सुंदर मी होणार !! ------- १

            डॉ.  टेकवानीच्या "मर्लिन कॉस्मेटिक क्लिनिक "मध्ये नीताबरोबर आपला नंबर येण्याची वाट पहाणाऱ्या मेधाच्या डोक्यात चिंतेचे काहूर माजलेले होते.अजूनही येथे थांबावे की नको याविषयी तिच्या मनाचा गोंधळ चालूच होता.एक मन म्हणे " विक्रमच्या मनात तुझ्याविषयी पुन्हा प्रेम निर्माण होईल असे करून आताच तुझा संसार सावरण्याची संधी आहे" पण दुसरीकडे आपण त्याला न कळत ही गोष्ट करतोय हे योग्य आहे का . विक्रमला खरच काय पाहिजे.आपण खरच त्याला आवडेनासे झालो आहोत का, की हा आपला नुसता संशयच आहे आणि त्यासाठी हा अघोरी मार्ग आपण स्वीकारत आहोत की काय  याविषयी तिच्या मनात शंका निर्माण होत होती .
          शेजारील फ्लॅटमध्ये रहाणाऱ्या  अगदी जवळच्या वाटणाऱ्या मैत्रिणीच्या म्हणजे नीताच्याच सल्ल्यावरून क्लिनिकची पायरी चढण्याचे धाडस मेधाने केले आणि तशीही नीता तिच्या लांबच्या नात्यातीलही होती.लग्न ठरल्यानंतर तिच्या घरी केळवणासाठी मेधा आणि विक्रमला बोलावले होते तेव्हा नीताने तिचे अभिनंदन तर केलेच होते पण "चांगलाच नवरा पटकावलास बरंका मेधे तू "असा अभिप्रायही दिला होता.योगायोगाने आता त्या पुन्हा  शेजारणीच झाल्या होत्या. त्यामुळे मेधाला ती फारच जवळची वाटे.
          नीता अगदी जवळची वाटत असली तरी तिची एक गोष्ट मेधाला पसंत नव्हती ती म्हणजे ती अगदी बिनधास्त होती. नीताच्या मते मात्र खरे तर तीच काळाच्या बरोबर होती आणि मेधा मात्र काकूबाई म्हणता येईल अश्या प्रकारात मोडत होती.त्यामुळे संजय आणि नीता तसेच एकत्र रहात होती.लग्न वगैरे लळालोंबा आम्हाला नको आहे असे दोघांचेही मत.जमेल तोपर्यंत एकत्र नाहीतर एकमेकापासून फुटायला केव्हांही मोकळे .संजय म्हणे,नीता आणखी कोणाला भेटते त्याची मी दखल घेत नाही आणि मी कोणाबरोबर हिंडतो यावर नीताची काही हरकत असणार नाही असा आमचा सगळा उघड उघड मामला. नीताही त्याच्याशी पूर्ण सहमत.
          अश्या स्वभावामुळे नीताकडे जेव्हां मेधा आणि विक्रम लग्न ठरल्यानंतर केळ्वनासाठी म्हणून गेले गेले तेव्हां नीयान म्हटलेल्या  गाण्यावर खूष होऊन विक्रम थट्टेने जेव्हां तिला म्हणाला,"नीता मला वाटते आपली जरा उशीराच गाठ पडली मेधाशी लग्न ठरलं नसतं तर तुझ्या या गाण्यावर खूष होऊन मी तुझ्याशीच लग्न केलं असतं."  " मग अजुन काय हरकत आहे ,काय गं मेधा,तुला काय, विक्रमपेक्षा चांगला नवरा मिळेल की"असं नीतानं म्हटलं होतं ते मात्र मेधाला काही आवडलं नव्हतं" त्यामुळे नीताला तिनं " ए उगीच फाजिलपणा नको हं. तू लाख करशील त्याच्याशी लग्न मी काही त्याच्यावरचा हक्क सोडणार नाही बरंका." असं फटकावलं होतं
       आतामात्र लग्नापूर्वी क्षणभरही आपल्याला दूर होऊ न देणाऱ्या विक्रमचे आपल्यावरील प्रेम कमी होऊ लागले आहे की काय असा संशय तिला येऊ लागला होता.या महिन्यात तर त्याचे वागणे फारच विचित्र होऊ लागले आहे असे तिला वाटू लागले होते.
   दहा पंधरा दिवसापूर्वीचाच तो प्रसंग.त्याला कुठलीशी फाइल सापडत नव्हती तर त्याने उच्च स्वरात हाक मारली होती "मेधा, माझी ती काल ऑफिसमधून आणलेली फाइल कुठं गेली?" त्याच्या सुरातून असा भास होत होता की जणु फाइल मेधानेच गहाळ केली. नाहीतर पूर्वीचाच विक्रम असता तर "सॉरी मेधा, तुला त्रास देतोय पण अगं,माझी कालच आणलेली फाइलच सापडत नाही, प्लीज शोधून देशील का.मला माहीत आहे तू नक्की शोधणार" असं म्हणणार आणि विक्रमचा हा वेंधळा स्वभाव माहीत असल्याने मेधाही त्यावर"तर काय त्यासाठीच राजेसाहेबांनी या दासीशी लग्न केलेय ना " म्हणणार तर विक्रमही "ए उगीच काय, दासी दासी लावलय,खर तर तू राणी आणि  दास  हो मी तुझा" अशी गाण्याची लकेरच घेणार."बर बर घ्या दासोपंत ही तुमची फाइल" मेधाला लगेचच ती फाइल सापडल्यावर ती त्याच्या हातात देत म्हणणार आणि त्याच हाताने तिला जवळ ओढून विक्रम तिचा हलकासा मुका घेणार.
           पण हे सगळे चित्रच जणु पालटले होते.कारण ती ताबडतोब लगबगीने येऊन त्याची फाइल शोधू लागली आणि नेहमीप्रमाणेच तिला ती लगेच सापडली म्हणून त्याच्या हातात देत "ही काय इथेच तर आहे" असे तिने म्हटल्यावर तिला साधे "थॅन्क्स" तर म्हणायचे राहिलेच उलट,""बर बर आण इकडे,उगीच मला खिजवू नकोस " असे उद्गार त्याने काढले. तरी त्याला चुचकारण्याचा प्रयत्न करीत ती म्हणाली,’ विकी,तुझे बी.पी.एकदा तपासून घेतले पाहिजे.तुझी चिडचिड हल्ली फारच वाढत चालली आहे"त्यामुळे शांत न होता उलट आणखीनच उसळून तो म्हणाला,"बर बर आहे माहीत, मोठी मानसोपचार तज्ञ आहेस ते " मेधाने मानसशास्त्र घेऊन एम.ए.केले होते त्यावर हा टोमणा होता."इतकं जर असेल " तो पुढं म्हणाला,"तर माझ्या मानसिक अवस्थेची थोडीफार कल्पना यायला हवी होती तुला"म्हणून तो फणकाऱ्याने निघून गेला.
    लग्न होऊन पाचच वर्षे झाली आणि तिच्यावाचून क्षणभही चैन पडत नाही असे म्हणणाऱ्या विक्रमला असे हे काय झाले हेच मेधाला कळेनासे झाले.लग्नानंतर दोन वर्षे मूल होऊ द्यायचे नाही,मेधाने नोकरी करायची नाही आणि दोन वर्षे नुसते एंजॉय करायचे हा निर्णय विक्रमचाच आणि त्याच्या प्रेमात पार बुडून गेलेल्या मेधालाही त्यात फारसे काही जगावेगळे आहे असे वाटले नाही.विक्रमला गलेलठ्ठ पगार होता आणि घरची वडिलार्जित मिळकत तो एकुलता एक असल्यामुळे त्यालाच मिळणार होती.त्यामुळे " राणी आता तू नुसता आराम करायचास उगीच नोकरीचा फास नाही लावून घ्यायचा "असे त्याने म्हणताच लग्नापूर्वी चांगली असलेली नोकरीही तिने सोडली.
      पहिले दोन वर्षे योजनापूर्वक मूल होऊ न दिल्यावर नंतर तिला दोनदा दिवस गेले आणि दुर्दैवाने दोन्ही वेळ तिचा गर्भपात झाला.त्याचा परिणाम तिच्याच मनावर अधिक झाला होता.विक्रमनेच "अगं होईल पुन्हा, काळजी करायचं कारण नाही " अशी तिची समजूत घातली होती आणि त्यांनी डॉक्टरांचा सल्लाही घेतला होता.डॉक्टरांनीही योग्य काळजी घेतल्यास पुन्हा अपत्यप्राप्ती होईल असा दिलासा दिला होता.त्यामुळे त्या कारणामुळे विक्रम चिडचिड करत असेल असेही नव्हते. मग असे काय झाले आहे की विक्रम आपल्याशी असे वागतो मेधाला प्रश्न पडत होता.कदाचित कामाचा ताण वाढला असेल आणि हा त्याचा तात्पुरता परिणाम असेल अशी मनाची समजूत तिने करून घेतली.
    विक्रम गेल्यावर थोड्याच वेळानंतर सहज म्हणून तिच्याकडे बसायला आलेल्या नीताने एकदम तिला,"सॉरी मेधा,विचारू की नको असे वाटते,उगीच तुमच्या खाजगी बाबीत नाक खुपसते असे तुला वाटेल,पण आज तुमच्या दोघांचा काही वाद तर झाला नाही ?"असे विचारल्यावर
" छे छे असे तुला का वाटते ?" असं सावरून घेण्याचा प्रय्त्न करत मेधा म्हणाली.शक्यतो हा विषय नीता अगदी जवळची असली तरी तिच्यापर्यंत जाऊ नये असे तिला वाटत होते, लग्न केले नसल्यामुळे लग्न केलेल्या जोडप्यांच्या भानगडीत नीताला  मात्र नको तेवढा इंटरेस्ट होता.
"तुला सांगायचे नसेल तर राहू दे पण संजय आणि विक्रम दोघे एकाच गाडीने ऑफिसला जातात ना,त्यामुळे त्या दोघांचे काही बोलणे झाले तर मला सांगितल्याशिवाय संजयला रहावत नाही".
"तुला राग येईल मेधा,पण तुझ्या नवऱ्याचे बाहेर तर काही प्रकरण चालू नाही ना ?" नीताने उगीचच पुडी सोडली.
"छे ते शक्यच नाही मला विक्रमविषयी पूर्ण खात्री आहे. तिची शंका झटकून टाकत मेधा उद्गारली.
" तू काही सांगू नकोस मेधा, या पुरुषांविषयी.त्यांच्या ऑफिसमध्ये भेटली असेल   कुणीतरी नटमोगरी  की पाघळली त्यांची स्वारी.म्हणून आपणच काळजी घ्यायला हवी.विशेषत: आपली फिगर,त्वचेच सौंदर्य टिकवून ठेवायला हव .अगं पुरुषाची वृत्ती असते भ्रमरासारखी,जरा चांगला रंग दिसला, वास आला  की चालला दुसऱ्या फुलातला मध चाखायला !
       नीताचे  उद्गार   मेधाने त्यावेळी मनावर घेतले नाहीत ,तरी त्याचा थोडा तरी परिणाम झाल्यावाचून राहिला नाही.विक्रमचे अलीकडील वागणे तपासून पाहिल्यास त्यात तथ्य असावे असे तिला वाटू लागले. लग्नानंतर विक्रम अगदी नाइलाज म्हणूनच ऑफिसमध्ये जायचा व वेळेपूर्वीच घरी यायचा.आल्यावर अगोदर तिला मिठीत घेऊन दिवसभराच्या विरहाची पुरेपूर वसुली करून घेतल्याशिवाय तो तिला सोडतच नसे.आता लग्नानंतर पाच वर्षांनीही त्याचा तोच  आवेग रहाणे शक्य नाही हे तिलाही समजत होते.आता तिला तरी पूर्वीसारखे त्याने आपल्याला मिठीत घ्यावे व कुसकरून टाकावे असे कोठे वाटत होते तरी नजरेतूनही जे प्रेम व्यक्त व्हायला हवे,आपुलकी दिसायला हवी तशी त्याच्या नजरेत नसते असा तिचा तर्क होता उलट त्या प्रेमाची जागा तिरस्कारानेच घेतली आहे की काय असे तिला जे भासत होते ,नीताच्या उद्गारातून त्यावर जणु शिक्कामोर्तब झाले.
     नीता निघून गेली आणि स्नानासाठी मेधा बाथरूममध्ये शिरली व गरम पाण्याचे तुषार अंगावर घेतल्यावर एकदम तिला उत्साहित झाल्यासारखे वाटले.सुगंधी साबण व शांपू च्या मर्दनाने तिच्या वृत्ती उल्हसित झाल्या व ती गाणे पण गुणगुणू लागली आणि अचानक ती भानावर आली कारण आपण गाणे गुणगुणत आहोत ते गाणे "कशि तुज समजाउ सांग " आपल्या मनोवृत्तीचेच द्योतक आहे असे तिला वाटले. विक्रमला कसे बर मनवावे याचाच विचार ती करू लागली.
    स्नानानंतर अंग कोरडे केल्यावर स्नानगृहातील आरशामध्ये सहज तिने दृष्टिक्षेप टाकला.इतर वेळी जी गोष्ट तिला जाणवली नसती ती आज अचानक जाणवली आणि ती एकदम चमकलीच.,कारण लग्नापूर्वी चवळीच्या  शेंगेसारखी शिडशिडीत होती ती.तिच्या याच अंगयष्टीवर विक्रम फिदा झाला होता.पूर्वीच्या कमनीय बांध्यातील वलये कोठल्या कोठे लुप्त झाली होती. आणि आज त्याच जागी अनावश्यक ठिकाणी चरबीचे थर जमा झालेली आकृती पाहून आरश्यातील व्यक्ती आपणच आहोत यावरच तिचा विश्वास बसेना.विक्रमच्या बाहुपाशात आता ती सामावूही शकत नसावी आणि त्यामुळेच तिला जवळ घेण्याची इच्छाही त्याला होत नसावी.
    नीताच्या बडबडीतील एक विचार किड्यासारखा तिच्या डोक्यात वळवळू लागला या पाच वर्षात दोनदा झालेल्या गर्भपातांमुळे ती स्वत:ला फारच जपू लागली व त्यात विक्रमचा लाडाने भरपूर खाण्याचा आग्रह .त्याच्या मते तब्येत चांगली राहिली तरच तिला पुन्हा मूल व्हायला अडचण होणार नाही पण ती इतकी चांगली झालेली पाहून ती आनंदित होण्या ऐवजी तिला त्याची लाजच वाटु लागली. आरश्यातले आपलेच प्रतिबिंब तिलाच पाहवेना. झटकन बाहेर येऊन अंगावर कपडे चढवत त्या दृश्याचा परिणाम पुसून टाकण्याचा तिन प्रयत्न केला.
        आपला लग्नापूर्वीचा आणि लग्नानंतरचा दिनक्रम याची तुलनाही नकळत तिच्या मनात सुरू झाली.लग्नापूर्वी घरातली किती कामे तिलाच करावी लागायची.कॉलेजात जाणे येणे आणखी अनेक उपक्रमात भाग घेणे या सर्व गोष्टीत ती अगदी बुडून गेलेली असायची.लग्नानंतर संगीताचे कार्यक्रम,नाटके पहाणे इ.गोष्टी जरी चालूच राहिल्या तरी घरातील कामे जवळ जवळ करतच नाही अशी परिस्थिती कारण बऱ्याच गोष्टीसाठी नोकर असल्याने काम करण्याची आवश्यकताच राहिली नाही. लग्नानंतरची काही वर्षे विक्रमभोवती रुंजी घालण्यात निघून गेली,त्यामुळे तिचे बाहेरील जग अगदी मर्यादित होऊन गेले.मैत्रिणींचीही लग्ने होऊन त्या दूर निघून गेल्या.त्यामुळे खाणे,झोपणे, टी.व्ही.पहाणे,शॉपिंग अश्या सुखासीन आयुष्याची संवय लागण्याचाच हा परिणाम हे नीताने तिच्या निदर्शनास आणल्यावर तिला जाणवले.
          . पण संध्याकाळी विक्रम कसा काय पण लवकर घरी आला  आणि त्याचा मूडही चांगला होता.बऱ्याच दिवसांनी घरी येताच तिला जवळ घेऊन त्याने तिचे दीर्घ चुंबन घेतले. तेव्हां तिला खूपच सुखावल्यासारखे वाटले.आणि बऱ्याच दिवसानंतर विक्रमने इतके प्रेमाने जवळ घेतल्याच्या आनंदाने तिच्या डोळ्यात पाणीच तरळले.त्याबरोबर चमकून जाऊन त्याने तिला मिठीतून दूर करत आणि हनुवटीवर कुरवाळत म्हटले,"ए वेडे असं काय झाल डोळ्यातून पाणी काढायला?’ त्याबरोबर ती त्याला आणखीनच बिलगली आणि "काही नाही असं तू जवळ घेतलेस ना किती बरे वाटले."असं त्याच्या कानात कुजबुजली.त्याचबरोबर तिला वाटलं विक्रमलाही काहीतरी अडचणी असणार नाहीतर तो असा वागणार नाही.आणि काही गैरसमज असतील तर दूर होण्याच्या इच्छेने ती पुढे म्हणाली,"विक्रम खरच काही प्रॉब्लेम आहे का तुला सतावणारा?मला सांग मीही काही मदत शक्य असेल तर करीन"
पण यावर विक्रम गप्पच राहिला. जणु काय सांगावे याचाच विचार करत होता.नंतर एकदम म्हणाला,
" हल्ली ती भवानी तुझ्याकडे फारच यायला लागलीय ?" अचानक त्याने विषय बदलल्यामुळे मेधा गोंधळून गेली आणि म्हणाली,
"भवानी कोण भवानी ?" "अग एवढेही कसे कळत नाही ती भवानी म्हणजे तुझी शेजारीण"
"मग भवानी काय म्हणतोस. बिचारी, मला करमत नाही तर माझ्याशी गप्पा मारत मला किती चांगली कंपनी देते"
" उगीच तिच्या जाळ्यात सापडू नको बरका, गोड गोड बोलत केव्हां तुला चाट मारेल कळणार नाही."
"काय म्हणतोस तू?"आश्चर्याने मेधाने विचारले,"आणि मला सांग, तिच्याविषयी इतके सांगायला तुझी आणि तिची केव्हांपासून इतकी दोस्ती झाली? अगदी दररोज तुझी आणि तिची गाठ पडत असल्यासारखा बोलतो आहेस."
"तू म्हणजे अगदीच भोळी गं भोळी मेधा,लग्नापूर्वीच आपल्या केळवणाच्या दिवशी तिनं माझी कशी फिरकी घेतली हे आठवतेना तुला? तुझ्याजागी मी असतो तर पुन्हा नसतो बुवा गेलो तिच्याशी बोलायला."
"असं का, नीता तुझी मग अगोदर गाठ पडली असती तर बरं झालं असतं असं तिला कोण म्हणालं ?मला तर वाटत अजून तुझाच तिच्यावर डोळा आहे."मेधानं त्यालाच उलट सुनावलं आणि त्याला गप्प बसावं लागलं
" अग आम्ही मॅनेजमेंटची माणसं,माणसाची पारख झटकन करतो,तुला नाही का पहाताक्षणी ओळखलं आणि लगेच लग्नाची मागणी घातली ?"
विक्रम आज चांगलाच मूडमध्ये दिसत होता.
"ते जाऊ दे,माझ्याशी ती अगदी सरळ वागते आणि मला योग्य सल्लाही देते."
" आणि तिचा सल्ला तुला अगदी योग्य वाटतो का?कमाल आहे तुझी."
"बरं जाऊ दे, मला एक सांग चहा घेणार का ?की काही खायला करू?"
"अरेच्चा आज फारच खुषीत दिसतेय स्वारी,"
"विकी, अरे तू असाच वागलास तर मी खूषच असणार,गेले दोन तीन दिवस अगदीच चिड चिड करत होतास ना ,बर मग सांग , चहा करूकी नको ?"
" खरतर आता इतकं काही गोड तोंड झाले आहे की चहा गोड लागेल की नाही शंकाच आहे " डोळे मिचकावीत विक्रम बोलला.
"ए चावटपणा पुरे,मी जातेच कशी चहा करायला."म्हणून ती खुषीतच आत पळाली.
दुसऱ्या दिवशी नीता आल्यावर तिला किती आणि काय सांगाव असं मेधाला होऊन गेलं पण तरी विक्रमने दिलेला इशारा पाळायचा असे तिने ठरवले आणि निदान त्या विषयाविषयी तरी काही बोलायचे नाहीअसा तिने विचार केला,पण नीतानच एकदम विषय काढला,
"अग मेधा,ती पल्लु आठवते का ग तुला?"
’हो, तीच ना ती, मोठे मोठे डोळे असलेली,गोरी गोबरी आणि शेलाटी ?" मेधा म्हणाली,
"शेलाटी माय फुट,आता ती चांगली गोलमटोल झालीय,"
"बर मग,तिचं काय ?"
"तिच काय काय म्हणून विचारतीस,सोडलं की , तिला तिच्या नवऱ्यानं "
" असं अचानक सोडायला काय झालेय तिच्या नवऱ्याला ?"
" काही नाही ,दुसरी कोणीतरी गळ्यात पडली म्हणे."
"कमालच आहे बाई या पुरुषांची त्यांना काय दुसरा उद्योगच नसतो की काय?" मेधा एकदम सावरून उद्गारली.
"अगं हीच तर मजा आहे,पुरुषांना काय एका वेळी कितीही पोरी हिंडवायला जमतं आणि तेही आपली काम अगदी व्यवस्थित पार पाडून आपणच आपल्या वेड्यासारख्या एकाच पुरुषाला धरून बसतो."
"तुला काय म्हणायचेय नीता,म्हणजे आपण करतो ते चूक आणि ते पुरुष वागतात ते बरोबर?"
"चूक काय आणि बरोबर काय हे मी नाही ठरवणार,मी फक्त तुला जगात काय चालले आहे ते सांगतेय.म्हणूनच त्या लग्नाच्या फंदात मी पडले नाही ,नाही पटलं संजयशी आणि आवडला जर दुसरा कोणी ,तर चालले मी त्याचा हात धरून.त्यावर तुला काय करायचे ते मात्र तू ठरव."
"म्हणजे म्हणायचे तरी आहे काय तुला ? मला काही हा प्रश्नच नाही. विक्रम माझ्यावर अगदी भरभरून प्रेम करतो आणि माझ्याशिवाय तो कुणाचाच विचार करणे शक्यच नाही"
"असं तुला आज वाटतंय आणि तसे असेल तर फारच छान. पण मला तरी एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते ती म्हणजेआपल्या मर्दाला आपणच आपल्या जाळ्यात बांधून ठेवलं पाहिजे.म्हणजे आपल्या आकर्षणाच्या जाळ्यात,ते थोडं सैल झाले की सुटलीच ही मासळी आपल्या तावडीतून."
"मग मी काय करावं असं तुझं मत आहे ?"शेवटी नाइलाजाने मेधाने नीताला विचारलेच.
"अगं ती जोली की फोली माहीत आहे ना?"
"हं अंजेलिना जोली तीच ना ,आता तिचं काय?"
"अगं तिच्या जीन्समध्ये ब्रेस्ट  कॅन्सरची बीजे आहेत म्हणुन सरळ तिनं शस्त्रक्रिया करून दोन्ही ब्रेस्ट  काढूनच टाकले म्हणजे त्या कॅन्सरचा प्रादुर्भाव व्हायला नको"
"बर मग त्याच इथं काय?"वैतागून मेधानं विचारलं
"अगं एवढही कसं कळत नाही ? आता तुझ्यावरही ती पाळी यायला नको म्हणजे कॅन्सरची नाही पण त्याहूनही भयानक म्हणजे तुझ्या या गोलमटोल,थुलथुलीतपणाने नवरा गमावण्याची, असे आपले मला वाटते."
"मग जोलीसारखी कुठली शस्त्रज्रिया करू मी माझं लग्न वाचावं म्हणून ? त्राग्याने मेधाने विचारले.
"अगं, आता अगदी सोपी शस्त्रक्रिया आहे त्यासाठी, तिला लायपोसक्शन म्हणतात."
"हे बघ मला माझा विक्रम इतक्या दुबळ्या विचारसरणीचा आहे असे वाटत नाही लग्नासारख्या पवित्र बंधन स्वीकारतानाच "नातिचरामि,नातिचरामि" अशी शपथ घेतलीय आम्ही आणि जिवात जीव असेपर्यंत पाळायचेही वचन एकमेकास दिले आहे. अर्थात तुला हे सांगण्यात काय अर्थ आहे म्हणा---- " एकदम आपण भलतेच बोलून गेल्याचे लक्षात आल्यामुळे तिने जीभ चावली आणि "सॉरी,मला तसे म्हणायचे नव्हते."म्हणून स्वत:स तिने सावरले.
  "नेव्हर माइंड, आय अंडरस्टॅंड"  तिचे बोलणे फारसे मनावर न घेता नीता म्हणाली "    बर राहू दे,तुझ्या भल्यासाठीच सांगतेय पण नको असेल तर नको ऐकूस पण जर तसे वाटले तर मला सांग डॉ.टेकवानी माझ्या चांगल्याच परिचयाचा आहे. त्यानेच तर माझ्या ब्रेस्टचा आकार  अगदी डोळे झाकले तरी संजयच्या डोळ्यात भरेल असा करून दिलाय. बर ठीक आहे,मला वाटले ते तुला सांगितले यावर मर्जी तुझी " म्हणून नीता निघून गेली.तिला पाठमोरी पहाताना तिच्या उरोजाप्रमाणेच तिच्या नितंबाचीही गोलाई टेकवानीनं बदलली असावी असे मेधाला उगीचच वाटून गेले.
   विक्रमच्या आपल्यावरील प्रेमाची ग्वाही मेधाने नीताला जरी कितीही निक्षून बजावून दिली असली तरी तिच्या म्हणण्यात तथ्य आहे हे तिलाही पटत होते. विक्रमलाच विचारावे का असे तिला वाटले पण तो याला अगदी सपशेल नकार देईल याची तिला खात्री होती.तसे त्याला विचारणे म्हणजे त्याच्या प्रेमाची प्रतारणा होती.त्यापेक्षा एकदा टेकवानीकडे जाऊन यावे आणि मग त्याला विचारावे असे तिला वाटले नाहीतरी शस्त्रक्रिया करायच्यापूर्वी  त्याला सांगावेच लागणार.
   दुसऱ्याच दिवशी विक्रम कामावर गेल्यावर ती नीताच्या फ्लॅटवर आली.आतापर्यंत नेहमी नीताच तिच्याकडे येत असे त्यामुळे तिच्याकडे जाण्याची तिला जरुरीच पडत नसे.तिने बेल वाजवली तरी बराच वेळ नीताच्या फ्लॅटचे दार बंदच होते. तिने दोन त्तीनदा बेल वाजवली तेव्हां बऱ्यच वेळाने नीताबे दार उघडले.तेही अगदी नुकतीच झोपेतून उठल्यासारख्या अवतारात.
"काय हे नीता, किती बेल वाजवायच्या मी ? मला वाटल कुठ बाहेरच गेलीस की काय ."
"सॉरी,मेधा संजय गेल्यावर जरा झोप काढायची संवय आहे मला,कारण त्याचा डबा तयार करण्यासाठी लवकर उठावे लागते ना,अग पण अशी उभी का? बसना " तिला बसण्याचा आग्रह करत नीता म्हणाली .मेधाने आजूबाजूला पाहिले आणि त्या  एवढ्या मोठ्या हॉलमध्ये तिला बसायला योग्य जागाच दिसेना जिकडे पहावे तिकडे कपड्यांचे बोळे,कचरा,कागदांचे ढीग.त्यामुळे बसायचे कोठे याचाच विचार करत मेधा उभीच राहिली.तिच्या फ्लॅटच्या तुलनेत हा फ्लॅटही अगदीच छोटा होता आणि अगदी आवश्यक तेवढेच फर्निचर दिसत होते.
"अगं थांब, तुला बसायच कुठं हा पेच पडला असेल आपण आतच बेडरूममध्येच बसू."म्हणून त्या दोघी आतच गेल्या.
" हं मग आज माझी कशी काय आठवण झाली बाईसाहेबांना "नीता म्हणाली
"तसं काही नाही आपली दररोज गाठ पडतेच की ,तेव्हां म्हटल आज आपणच जावं"
"वा वा,भाग्यच माझं, बरं ते जाऊदे काय घेणार सरबत की कोला की आणखी दुसरे काही?"हाताची मूठ करत ओठाकडे नेत ड्रिंकचा अभिनय करत नीतानं विचारलं
"छे,छे उगीच काय, तुला माहीत आहे ना, तसलं मला काही चालत नाही. साध पाणी दे नाहीतर काही करायचंच असेल तर लिंबू सरबत दे," घाइघाइने मेधा म्हणाली
"भारीच बाई सोवळी तू.आता हे काय लिंबू सरबत पिण्याचे दिवस आहेत?"
"हं उगीच आगाउपणा नको बरंका नीता,"
"बर बाई राहिलं, लिंबू सरबत तर लिंबू सरबत. पण मी दुसरं काही घेतलं तर चालेल ना?"
"तुला कोण अडवणार बाई ?"
" आणि अडवलं तर मी थोडीच ऐकायला बसलेय " फ्रीज उघडुन एका हातात सरबताची व दुसऱ्या हातात व्हिस्कीची बाटली काढत नीता म्हणाली.नंतर एका ग्लासात सरबत व दुसऱ्यात व्हिस्कीचा पेग ओतून सरबताचा ग्लास मेधाच्या हातात देत ती म्हणाली,
"हं आता बोल"
" प्रथमच I am very sorry  नीता,काल तुला जे बोलले त्याबद्दल, लग्न न करण्याचा निर्णय तुम्ही दोघांनी विचारपूर्वक घेतलाय त्यात मला नाक खुपसायचं कारण नव्हतं.पण मला दुसरंच सांगायएय ते म्हणजे तू काल जे म्हणत होतीस आपल्या शरीराया सुडौलपणाबद्दल, आता वाटू लागलेय की तुझ्या बोलण्यात तथ्य आहे."मेधाने सुरवात केली.
"दॅट्स लाइक अ गुड गर्ल.मला माहीत होत, की तुझ्यासारखी शहाणी मुलगी कधीतरी योग्य विचार करेलच म्हणून,बर मग आता बोल पुढे काय करायचे ठरवले आहेस?" नीता एकदम उत्तेजित होऊन म्हणाली.
"तू ते टेकवानींच सांगितल तसे खरेच होईल का,माझ्या अंगावरील चरबी खरच काढू शकतील ते.?"चाचरतच मेधा म्हणाली.
"अग माझ्यावर विश्वास नाही का ?माझा स्वत:चा अनुभव तर आहेच, पण मला खात्री आहे की ते तुझा असा कायापालट करतील की विक्रम तुला सोडून कामावरही जायला नको म्हणेल."
" तसं काही नको व्हायला बरंका "मेधा घाईघाईने म्हणाली
"अगं ते मी आपलं असंच म्हटलं  ते अगदी शब्दश: घेऊ नकोस ,असं कधी झालंय का ? बर ते जाऊदे केव्हां जायचेय आपण टेकवानींकडे म्हणजे तशी त्यांची अपोइंटमेंट घ्यायला बरे "
" पण मला अगोदर विक्रमला विचारायला हवे" गुळमुळीतपणे मेधा म्हणाली
"अग टेकवानीकड जायचं म्हणजे लगेच लायपोसक्शन करायचे असे वाटले की काय तुला ? ती फार पुढची गोष्ट आहे.उद्या परवा टेकवानीकड जायला विक्रमला कशला विचारायला हवे ? नंतर प्रत्यक्ष लायपो करण्यापूर्वी विचार हवे तर. आता मी ऍपॉइंटमेंट तर घेऊन ठ्वते आणि सध्या विक्रमपासून हे गुपितच राहूदे त्याला एकदम चकित कर हवे तर." म्हणुन नीताने लगेचच डॉ.ना फोन लावला.थोड्यावेळातच फोनवर बोलून नीता म्हणाली,
"यू आर लकी मेधा, उद्याचीच  ऍपॉइंटमेंट मिळाली आहे,नाहीतर बऱ्याच वेळा पंध्रा पंध्रा दिवस लोकांना वाट पहात बसावं लागतं.उद्या सकाळी साडॅदहाला निघू ऍपॉइंटमेंट अकराची आहे. टॅक्सीनच जाऊ म्हणजे गाडी घरी ठेवायला विक्रमला सांगायला नको. "
       आणि पावणे अकरा वाजता त्या दोघी टेकवानींच्या क्लिनिकमध्ये होत्या. पण अजूनही आपण येथे आलो आणि तेही विक्रमला कळू न देता हे बरोबर केले की नाही याविषयी मेधाच्या मनातील गोंधळ संपत नव्हता. लग्नानंतर आजपर्यंत तिने कोठलाच निर्णय विक्रमचा सल्ला घेतल्याशिवाय घेण्याचा विचारही केला नव्हता. खरेतर तिने एकादी गोष्ट त्याला न विचारता केली तर त्याची हरकत होती अशातला भाग नव्हता.उलट तिने स्वत: बाहेर जावे,फिरावे,स्वत:चे मनोरंजन करून घ्यावे असा कधीकधी तो आग्रहही धरी कारण कामाच्या व्यापामुळे . आपल्याला तिच्याकडे लक्ष देता येत नाही असे त्याला वाटे.पण तिलाच ते नकोसे वाटे. आपल्याच विचारात ती गुंगून गेली असताना,
"मिसेस मेधा पंडित " असा आवाज तिच्या कानावर आला आणि तेवढ्यात नीतानेच "अग,मेधा तुलाच बोलावत आहेत बघ" असे म्हटल्यावर ती भानावर आली "चल चल " म्हणत नीताने तिला जवळ जवळ ओढतच आत नेले.