सुंदर मी होणार !! ------- उपसंहार

              आईला आणायला लगेचच विमानतळावर  मेधाला जावे लागले.सुदैवाने विक्रम बंगलोरला गेल्यामुळे गाडी घरातच होती आणि ड्रायव्हरला फोन करताच तो लगेचच आला.विमानतळावर पोचताच आई गेटपाशी उभीच असलेली मेधाला दिसली.
" अगं काल तर तू म्हणाली होतीस की तुझे सांधे दुखत आहेत आणि अचानक बेत बदललास ?"
" खरं तर मी यावेळी येणारच होते, पण तू फोनवरून काही आव्श्यकता नाही म्हटल्यामुळेच न येण्याचा निर्णय घेतला होता. पण तुझा फोन झाल्यावर लगेच विक्रमचा फोन आला,त्याने बजावून सांगितले की तू एकटीच आहेस आणि यावेळी तुला सोबतीची आवश्यकता आहे. काय तब्येत ठीक आहे ना?"
" अगं आई तुला त्याचा स्वभाव माहीत आहेना ,उगीचच काळजी करत असतो,बर आता तू घरी चल मग शांतपणे बोलूया." घर आल्यामुळे आईला घरात घेऊन जात मेधा उत्तरली.
    घरात जाऊन फ्रेश होऊन मेधाने दिलेला चहाचा कप हातात घेऊन शांतपणे सोफ्यावर बसत आई म्हणाली,"आता सांग बरं शांतपणे जे काय सांगायचे ते."
 आता आईला काय सांगावे याचा मेधाला पेचच पडला. विक्रमने आईला का फोन केला असावा याची थोडीफार कल्पना मेधाला आली होती कारण विक्रमने निक्षून बजावले असले तरी मेधा आणि नीता आपल्या गैरहजेरीत लिपोसक्शब पार पाडतील अशी शंका त्याला वाटत होती त्यामुळे आईला त्याने पहारेकरी म्हणूनच पाठवले असणार,त्यामुळे आईला काय सांगावे याचा मेधाला पेचच पडला त्यामुळे ती इतर गप्पाच करत अराहिली,"बाबांची तब्येत कशी आहे?"
"त्यांचे काही विचारू नको,पण त्यानी आपलं पथ्य पाणी संभाळलं आहे त्यामुळे तर त्यांना सोडून येण्याचं धाडस केलं मी,पण ते जाऊदे मला तू शांतपणे काय सांगणार होतीस ते राहूनच गेलं." तेवढ्यात फोन वाजला आणि मेधानं तो घेतला नीताचाच फोन होता,
"मेधा, उद्याची अपॉइन्ट्मेन्ट मिळाली आहे बरंका " तिला काय उत्तर द्यावं ते मेधाला कळेना त्यापेक्षा तिलाच इकडे बोलावून घ्यावे म्हणजे दोघी मिळून आईला समजावून सांगता येईल असा विचार करून तिने,
"अगं नीता मग तूच इकडे येना,आईलाही तुझ्याशी गप्पा मारता येतील" असे म्हटले आणि "अगं आई नीता येतीय बरंका, तुझ्याशी गप्पा मारायच्यात तिला." असं तिनं म्हटल्यावर आईच्या प्रश्नाचे उत्तर देणं आपोआपच टळलं.
   नीता आल्यावर आईशी गप्पा मारता मारता तिनं विचारलं,"मेधानं सांगितलं की नाही तुम्हाला आई?" "कश्याविषयी बोलतेस तू नीता?आल्यापासून काहीतरी सांगायचेय, काहीतरी सांगायचेय म्हणते आहे पण सांगायला वेळच मिळाला नाही तिला,काय एवढं सांगायचेय?"
"अहो आई ,मेधा एक छोटसं ऑपरेशन करणार आहे,बरं झालं तुम्ही आलात ते,आता तुम्ही असल्यावर आम्हाला काळजी नाही."
"कसलं ऑपरेशन?आणि अगोदर काहीच चर्चा नाही,काल फोनवरसुद्धा काही बोलली नाही,उलट मी येऊ नये असेच तिने मला सांगितले होते.मीच आपली मला चैन पडेना म्हणून आले,कसले ऑपरेशन करायचे आहे?"
"अहो आई, उगीच काळजी करण्यासारखे असे काही नाही,हल्ली मेधाची जाडी नको तितकी आणि नको त्याठिकाणी वाढत चालली आहे म्हणून एका शस्त्रक्रियेने ती चरबी काढून टाकायची बस इतकेच."
"बस इतकेच ?त्याला लिपोसक्शन म्हणतात त्यासाठी बऱ्याच ठिकाणी नळ्या खुपसतात आणि त्यातून चरबीचा द्रव शोषून घेतात,त्याला अनेस्थेशिया पण द्यावा लागतो आणि या सगळ्याला दोन तास तरी लागतात आणि तरी तू त्याला बस इतकेच म्हणतेस ?मला तरी हे काही पटत नाही." आई म्हणाल्या.
"आई उगीचच तू स्वत:ला त्रास करून घेत आहेस. शस्त्रक्रियेनंतर माझ्यात जो बदल घडेल तो पाहिलास की तूही म्हणशील,बरं झालं ऑपरेशन केलं.तुला सुद्धा तसं ओपरेशन करून घ्यावं असं वाटू लाहेल"
"चल चावटपणा नको करूस ,एवढी काही तुझी जाडी वाढली नाही,"
"अहो आई,मेधाला अजून खूप काही करायचे आहे, त्यामुळे शरीर बांधा सुडौल ठेवायलाच हवा. तुमचा काळ वेगळा होता आता आम्ही कुठेही गेलो की आम्हाला चपळपणे हालचाली कराव्या लागतात,साधं विमानाच्या सीटवर बसताना नको येवढ्या जाडीचा त्रास होतो" नीतानं मध्यस्थी केली.
"हे मात्र बरीक खरे,आताच विमानात दोन तास बसले तरी माझ्या पायांना मुंग्या आल्या."
"असं करा आई, आपण सगळेच डॉ.टेकवानींकडे उद्या जाऊ,तुम्हाला योग्य वाटले तरच आपण शस्त्रक्रिया करू मग तर झाले?"नीतानं मेधाच्या आईला पटवण्यात निम्मे यश तरी मिळवले.
     दुसऱ्या दिवशी डॉ.टेकवानीकडे मेधा, नीता व मेधाची आई सगळेच जण गेले."वेलकम, "असे त्यांचे स्वागत करत डॉ.टेकवानींनी मेधाच्या आईकडे पहात म्हटले,"बरंझालं तुम्ही आलात,मी मेधाजींना म्हटले होते विक्रमजींना घेऊन येण्याबद्दाल पण त्यांना त्यांच्या कामातून फुरसत मिळत नाही असे त्या म्हणाल्या" 
"मेधाजी,आज आम्ही सगळ्या तपासण्या करणार आहोत आणि जर तुम्ही या शस्रक्रियेला योग्य आहात असे आढळून आले तर आजपासून पंधरा दिवस तुम्हाला काही गोळ्या शस्त्रक्रियेच्या वेळी चरबी घट्ट होऊ नये म्हणून  घ्याव्या लागतील त्याना anticoagulant tablets म्हणतात व त्यानंतरच शस्त्रक्रिया करणार,लक्षात आले ना ?"
"म्हणजे नीता आपण विक्रमच्या गैरहजेरीत जे करायचे ठरवले होते तसे काही होणार नाही."
"हो तसेच आहे कारण तुमच्या ह्या बेताचा सुगावा लागल्यामुळे मी लगेचच परत यायचा निर्णय घेतला.बेंगलोरला माझे काही सहकारी काम पहात आहेत"  विक्रमने प्रवेश करत म्हटले.
"मला वाटते मध्यंतरी माझ्या वागण्यात जी चिडचिड उत्पन्न झाली होती त्यामुळेच असा अवास्तव निर्णय घेण्याची तुला घाई झाली असावी."
"आणि त्यात ही नीता, तिची फार काळजी घेणारी,तिला वाटत होतं की लगेच तुमचं फाटणार आणि तू तिला सोडून आणखी एकादी फटाकडी गाठणार."  संजय  म्हणाला
"खरं तर त्यावेळी मी माझ्या बिझनेसच्या कठिण अवस्थेतून जात होतो,हे मी तुला सांगायला हवे होते मेधा. Really I am very sorry."
" मग आता इथं कशाला आलोय आपण ?" वैतागून नीताच म्हणाली    "माझी सगळीमेहनत पाण्यात गेली.तुला चांगली चवळीच्या शेंगेसारखी बायको मिळवून देणार होते मी विक्रम,पण तुला आपली तीच फतारडी आवडतीय तर माझं तरी काय अडलंय."
"हे बघ नीता,मेधाशी मी लग्न केलं तेव्हांच आमचं ठरलंय की एकमेकाची साथ कधीच सोडायची नाही आणि अश्या क्षुल्लक गोष्टीवरून तर मुळीच नाही."
"तेच मी तिला सांगत होतो,"संजय मध्येच म्हणाला,"पण ती ऐकायलाच तयार नाही.आता आम्ही जरी लग्न केलं नसलं तरी मी थोडेच सोडणार आहे नीताला जर तिची जाडी वाढली कदाचित तर"
"मी मात्र तुला सोडीन बरंका तू विक्रमसारखी दादागिरी करायला लागलास तर" नीता हसत हसत म्हणाली.
"आपण डॉक्टर साहेबांना मात्र उगीच त्रास दिला" विक्रम तेवढ्यात बाहेर येणाऱ्या डॉक्टरांकडे पहात म्हणाला.
"मुळीच नाही,मी ऑपरेशन करणारच नव्हतो,मेधाजींना मी असेच झुलवत ठेवले होते,कारण विक्रम,आणि मेधाच्या आई तुम्हाला एक गुड न्यूज आहे." डॉक्टर म्हणाले.
"And good news is Medhaaji is going to be a mother within few months.So go and celebrate.विक्रम तुम्ही बाप बनणार आणि तुम्ही आजी,"मेधाच्या आईकडे पहात डॉक्टर म्हणाले आणि तिथे आनंदाचा एकच जल्लोष झाला.