एप्रिल २४ २००६

हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण

ह्यासोबत

हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण

शल्यक्रियेचे दुःखः प्रथम पुरुषी, एकवचनी

हृदयधमनीरुंदीकरण शल्यक्रियेनंतर माझा एक मित्र मला भेटायला आला. त्याने विचारले की शल्यक्रियेदरम्यान दुःख होते का? त्यावर खालील चर्चा झाली. मला वाटते की त्यात चर्चिल्या गेलेली माहिती प्रातिनिधीक आहे. कुणालाही सारखीच उपयोगी/निरुपयोगी. पण गरजवंतास संदर्भसाधन व्हावे म्हणून इथे लिहून ठेवत आहे.

मीः खरे तर दुःख असे फारसे होत नाही. कारण स्थानिक भूल दिलेली असल्याने काय करत आहेत ते दिसत राहते, प्रत्यक्षात आणि संगणकाच्या पडद्यावरही, मात्र दुःख असे होत नाही. (उजव्या अथवा डाव्या) जांघेतील धमनी त्वचेच्या अगदी जवळ असते. तिथे बाहेरून एक हृद्-नाल-शलाका (नाल-नलिका, शलाका- सळई, लवचिक सुई, नाल-शलका- पोकळ, लवचिक, लांबलचक सुईसारखी प्रवेशनळी जिच्यातून निरनिराळी आयुधे व औषधे हृदयधमनीत शिरवता येतात, catheter) प्रवेशनासाठी एक बंद तोटी धमनीत खुपसून घट्ट चिकटवून टाकतात. मग शरीराबाहेरूनच ती तोटी उघडून धमनीत हृद्-नाल-शलाका शिरवता येते. शल्यक्रिया ह्या तोटीतून आयुधे व औषधे धमनीत शिरवून साध्य केल्या जाते. शल्यक्रियेनंतर ही तोटी बाहेरून बंद करून ठेवतात. ह्या सर्व क्रिया करत असतांना जांघेस स्थानिक भूल दिलेली असते म्हणून शल्यक्रिया फारशी जाणवतही नाही.

जिच्याद्वारे शल्यक्रिया साधलेली असते ती तोटी आठ दहा तासांनंतर जेव्हा काढून टाकतात त्यावेळी मात्र, दुःख होते. खूप रक्तस्त्रावही होत असावा. आणि ती काढून टाकण्याची प्रक्रियाही फारच वैशिष्ट्यपूर्ण असते. स्थानिक भूलही दिलेली नसते. तोटी उपसून बाहेर काढतात. काढणारे निवासी डॉक्टर त्या छिद्रावर बाहेरून त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा, रक्तस्त्राव थांबेस्तोवर घट्ट दाबून धरतात. ही अवस्था फारच अवघडलेली असते. दहा-पंधरा मिनिटे चालते. नंतर रक्तस्त्राव थांबलेल्या त्या छिद्रावर बाहेरून मलम पट्टी करून वर अनेक तासपर्यंत जड वाळूची पिशवी ठेवतात. पुन्हा ते छिद्र उलगडून, रक्तस्त्राव होऊ नये म्हणून.

मित्रः मग ती पट्टी काढून टाकतांनाही पुन्हा रक्तस्त्राव होत असणार. नाही का?

मीः नाही. दुसऱ्या दिवशी घरी जाण्यासाठी सोडतात तेव्हा डॉक्टरच ती पट्टी काढून टाकून दुसरी लावून देतात. यावेळी मला तरी मुळीच रक्तस्त्राव झाला नाही.

पण माझ्यावेळी तोटी काढून टाकत असतांना, डॉक्टर अंगठा दाबून उभे होते. बहुधा रक्तस्त्राव थांबत नसावा. मला डोळ्यापुढे अंधेरी येऊ लागली. थंडी वाजू लागली. मी त्यांना तसे सांगितले. त्यांनी नर्सला, हाताच्या शिरेत कायम बसवून ठेवलेल्या पोकळ सुईच्या तोटीतून, कसलेसे औषध घालण्यास सांगितलेले मी स्पष्ट ऐकले. नंतर माझे भान हरपू लागले. नर्स आसपास नव्हती. तिला बोलावण्यासाठी ते बटण दाबणार होते. मात्र एकाएकी त्यांनी दोन्ही हातांनी माह्या मांडीवरील छिद्र दाबून धरल्याचे पाहून, मी त्यांना म्हणालो की 'थांबा मीच बटण दाबतो'. मग मी बटण दाबून नर्सला बोलावले. नर्सने हातातील पोकळ सुईमध्ये कसलेसे इंजेक्शन टोचले. मग माझे भान परत येऊ लागले. सारी प्रक्रिया तीस, चाळीस मिनिटे चालली असावी. मग मला वाजणारी थंडी कमी व्हावी म्हणून एक मोठा गरम हवेचा ब्लोअर चालू करून त्याचा नळा माझ्या पांघरुणात घुसवून ठेवलेला होता. त्यानंतर साधारण तीन चार तासांनी मला उब वाटू लागली.

मित्रः पण हृदयधमनीत विस्फारक (स्टेन्ट) बसवतांना दुखले की नाही?

मीः हृद-नाल-शलाका मांडीतील धमनीद्वारे हृदयाबाहेरील मुख्य रक्तनळ्या (aorta) पर्यंत आणि तिथून पुढे वळवत, वळवत ज्या हृदयधमनीत अडथळा सापडलेला असेल त्या धमनीत अडथळ्यापर्यंत सरकवत नेतात. शलाका आत घुसवत असतांना, ती सारत असल्याचे आपल्याला प्रत्यक्षच दिसत असते. ती आतमध्ये वळावी ह्यासाठी बाहेरील मांडीजवळचे टोक गोल फिरवत असावेत. अडथळ्याचे जागेवर पोहोचताच तिच्या बाह्य भागावर चढवलेला एक फुगा हवा भरून फुगवू लागतात. माझ्या शल्यक्रियेच्या वेळी ह्या फुगवण्यासाठी वातावरणाच्या सतरापट दाब वापरलेला होता. त्या फुग्यावर विस्फारकही चढवलेला असतो. तो पण फुगू लागतो. त्यावेळी धमनीतील अडथळा आतून फुगवत, फुगवत रुंदावत असतांना मात्र छातीत त्या जागी किंचित दुखू लागले. 'डॉक्टर छातीत दुखताय हो' एवढे म्हणण्याचा आतच ते दुःख थांबलेलेही होते.

नंतर जेव्हा फुग्यातील हवा उतरवून तो पूर्वस्थितीत आणतात, तेव्हा विस्फारक मात्र परत येत नाही कारण तो लवचिक नसतो आणि सतरापट वातावरणीय दाबाखाली विस्फारलेला धातूचा विस्फारक पूर्वपदावर आणण्याचे त्राण हृदयधमनीच्या स्नायूमध्ये नसते. हृद-नाल-शलाका मग खेचून बाहेर काढतात, तोटी बंद करून ठेवतात आणि हृदयधमनीरुंदीकरणाची शल्यक्रिया पूर्ण होते.

(माझ्या डाव्या, पुढे उतरत्या हृदयधमनीत, LAD-Left Anterior Descending Artery,  १६ मिलीमीटर लांब आणि २.२५ मिलीमीटर व्यासाची नलिकासदृश, कलंकहीन पोलादाची औषधलिंपीत जाळी, विस्फारक म्हणून बसविण्यात आली होती.)

Post to Feedहम्म
सूचना योग्यच आहे!
बाप रे!

Typing help hide