नांगरावाचून नौका, नीड नसलेला विहंग
ना दिशा, ना ध्येय, मी तर दोर तुटलेला पतंग
मोजक्या शब्दात केले मोकळे मी अंतरंग
लाट सरली भावनांची, राहिले मागे तरंग
जळमटे, कोळिष्टके सांभाळली होती मनाची
अन् चिरेबंदी मतांचा राखला वाडा अभंग
तिष्ठला दारात माझ्या देव हे कळलेच नाही
वीट दिसली, का न दिसला त्यावरीचा पांडुरंग?
ह्या जगाची नाळ आता कापण्याची वेळ आली
वाजवा सनई, असे हा जन्म घेण्याचा प्रसंग
शोध नवतेचा मला, मृत्यो, तुझ्या दारात आणी
पाहुनी झालेत सारे जीवनाचे रागरंग
पाहुया कोणा कवीची दिव्य प्रतिभा दीप्त होते
ये निषादा, बाण चालव, क्रौंच मी मिथुनात दंग