चल गड्या चेतवू या भाषेची वात

जडजंबाळाला पुरातनाचा साज
संस्कृती म्हणोनि अवघड ऐसा बाज
अर्थाहुनि घुसली अर्थहीनता ज्यात
चल गड्या चेतवू या भाषेची वात

रे शब्द नको, गड बांधा येथे छोटे
रे अर्थ हवा हे म्हणणे निव्वळ खोटे
चल पुढे म्हणोनि पळुया आपण आत
चल गड्या चेतवू या भाषेची वात

प्यांटीस तुमानी शर्टास म्हणुया सद्रे
हे अपुले बर्का, जरी हे वेडेविद्रे
तर्कावर करुया दुराग्रहाने मात
चल गड्या चेतवू या भाषेची वात

मज आज नको, मज काल प्रिय हा भारी
मी विन्मुख जेंव्हा सूर्य उगवला दारी
पूजेस भुताच्या सजवू त्याचे प्रेत
चल गड्या चेतवू या भाषेची वात

हे कुंपण बांधा, घाला जडशीळ बेड्या
या गच्च बांधुया सगळ्या खिडक्या उघड्या
हे वारे थांबले,  शब्द कुबटले आत
चल गड्या चेतवू या भाषेची वात

मग भरवु तेंव्हा ऐशी चर्चासत्रे
का बंधू माझा अजुनि दारचे कुत्रे
का होय भिकारी अजुनि माझी जात
चल गड्या चेतवू या भाषेची वात