सुंदर मी होणार !! ------- २

डॉ.टेकवानींना पाहून तिला खूपच बरे वाटले.त्यांचा गोरापान चेहरा,उंचीपुरी शरीरयष्टी,रुबाबदार व्यक्तिमत्व व त्यास शोभेसे अंगावरील भारी कपडे यांमुळे तिच्यावर त्यांची मोठीच छाप पडली.
"गुड मॉर्निंग मॅम,म्हणत त्यानी तिला समोरच्या गुबगुबीत कुशनच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली.
"  and how do you do नीताजी  ?"नीताकडे वळून त्यानी विचारले.
" Oh,thanks,I am fine doctor, " म्हणुन तिनेही त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला आणि तीच पुढे म्हणाली
"डॉक्टर,ही मेधा,  माझी नेबर आणि क्लोज फ्रेंड " नीताने मेधाची ओळख करून दिली.
"ओ.के.बोला मिसेस पंडित,  आपला काय प्रॉब्लेम आहे ?"
" डॉक्टर ,अलीकडे माझी जाडी खूपच वाढत चालली आहे"
" आपल्याकडे जी गोष्ट असते तीच आपल्याला नको असते नाहीका ?’ डॉक्टर हसत हसत म्हणाले,
" आता बघा की, माझ्या बायकोला मात्र ती किडकिडीत आहे याचे वाईट वाटते,"
" तसे नाही डॉक्टर,कोठलीही गोष्ट योग्य प्रमाणात असेल तर चांगली वाटते."
"यु आर राइट,मेधाजी,मी आपले थट्टेत म्हटले.तुमचा मुद्दा अगदी बरोबर! आणि अहो आम्ही त्यासाठीच येथे बसलो आहोत ना,तुम्हाला जर असं वाटलं नाही तर आमच्याकडे कोण येणार ? बर आता प्रथम आपण पलीकडे या म्हणजे योग्य त्या  तपासण्या करता येतील."
    तपासणी कक्षात तीन लेडी डॉक्टर्स वेगवेगळ्या केबिन्समध्ये होत्या व तेथे मेधाच्या शरीराच्या वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात अगदी बी.पी.ब्लड या नेहमीच्या गोष्टी तर पाहिल्या गेल्याच शिवाय त्याव्यतिरिक्त तेथील लेडी डॉक्टरने तिच्या शरीराची मोजमापे अनेक ठिकाणी   घेतली व त्या सर्वांची विस्तृत नोंद आपल्या लॅपटॉपवर केली. तेथील अद्यावत कॅमेऱ्याचा वापर करून तिच्या शरीराया निरनिराळ्या भागांची छायाचित्रेही घेण्यात आली.
    मेधा कपडे घालून बाहेर आली तेव्हां डॉक्टर  संगणकातून आलेले फोटो व नोंदी पहातच बसले होते. ती बाहेर येताच तिच्याक्डे पहात ते म्हणाले,"मिसेस  पंडित ,खरे तर काही औषधे व इंजेक्शन्स देऊन आपल्या शरीराचा आकार सुयोग्य होईल असे मला वाटते व काही व्यायाम प्रकारही मी सुचवतो.त्यानंतरही तुमचे समाधान झाले नाही, तर लायपोसक्शनचा उपाय आहेच.त्यामुळे  मात्र अगदी योग्य त्याच ठिकाणी योग्य प्रमाणात आपल्या शरीरातील चरबी राहील याविषयी मला खात्री आहे.
   डॉ.टेकवानींची गलेलठ्ठ फी देऊन बाहेर पडतानाच आपले अंग हलके झाल्यासारखे मेधाला वाटू लागले.
"बघ, महिन्याभरातच तू अगदी चवळीची शेंग दिसायला लागशील."नीताने बाहेर पडताच आपली टकळी सुरू केली पण मेधाला आता ती अगदी असह्य वाटत नव्हती .
=======================
" मग काय झालं मर्लिन क्लिनिकमध्ये?" विक्रमने  घरात प्रवेश करताच मेधाला विचारलं.
  त्याचा हा प्रश्न ऐकून मेधाला आश्चर्याचा धक्काच बसला.
"पण ,तुला कुणी सांगितलं,मी मर्लिनमध्ये गेले होते ते."
" ते आमचं गुपित आहे.तुला काय वाटतं तू अशी मला पत्ता लागू न देता कोठेही जाऊ शकशील ?"
"ए रागावू नको," आपल्या सुरात आर्जवीपणा आणत मेधा म्हणाली.
"तुला सांगणारच होते ---"
" हो पण तुझ्या लाडक्या मैत्रिणीनं सांगितलं आणि ते तू ऐकलेस,असेच ना ?"विक्रमच्या सुरातील नाराजी लपत नव्हती.
"विकी,प्लीज माफ करना मला.आत्तापर्यंत कधी असं झालंय का की कोणतीही गोष्ट मी केलीय आणि तुला त्याचा पत्ताही लागू दिला नाही.आणि आता डॉक्टरनी दिलेली औषधे  मी तुझ्यापुढेच घेणार ना,किंवा व्यायाम करणार तेही तुला नकळत थोडाच करणार आहे, नीताने फोन केला आणि लगेचच डॉक्टरची वेळ मिळाली म्हणून गेलो नाहीतर तुलाच घेऊन गेले असते."
" बरं ते राहूदे,तुझे समाधान झाले ना ?" विक्रमचा पारा खालती आल्याचं मेधाने ओळखले. 
"  आत्ता तरी डॉक्टरांनी गोळ्या,औषधं लिहून दिली आहेत आणि व्यायामही सांगितले आहेत. त्यामुळे जाडी व चरबी कमी होईल असे त्यांनी सांगितले आहे "
    डॉक्टर टेकवानीनी सांगितलेली गोळ्या व औषधे मेधाने अगदी लगेचच मागवली.औषधाने जाडी कमी होईल यावर मात्र तिचा काही विश्वास बसत नव्हता तरीही नीताचा आग्रह म्हणून तिने प्रयत्न करून बघायचे ठरवले.इतकेच काय त्यानी सांगितलेले व्यायामप्रकार करण्यासाठी ती अगदी पहाटे उठायला लागली.तिला इतक्या पहाटे आपल्या कुशीतून उठू देण्याची विक्रमची तयारी नसे.
"कशाला हवी ही सगळी कटकट तू मला अशीच आवडतेस " असे म्हणून तो तिला जवळ ओढायचा प्रय्त्न करायचा पण तिचा अगदी ठाम निश्चय असायचा त्यापुढे त्याचे काही चालायचे नाही.त्यामुळे पंधरा दिवसांनी क्लिनिकमध्ये जाताना नीताने "अगं तू एकदमच स्लिम दिसू लागली आहेस" असं म्हटल्यावर आपल्या अंगावरून मोरपीस फिरल्यासारखं तिला वाटलं.
   त्या दोघी मर्लिन क्लिनिकमध्ये शिरल्या आणि त्यांच्यासमोरूनच संगीता दवे बाहेर पदली.संगीताकडे पाहून तिला अतिशय आश्चर्य वाटले कारण एकेकाळी बटाट्याच्या पोत्यासारखी दिसणारी संगीता आज एकदम वठलेल्या झाडासारखी दिसत होती. मेधाला पाहून संगीताचा चेहरा फुलला,पुढे होत म्हणाली,"काय गं मेधा,लग्न भलतंच मानवलेलं दिसतंय ?"
"हो, पण तुला असं काय झालंय,अगदी वाळून गेली आहेस, नवरा फार छळतो की काय?"
"छे गं तो तर मला अगदी फुलासारखं जपतोय,पण त्याचं काय झालं ---"असं म्हणून नवरा आपल्यावर किती प्रेम करतो पण लग्नानानंतर दोनच वर्षात ती कशी आजारी पडली आणि त्यात तिची तब्येत लशी ढासळली याचे पुराण तिनं सुरू केलं आणि  तिला प्रश्न विचारल्याचा मेधाला पश्चाताप झाला.आपली देहयष्टी पुन्हा डौलदार होण्यासाठी डॉ.टेकवानीकडे ती येत होती.
     क्लिनिकमध्ये शिरताच डॉ.टेकवानींनी "हॅलो मिसेस पंडित," म्हणत तिचे उत्साहाने स्वागत केले."You are looking much better " "Thank you doctor," मेधाही उत्साहाने म्हणाली.पण हे तिचे ओढून ताणून आणलेले अवसानच होते कारण मधल्या काळात आहारावर कडक नियंत्रण ठेवून,डॉकटरनी सांगितलेले व्यायाम करूनही आपल्या शरीरात फारसा बदल झाल्याचे तिला स्वत:ला तरी जाणवत नव्हते."Let us see what your results say" म्हणून डॉक्टरांनी डॉ.डॉलीला मेधाची तपासणी करण्यास सांगितले.डॉलीने तिची इतर काही तपासणी न करता तिचे फक्त वजन  पाहिले आणि ती डॉक्टरांकडे येऊन म्हणाली,"Doc,she  has gained half kg."
"Oh,I see," म्हणत टेकवानीं मेधाकडे वळून म्हणाले,"I am sorry,मेधाजी,आपण आहारावर जरा अधिक नियंत्रण ठेवायला हवे." मेधाला अगदी रडूच कोसळले.कारण डॉक्टरांच्या सूचनांचे तिने अगदी तंतोतंत पालन केले होते आणि तरीही वजन कमी होण्या ऐवजी ते अर्ध्या किलोने वाढलेलेच आहे हे पाहून तिला आश्चर्यच वाटले.
  "पण मी तर तुमच्या सूचना अगदी तंतोतंत पाळल्या होत्या डॉक्टर, आहार अगदी तुमच्या सूचनाप्रमाणेच घेत होते आणि व्यायामही !"
" त्याचे काय आहे मेधाजी, कधी कधी शरीरातील काही भागात वाढलेली चरबी नुसत्या आहार किंवा व्यायामाने कमी होत नाही पण मला खात्री आहे दोन किंवा तीन महिन्यात आपण तुमच्या वजनाचा प्रश्न निकालात काढू शकू. Have some patience! "
         नीताबरोबर बाहेर पडताना मेधा खूपच नाराज झाली होती.पण नीतानेच तिला धीर देत म्हटले,"अगं इतकं काय मनाला लावून घेतेस,डॉक्टरनी सागितले आहे ना मग ते काहीतरी केल्याशिवाय रहाणार नाहीत,विश्चास ठेव माझ्यावर.डॉक्टरांची मानसिकता कशी असते तुला माहीत आहे.शिवाय शस्त्रक्रिया म्हणजे त्यात धोका हा आलाच त्यामुळे एकदम शस्त्रक्रियेचा पर्याय ते सुचवणार नाहीत.पेशंट व त्याचे नातेवाईक ऑपरेशनपूर्वी सर्जन सांगतील ते ते मान्य करतात पण काही भलते सलते झाले तर मात्र दोष डॉक्टरलाच देतात  त्यामुळे मला वाटते तू शस्त्रक्रियेविषयी विक्रम काय म्हणतो हे का विचारत नाहीस?"
"तो तर मला या डाएट, व्यायाम या भानगडीत सुद्धा पडायला नको म्हणतो,मग ऑपरेशनची तर बातच दूर."
"पण तुला तरी ही गोष्ट त्याला पटवायलाच हवी.त्याच्या परवानगीशिवाय डॉक्टर मला नाही वाटत ऑपरेशनची रिस्क घेतील."
"पण त्याची  परवानगी आवश्यकच आहे का  ?" 
 "तसे पहायला गेलं तर पेशंटची सही पुरेशी होते.अश्या शस्त्रक्रियेत डॉक्टर्स नवऱ्यांना विश्वासात घेतात एवढेच ! तसे कायदेशीर बंधन नाही"
" मग मला वाटते विक्रमला विचारण्यात काही अर्थ नाही.मला नाही वाटत तो या ऑपरेशनला तयार होईल.’
"बघ तरी एकदा प्रयत्न करून,त्याने अगदी नाहीच म्हटले तर त्याचा कुठे दौरा निघाला की आटपून टाकू आपण त्याला कळू न देता "
"बर, बघते मी त्याची समजूत पटते का ते" मेधा आपल्या फ्लॅटमध्ये शिरता शिरता म्हणाली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
"हं काय म्हणतोय आजचा दिवस ?"घरात प्रवेश करत करत विक्रमने विचारणा केली.
"तुला एक विचारायचं आहे."त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत मेधा म्हणाली,"विचारा विचारा .असं काय विचारायचं आहे राणीसाहेबांना ?"
"ए मी अगदी सीरियसली विचारतेय उगीच थट्टेवारी नेऊ नको,"
"अगं मग विचार की, मीही अगदी सीरिअसलीच सांगतोय"
"आज मी डॉक्टर टेकवानींकडं गेले होते"
" मग तुझं वजन कमी होतेय ना , मग झालं तर असेच चार पाच महिने जाऊदे तू अगदी छान पूर्वीसारखीच दिसू लागशील " 
" हो, हो, अरे माझं ऐकून तर घेशील?अरे,मागच्या महिन्यात इतका कसोशीने प्रयत्न करूनही आज माझे वजन अर्धा किलो वाढलेच आहे"चेहरा पाडत मेधा म्हणाली.
"एवढेच ना,मग त्यात इतके मनावर घेण्यासारखे काय आहे ?उगीच तू या गोष्टीकडे जास्त लक्ष देतेस ना,त्याचाच हा परिणाम.तू हे सगळे सोडून मस्तपैकी खात पीत रहा,काळजी सोड,तब्येत अशीच राहू दे काही काळजी नको."
" अरे तुला कळत कसे नाही,अशीच जाडी वाढत राहिली तर बाळंतपणसुद्धा कठीण जाईल हे लक्षात येते का तुझ्या ? मला काय वाटते,विक्रम,आपण लायपोसक्शनचा प्रयोग करून पहायला काय हरकत आहे ? हल्ली ते ऑपरेशन अगदी कॉमन झालेय."
"डॉ.टेकवानींनी तुला तसं सांगितले आहे का ?"
"नाही ,त्यानी तसं सांगितलं नाही पण या उपायांनी स्थूलपणा कमी करता आला नाही तर तोच एक पर्याय आहे, आणी नीतानंही मला तसंच सुचवलं आहे.आणि--"
"तुला ते पटले आहे असेच ना ?" जरा घुश्श्यातच विक्रमने विचारले
" हो तसे समज" मेधाने आता आपले म्हणणे सांगायचेच असा निश्चयच करून म्हटले.
"पण माझे मत विचारत असशील तर ,मला मात्र हा पर्याय मान्य नाही."विक्रमने आपला निकाल जाहीर केला.
क्रमश :