सुंदर मी होणार !! ------- ४

       एअरपोर्टवर विक्रमला सोडून मेधा परत आली ती तडक नीताकडेच गेली.जाण्यापूर्वी फोनही करण्याचे भान तिला राहिले नाही कारण नेहमीप्रमाणेच नीता एकटीच असणार याविषयी तिला खात्री होती.पण तिच्या फ्लॅटमधून जोरजोरात आवाज येत होते.एक आवाज तर नीताचा होता हे उघडच होते आणि दुसरा बहुधा संजयचा असावा,
"तू हे मेधाच्या मनात काय भरवतेस,तुझे तुला तरी कळते का?" हा आवाज संजयचा होता.
"का तुझी त्याला काय हरकत ? मेधा माझी मैत्रिण आहे आणि तिच्या भल्यासाठीच तर माझा हा सल्ला आहे."
" खरच तिच्या भल्यासाठीच आहे ना?की त्यामागे तुझा आणखी काही हेतू आहे?"
"कमालच आहे संजय, आता यामागे माझा काय दुसरा हेतू असणार? तूच तर मला सांगितलेस ना हल्ली विक्रम बराच चिडचिड करतो, मेधावर उगीचच रागावतो , तेव्हां मला वाटले की त्याचा मेधातील इंतरेस्ट कमी झाला असेल म्हणून या उपायाने  त्या दोघांचे संबंध सुरळीत होतील असा माझा आपला अंदाज. ते चांगले रहावेत हाच माझा उद्देश आणखी काही नाही." 
"नीता, मी काही तुला आज ओळखत नाही. तूच मला म्हणाली होतीस ना, विक्रमला खरं तुझ्याशीच लग्न करायचं होतं पण मधेच ही मेधा कडमडली."
"संजय, तू उगाच वडाची साल पिंपळाला लावू नकोस बरंका, मी असं काही म्हटलं नव्हतं.मेधाचं लग्न ठरल्याचर  त्या दोघांना आम्ही केळवणाला बोलावलं होतं, तेव्हां, विक्रमला मी आणि विक्रमने मला प्रथम पाहिले आणि त्यावेळी माझं गाणं ऐकून असं तो आपला थट्टेनं म्हणाला होता की माझी आणि त्याची अगोदरच गाठ पडायला हवी होती.इतकंच, म्हणजे त्याचा माझ्यावर डोळा होता किंवा माझा त्याच्यावर डोळा आहे असं तर्कट तूच रचतो आहेस."
"बरं राहिलं, कदाचित माझा तर्क चुकीचा असेल "
"चुकीचा असेल नाही चुकीचाच आहे  इतके दिवस एकत्र राहून हीच का माझी पारख केलीस ?आपण शेजारी रहातो म्हणून मी विक्रमशी कधी फार गप्पा मारल्यात किंवा मुद्दाम तो असताना मेधाकडे गेले असं तुला आढळलं का ?"
" बरं बरं, माफ कर मला, चुकीचा निष्कर्ष काढल्याबद्दल."
"आता माफ करते. पण असा मागून वार केलेला मला नाही खपणार,सांगून ठेवते.मला जर विक्रम आवडतच असला तर तसं स्पष्ट सांगेन मी तुला, आणि त्यालाही, मी अशी थोडीच घाबरणार आहे ?"
" हो हो, तू आहेस तेवढी स्पष्टवक्ती  अगदी मान्य. पण खरं सांगू का नीता,  तू उगीचच जास्त त्या मेधात इन्व्हॉल्व होत आहेस मला वाटते.त्या विक्रमला मेधाची जाडी खुपत नाही आणि तुलाच काय पडलय तिचं. ती तुझी बालमैत्रिण आहे हे जरी खरं असलं तरी त्या दोघांमधील हा प्रश्ब आहे तो त्यांचा त्यांना सोडवू दे ना "
"हे बघ संजय,उगीचच कुठलीही गोष्ट अंगाला लावून न घेण्याचा आहे  तुझा स्वभाव आणि पुरुषांचा स्वभाव असाच असतो.आम्हा बायकांना नाही जमत इतकं अलिप्त रहाणं "
   आत शिरावं की तेथूनच परत फिरावं हे मेधाला समजेना परतच फिरण्याचा निर्णय करून ती वळली आणि सुधा समोरून आली.ती  त्यांची दुसरी शेजारीण,"का, नीता नाही का घरात ?" तिनं विचारलं.आता काय उत्तर द्यावं मेधाला समजेना.
"आहे की दोघेही घरातच आहेत ."तिला उत्तर द्यावे लागले.
"मग दारात उभी का चल की आत."तिला बरोबर घेत सुधाने बेल वाजवली व आतील संभाषण बंद पडले व एक दोन मिनिटात नीतानेच दार उघडले.यावेळी तिचा फ्लॅट जरा व्यवस्थित होता म्हणजे सोफ्यावर बसण्यापुरती तरी जागा होती व कपड्याचे बोळे हॉलच्या कोपऱ्यात पडले होते.तेथूनच ते वॉशिंग मशीनकडे नेण्यात येत असतील पण ते नीताने न्यायचे की संजयने या वादाचा निकाल अजून लागला नसावा.
  पण सुधाबरोबर आत जाण्यात मेधाला काही स्वारस्य नव्हते त्यामुळे ,"अगं मला जरा महत्त्वाचा फोन करायचा आहे " म्हणून मेधाने  आपली सुटका करून घेतली आणि ती आपल्या फ्लॅटवर आली.तेवढ्यात विक्रमचा फोन बेंगलोरला पोचल्याचा आलाच.पाठोपाठ नीताचा फोन आलाच,"काय गं मेधा तू अगदी दारापाशी येऊन परत गेलीस ,सुधा सांगत होती.काय झाले तरी काय ?"
"काही नाही अगं बरेच दिवसात आईला फोन केला नव्हता त्याची आठवण झाली म्हणून घरी परत आले."
"अच्छा,मग फोन झाला असेल तर इकडेच येना जरा गप्पा मारू.अनायासे सुधाही आली आहे."पण मेधा आत्ताच नीता आणि संजयच्या संभाषणाचा विचार करत होती आणि हे काय गौडबंगाल आहे तिला कळेना. नीता व सुधा यांच्या बोलण्यातून ते उलगडण्याची शक्यता आहे असे तिला वाटत नव्हते त्यामुळे न जाणेच योग्य असा विचार करून तिने नीताला आपण येत नसल्याचे कळवले,
मेधाने आईला फोन करण्याची थाप मारली आणि आश्चर्य म्हणजे लगेच  तिच्या मोबाइलचीच रिंग वाजू लागली,आणि तिनं फोन घेतला तो तिच्या आईचाच निघाला,""अगं मेधा किती दिवस झाले तुझा काहीच फोन नाही,तब्येत बरी आहे ना तुझी ?" फोनवर आईचा आवाज ऐकून तिला एकदम फारच बरे वाटले एकदम आपली आईच आपल्याचरोबर आत्ता असायला हवी असे तिला वाटून गेले
"मी ठीक आहे आई ,तू कशी आहेस?"
"अगदी छान,आम्ही खुशाल आहोत ,मला तुझीच काळजी लागून राहिली आहे,जावईबापू बंगलोरला गेलेत म्हणे,त्यांचा फोन आला होता ते म्हणत होते थोडे दिवस तुझ्याकडे येऊन रहा म्हणजे तुला एकटे वाटणार नाही "
" तसं काही नाही आई,मला आता याची संवयच झाली आहे.महिन्यातून पंधरा दिवस तरी विक्रमचे दौरे चालू असतात आणि प्रत्येक वेळी तुला थोडेच येता येणार ,तशी काही काळजी करू नको आणखी इथं नीताही आहेच ना अगदी शेजारी,त्यामुळे एकट वाटण्याचा प्रश्नच नाही."
" मग काही हरकत नाही,मलाही हल्ली प्रवास अगदी नको वाटतो,त्यात ह्यांना एकट्याला टाकून आले की तिथं असले तरी माझं निम्म लक्ष इकडे ह्यांचं कसं चालले असेल याकडेच असते.बर यांना म्हटले आपण दोघे जाऊ तर ह्यांचा स्वभाव तुला माहीतच आहे, बापाचं न ऐकता लग्न केलं आता मी तिचं तोंडही पहाणार नाही हेच त्यांच पालुपद.आता नातवंड झाल्यावरच त्याला किंवा तिला पहायला यावंसं वाटलं तरच येतील"
आपल्या वडिलांनी आपल्या लग्नाची गोष्ट इतकी मनाला लावून घ्यावी याचे मेधाला खूप वाईट वाटले पण त्याला इलाज नव्हता.
"जाऊदे आई तू नको मनाला लावून घेऊस तुझी लेक इथं अगदी आनंदात आणि सुखात आहे,विक्रम माझी इतकी काळजी घेतो---- ,"
"ते मला माहीत आहे गं,नाहीतर दोन तीन दिवसासाठी येऊन जातेच कशी मलाही बरे वाटेल आणि तुलाही"
आईला नको कसे म्हणावे याचाच मेधाला पेच पडला कारण ती आली तरी आपला शस्त्रक्रियेचा बेत पार पडेल की नाही अशी शंका तिला होती.
" आई उगीचच काळजी करतेस तू, आता तू येतेच आहेस तर मला थोडेच वाईट वाटणार आहे पण तू उगीचच दगदग करून चार दिवसासाठी इतका लांबचा प्रवास करून येणे मला काही योग्य वाटत नाही"
" असं म्हणतेस ? बर मग राहूदे सध्या,नाहीतरी सध्या सांधे फारच धरले आहेत,डॉक्टरांचे औषध चालू आहेच वाटेल बरे दोन तीन दिवसात"
"आई स्वत:ची नीट काळजी घे आणि माझी मुळीच काळजी करू नकोस." सुटकेचा नि:श्वास टाकत मेधा म्हणाली आणि चार दोन इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तिने फोन बंद केला.
दुसऱ्या दिवशी नीताच आपल्याकडे येईल आणि डॉ.टेकवानींकडे केव्हां जायचे असे विचारेल असा मेधाचा अंदाज होता पण सकाळी बराच उशीर झाला तरी ती आली नाही किंवा तिचा फोनही आला नाही,त्यामुळे शेवटी तिनेच न राहवून नीताला फोन केला,
" अगं नीता,काय झालं तरी काय.मला वाटलं तूच येशील सकाळी नेहमीप्रमाणे,आणि मग आपल्याला डॉक्टरांची अपॉइंट्मेंट घेता येईल,की मीच येऊ तुझ्याकडे ?"
"येतीस का माझ्याकडे ?आपण या विषयावर जरा चर्चा करू आणि मग डॉक्टरांची भेट ठरवू." नीताने असे म्हणणे हे जरा अस्वाभाविक होते ,पण आता तिच्याकडे जाणे मेधाला आवश्यक वाटत असल्यामुळे ती लगेचच तिच्याकडे गेली.
     आश्चर्य म्हणजे संजयही घरातच होता.त्याला पाहून मेधाला आश्चर्य वाटले आणि आता हा  विषय कसा काढायचा याविषयी ती विचार करू लागली,पण तिचा प्रश्न संजयनेच सोडवला,"मेधा ये,मी मुद्दामच घरात थांबलो आहे..तुमचा काय बेत ठरला आहे याची मला कल्पना आहे,आणि नीताच्या सल्ल्यावरून तू लिपोसक्शनची शस्त्रक्रिया करायला निघाली आहेस असे मला वाटते,तसे असेल तर तिच्या सल्ल्याचा तू पुनर्विचार करावा असे मला वाटते.आणि तिने त्यात इन्वॉव्ह होऊ नये असा माझा तिला सल्ला आहे."
"एक्स्यूज मी संजय,नीताने मला सुचवले,ती मला डॉक्टरकडे घेऊन गेली हे सगळे खरे आहे पण आता मीच हा निर्णय घेतला आहे की लिपोसक्शन करून घ्यायचे.त्यामुळे मी तिला यात इन्वॉल्व करत नाही,हा माझा स्वतंत्र निर्णय आहे असे समज,आता तर झाले?"
" मग मला वाटते,मेधा,विक्रम येईपर्यंत तू थांबावेस."
" कमाल आहे संजय तुझी विक्रमचा या शस्त्रक्रियेस विरोध आहे त्यामुळे तर तो नसताना ती करायचा निर्णय आम्ही म्हणजे आता मी म्हण,घेतला आहे,यावर तुला काय म्हणायचे आहे?"
यावर संजयला गप्पच रहावे लागले,कारण आत्तापर्यंत हा निर्णय नीताच्या आग्रहापायी मेधा घेतेय असे त्याचे मत होते आणि त्यात तथ्यही होते पण आता मेधानेच आपला पवित्रा बदलला म्हटल्यावर त्याचे बोलणेच खुंटले.
"मग नीता, डॉ.टेकवानींची अपॉइंन्टमेन्ट शक्य तितकी लवकर घे.मला या लग्नाच्या वाढदिवसाला विक्रमला अगदी चकित करायचे आहे.मी त्याला जाण्यापूर्वीच सांगितले आहे की तुला एक आगळी वेगळी भेट देणार आहे म्हणून."मेधा नीताकडे वळून म्हणाली.
"टेकवानीना फोन काय आत्ताच लावते "नीता उत्साहाने म्हणाली.म्हणून ती लगेच फोनकडे वळली,पण तिने फोनला हात लावण्यापूर्वीच फोनची रिंग वाजली. पण ती मेधाच्या फोनची होती
"कोण मेधा ना  ? "
"हो, मीच, का गं आई काय झालं सगळं ठीक आहे ना ?"
"  हो, अगं काल सगळं ऐकलं तरी माझं काही समाधान झालं नाही तेव्हां शेवटी मीच निर्णय घेतला की तुझी गाठ घेऊनच जावं, एअरपोर्टवरून बोलतेय, येतेस का न्यायला ? "
"हो येते ना, "आणी नीताकडे वळून ती म्हणाली, "आत्ताचा  बेत कॅन्सल, अगं आई इथे आली आहे, " 

पुढील भागात या कथेचा शेवट करायचा आहे. तो कसा असावा ?