हृदयविकार-१९ प्राणायाम


हृदयविकार-१९ प्राणायाम


प्रस्तावनाः
इथे केवळ हृदयधमनीअवरोध ह्या विकारासंदर्भात चर्चा केलेली आहे.
तरीही तिचा उपयोग इतर अवनतीकारक रोगांकरितासुद्धा होऊ शकेल.
श्रेयअव्हेरः
हा वैद्यकीय अथवा प्राणायामविषयक सल्ला नाही.
तशी माझी पात्रता नाही. हे केवळ अनुभवातून आलेले शहाणपण आहे.
टीपः
इथे अनेक मते, आधाराविना मांडलेली दिसून येतील.
ती आधार असल्यामुळेच अस्तित्वात आलेली आहेत.
त्यांचेवर चर्चा होऊ शकेल. इथे चर्चेचे प्रयोजन नाही.
मात्र ती साधकबाधक चर्चा इतरत्र चर्चाविषय उघडून करावी.



 


ह म्हणजे सूर्य व ठ म्हणजे चंद्र, ह्यांच्यात संतुलन साधतो तो 'हठ'योग. सूर्य (पिंगला) व चंद्र (इडा) ह्या अनुक्रमे उजव्या व डाव्या नासिकांपासून गुदद्वारापर्यंत पोहोचणाऱ्या नाड्या (मला काहीसा न कळलेलाच भाग आहे हा! जाणकारांनी प्रकाश टाकावा. मात्र माझ्या समजाप्रमाणे नाडी म्हणजे मज्जारज्जू असे असावे. शिवाय, मज्जारज्जू मेंदुतून निघून संवेदना स्थळापर्यंत असतात ह्या माझ्या आजवरच्या समजास छेद देऊन, शरीरातील सहा चक्रांपासून ते संवेदना स्थळापर्यंत जात असतात असे नाड्यांच्या वर्णानांवरून स्पष्ट होते.) तिथपासून पाठीच्या कण्यातून मेंदूकडे गेलेल्या सुषुम्ना नाडीस भृमध्यात पुन्हा एकदा मिळतात. इडा व पिंगला ह्या दोन्ही नाड्या क्रमशः अडीच अडीच घटका आळीपाळीने चालतात. व शरीरातील समतोल साधतात. इडा व पिंगला ह्या दोन्ही नाड्या ब्रह्ममुहूर्तावर किंचित काळ एकाच वेळी चालतात. तेवढ्या वेळेपुरता सुषुम्ना नाडीचा प्रवाह चालू झाला असे समजावे. अशाप्रकारचे इडा व पिंगला ह्या दोन्ही नाडींमधील ऐक्य साधणाऱ्या 'प्राणायामा'ला हठयोग म्हणतात. आणि हठयोगावाचून अष्टांगयोग साधनेला पूर्तता येत नाही. पातंजली मुनींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी अशा अंगांनी युक्त असा अष्टांगयोग (चित्तवृत्तीनिरोध) सांगितलेला आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की प्राणायाम हा योगसाधनेचाच एक भाग आहे.


एका नाकपुडीतून श्वास आत घेत असतांना दुसरी नाकपुडी बंद ठेवावी. घेतलेला श्वास पहिली नाकपुडी बंद ठेवून दुसऱ्या नाकपुडीने बाहेर सोडावा. ह्यास अनुलोम विलोम प्राणायाम म्हणतात. हृदयरुग्णांना अनुलोमविलोम (अल्टरनेट नोस्ट्रेल ब्रिदींग) प्राणायामाचा खूप उपयोग होतो. कारण इडा व पिंगला नाड्यांमधील संतुलन ह्यामुळे साधल्या जाते.


प्राणायाम श्वसनशक्ती वाढवू शकतो. सामान्यतः आपण श्वास आत घेतो तो काळ, श्वास बाहेर सोडतो त्या काळापेक्षा बराच जास्त असतो. म्हणूनच, वयपरत्वे लवचिकता गमावत राहणाऱ्या छातीच्या पिंजऱ्यास, अपान पूर्णपणे बाहेर घालवून देणे जमत नाही. परिणामतः रक्तशुद्धीची प्रक्रिया अपुरीच राहत जाते. आणि स्वास्थ्य बिघडते. हृदयधमनी-अवरोधाने पीडित रुग्णांनी प्रथमतः समान श्वसन (इक्वल ब्रिदींग) करू लागावे. त्याचा अभ्यास करावा. म्हणजे, जेवढा वेळ श्वास आत घेत राहता तेवढाच वेळ उच्छवास सोडत राहा. ह्याने श्वसन शक्ती सुधारते.


श्वास पूर्णपणे आत घेतल्यावर उच्छवास न टाकता, त्याला आतच रोखून धरण्याला आंतरकुंभक म्हणतात. तसेच उच्छवास पूर्णपणे टाकून झाल्यावर पुढला श्वास घेणे न सुरू करता उच्चवासास बाहेरच रोखून धरणे ह्याला बाह्य कुंभक म्हणतात. हृदयरुग्णांनी कुठल्याही प्रकारचा कुंभक धरू नये.


सुखासनात बसून भरपूर श्वास आत ओढून घेऊन, त्यातील ४० टक्के उच्छवास जलद धक्क्याने बाहेर टाकल्यास फुफ्फुसे पुन्हा श्वास आत घेण्यासाठी फुगतात. हीच प्रक्रिया लगातार करत राहण्यास कपालभाती प्राणायाम म्हणतात. फुफ्फुसांना ह्यामध्ये मिळणाऱ्या झटक्यांमुळे केशवाहिन्यांच्या जंजाळात अडकून राहिलेला अपान (कर्ब-द्वि-प्राणिद वायू) त्वेषाने बाहेर फेकल्या जातो. त्याची जागा नव्याने आत येणारा प्राणवायू घेत जातो. म्हणून रक्तशुद्धीला उत्प्रेरणा मिळून आरोग्य सुधारते.


सामान्यतः आपण मिनिटाला १५ ते १८ श्वासोच्छवासाची आवर्तने पूर्ण करत असतो. जेवढी कमी करू तेवढे चांगले असे समजले जाते. ऋषीमुनी मिनिटाला ५-६ श्वासोच्छवासाची आवर्तने पूर्ण करत असतात. म्हणून ते दीर्घायू होतात. म्हणून संथश्वसन शिकून घ्यायला हवे. दीर्घश्वसन करायला हवे. नेहमीच.


आणखी एकप्रकार आहे, ज्याचा हृदयरुग्णांना भरपूर उपयोग होतो. तो म्हणजे उदरश्वसन (ऍबडोमिनल ब्रिदींग). पाठीवर उताणे पडून पाय गुढघ्यात मोडून पावले बुडाजवळ ओढून घ्यावीत. हात शरीरालगत तळवे जमिनीकडे करून ठेवावेत. मग एक हात पोटावर ठेवून सावकाश श्वासोच्छवास करावा. श्वासागणिक वरखाली होणाऱ्या पोटाच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करावे. डोळे मिटूनच ठेवावेत.


रामदेवबाबा, आस्था वाहिनी, योगावरील अनंत पुस्तके मार्गदर्शनास असतातच. त्याद्वारे इतरही प्राणायामाचे प्रकार, कसे करावेत, का करावेत वगैरे माहिती सहज मिळू शकेल. म्हणून केवळ उद्दिष्टे आणि सूत्रे स्पष्ट करण्यासाठीच हा लेख लिहीला आहे असे समजावे. मात्र, श्वसनक्षमता ह्या सदरात वर्णिलेल्याप्रमाणे क्षमता साध्य होण्याचा उद्देश कायम मनात ठेवावा. मापन करून प्रगतीची देखरेख करावी.