एप्रिल २२ २००६

हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण

ह्यासोबत

हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण

कुणा एका हृदयरुग्णास पडलेले प्रश्न आणि त्याने शोधलेली त्यांची उत्तरे
अर्थातच प्रथमपुरूषी, एकवचनी

मीः डॉक्टर मला तुम्ही हृदयधमनीआलेखन (angiography) करण्यासाठी पाठवत आहात, पण मला हे सांगा, की  ते माझे हृदयधमनीरुंदीकरण (angioplasty) तर करण्यासाठी मला भाग पाडणार नाहीत ना? (हा लोकांनी व्यक्त केलेल्या अनुभवावर आधारित भीतीचा व्यक्त परिणाम होता.)

डॉक्टरः मुळीच नाही. तुम्ही आधी हृदयधमनीआलेखन तर करून घ्या! मग जरूर वाटल्यास हृदयधमनीरुंदीकरण करू. तेव्हाही सगळ्या पर्यायांचा विचार करूनच आपल्याला निर्णय घेता येईल. (हा सारा दिलासा निव्वळ खोटा असतो. हे मला आता कळून चुकले आहे. एकदा हृदयधमनीआलेखन करण्यासाठी पाठवतात तेव्हा जमल्यास हृदयधमनीरुंदीकरण करण्याचाच बेत असतो. त्यावेळी मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. खरे तर एव्हाना ताणचाचणी झालेली आहे. हृदयधमनीविकाराचे निदान झालेले आहे. त्याची खात्री करण्यासाठी आणि मग हृदयधमनीरुंदीकरण करण्यासाठी मला पाठवलेले आहे. असो. मला हे सारे आता समजते आहे.)

(त्यावेळी) मग मला माझ्या एका मित्राची आठवण झाली, ज्याचे हृदयधमनीरुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच झालेले होते. मी लगेच तातडीने त्याची भेट घेतली.

मीः काय रे, मला हृदयधमनीआलेखन करवून घेण्याचा सल्ला दिलेला आहे. तसे ते करवून घ्यावे का? त्यात काय धोका असतो? त्यादरम्यान हृदयधमनीत अडथळा आढळून आल्यास ते लगेचच हृदयधमनीरुंदीकरण करण्यास सांगू शकतात का? सांगितल्यास तसे करावे का?

मित्रः अरे हो, हो, हो! किती प्रश्न विचारशील? हृदयधमनीआलेखन करवून घेण्याचा सल्ला दिलेला असल्यास अवश्य करवून घ्यावे कारण प्राथमिक निदान तर आधीच ताणचाचणीने झालेले आहे. तेव्हा संपूर्ण निदान करवून घेण्याशिवाय काहीही पर्याय नाही. त्यात धोका असा असतो की त्यादरम्यान हृदयधमनीत अडथळा आढळून आल्यास ते लगेचच हृदयधमनीरुंदीकरण करण्यास सांगू शकतात. तसे सांगितल्यास, व शक्य असल्यास तिथेच करवून घ्यावे कारण मी तसे न केल्यामुळे माझ्या दोन दिवसात दोन शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.

मीः त्या कशा?

मित्रः मलाही हृदयधमनीरुंदीकरण करण्यास सांगतील अशी भीती होतीच. तसेच त्यांनी सांगितलेही. एकच अडथळा होता व तो हृदयधमनीरुंदीकरणाने काढून टाकता येण्यासारखा होता. मला आधीच लोकांनी सतर्क केलेले असल्यामुळे मी तिथेच हृदयधमनीरुंदीकरण करण्यास, स्पष्टच नकार दिला. मला दुसरा चांगला पर्याय सापडेल असा विश्वास वाटत होता. मात्र, त्यावेळी मी अतिदक्षताविभागात शल्यक्रियेच्या हानीतून सावरत होतो व बायकोला तो पर्याय शोधायचा होता. ती घाबरूनच गेली. मला आधीच एक हृदयविकाराचा झटका आलेला होता. दुसरा कधीही येईल अशी भीती तिच्या डोक्यावर टांगती होती. मुलगा लहान होता. अशा स्थितीत ती कुठे फिरली असती? तिला निकटवर्तीयांनी हृदयधमनीरुंदीकरण करवून घेऊन धोका आधी नष्ट करण्याचा सल्ला दिला. तो तिला पटला. मग तिने डॉक्टरांना कसेही करून लगेचच हृदयधमनीरुंदीकरण करवून घेण्याची गळ घातली. डॉक्टर म्हणाले की जर असे होते तर मग त्यावेळीच का करून घेतली नाही? आता दुसऱ्या जांघेतून दुसरी शल्यक्रिया करावी लागेल. खर्च येईल तो निराळा. आणि दुसरी शल्यक्रिया सहन करावी लागेल तिही निराळी. पण तिला पर्याय सापडला नाही आणि दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या जांघेतून माझी दुसरी शल्यक्रिया झाली.

मीः पण मग मी काय करू? जर मलाही हृदयधमनीरुंदीकरण करण्यास सांगतील तर मी करून घेऊ का?

मित्रः हो! नाहीतर वेगळ्याने करावी लागल्यास दोन शल्यक्रिया आवश्यक ठरतात.

Post to Feedचांगला
अभिप्रायाखातर धन्यवाद.

Typing help hide