(श्री कनकादित्य)
कोकण जसे आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते प्रसिद्ध आहे ते तेथील सुबक मंदिरे आणि त्यांच्या गुढरम्य दंतकथांबद्दल. मागील लेखात आपण आडीवऱ्याच्या श्री महाकाली मंदिराला भेट दिली. आडिवऱ्यापासून जवळच असलेले व महाराष्ट्रातील एकमेव असे सूर्यनारायणाचे मंदिर म्हणजेच आपल्या आजच्या भेटीचे ठिकाण कशेळीचे "श्री कनकादित्य मंदिर".
कशेळी गावचे भुषण असलेले श्री कनकादित्य मंदिर रत्नागिरिपासून ३२ आणि राजापुरपासून ३५ किमी अंतरावर आहे.
आपल्या भारतात फार कमी सूर्यमंदिर आहेत. सौराष्ट्रात प्रभासपट्टण, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या भागात काही सूर्यमंदिर
आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर तालुक्यातील हे सर्वात मोठे देवालय गावच्या मध्यभागी विस्तिर्ण सपाट प्रदेशात बांधले आहे. या मंदिराला उज्ज्वल अशी ऐतिहासिक पार्श्वभुमी लाभली आहे. मंदिरात जी आदित्याची मूर्ती आहे ती
सुमारे आठशे वर्षापूर्वी सोमनाथ नजिकच्या सूर्यमंदिरातून आणली गेली आहे.
कशेळी गावात या मूर्तीचे आगमन कसे झाले याबद्दल मंदिराच्या पुजारींनी एक दंतकथा सांगितली ती अशी की,
काठेवाडीतील वेटावळ बंदरातून एक नावाडी आपला माल घेऊन दक्षिणेकडे चालला होता. त्याच्या जहाजामध्ये हि
आदित्याची मूर्ती होती. जहाज कशेळी गावच्या समुद्रकिनारी आले असता अचानक थांबले. खूप प्रयत्न केला पण जहाज
मागेही जाईना आणि पुढेही जाईना. शेवटी नावड्याच्या मनात आले कि जहाजात जी आदित्याची मूर्ती आहे तिला
इथेच स्थायिक होण्याची इच्छा दिसते. मग त्याने ती मूर्ती कशेळीच्या समुद्रकिनारी असलेल्या एका नैसर्गिक गुहेत
आणून ठेवली आणि काय आश्चर्य! बंद पडलेले ते जहाज लगेचच चालू झाले. कशेळी गावात पूर्वी कनका नावाची एक
थोर सूर्योपासक गणिका राहत होती. एकदा तिच्या स्वप्नात सूर्यनारायणाने येऊन सांगितले की मी समुद्रकिनारी एका
गुहेत आहे तु मला गावात नेऊन माझी स्थापना कर. कनकेने हि हकिकत गावात सांगितली. गावकऱ्यांनी समुद्रावर
जाऊन शोध घेतला असता आदित्याची हि मूर्ती गुहेत सापडली. पुढे कनकेने गावकऱ्यांच्या मदतीने मंदिर बांधून तीची
स्थापना केली. कनकेच्या नावावरुनच या मंदिराला "कनकादित्य" आणि ज्या गुहेत आदित्याची हि मूर्ती सापडली ती
गुहा "देवाची खोली" म्हणून ओळखली जाते.
रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक व पुरातन महत्त्व असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी देशातील विविध भागातून
लोक येतात. चारही बाजुला भक्कम चिरेबंदी असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात इतर देवदेवतांचीही सुबक मंदिरे आहेत.
कोकणातील इतर देवलयाप्रमाणेच श्री कनकादित्यचे मंदिरही कौलारू आहे. मंदिर परिसरातील दीपमाळा, फरसबंदी
पटांगण, शांत वातावरण यामुळे मंदिर पाहताक्षणी मन प्रसन्न होते. मंदिरात कोरीव कलाकुसर केली असून ते
पुराणकालीन आहे. छतावर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर असून
श्री कनकादित्याची मूर्ती हि अतिशय आकर्षक आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून देवस्थानच्या भक्तनिवासात
राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते.
पन्हाळगडाचा राजा शिलाहार याने कशेळी गावात दररोज बारा ब्राह्मणांना भोजन घालण्यासाठी येनाऱ्या खर्चाकरीता
गोविंद भट भागवतांना कशेळी गाव इनाम दिला. त्याबद्दलचा ताम्रपट आजही मंदिरात पाहवयास मिळतो. गोविंद भट
श्री कनकादित्याचे पुजारी होते. आजही श्री कनकादित्याच्या पुजेचा मान त्यांच्या घराण्याला दिला जातो. अशा या
पुरातन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचे सांगितले जाते. तसेच इतिहासाचार्य राजवाडे, महोपध्याय
दत्तो वामन पोतदार, प्राध्यापक गंगाधर गाडगीळ, माधव गडकरी यांचीही श्री कनकादित्यावर श्रद्धा होती.
दरवर्षी रथसप्तमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. पाच दिवस साजरा होणाऱ्या या उत्सवाच्या काळात
कालिकावाडी येथून कालिकादेवीला वाजत गाजत गावात आणून देविचा मुखवटा श्री कनकादित्याच्या शेजारी ठेवला
जातो. कालिकादेवीबरोबर आडिवऱ्याची भगवती देवी हि तिची पाठराखीण म्हणून चार दिवस मुक्कामाला येथे येते.
उत्सवाच्या काळात किर्तन, प्रवचन, आरती, पालखी याचे आयोजन केले जाते. मंदिराचे कामकाज पाहणारे बारा जणांचे
विश्वस्त मंडळ या कार्यक्रमाचे चोख आयोजन करतात.
महाराष्ट्रातील एकमेव अशा या सूर्यनारायणाच्या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या.
जायचे कसेः
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.
रत्नागिरी पासून अंतर - रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी (३2 किमी)
राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे, कशेळी (35 किमी)