी इथे हायेदे ह्या गायिकेने  गायीलेले एक कडवे घेऊन त्याला मी म्हटलेले जोडले आहे.

गोले सांग्याम,  गोले सांग्याम - गोल = फुल, स्यांग = दगड, मान = माझा, म्हणून - कवी एक शेवाळे असून
त्याचे अस्तित्व वाहत्या झर्‍याच्या पाण्यावर आहे.
चे बेग्याम आज देलेथांग्याम - चे = काय / कसे, बेग्याम = सांगू मी, आज = कोणत्या कारणाने, देलेथांग्याम
= निराश / मलूल आहे. म्हणून - कसे सांगू कशामुळे मी निराश आहे. मिसले ऑफतॉब अगे बारमान नाथॉबी
सार्दामो बी रंग्याम - मिसले = उदाहरणार्थ, ऑफतॉब = सूर्यप्रकाश, अगे = जर, बारमान = माझ्या करता,
नाथॉबी = प्रकाशाविना, सार्द = थंड / निर्जीव, रंग्याम = रंगमाझा. म्हणून - जसे सूर्यप्रकाश जर माझ्या करता
नसेल तर  मी निर्जीव व माझा रंग नसणार. गाणे ऐका : गोले सांग्याम

हे दुसरे गाणे हबीब ह्या गायकाचे. भारतातील परिस्थितीला कंटाळून मी इराणला आलेलो होतो, त्या पहिल्या रात्री हे पहिले फारसी गाणे ऐकले, त्याचा अर्थ दुभाष्याने समजवून सांगितला. मला गाणे फार आवडले, मी ते लगेच पाठ केले. हबीब ची बायको व मुलगी एका अपघातात मरतात, तेव्हा हे गाणे त्याने तयार करून म्हटले होते. त्या मूळ गाण्याला जोडून मी माझ्या आवाजात म्हटलेले गाणे जोडले आहे. गाणे ऐका : हबीब व व्हीके

मान मर्दे तनहा ए शबाम - मी ह्या रात्रीचा एक अनाथ माणूस आहे
मोहोरे खामोशी बारलाबाम - बोलू शकत नाही ओठ दाबले गेले आहेत 
तनहा वो गमगीन रफतेआम - सगळे माझ्या पासून दूर गेले आहेत
देलआज हमे गुसस्तेआम - ह्या सगळ्यातून माझे मन निराश झाले आहे
तनहॉ ए तनहॉ गमगीनो रुसवॉ तनहॉवो बी फारदॉ मानाम - एकुलता एक, निराश, अभागी, भविष्य नसलेला मी अनाथ झालो आहे.

ह्याच तीन महिन्यात मला बर्‍याचवेळा व्यक्तीविषेश ( पर्सनल ) विभागाला माझी वैयक्तिक माहिती एका
लेखनिक मुलीला द्यावी लागत असे. कार्यालयातील मुलींना इंग्रजी बोलता येत नसे. पण फक्त ह्या एकाच मुलीला तुटक वाक्यरचना करत इंग्रजी बोलता येत होते. एकदा मी दुभाषी आणि त्याचे मित्र असे बोलत बसलो होतो, एका मुलीने त्याला फोन करून मला इराणी गाणे म्हणायला सांगितले, मी म्हटले. मग दुभाष्याने मला सूचना केली, मी मुलींना बरोबर असे बोलण्याचे वाईट परिणाम होतील वगैरे. त्याच्या दुसर्‍या मित्राने गंभीर होत सांगितले, मी ज्या मुलीबरोबर इंग्रजी बोलतो तीच्या लग्नाची बोलणी त्यामुळेच फिसकटली होती. मला त्या प्रसंगाचे गांभीर्य जाणवले व मी लग्नाला तयार आहे असे सहज बोलून गेलो. ती मुलगी व नातेवाईक तयार असतील तर मी तयार आहे.

पुढच्या १५ दिवसांत सगळी चक्र गरगरा फिरली आम्ही लग्न करणार हे जाहीर केले गेले. कायदेशीर कारवायांना सुरुवात झाली. आम्हा दोघांचे विरोधक वाढले. त्याच महिन्यात सलग ५ दिवस आजूबाजूच्या गावातील व कंपनीचा वीज प्रवाह बंद झाला होता शहराच्या नगर अध्यक्षाने कंपनीला शक्य असल्यास मदतीची विनंती केली. कंपनी प्रमुख मला घेऊन गेला. वीज वितरणाच्या इलेक्ट्रॉनिक नियंत्रकाचा बॅटरी प्रवाह निकामी झाला होता. मी बाहेरून प्रवाह देण्यात यशस्वी झालो व वीज पुरवठा सुरू करू शकलो. माझे खूप कौतुक झाले. माझ्या पगारात १००० ची वाढ झाली.

परदेशिय व्यक्तीशी लग्न म्हणून निरनिराळे परवाने परराष्ट्र खात्याशी संबंधीत होते. आम्हा दोघांना दर १०
दिवसाआड तेहरानला  जावे लागत असे. इथे त्या इंग्रजाच्या ३० पानी करार पत्राचा व माझ्या १ पानी करार
पत्राचा फरक जाणवला. मला कंपनीने तेहरानला जाण्यास वाहन नाकारले त्यामुळे स्वखर्चाने ये जा करणे फारच त्रासदायक, महागात पडले. कसे ? जे घडले ते एकाद्या इंग्रजी सिनेमात घडते तसे होते. - भेटू भाग - २२.