नशीब माझे - भाग - १३

तो गोड लडिवाळ आणि हा केविलवाणा नजारा, हा २४ तासांत घडलेला फरक मी समजवून घेण्याच्या प्रयत्नात होतो. तिने एकेक कोडी उलगडायला सुरुवात केली. दैनंदिन रटाळ वाटणार्‍या दुनियेत ह्या कलाकार मित्राची ओळख तिला आकर्षक वाटली होती. त्याने दिलेले
शृंगाराचे धडे व त्यातून शरीर सुखाचे प्रयोग करणे फार धाडसी वाटले होते. पुढे त्या प्रयोगांची भूक वाढली. आजूबाजूच्या मंडळीत चर्चा सुरू झाली. शेवटी व्हायचा तो परिणाम झालाच. परिणाम टाळणे त्याच्या पुरुषार्थाला मान्य नव्हते. मुलगी जन्माला आली. हा कलाकार ढसढसा रडला होता. कारण फारच हास्यास्पद होते. पहिला मुलगाच असेल अशी लावलेली पैज तो हरला होता.

गावठी दारू पिणे सुरू झाले, त्या नशेत शारीरिक जोर जबरदस्ती सुरू झाली. हिचा विरोध मोडण्या करता ह्याने बाहेर बायका शोधल्या होत्या. त्या रात्रीचा दारूचा वास, ती जोर जबरदस्ती, त्याचा अर्थ मला समजला. त्या शारीरिक जखमा मला जास्त स्पष्ट दिसल्या. केविलवाण्या नजार्‍याचा अर्थ समजला होता, पण तो गोड लडिवाळ नजारा काय होता ?

तिने कॉफीचे कप गोळा केले, आंत जाऊन तोंड डोळे पुसत ती बाहेर आली. माझ्या शेजारी थोडे अंतर ठेवून बसली.तिच्या कडे बघून मी चकीत झालो तो गोड लडिवाळ नजारा घेऊन ती जवळ येऊन बसली होती. कलाकाराची बायको चांगलीच नटी होती. तिने त्या ध्वनी फीत रात्रीचे स्पष्टीकरण जास्त नमकीन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा तो प्रयोग त्या आधी बर्‍याचवेळा यशस्वी झाला होता. पण ह्या वेळचा आनंद हरवलेला नवरा परत सापडल्याचा होता. म्हणून त्या खुशीत त्या सकाळी माझे आभार मानण्या करता तिने तो नजराणा पेश केला होता. " पण तू अगदीच अरसिकता दाखवलीस" म्हणत मला चिमटा घेतला. ति तुम्ही वरून तू वर घसरली होती, मी मात्र अजून तुम्हीची मर्यादा पाळून होतो. त्या अदाकारी पासून सावध होतो.

त्या रात्री पुन्हा तो कलाकार बाहेर निघून गेला. तिला त्यांच्या शारीरिक प्रयोगांचे वर्णन करण्याची संधी मिळाली. त्या सगळ्याचा आता मला त्रास होऊ लागला होता. मी तसे तिला सांगितले. उलट तिने चूक माझी दाखवली, " मला सांग तुला पुरुषी भावना नाहीत का ? मी
चिडलो " तुला शंका असेल तर तूच चाचणी कर, कारण ह्यात पकडला गेलो तर नुकसान माझे आहे हे नक्की ! "  ति चिडून आंत निघून गेली. (एवढेच लिहिण्याचे तारतम्य मला आहे. धाडसी वाचकांनो माफ करा.)

ती रात्र कशीबशी मी तिथे काढली. दुपारी जेवणानंतर त्या दोघांचे आभार मानीत मी तिथून पळ काढला. कंपनीत इतर सहकार्‍यांना झाल्या प्रकाराची थोडक्यात माहिती दिली व त्यांना सावध केले. कदाचित माझी कलाकाराबरोबर हाणामारीची शक्यता असल्याची कल्पना दिली.पुढे काही दिवस त्या नटीचे फोन मला आले. मी त्यांच्या घरी जाणे टाळले. पण तिला व तिच्या मुलीला सार्वजनिक जागी भटकायला घेऊन गेलो होतो. शेवटी अपेक्षित घडले, कलाकार हातोडी घेऊन मला मारायला धावला. त्याचा हात वर जाताक्षणी त्याच्या नाकावर मी जोरात बुक्का हाणला. त्याचा तोल गेला बरळू लागला. बाजूच्या बघ्यांनी त्याला सावरले व चुपचाप घरी जायला सांगितले.

हे सगळे एक एक अनुभवलेले प्रसंग मी लिहून ठेवतो आहे. प्रत्येकाने कुवती नुसार त्यांची चिरफाड करावी. अहो ह्या प्रसंगा नंतर मी फार बदललो. मी नशीब माझे म्हणणे सोडून दिले. आता ... ... नशीब त्यांचे - भेटू भाग १४