सुंदर मी होणार !! ------- ३

          "’मग काय,विचारलंस का विक्रमला?" दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम आणि संजय कामावर जाताच नीताने लगेचच मेधाकडे आपला मोर्चा वळवला. आणि तिन दिलेला कॉफीचा कप तोंडाला लावत प्रश्न केला.जणु त्यांच्या निघण्याचीच ती वाट पहात होती.मेधाला मात्र आता तिचे आगमन फार आनंददायक वाटले नाही.विक्रमने इतका ठामपणे नकार दिल्याचे नीताकडे कबूल करणे आपल्याला अवघड जाणार हे तिला माहीत होते.
"हो कालच मी त्याला विचारले,आणि मी म्हटले तसेच झाले,"
"म्हणजे त्याने नकार दिला असेच ना ?" नीताने तिचे काम हलके केले आणि आपला राह व्यक्त करतत ती म्हणाली,.
"या पुरुषांचे मला काही कळत नाही,बायकोने सुंदर दिसावे असा त्यांचा आग्रह तर असतो पण मग त्यासाठी आपण काही करू म्हटले तर त्याला उत्तेजन देण्या ऐवजी ----"
" तुझे म्हणणे कदाचित बरोबर असेलही,नीता,पण माझा विक्रम तसा नाही "मेधाने तिला मध्येच अडवीत म्हटले,’त्याचे माझ्यावर इतके प्रेम आहे की या शस्त्रक्रियेत माझे काही बरेवाईट झाले तर काय ही कल्पनाही त्याला सहन होत नाही,त्यामुळेच त्याने ठामपणे मला अश्या प्रकारची शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे."
" बरं तू म्हणतीस तसे समजूया--" नीताने तिच्या या स्पष्टोक्तीमुळे मुळीच नाउमेद होत म्हटले. " विक्रम तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतो अगदी शंभर टक्के कबूल,पण एक गोष्ट तुला समजूनही तू नाकारतेस, ती म्हणजे तुझ्या अश्या बेढब होण्याने त्याचा तुझ्यातील इंटरेस्ट कमी झाला आणि  त्याच्या ऑफिसातील एकादी तन्वंगी त्याला वश झाली तर त्याला मोह होणार नाही असे वाटते का तुला? अगं भले भले या मोहातून सुटले नाहीत तिथं तुझ्या विक्रमचे काय घेऊन बसलीस.? तू पाहिलेस ना त्या दिवशी डॉ.टेकवानींकडे कशी रीघ लागली होती पेशंट्सची. त्यात स्त्रियाच असतात असे नाही बरंका, पुरुषसुद्धा असतात."
"त्याना काय करायचे असते अशा क्लिनिकमध्ये?" इतका वेळ गप्प बसलेल्या मेधाने आश्चर्याने विचारले.
"म्हणजे तुला काय वाटत,पुरुषांनाच सुंदर स्त्री हवी असते आणि बायकांना मात्र कसलाही सोम्यागोम्या चालतो ?गेले ते दिवस, आता स्त्रीलाही वाटू लागले आहे की आपला जोडीदार आपल्या मनासारखा असावा. आणि तसे का वाटू मये  ? पूर्वीच्या काळीसुद्धा स्वयंवराची पद्धत होती त्यावेळी हजारो पुरुषांच्या मालिकेतून आपल्याला आवडणाऱ्या पुरुषाच्या गळ्यात माळ घालायची ना राजकन्या? मग आजच्या स्त्रीलाही तसेच वाटले तर त्यात गैर काय? हल्ली कित्येक पुरुष चाळिशी ओलांडली तरी लग्नावाचून रहातात ते काय उगीचच."
"खरं आहे,त्याबाबतीत तुलाच जास्त अनुभव असणार,"मेधाने नीताला चिमटा काढला.
"तसे म्हण हवे तर,नाहीतरी आम्ही बंधनात रहायचं नाही हे ठरवण्याचा मुख्य उद्देश तर तोच आहे.बरं ते जाऊदे,मी आपली उगीचच बडबड करतेय,जणु डॉ.टेकवानीची एजंटच असल्यासारखी.त्याला पेशंट अगदी नको नको म्हणतानाही येतच आहेत त्यात मी कशाला उगीच भर घालू.तुझी बालमैत्रिण या नात्याने मला जे करावं वाटलं ते माझं कर्तव्य मी केल,आता तू आणि तुझा विक्रम,काय घालायचा असेल तो गोंधळ घाला,त्याला तू आवडतेस आणि तुला तो, देव करो आणि तुमची जोडी अशीच सुखात नांदो.चल जाते मी कशी, आता पुन्हा नाही हा विषय तुझ्यापुढं काढणार" म्हणून नीताने बाहेरजाण्यासाठी पाय उचलला पण तिने दरवाज्याच्या दिशेने दोन पावले टाकली न टाकली तोच मेधाने तिला थांबवले,
"अगं थांब,नीता इतकी डोक्यात राख घालून घेऊ नकोस,मला तुझं म्हणणं पटतयं गं "
"नुसतं पटतय म्हणून काय उपयोग,कारण विक्रमच्या संमतीशिवाय एक पाऊलही तू टाकणार नाहीस आणि तो काही तुला हे पाऊल टाकू देणार नाही मग मधल्या मध्ये माझी मात्र उगीचच गोची."
’ असं कर ना डॉक्टरांची अपॉइन्टमेन्ट घेऊन ठेव म्हणजे त्याना या शस्त्रक्रियेविषयी जरा विचारता येईल आणि मग तसे ठरवता पण येईल.’
"आता कसं शहाण्या मुलीसारखी बोललीस, चल आताच फोन करते आणि त्यांची अपॉंइन्टमेन्ट घेते कशी,नाहीतर लगेच तुझा विचार बदलायचा.आणि आता एकदाच काय तो विचार पक्का कर, नाहीतर मी  आपले तुझी सेक्रेटरी असल्यासारखी फोन करनार आणि आयत्या वेळी तू कच खाणार"
"नाही नाही आता मात्र माझा विचार अगदी पक्का" मेधाने तिला आश्वासन देत म्हटले.
    डॉ.टेकवानींना फोन लागला पण ते आठ दिवस सिमला कुलू मनालीच्या सहलीला गेले होते त्यामुळे आठ दिवसानंतरची भेट ठरली.
"बघ तू उगीचच वेळ घालवलास, नाहीतर जाण्यापूर्वी तुझे ऑपरेशन करूनच डॉक्टर गेले असते आणि --- बरं ते राहूदे नाहीतरी आपल्यालाही विक्रम येथे नसण्याची वाट पहावीच लागणार आहे कारण तो काही तुला ही शस्त्रक्रिया करू देणार नाही हे तुझ्या बोलण्यावरून सिद्धच झालंय त्यामुळे तसाही वेळ जाणारच आहे.बर मग आता मात्र मी जाते, Thanks for the coffee"
         या वेळी मात्र मेधाने डॉ.टेकवानींच्या क्लिनिकमध्ये  अगदी निश्चयपूर्वक पाऊल ठेवले.पहिल्या वेळी मनावर असलेले दडपण तिला मुळीच नव्हते. यावेळी नीताही तिच्याबरोबर नव्हती,पण आपला नंबर येईपर्यंत शांतपणे ती स्वागतकक्षातील रंगीबेरंगी चित्रे असलेली मासिके चाळत बसली.त्यातील एकात अनायासे लिपोसक्शनवरील एक लेख सचित्र होता तो ती वाचत बसली होती तेवढ्यात स्वागतिकेने तिचे नाव पुकारलेच.डॉक्टरनी अर्थातच नीताची चौकशी केली,"आज मेधाजी आपण एक्ट्याच कश्या काय? आपली सहेली नाही आली ?" असा प्रश्न त्यानी विचारलाच.
"हो खर तर आम्ही दोघी निघालोच होतो पण अचानक संजयचा फोन आला आणि तिला जावे लागले’"
"मग विक्रमजींना तरी बरोबर आणायचे,त्यांचाही परिचय झाला असता."
"त्यांना तर काय कामातून क्षणाचीही फुरसत नसते" मेधाला खरे कारण निदान आत्ता तरी सांगायचे नव्हते.
"ओ.के.काही हरकत नाही,तर मग आपल्याला शस्त्रक्रिया करूनच अतिरिक्त चरबी हटवायची आहे असेच ना ?"
"होय डॉक्टर त्याशिवाय दुसरा काही उपायच दिसत नाही मला"
"खरे आहे मेधाजी,कारण आपण औषधोपचार व व्यायाम करून पाहिले आणि त्याचा काही उपयोग नाही असे दिसले.शिवाय काही भागातील चरबी ही कोणत्याच उपायांना दाद देत नाही. ती शस्त्रक्रिया करूनच शरीराबाहेर काढावी लागते. चला मी तुम्हाला आत नेऊन आपल्याला कश्या प्रकारची शस्त्रक्रिया करावी लागेल याविषयी एक फिल्मच दाखवतो."
टेकवानींच्या क्लिनिकमधील वरच्या मजल्यावर एक प्रशस्त हॉलमध्ये अगदी एकाद्या चित्रपटगृहासारखीच व्यवस्था केलेली होती. मेधासारखेच आणखीही काही पेशंट्स तेथे अगोदरच जमले होते.त्यात काही स्त्रिया व काही पुरुषही होते.
"ladies and gentlemen,"अशी सुरवात करून आता कोणत्या प्रकारची फिल्म दाखवण्यात येणार आहे याची माहिती डॉक्टरांनी इंग्रजीमध्येच दिली व त्यानंतर जर काही गोष्टी कळल्या नसतील तर हिंदी किंवा   मराठीतही प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेण्यास सांगितले.
" अतिरिक्त चरबी अगदी पूर्णपणे निघते ना ?" एका स्त्रीने शंका विचारलीच.ती अगदी चांगलीच जाडजूड होती त्यामुळे तिला ही शंका वाटणे स्वाभाविक होते.
"अगदी योग्य शंका, तिच्या देहाचा आकार न्याहाळत डॉक्टर म्हणाले,"आपल्याला शरीराचा योग्य समतोल साधता येईल इतकीच चरबी काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो,कारण अधिक प्रमाणात चरबी काढण्याचा प्रयत्न करणे हे जिवावरही बेतू शकते आणि आपण जाणताच "सिर सलामत तो पगडी पचास " त्यामुळे चरबी काढतांना आपल्या जिवास धोका होणार नाही याची आम्ही प्रथम काळजी घेतो.
"मग माझ्यासारखीला या ऑपरेशनचा काही उपयोग नाही" ती बाई जरा खट्टू होतच म्हणाली.
"तसे काही नाही बाईसाहेब,एका वेळी जादा चरबी काढणे हानिकारक असले तरी आम्ही दोन अगर तीन वेळा या पद्धतीने चरबी कमी करून आपणास अगदी मेरिलिन मन्रोसारखे डौलदार करू, काळजीच करू नका"  टेकवानींच्या या विधानावर तेथे बरेच हास्यध्वनी उमटले आणि ती स्त्री जरा लागल्यासारखी झाली."अर्थात ही जरा अतिशयोक्ती झाली, " डॉक्टर स्वतःला सावरत म्हणाले, " पण आपल्यालाही  या शस्तक्रियेचा नक्कीच फायदा होईल. कसा ते मी तुम्हाला स्वतंत्रपणे सांगेन व त्यानंतरच आपण निर्णय घेऊ शकता,त्याचबरोबर आम्ही एकदा चरबी काढल्यावर पुन्हा वाढू न देणे ही जबाबदारी तुमची.  "
        फिल्म दाखवल्यावर बहुतेकांना कॅन्युला म्हणजे चरबी शरीरातून बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणारी पोकळ नलिका कशी असते, त्या चरबी असलेल्या जागी कश्या अंतर्भूत केल्या जातात व त्यातून चरबी कशी काढता येते याविषयीचे बरेच ज्ञान प्राप्त झाले.बहुतेकांच्या मांड्या,पोट आणि नितंब या भागावरच चरबीचे अतिरिक्त थर असतात व ते काढण्यापूर्वी व काढल्यानंतर त्या अवयवांना सुडौलपणा कसा प्राप्त होतो या गोष्टीचीही  फिल्ममधून प्रत्यक्ष पाहून योग्य कल्पना सर्व उपस्थितांना झाली..
   फिल्म दाखवल्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅन्युला वगैरे साहित्यही टेबलावर मांडून ठेवलेले डॉक्टरांच्या मदतनिसांनी दाखवले.
त्यानंतर डॉक्टरांशी बोलताना मेधा म्हणाली,’"डॉक्टर ही तर फारच साधी व सोपी प्रक्रिया असताना त्यात धोका आहे असा , त्याचा इतका बाऊ का करतात समजत नाही."
 "मेधाजी,सर्वसामान्य माणसाला त्यात धोका नाही असे वाटत असले तरी आम्हा डॉक्टरांनाच त्यातील गुंतागुंत काय असू शकते आणि त्यामुळे कोणता धोका संभवतो याची कल्पना असते.त्यामुळे त्यात असलेल्या धोक्याची कल्पना आम्ही पेशंटना अगोदर देतो.एक गोष्ट लक्षात ठेवा, शस्त्रक्रिया म्हटले की धोका हा असतोच.कारण काही नाही म्हटले तरी तुमच्या शरीरातील एक अवयवास आम्ही छिद्र पाडत असतो किंवा त्याचा तुकडा काढत असतो.सुदैवाने देवाने आपल्या शरीराची निर्मिती अशी केली  आहे की बऱ्याच गोष्टी कापल्या तरी त्यांची जागा नव्या पेशी घेतात व तो भाग पूर्ववत होतो.परंतु तसे होत असताना जंतूंचा प्रादुर्भाव होणे शक्य असते, तो न व्हावा न्हणून आम्ही शक्य तेवढी काळजी घेत असतो,त्यामुळेच आम्ही हा निर्णय आपल्यावर सोपवतो.पूर्ण विचार करून आम्ही दिलेल्या कायदेशीर संमतिपत्रावर सह्या करा मगच शस्त्रक्रियेच्या सर्व फॉर्मॅलिटीज सुरू करण्यात येतील."
मर्लिन क्लिनिकमधून मेधा घरी आली तेव्हां नीता तिची वाटच पहात होती.तिचे काम लवकर झाल्यामुळे ती घरी येऊन बसली होती.
"मग काय म्हणाले डॉक्टर?’ नीताने अपेक्षित प्रश्न विचारला व यावेळी मात्र मेधाने अपेक्षित म्हणजे तिला हवे असलेलेच उत्तर दिले,"डॉक्टरांनी सर्व माहिती फारच व्यवस्थित दिली आणि मला तर हे ऑपरेशन अगदीच सरळ आणि सोपे वाटले."
" मग मी तरी काय म्हणत होते.तू आणखी जर वाट पहात बसली असतीस तर उलट अतिरिक्त चरबी ज्यादा झाल्यामुळे तशी शस्त्रक्रिया करायला डॉक्टरांनीच नकार दिला असता"
" हो तू म्हणतेस ते बरोबर आहे,कदाचित मला दोन तीनदा लिपोसक्शन करावे लागले असते.बर ते जाऊदे आता मी तर निर्णय घेतला आहे की ही शस्त्रक्रिया करायची,फक्त त्यासाठी विक्रमचा कुठलातरी दौरा निघायला हवा एवढेच काय ते!"
" तो प्रश्न अगदी किरकोळ आहे. निघेलच त्याचा दौरा लवकरच." नीता म्हणाली.
आणि जणु काही ती भविष्यवाणीच तिच्या मुखातून बाहेर पडली कारण त्याच दिवशी संध्याकाळी विक्रम घरी आला ते अगदी धावत पळतच "मेधा माझी बॅग भर लवकर, संध्याकाळच्या फ्लाइटने मला बंगलोरला जायचे आहे.एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची संधी आहे ती वाया जाऊ देता उपयोगाची नाही."
         विक्रमच्या तोंडून ही बातमी ऐकल्यावर एकीकडे मेधाला बरे वाटले त्याचबरोबर तिला आपला आधार गेल्यासारखेही वाटले.बरे वाटण्याचे कारण उघडच होते,कारण त्याच्या अनुपस्थितीत आपल्याला हवी ती शस्त्रक्रिया कुठलीही आडकाठी न येता करता येईल ही झालेली जाणीव पण त्याचबरोबर चिक्रम नसला की तिला अगदी एकटे पडल्यासारखे वाटे तीच जाणीव पुन्हा तिच्या मनाचा ताबा घेऊ लागली.
"पण असे एकदम अचानक कसे ठरले ?विकी, सांगशील का मला सगळे ?"
"आता उगीच वेळ घालवू नको,तू माझ्याबरोबर एअर पोर्टवर चल म्हणजे जाताना सगळे नीट सांगतो."घाई घाईने विक्रम उत्तरला.आणि मग मेधाला लगेचच त्याच्या जाण्याची तयारी करायच्या मागे लागावे लागले.तयारी म्हणजे काय त्याचे कपडे व इतर काही आवश्यक गोष्टीच  त्याच्या नेहमीच्या प्रवासी बॅगमध्ये भरायच्या एवढेच काय ते काम,पण तेही मेधाच्या मदतीशिवाय विक्रमला जमत नसे.
"पण तू लवकर परत येणार ना विकी,मला एकटीला येथे फार बोअर होते."त्याला एअरपोर्टवर सोडताना मेधाने विचारले,
" काम झाले की लगेचच परत येणार डार्लिंग ,मला तरी तुला सोडून एकट्याला कसे रहावेल,बर अच्छा बाय,काळजी घे स्वत:ची"
"आणि हो सतरा तारखेस आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे विसरू नकोस.त्यावेळपर्यंत तरी तुला आलेच पाहिजे, I want to give you a big surprise!"
"मग तर येणारच,  बर अच्छा Take care" एअरपोर्टच्या प्रवेशद्वारात तिचा निरोप घेत विक्रमने म्हटले.
क्रमशः