एक डाव भुताचा- भाग ३

एक डाव भुताचा- भाग १
एक डाव भुताचा- भाग २
एक डाव भुताचा-भाग ३
एक डाव भुताचा- भाग ४




सॅमच्या मनात आले तर तो आपल्याला मारेल याची तिला शंका नव्हती. विचारात डोळा कधी लागला ते माधवीला समजले नाही.
एक डाव भुताचा- भाग ३


         दुसऱ्या दिवशी  माधवीचे डोळे लाल दिसत होते. सकाळी  रिटा व ख्रिस्तीनला "काही नाही ,रात्री सिनेमा पाहतं होते "असे सांगून माधवीने एका हिंदी सिनेमाविषयी बोलायला सुरुवात केली.   

"कुणाला काही भितीदायक अनुभव आला का गं?"माधवीने विचारले.
"छे, आम्हाला तरी नाही " असे म्हणत ख्रिस्तीन व रिटाने सुटकेचा श्वास सोडला होता.  

               ऑफिसात काम खूप होते. मिटिंग्स, फोन आणि प्रोजेक्टच्या विचारात दिवस पुढे जात होता.  दिवसभर प्रयत्न करूनही माधवीच्या मनातून सॅमचे विचार जात नव्हते.    जीवाच्या भितीने काम सोडून घरी निघून जाण्याचे विचार शंभरदा तिच्या मनात आले होते.   सॅम भविष्यात इजा करणार नाही याची खात्री कुठे होती? घरी जायचे कारण तरी काय सांगणार?  खऱ्या कारणावर कोणी विश्वास ठेवला नसता. शिवाय तिच्या निघून जाण्याने ख्रिस्तीच्या मनासारखे होणार होते ते वेगळेच.  त्या दिवशी ख्रिस्तीनने उगीच तिच्या कामाच्या पद्धतीवर शंका घेऊन व विरोध करून तिचे काम वाढवले होते.  तेव्हा कामाकडे लक्ष दिलेच पाहीजे अशी स्थिती होती. हार मानून निघून जाणे तिच्या स्वभावात नव्हते.  म्हणून तिथेच राहून काम करायला हवे अशी तिने स्वतःची समजूत घातली. 
सॅमविषयी तिच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते ते ती नाकारू शकत नव्हती. सॅमला  तिला मारायचे असेल तर इथेच काय जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तिची सुटका नाही हे तिला कळून चुकले होते. त्यामुळे घरी जाण्याचा विचार तिने डोक्यातून काढून टाकला.  


                दिवसभराच्या कामाने माधवी खूप थकली होती.  हॉटेलवर  निघायच्या आधी सवयीने संध्याकाळी तिने ईपत्र पाहिले. तिच्या मित्राने शैलेशने, तिचा हॉटेलचा दूरध्वनी  क्रमांक विचारला होता. तिचा भ्रमणध्वनी बरेचदा बंद असतो अशी शैलेशची तक्रार असे.  ती नॅशविलला आहे ते शैलेशला कसे समजले याचा माधवीला उलगडा झाला नाही.   पहाटे तो फोन करणार होता. शैलेशशी बोलून बरेच दिवस झाले होते. गेले काही महिने शैलेश लंडनला होता तेंव्हापासून माधवीचे आणि त्याचे बोलणे झाले नव्हते.  माधवीने त्याला उत्तर लिहून खुशाली कळवली.      


                  संध्याकाळी ऑफिसमधून परस्पर सगळे सहकारी बाहेर फिरायला व जेवायला गेले. माधवीसुद्धा त्यांच्याबरोबर गेली.  जाण्याआधी तिने आठवणीने काढलेले प्रिन्ट आऊटस बरोबर घेतले आहेत याची खात्री केली.  पब मध्ये सिगारचा व बियरचा वास दरवळत होता.  न समजणारे आणि कदाचित म्हणून कर्कश वाटणारे संगीतदेखील माधवीला एकटीने हॉटेलवर राहण्यापेक्षा बरे वाटत होते.  काही पालकाची पाने, कांदा टोमॅटो अन चीज घातलेले सॅंडविच माधवीने पाण्याबरोबर पोटात ढकलले.  त्यानंतर ती सगळ्यांबरोबर हॉटेलवर परत आली.  हे सर्व करताना मनातल्या मनात रामनामाचा तिने अखंड जप सुरू ठेवला होता.  रामनाम घेण्याचे सर्व विक्रम तिच्याच नावावर जमा होणार असे दिसत होते.  


               आधीच्या रात्री जवळ जवळ पूर्ण जागरण झाले होते.   हॉटेलवर येताच माधवीचा डोळा केंव्हा लागला हे तिला सुद्धा समजले नाही.  सिगारच्या वासाने तिला मध्यरात्री जाग आली.  तडक ती उठून उभी राहिली. समोर सॅम उभा होता.  त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याच्या हातात माधवीने काढलेल्या माहितीजालावरील रामरक्षा व कुराणाच्या प्रती  होत्या.

"तू , तू काय मूर्ख समजतेस का मला?  कशाकरता हे कागद गोळा केलेस? तू माझ्यावर तू विश्वास ठेवला नाही . मी तुझ्याशी गप्पा मारायला येतो असे सांगितले होते ना?  "


सॅम चिडला होता.  आता तिची धडगत नाही हे माधवीने ओळखले होते.
"नाही तरी मारणार आहेस मला ,मग असे किती घाबरून जगू? सॅम, तुला ख्रिस्तीनने ते पाठवले आहे का? आजकाल ती जादूटोण्याचा अभ्यास करते आहे आणि माझ्यावर चिडली आहे.  " माधवीने एका दमात विचारले.


"अजूनही बदलली नाहीस. "उद्विग्नपणे सॅम शेजारच्या खुर्चीत बसला.  "माणूसच आहेस तू ! माणसासारखेच वागशील ; संशयाने!  नेहमीच. "
माधवीने मान खाली घातली.

तेवढ्यात कागदाच्या गठ्ठ्याकडे पाहत सॅम कडाडला, "तुमची माहिती जुनी झाली आहे. ही पुस्तके अन् हे कागद आमचे काही बिघडवू शकत नाही. अगदी ते कपाटातले बायबल आणि बाहेरच्या दरवाज्यावरचा क्रॉससुद्धा. ह्या सर्वांवर आमच्याकडे उपाय आहेत.  its time to update your knowledge ,baby".  सॅमने हातातले कागद भिरकावून दिले.

"तुझ्या दुसरी कोणी असती तर तिला मी जिवंत ठेवले नसते " बोलता बोलता सॅम माधवीच्या जवळ आला होता. तिच्या अंगातल्या फिकट गुलाबी ड्रेसकडे तो निरखून पाहतं होता.  ती नजर माधवीला असह्य होवू लागली.


"तुझ्या ह्या वागण्याचा मला किती त्रास झाला आहे माहिती आहे का?  केवळ तुला जीवदान दिले म्हणून माझी कष्टाने मिळवलेली अर्धी विद्या नाहीशी झाली आहे. " सॅमच्या बोलण्यात खंत जाणवत होती.


खोलीत बराच वेळ शांतता होती.  सॅम काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने पुन्हा सुरेश भटांची सीडी लावली आणि तो डोळे मिटून तीच गजल ऐकू लागला.
"मला निघायला हवे, मी थकलो आहे. "सॅम दरवाज्याकडे जात म्हणाला.
"एवढी कॉफी घेणार नाहीस?" माधवीने आर्जवी स्वरात विचारले. सॅमने जीवदान दिले याचा अविश्वासही तिच्या नजरेत होता. त्याच वेळी त्याला त्रास दिला ही अपराधीपणाही जाणीवही तिला खात होती.

"ठीक आहे'"सॅमने कॉफीचा एक घोट घेतला. तेवढ्यात फोन वाजला. 
"बहुधा शैलेशचा असावा " माधवी उत्तरली. सॅमची परवानगी विचारण्यासाठी माधवीने सॅमकडे पाहिले. 

" फोन घे. शैलेशचाच आहे.  त्याने याआधी दोनदा फोन केला होता. मी मध्ये होतो त्यामुळे त्याला तुझ्याकरता निरोपही ठेवता आला नाही.  तुझ्या मित्राला माझ्याकडून हाय सांग.  त्याच्या प्रेमात तर पडली नाहीस ना?" सॅमने गंभीर होत विचारले.  


तिच्या उत्तराची अपेक्षा न ठेवता "ही तसेच वागते आहे" असे म्हणत सॅम बाहेर निघून गेला.  माधवीने फोन घेतला व ती शैलेशशी बोलू लागली. 

                       सकाळ झाली होती.  माधवीने आनंदशी संपर्क साधला.  शैलेश काय म्हणत होता ते सांगताना तिच्या स्वरातली खुशी ती लपवू शकली नाही.  
"मला वाटलेच होते की तुझे काहीतरी बिनसले आहे. तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस  असे वाटले. तुला मन मोकळे करता यावे म्हणून  मीच शैलेशला लिहिले होते की तू नॅशविलला आहेस. चला, त्याच्याशी बोलणे झाल्यावर तरी बाईसाहेब खूश आहेत ना ! "
आनंदचे  हे वाक्य ऐकून  शैलशने एकदम हॉटेलचा नंबर कसा मागितला याचा माधवीला उलगडा झाला.  


पण आनंद  आणि शैलेश हा दोघांनाही तिने सॅमबद्दल काही सांगितले नव्हते !


                 क्रमशः