रोटवद ते कासोदा...कासोदा ते न्यू जर्सी

रोटवद ते कासोदा.....कासोदा ते न्यू जर्सी.....प्रवास....प्रवास....!!!! दोन मानवी शरीरांच्या एका मांसल तुकड्याचा प्रवास.....एका शांत, अबोल 'जगाचा' प्रवास....एका आईच्या दुधाचा प्रवास.....आई,वडील,आजी,काका...आणि आजूबाजुची माणसं.. ह्यांच्या संस्कारांचा प्रवास....मी जिथे शिकलो,त्या रोटवदच्या बालवाडीचा प्रवास....त्या रोटवदच्या काळ्या मातीच्या 'वावराच्या' (शेताच्या ) सुगंधाचा प्रवास ... जिने मला आणि माझ्या आधीच्या पिढीला जगवलं....!!! नाचणखेड्यातल्या.... चिक्कूंच्या, चिंचांच्या स्वादाचा स्वादाचा प्रवास ......त्या १ ल्या इयत्तेचा प्रवास.... अंमळगावच्या २ ऱ्या" __msh_fixed="false">ऱ्या इयत्तेकडे.. ह्या इयत्तेचा, कासोद्यातल्या३ री ते १० वी च्या प्रवासाकडे झालेला प्रवास..... ह्या काळात घरात, शाळेत, समाजात आलेल्या कटु-गोड अनुभवांचा प्रवास....१० वी नंतर ...पंख फुटलेल्या आणि आकाशाकडे 'भरारी' घेतलेल्या पक्षाचा प्रवास.... धुळे येथे 'जय हिंद' कॉलेजमधल्या घेतलेल्या शिस्तबद्ध शिक्षणाचा प्रवास, कुणाल हॉटेलमधल्या चहा आणि मिसळच्या चवीचा प्रवास...जमवलेल्या मित्रांचा आणि जुळलेल्या 'मैत्राचा' प्रवास......१२ वीत मिळालेल्या 'यशाच्या' आनंदाचा प्रवास....!!!

पुणे..... शिक्षणाच्या माहेरघराकडे, एका तरुणाचा प्रवास..‌ सीओईपीतल्या रॅगींगच्या अनुभवांचा प्रवास....१८५३ पासून अखंड सुरू असलेल्या, सीओईपीच्या प्रवाहात......माझ्या छोट्याश्या होळीने...४ वर्ष, गटांगळ्या, बुचक्या खात केलेला प्रवास ...३ऱ्या वर्षी मी बनलेल्या 'सँटाचा' प्रवास.....मी वसतीग्रुहात लावलेल्या, आंब्याच्या झाडांच्या कैऱ्यांचा, त्यांच्या सावलीचा प्रवास....२२ जून २००५ साली, सकाळी ५ वाजता, घरी जातांना 'सीओईपी' ला वाहिलेल्या २ अश्रुंचा प्रवास...डोळ्यांकडून ... गालाकडे....मित्रांनी दिलेल्या निरोपाचा प्रवास.... संदिप विनायक पाटिल,कासोदा ता.एरंडोल जि. जळगाव.. असं लिहीलेल्या माझ्या सायकलीचा....माझ्या छत्रीचा प्रवास.....!!!

एका प्रौढ तरुणाचा सॉफ्टवेअरच्या विशाल जगताकडे निघालेला 'प्रवास'.... हाताने जेवणाऱ्या, भाकरी-पिठलं खाणाऱ्या तरुणाचा काटे-चमचा-फोर्क कडे झालेला प्रवास.... हाफ पँट ते क्वाड्रा जिन्स झालेला प्रवास.....पॅरागॉन ते 'आडिडास' कडे झालेला प्रवास......प्रिपेडकडून पोस्टपेड फोनकडे झालेला प्रवास....पुणे ते जळगाव...महाराष्ट्र एक्सप्रेसमधल्या... साधारण डब्यात मी व्यतित केलेल्या 'अनेक' रात्रींचा प्रवास.....त्या कुबट वासांचा प्रवास..... ह्या प्रवासाचा... पुणे ते जळगाव ट्रॅवल्सकडे झालेला प्रवास.....बिडीच्या दुर्गंधापासून ... जोवान मास्कच्या सुगंधाकडे झालेला प्रवास.... सेनापती बापट रोडजवळील कॉफी स्टॉपकडे मी व चंदुने केलेला प्रवास.....आमच्या त्या गरम कॉफीचा झुरका घेत मारलेल्या गप्पांचा, विनोदांचा प्रवास......!!!

माझ्या व चंदुच्या नात्याचा प्रवास....मला रुमच्या रस्त्याच्या कोपऱ्यापर्यंत सोडायला आलेल्या चंदुने गाळलेल्या अश्रुंचा प्रवास....... त्याने दिलेल्या मिठीचा प्रवास.... पुणे ते मुंबई रस्त्यावर मी, माझ्या सगळ्या मित्रांशी, नातेवाईकांशी, केलेल्या संवादाचा प्रवास....विमानतळाजवळील ट्रॅफिक जॅम चा प्रवास.... विमानतळावर माझ्या वडिलांनी, आईंनी दिलेल्या आशीर्वादाचा प्रवास......त्यांच्या त्या केविलवाण्या... लपंडाव खेळलेल्या हास्याचा प्रवास....ढगांमध्ये जाउन, ढगांना पाहण्याचा प्रवास....माणसाने केलेल्या प्रगतीच्या अभिमानाचा प्रवास.....बाजुला बसलेल्या मुलीशी मारलेल्या गप्पांचा प्रवास..... कानाच्या उघड-झापेचा प्रवास.... हा सगळा "प्रवास" थोडा थांबला आहे......'मनोगतावर'.... अनेक मित्रांना हा प्रवास घडवून आणण्यासाठी.

ते म्हणतात नां.... ३ आंधळ्यांनी हत्ती पाहिला...१ला म्हटला.. हत्ती झाडुसारखा असतो...२रा म्हटला... हत्ती सुपासारखा असतो... ३रा.... हत्ती मंदिराच्या जाड दगडी खांबासारखा असतो... कारण तिघांनी हत्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्ष केलेला असतो,,,तसच असेल कदाचित माझं मत अमेरिकेबद्दल....मी ही ह्या खंडाच्या एका अंगाला अनुभवेल..पुढच्या एका वर्षात....!!

१२ एप्रिल २००८ ला दुपारी १२ वाजता नेवार्क विमानतळावर मी पोहचलो आणि मी पाहिलेलं अजून एक सोनेरी स्वप्न पुर्ण झालं. मला माझ्या वडिलांचा विद्द्यार्थी घ्यायला आला होता. मला अगदी घरासारखं वाटलं. पण मात्र मी सोमवार ते शुक्रवार थांबलेल्या हॉटेलमध्ये माझं मन रमेना.....म्हणून मी अजून एक प्रवास केला. बँक ऑफ अमेरिका मध्ये उघडलेल्या खात्यापासून ते टी-मोबाईलच्या फोनपर्यंत.... आणि तो ही एका दक्षिण भारतिय कुटुंबासमवेत.....तिथे मी भाडेकरू म्हणून राहतो.

फोन घेतल्यानंतर मी घरी ४० मिनिटे बोललो तो आनंद मी शब्दात सांगुच शकत नाही. शनिवार - रविवार इथे फोन फुकट असतो, म्हणून मी अमेरिकेत माझ्या अगोदर आलेल्या माझ्या मित्रांशी तास-तास बोललो, त्या वेळी खुप-खुप बरं वाटलं..... अमेरिकेत तसा मी पहिला भारतिय नसेल म्हणा..‍ ज्याला नेवार्क ते वर्ल्ड ट्रेड सेंटर पर्यंत जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करतांना....मुंबईच्या लोकलची आठवण होउन... धक्के खातांना हसू येतं... न्यू जर्सी मध्ये पान भेटतं आणि ते विकत घेतल्यावर त्याला हसू येतं..‍ ज्याला शॉपींग मॉलमध्ये गेल्यानंतर अवाढव्य कांदा, लसुण, बटाटा ह्यांना बघून हसू येतं.... यु मी और हम आणि क्रेजी फोर ची पाटी पाहिल्यानंतर तर मला हसू आवरताच आलं नाही..‍ग खरंच खुप जवळ आलय बाबा... ह्याचीच प्रचीती आली.

हा प्रवास आता १४ एप्रिल २००९ पर्यंत चालणार आहे त्या नंतर काय होइल माहीत नाही. ह्या प्रवासाला सोनेरी, आनंदी, अविस्मरणीय बनवायला 'मनोगत' आहेच. खरं सांगू, मी ना एक तत्त्व बनवलं आहे ह्या प्रवासातुन....मी जेव्हा धुळेला शिकायला गेलो होतो ना, तेव्हा मला खुप-खुप वाईट वाटायचं....वाटायचं इथली धुळ्याची मुलं भाग्यवान आहेत... ह्यांची इथेच घरं आहेत....आई-वडील इथेच आहेत...मित्र आहेत, पन माझं तसं काहिच नाही....मी म्हणायचो नाही मी घरिच शिकेल....पण कासोद्याला तर महाविद्द्यालयच नाही...मग जाउद्या इथेच राहुया. आतली गोष्ट सांगायची म्हणजे मी २ दिवसात सामान घरी नेलेला....आणि १५ व्या दिवशी मीच माझ्या हाताने तोच सामान धुळेला आणलेला.८ मार्च २००१ ला जेव्हा मी १२ वीचा गणिताचा पेपर देउन धुळे सोडून घरी जात होतो तेव्हा मिश्र भावना झालेल्या... जिवाभावाचे मित्र झालेले... असंख्य आठवणी....मनसोक्त जगलेलो होतो. म्हणून मला आजही धुळ्यातली २ वर्षे जशीच्या तशी आठवतात...आणी आनंद होतो. पण जेव्हा मी इंजिनीयरींगच्या १ ल्या वर्षाला आलो तेव्हा पण तसंच..... सीओईपी कासोद्याला का उघडलं नाही ईंग्रजांनी..??? मी पुण्यात का शिकलो नाही लहानपणापासुन. पण आजही त्या ४ वर्षात घालवलेला एक-एक क्षण आनंददायी वाटतो.तसाच अमेरिकेत आल्यावरही ५ दिवस मला कंटाळा आला. परत जावसं वाटू लागलं. पण आता ठिक आहे. धुळ्यातल्या, पुण्यातल्या दिवसांसारखच ह्या दिवसांनाही अविस्मरणिय बनवायचय....‍ जगून घ्यायचय....आलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक घटका... आनंदाने....!!! एक प्रवास घडवण्यासाठी.

धन्यवाद.