ह्यासोबत
"आठवते ते एवढेच की मी तेव्हा राखाडी रंगाच्या धुळीने माखलेल्या छोट्या छोट्या टेकड्यांच्या वैराण प्रदेशातून चालत होतो. झुडपे बदनामीपुरतीच होती जेमतेम. आणि जी काही काटेरी झुडपे होती त्यांची सावली एखाद्या थोराड कुत्र्यालाही पुरली नसती. चालताना धुळीचे लोट उठत होते आणि ठसका लागून जीव कासावीस होत होता."
"आणि अचानक ते सूर ऐकू आले. स्वरांशी असलेला संबंध तोडल्यावर परत कधी असले काही होईल याची मुळीसुद्धा कल्पना मी केली नव्हती. पण हे तंतुवाद्याचे असल्यासारखे वाटणारे सूर इतके विव्हळ करणारे होते, की मी मंतरून घातल्यासारखा त्यांच्या उगमाकडे चालत गेलो. एका राहुटीतून ते स्वर ऐकू येत होते. त्या राहुटीच्या बंद कनातीपाशी मी खिळल्यासारखा उभा राहिलो. अचानक ते सूर थांबले, आणि मला तीव्र वेदनेची जाणीव झाली. एका धिप्पाड कुत्र्याने त्याच्या रुंद जबड्यात माझ्या पोटरीला आवळून रक्ताच्या चिळकांड्या उडवल्या होत्या."
"पाय सोडवून घेण्याचा प्रयत्न करावा असा संदेश मेंदूकडून निघेपर्यंत तंबूची कनात दूर झाली आणि ती बाहेर आली. पायासारख्या क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष द्यायचे टाळून मी तिच्याकडे बघत राहिलो."
"सौंदर्य म्हणजे काय याची साक्षात व्याख्याच इथे माझ्यासमोर उभी होती. तिच्याकडे एकदाच बघितल्यावर आता काही पाहायचे उरले नाही म्हणून डोळे फोडून घ्यावेसे वाटणारे तिचे सौंदर्य होते. काय नव्हते त्यात? शालीनता, सूचकता, अधीरता, खट्याळपणा आणि जहरी मादकता, सर्व उचंबळून उसळत होते. रंगीबेरंगी तुकड्यांनी सजलेला तिचा वेष तिची कमनीय काया खुलवत होता."
" "माफ करा हं, आमच्या कुत्र्याने पकडले वाटते तुम्हाला", तिचा आवाज तिच्या वादनाला चोख शोभेल असाच होता. कुत्र्याला तिने "जा बघू आपल्या कामाला" असे म्हणून हुसकावून लावले आणि जखम धुवायला पाणी दाखवण्याकरता ती कनातीमागच्या एका दीडबोटी धारेच्या झऱ्याकडे मला घेऊन गेली. माझ्या तोंडून एकही शब्द फुटला नाही. माझ्यावरचा मंत्राचा असर अजूनही उतरला नव्हता."
"परत येऊन आम्ही त्या तंबूत गेलो. तिने एका सुरईतून मातीच्या वाडग्यात एक काळसर द्रव्य ओतले आणि मला देऊ केले. "तुम्हाला हे आवडेल की नाही माहीत नाही, पण आमच्यामध्ये वाटसरूला हे देण्याची पद्धत आहे" तिचा आवाज परत किणकिणला. मी हळूच चव घेतली. कसल्यातरी प्रकारचे मद्यच होते ते, पण इतके सौम्य, की त्याने जर झिंग आलीच, तर ती आपण डोळे मिटल्यावर चोरपावलांनीच येत असणार बहुधा."
"मग तिने माझ्या पायाला लावण्यासाठी कसलातरी पाला ठेचून दिला आणि त्यावर गुंडाळायला एक कापडाची चिंधोटी दिली. "बरे वाटेल एक दोन दिवसांत" ती परत किणकिणली. "तुम्ही कुठे निघाला होतात?" कशाबद्दल बोलावे याबद्दलची माझी अडचण अशी सहज दूर झाली."
"पण तिने खिन्नपणे हसून हातानेच मला थांबवले. "मी विचारले खरे तुम्हाला, पण तुम्ही काहीही सांगितलेत तरी मला माझा नवरा येईपर्यंत काहीच कळणार नाही तुम्ही काय म्हणताय ते. मी बहिरी आहे. तुम्ही कुठली भाषा बोलताय हे कळले नाही तर मला काहीही कळू शकणार नाही. मी माझ्या नवऱ्याचे ओठ वाचते आणि त्यावरून समजते. आता मुळात मी बोलतेय ते तुम्हाला कितपत कळतेय आणि तुम्ही कुठल्या भाषेत बोलाल हे मला साफ अगम्य आहे". मी सुन्न झालो. एवढे स्वर्गीय संगीत आणि ते उमलवणारी साफ बहिरी? आणि एवढे स्वर्गीय सौंदर्य आणि त्याला आधीच बळकावून बसलेला कुणी टोणगा? विषाद आणि राग यात काय वरचढ वाटत होते सांगणे कठीण होते."
"काही वेळाने जाणीव झाली की ती कुणाशीतरी बोलते आहे. मी वळून बघितले तर तिचा नवरा दिसला. आता विषादाला खाली ढकलून राग उफाळून आला. चेहऱ्याला ना आकार ना उकार, उंची जेमतेम तिच्या खांद्यापर्यंत, पुढचे दोन दात पडलेले, आणि रंग ठार काळा. इतका की अंधारात दिवा घेऊन चालला असता तर 'भूत' म्हणून आरोळी ठोकण्याआधी कुणी क्षणभरही विचार केला नसता."
""हा माझा नवरा. आता तो बोलेल तुमच्याशी" परत स्वर किणकिणला. ते ध्यान सरळ माझ्याकडे आले. आणि त्या गचाळ आकाराला न शोभणाऱ्या संयत स्वरात त्याने विचारले, "आपण कुठून आलात? माझी भाषा तुम्हाला कळतेय का?". मी होकार दिला आणि मी दिशाहीन वाटसरू असून संगीतस्वरांच्या लोभाने इथे पोचलो हे सांगितले. पण मी जेव्हा 'तिकडून' आलो असे हातवारे केले तेव्हा तो विषण्ण हसला आणि म्हणाला, "आपली भाषा सुदैवाने एकच आहे, त्यातच बोला. हातवारे करून मला आंधळ्याला काय कळणार?" मी आ वासून पाहत राहिलो".
"पाय बरा होण्याच्या मिषाने मी तिथे राहिलो. संताप उफाळून येत होता. विषाद त्यावर हबके मारत होता. असेही कळले की ती जे वाद्य वाजवते ते वाद्य तिचा नवरा तयार करतो. बांबूचे तुकडे, मेंढराचे कातडे आणि कोकराच्या आतड्यापासून केलेल्या बारीक तंतूंनी. हं! बहिरी वाद्य वाजवते तर ते तयार करायला आंधळाच हवा!"
"आमची भाषा एक आहे हे तिला कळल्यावर आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. त्यांचा पिढीजात व्यवसाय नाग पकडून त्याचे विष काढण्याचा होता. मेषपात्र दिसणारा तिचा नवरा या कामात सराईत होता. तो दांडगा कुत्रा बिळे शोधून देण्याचे काम करी आणि पुढचे काम हे बुवा करत. ती एकटी निर्धास्तपणे तंबूत वाद्य वाजवत बसे. त्या कुत्र्याचे कान-नाक-मन अगदी तिखट होते. तिच्या जवळपास कुणी आल्याचा त्याला लगेच सुगावा लागे आणि तो झेपा टाकत त्या आगंतुकाच्या समाचारासाठी हजर होई."
"तिच्यामुळे मी परत संगीताकडे वळलो. पण आता त्यात स्वरांची आराधना असा शुद्ध हेतू न राहता तिला दिपवणे आणि भुलवणे असा तिच्या मोहात पडलेल्या मनाने ठरवलेला हेतू होता. आणि ते शक्य नव्हते. तिचे ते वाद्य मला काही केल्या हातात बसेना. आणि मी ज्यावर अलम दुनियेला झुलवत होतो, तो माझा आवाज तिच्यापर्यंत पोचत नव्हता. ओठ वाचून स्वर आत पोचत नाहीत."
"मात्र ती गप्पा अगदी मनमोकळेपणाने मारे. तिचे तिच्या नवऱ्यावर जिवापाड प्रेम होते आणि पुढच्या जन्मीदेखील हाच पती मिळावा म्हणून ती दंडाभोवती कसलेसे डोरले बांधत असे. आणि हे तिने इतक्या निरागसपणे सांगितले की तिच्या मोहाने वेडावलेल्या मनालाही काही काळ स्तब्ध राहावे लागले. पण मोहाचे रूपांतर हळूहळू विषयासक्तीत होऊ लागले."
"आणी एकदा मी तिला तंबूमागच्या झऱ्यापाशी स्नान करताना पाहिले. मोकळेपणाने ती पाणी उघड्या अंगावर खेळवीत होती, आणि तंबूच्या कनातीच्या फटीतून मी आसक्तीने ते दृश्य नजरेने पीत होतो. खरेतर स्त्रीदेह आणि त्याची वळणे मला अजिबात नवीन नव्हती. पण हा देह मला अप्राप्य आहे ही जाणीवही माझ्या कामांध मनाला रोखू शकली नाही. मी पाहतच राहिलो."
"व्यवसायाला बाहेर पडलेल्या तिच्या कुत्र्याला याचा सुगावा कसा लागला कोण जाणे. यावेळेला त्याचे दात पार नडगीच्या हाडाला भिडले. अखेर जिवाच्या कराराने मी जवळ पडलेली पहार त्याच्या डोक्यात घातली तेव्हा कुठे त्याचा प्राण गेला आणि जबड्याची पकड ढिली पडली."
"पुढच्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा धीर उरला नाही. एका कापडाची पट्टी नडगीवर गुंडाळून मी तिथून पळ काढला."
"परत निर्विकार दिशा. परत दिशाहीन वाटचाल."
"नदीकाठच्या त्या पाठशाळेत मी पोचलो तेव्हा संध्याकाळ होऊन गेली होती. झोपड्यांतून मिणमिणते दिवे अंधाराला छोटी छोटी भोके पाडीत होते. मुले काहीतरी संथा म्हणत होती, त्याचा सामूहिक आवाज गुंजत होता. पांढरी दाढी पार छातीवर पोचलेल्या एका व्यक्तीने माझी आस्थेने चौकशी केली आणि मला पथारी पसरायला एका झोपडीची तजवीज केली."
"आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाशी संबंध न आलेला मी, पण मला ते वातावरण आवडू लागले. काही शिकण्याची इच्छा मी त्या दाढीवाल्या व्यक्तीला सांगितली. त्यांनी निर्विकारपणे मान हालवली. "नाहीतरी माणूस जन्मभर विद्यार्थीच असतो, मग वयाचा अडसर कशाला" असे काहीसे बडबडून त्यांनी माझी रवानगी माझ्यापेक्षा चोख तीस वर्षांनी लहान असणाऱ्या बालकांमध्ये केली."
"सुरुवातीला जरा जड गेले, पण नंतर स्वर आणि त्रिमिती आकार यातच आतापर्यंत गुंतलेले मन एका वेगळ्याच विश्वात विहरू लागले. अशी काही वर्षे लोटली. आता तिथला अभ्यास संपवून मी तिथेच अध्यापक म्हणून काम करू लागलो. इतर अध्यापकांबरोबर आणि त्या दाढीवाल्या आचार्यांबरोबर चर्चा करू लागलो आणि वाद घालू लागलो."
"मानवी जीवनाचा अर्थ काय, भाषा हे केवळ एक संवादाचे माध्यम आहे की विचारांचे उगमस्थान आहे, सर्व कला या भाषेच्या माध्यमातून उपभोगता येतात का,.... प्रश्न अनेक होते. आणि दुर्दैवाने त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे असून ती आपल्याला माहीत आहेत असा तिथल्या सर्वांचा अट्टाहास हळूहळू पण स्पष्टपणे दृग्गोचर होत गेला. काडीकाडीने पाठीवरचे ओझे वाढणाऱ्या उंटासारखा मी सहनशक्तीची परीक्षा बघत बसलो."
"शेवटची काडी फारच क्षुल्लक होती. 'आपल्याकडे शिकून गेलेले विद्यार्थी खरोखर त्या ज्ञानाचा उपयोग किती करतात?' हा मला पडलेला प्रश्न मी सर्वांसमोर मांडला आणि जी उत्तरे आली ती पुरेशी ठरली. मुळात हा प्रश्न पडणे हेच आपल्याला साध्य झालेल्या अंतिम ज्ञानावरती अविश्वास दाखवणे आहे, ही मानसिकताच आपल्या समाजाला गर्तेत लोटायला कारणीभूत ठरते आहे, एखादी हमखास उपयोगाची वस्तू कुणी वापरत नसेल तर दोष न वापरणाऱ्यावर जातो, एखाद्या प्रश्नाचे उत्तर धडधडीतपणे समोर उभे असले तरी ते जाणण्याची कुवत फार थोड्या लोकांची असते त्याला आपण काय करणार, गुरू आणि ग्रंथ यांची जिथे पूजा होत नाही तो समाज नष्ट व्हायच्याच पायरीचा असतो,..... मला तिथून चालता करायला हे शब्दांचे वायबार पुरेसे होते."
"आताच्या वाटचालीला या विचारांचा अनाहत नाद मागे गुंजत साथ करीत होता."
"तो भगव्या कपड्यांतला स्थूल तरुण भेटेपर्यंत मी भिरीभिरी भटकत होतो. मृदू हळुवारपणे त्याने माझे म्हणणे ऐकून घेतले आणि यावर उपाय म्हणजे एका जागी बसून चिंतन करणे हाच आहे हे ठामपणे सांगितले. चिंतन करायची पद्धत, आणि जर का त्या चिंतनाने प्रश्न सुटलाच नाही तर शेवटचा उपाय म्हणून ह्या जागेचा पत्ता त्याने दिला."
"मी चिंतनाला सुरुवात केली. देहधर्म आवरणे सुरुवातीला जड गेले, पण ते त्याने सांगितलेच होते. प्रयत्नांनी दिवस दिवस बसणे जमू लागले. विलंबित लयीत गाणे खुलवत न्यावे तशी अनुभूती येऊ लागली."
"आणि एक वेळ अशी आली की आताच्या आता आपण चालायला लागले पाहिजे हे चटचटीतपणे जाणवले. तत्क्षणी मी उठून चालायला सुरुवात केली."
"असाच एक माळ, फक्त समुद्राला लकटून वसलेला. त्याच्या कड्यावर एक वडाचे झाड. तिथवर मी पोचलो तोच गडद निळे धुके सर्व बाजूंनी लपेटू लागले. आतापर्यंत असाध्य असलेल्या सर्व सुरावटी मंद आवाजात साथ करत होत्या. धुक्याचे गडद लोट चहूबाजूंनी उसळू लागले. पण त्या सुरावटींनी पुढे जाण्याची उमेद जागवली होती."
"एक दरवाजा दिसू लागला. त्या दरवाज्यापलीकडे आतापर्यंत अनोळखी राहिलेले अंतिम सत्य! मी आसुसून वाट चालत राहिलो. धुके हळूहळू विरळ होत गेले."
"आणि माझी झालेली फसगत स्पष्ट दिसू लागली. तो दरवाजा होता, पण त्याला कुठल्याही बाजूने भिंतींचे कोंदण नव्हते. त्यातून पार गेले काय आणि जन्मभर एकाच बाजूला बसून राहिले काय, काहीच फरक पडणार नव्हता. झापडबंद जाणीवांना आपण दरवाजा पार करून गेलो एवढे भुलवण्यासाठीच त्याची योजना होती बहुतेक. आणि माझ्या जाणीवा तर आता हिंस्र प्राण्यासारख्या वखवखलेल्या होत्या. त्यांना शांतवायला हे बोटभर हाडूक अजिबात उपयोगाचे नव्हते."
"परत वाटचाल. फक्त आता इथला पत्ता माहीत होता, त्यामुळे कुठे चाललोय हे माहीत होते एवढेच."
"हे देवी, का हे असे सगळे? काय अर्थ या सगळ्याचा?"
"हातात ओल्या मातीचा गोळा घेऊन घटकेत मडके, घटकेत कुंडी असे चाळे करणाऱ्या लहरी कुंभारासारखे माझ्या आयुष्याशी कोण खेळतंय? माझ्या आयुष्याचा ताबा माझ्याकडे का नाही? तसा तो आहे, मीच माझ्या जीवनाला जबाबदार आहे असे सांगत फिरणारे विचारवंत मी पाहिलेत. पण अगम्य गोष्टीबद्दल ठाम धाडसाने बोलण्याच्या धैर्याबद्दल त्यांचे कौतुक करावे की कीव असा प्रश्न पडण्याखेरीज काहीच झाले नाही."
"माझ्याकडेच जर माझ्या जीवनाचा ताबा असता तर आजही मी सुखाने त्या खेड्यात मद्य विकत राहिलो असतो. लग्न झाले असते, मुले झाली असती आणि तीही माझ्याबरोबर कामाला आली असती."
"किंवा डोळे गच्च मिटून स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलत राहिलो असतो. लग्न, संसार असली कोडी सोडवण्याच्या भानगडीत न पडता."
"किंवा स्वर-बिर सगळे झूट म्हणून माझ्यावर जीव लावून बसलेल्या बायकोबरोबर गद्य संसार करत सुखाने उंबरातला किडा बनून राहिलो असतो."
"किंवा अख्ख्या पहाडामध्ये लपलेली मूर्ती मुक्त करण्यासाठी झटत आयुष्य वेचले असते."
"किंवा त्या सौंदर्यवतीच्या दारात दुसरा कुत्रा बनून राहिलो असतो."
"पण दरवेळेस सगळी समीकरणे उलटीपालटी का होत गेली? बिनभिंतींचा दरवाजा शेवटी प्रत्यक्ष दिसला, पण आयुष्यभर मी असे बिनभिंतींचे दरवाजेच ना ओलांडत बसलो?"
"संगीत म्हणजे काय हे भाषेत सांगावे लागते हे आचरट विधिलिखित कोणाचे? 'भाषा आहे म्हणूनच विचार शक्य आहेत' असे म्हणणारे विद्वान आहेत. हे म्हणजे कपडे आहेत म्हणून देह आहे म्हणण्यासारखे झाले."
"अर्थात अशा विद्वानांना वादात हरवणे शक्यच नसते. कारण वाद घालायचे ते दोन-मितीच्या भाषेच्या दीडविती आरशात उमटणाऱ्या अंधुक प्रतिमांच्या आधारे. आपल्या अंधाऱ्या गल्लीत सिंहाला बोलावून त्याची शिकार करणारे कुत्रेही खूपच धाडसी म्हणायचे यांच्या पुढे."
"एखादाच स्वर असा उमटतो की टचकन डोळ्यांत पाणी उभे राहते. त्या अनुभूतीच्या अत्युच्च क्षणीदेखील हे शब्दांचे आरसे घेऊन कवडसे पाडत हिंडणार. 'त्या गायनात महासागराची प्रदीर्घ खोली जाणवते' किंवा असेच काहीतरी वाभरट. खऱ्या महासागराची खरी खोली स्वतःच्या गळ्यात खरा दगड बांधून का मोजत नाहीत ही माणसे?"
"आणि भाषेखेरीज सर्व माध्यमांना दुय्यम ठरवून गणिकाबाजारात उतरवणारी ही माणसे, जीवनावर बोलायची पाळी आली की भेदरट कुत्र्यापेक्षाही जलदीने शेपूट घालून पळत सुटतात. मग आत्मा, मोक्ष, प्राक्तन, मृत्यू, ब्रह्म असले पतंग उडवत बसायचे. खोल प्रश्नांना थिल्लर उत्तरे शोधायची."
"जगात देव आहे की नाही, हा देखील एक असाच प्रश्न. यात वाद घालण्यासारखे काय आहे हे मला कधीच कळले नाही. देव, दैव, नियती काय म्हणायचे असेल ते म्हणा, पण असा कुठलाही शब्द उमटवण्याअगोदर आपल्याच मनात त्या शब्दाने मूळ पकडले आहे का हे तपासून पाहायला नको?"
"जीवन, देह, आत्मा सगळे सगळे झूट, हातातले मदिरापात्र तेवढे खरे असे ठामपणे प्रतिपादून अष्टौप्रहर तरंगत असणारे मद्यपी कितीतरी बरे यांच्यापेक्षा."
"मृत्यूबद्दल बोलणे तर शक्यच नाही. वाचातप म्हणून मृत्यूसंबंधित प्रत्येक शब्द घासून, त्याचा अर्थ पुसून पार बेचव उकडबटाटा करून टाकलेला. निजधामास काय, कैलासवासी काय, सद्गती काय, चहाटळपणा सगळा."
"मृत्यू म्हणजे नक्की काय? देह नष्ट झाला कीच मृत्यू येतो का? मृत्यू येण्यासाठी काय करावे लागते, पाप की पुण्य? माझ्या बायकोने काय केले होते? संगीताच्या पाशात अडकू शकत नव्हती ती, हे काय म्हणायचे? मृत्यू यायचाच होता तिला, तर लौकर का नाही आला? शेवटच्या आजारात कळवळून स्वतःची नखे स्वतःच्याच हातात घुसेपर्यंत कडाडून मुठी वळून रक्त काढत ती वाट पाहत होती, तेव्हा कुठे बसला होता हा 'अटळ' राक्षस?"
"आता हे सगळे मी बोलतोय त्याचा तरी अर्थ काय? भाषेला एवढे नालस्तून मी परत भाषेच्या दोनमिती दीडविती आरशातच हा धूसर प्रतिमांचा खेळ मांडलाय ना? त्याची काय संगती लावणार?"
"की नाही नाही म्हणताना मीपण त्या वावदूक विद्वानांच्यातलाच होऊन गेलोय एक? तसे असेल तर..... काय म्हणू? यापेक्षा मृत्यू बरा? पण तेही असेच एक बिनअर्थाचे वाक्य. अर्थच माहीत नाही तर 'मृत्यू बरा' या बुडबुड्याला तरी काय अस्तित्व?"
त्याचा आवाज गुंजत गुंजत नाहीसा झाला. हळूहळू प्रतिध्वनीही त्याच वाटेने गेले.
"तू हे सगळे बोललास, बरे वाटले. आम्हाला नव्हे, तुलाच. 'मी म्हणजे कुणीतरी' हा अभिनिवेश तुझ्या जाणीवेत नव्हे, पण नेणीवेत रुतून बसला होता. त्याला उपसून काढलेस हे बरे केलेस." बासरीच्या हळुवार फुंकेसारखा देवीचा आवाज होता.
"आता तू उपस्थित केलेली प्रश्नांची फैर. मनात प्रश्न उमटला की त्याचे उत्तरही कुठेतरी तयारच पाहिजे हा तुझा दुराग्रही हट्ट तुझ्या गळ्यातली धोंड झाला आहे. गाताना जसा प्रत्येक तानेला समेवर येण्याचा हट्ट निरर्थक हिशेबीपणा ठरतो तसेच झाले हे. काही ताना मध्येच तालाचे बोट सोडून स्वच्छंद उड्या मारत हिंडतात. कधी त्या उड्या मध्येच सोडून खाली मान घालून समेवर येतात. कधी खोड्याळ मुलासारख्या अवखळपणे 'येत नाही ज्जा' म्हणून निघून जातात आपल्या वाटेला. तुला स्वरझोपाळ्यावर बसून झुलायचेय की किती झोके झाले त्याचा कोरडा हिशेब मांडायचाय?"
"आणि हिशेब मांडायचाच झाला, तर इथे येऊन आमच्यावर आरोपपत्र दाखल करण्याआधी तुला किती किती क्षण तुमच्या भाषेत 'दैवी सुखाचे' मिळाले उपभोगायला त्याचाही हिशेब मांड जरा. याच्या एक शतांश क्षणांवर आणि शतपट दुःखांवर आयुष्ये पेललेली कितीतरी माणसे दिसतील तुला आसपास, जर डोळे खरेच उघडायचे कष्ट घेतलेस तर. त्यांना असले प्रश्न पडले नसतील असे तुझे ठाम म्हणणे आहे?"
"असो. एक गोष्ट स्पष्ट झाली नसेल तर करून टाकते. तुझ्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे नाहीत. आणि तुझे पुढे काय करायचे हे देखिल आम्हाला माहीत नाही. आम्ही देव झालो म्हणून आम्हाला तुमच्या पेक्षा अधिक कळते हे खरे, पण सर्व कळते असे नाही."
"आणि तू तर आता ती सीमारेषाही पार करून आलाहेस."
"अश्वत्थाम्या, असा दचकू नकोस, तुलाच संबोधते आहे."
"अश्वत्थामा हे एका व्यक्तीचे नाव नव्हते आणि नाही. आमच्या हद्दीबाहेर गेलेल्या तुझ्यासारख्या प्रवृत्तीचे ते नाव आहे. अर्थात तुम्ही मानवांनी लगेच त्याचे एक मसालेदार मिथक करून टाकलेत. जखम काय, तेल काय, हं!"
"आता इथून पुढे तू कुठे जाशील, माहीत नाही. पण माहीत आहे ते एवढेच, की तुला मृत्यू नाही. आणि अजून हेही सांगते, की आम्ही देवमंडळी कुठे जाणारोत हेही आम्हाला माहीत नाही. त्या अर्थाने आपण आता समांतर मार्गांवर आलोत. फक्त तुझ्या मागे प्रश्नचिन्हाचा दैत्य कायम असेल आता, त्याला शांतवत हिंडणे हे तुझे प्राक्तन. कमीतकमी लोक तुझ्यासारखे बहकावेत याची काळजी घेणे हे आमचे प्राक्तन."
"बघू, भेटूही कदाचित परत एखाद्या वळणावर. पण भेटू याचा अर्थ परत ऐसपैस बोलू असा नव्हे, किंबहुना ओळख दाखवू असाही नव्हे एवढेच ध्यानात ठेव".
पणतीतले इंधन संपले आणि फडफडून ज्योत निमाली.